संगणक आला आणि घराघरांमध्ये रुळला, त्यानंतर समाजामधली एक तक्रार प्रचंड वाढली; ती म्हणजे मुलांनी मैदानावर जाणे आता कमी केले असून त्याऐवजी ते संगणकावर गेम्स खेळण्यात खूप वेळ वाया घालवू लागले आहेत. कॉम्प्युटर गेम्स हा प्रकारच त्या वेळेस नवखा होता, त्यामुळे नव्याची नवलाई म्हणून हे आकर्षण असेल असे समजून अनेकांनी सुरुवातीस त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर असे लक्षात आले की, कॉम्प्युटर गेम्समधील वैविध्यामुळे मुलांना घरबसल्या रंजनाचे एक आयतेच साधन उपलब्ध झाले आहे. शिवाय यात फारसे शारीरिक कष्टही करावे लागत नाहीत. त्यामुळे शॉर्टकटमध्ये अधिक आनंद अशी ही सोय आहे. साहजिकच, त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ कमी झाले, शॉर्टकट कुणाला नको असतो? या काळात पालकांच्या पिढीकडून केवळ तक्रारी वाढल्या. कॉम्प्युटर गेम्सऐवजी मुलांनी पर्याय म्हणून मैदानी खेळांकडे वळावे, यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. ‘‘अरे, कॉम्प्युटरवर काय खेळतोस जरा मैदानात जाऊन खेळ’’ असा धोशा लावणे म्हणजे मैदानी खेळांसाठीचे प्रयत्न नव्हेत. किती पालक आपल्या मुलांसोबत खेळण्यासाठी मैदानावर उतरले आणि त्यामध्ये असलेली गंमत आणि त्यानिमित्ताने मिळणारे जीवनशिक्षण त्यांनी मुलांना समजावून सांगितले? सर्वेक्षण केले तर लक्षात येईल, अशा पालकांची संख्या अगदीच किरकोळ आहे. मग कुणी पालक म्हणतीलही की, आता काय आम्ही मैदानावरपण उतरायचे का? खेळ फक्त लहान मुलांनीच खेळायचे असतात हे कुणी ठरवले? पालकांच्या पिढीनेही मैदानी खेळांना सोडचिठ्ठीच दिली आहे. रस्त्यावर किंवा मैदानाशेजारून जाताना तिथे सुरू असलेले क्रिकेट पाहण्यासाठी क्षणभर पाय आजही थबकतात.. कारण खेळ आपल्या मनात खोलवर रुजलेले असतात. पण पुन्हा मैदानावर उतरण्यास कधी स्वत:च्याच शारीरिक क्षमतांविषयी असलेली शंका आड येते तर कधी लाज. पण पुढची पिढी सुदृढ राखायची असेल तर लाज काही काळ बाजूला सारण्यात अक्कलहुशारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा