जगाच्या इतिहासात मानवाला शोध लागल्यापासून आजवर टिकून असलेली आणि सातत्याने पिढीदरपिढीगणिक किंमत वाढत असलेली गोष्ट म्हणजे सोने. पण गेल्या चार- सहा महिन्यांच्या कालावधीत जागतिक स्तरावर सोन्याचे भाव खाली आले असून येत्या काळात ते आणखी खाली येतील की काय अशी शंका भारत आणि चीन या जगातील दोन्ही सर्वात मोठय़ा बाजारपेठांमध्ये व्यक्त होते आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या सोने खरेदी-विक्रीच्या व्यवसायातील शिखर संस्थेनेही या संदर्भातील एक अहवाल दोन महिन्यांपूर्वीच जारी केला असून त्यातही सध्याचा कालखंड हा सोन्याच्याच सत्त्वपरीक्षेचा असल्याचे म्हटले आहे.
यंदाच्या वर्षी जागतिक स्तरावर खूप घडामोडी एकाच वेळेस घडत आहेत. युरोपचे भवितव्य ग्रीसवर अवलंबून आहे. इसिसमुळे मध्य आशियामध्ये अशांतता आहे. भारतातील मान्सून चांगला न झाल्याने दुष्काळाची भीती देशाला ग्रासून आहे, त्याचेही जागतिक परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर पाहायला मिळत आहेत. चीनचा विकास दर खालावल्याचा परिणामही जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतो आहे. ग्रीसच्या आर्थिक संकटातून मुक्तीचा सुरक्षित मार्ग म्हणून युरोपमध्ये सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. एरवी सोने हा युरोपच्या दृष्टीने कधीच फारसा स्वारस्य असलेला विषय नव्हता.
सोन्याच्या बाजारपेठेवर राज्य करतात ते भारत आणि चीन हे दोन देश. चीनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना सोन्यातील गुंतवणूक घटली, आणि शेअर बाजार कोसळला तेव्हा ती वाढणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्याचा फटका सोन्याच्या जागतिक बाजारपेठेला बसला. आता मात्र चीनच्या मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी राखीव निधी म्हणून ६०४ टन सोने खरेदीचा निर्णय घेतला असून त्यामुळे सोने बाजाराला एक चांगली दिशा मिळणे अपेक्षित आहे.
सोन्याच्या जागतिक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे तो भारतातील कमी पावसाचा आणि त्यामुळे आलेल्या दुष्काळाचा. जगात सर्वाधिक दागिन्यांमधील गुंतवणूक भारतात होते. यंदाच्या वर्षी ती जगात १४ टक्क्यांनी तर भारतात दुष्काळामुळे २३ टक्क्यांनी घटली आहे. त्यातच जून ते नोव्हेंबर लग्नाचे मुहूर्तच नसल्याने जागतिक अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत असताना खऱ्या अर्थाने हा काळ सोन्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला. जगातच याच कालखंडात ईटीएफ म्हणजेच पेपर गोल्डकडे खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्या तुलनेत कामगारांची चांगली बाजारपेठ (कामगार कायदे कडक असल्याने मंदीचा परिणाम फारसा जाणवत नाही) असलेल्या अमेरिकेत मात्र सातत्यपूर्ण वाढ सोन्याच्या खरेदीत पाहायला मिळते आहे.
भारतातील आकडेवारीबद्दल बोलायचे तर वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या संशोधन अहवालानुसार, भारताला गरज आहे ती हॉलमार्कची. सोन्याच्या कसाच्या खात्रीची. जागतिक दागिने बाजारपेठेतील ८ टक्के वाटा भारताचा आहे. त्यातील केवळ ३० टक्के दागिनेच हॉलमार्क असलेले असतात आणि ते सर्व अधिक किमतीचे असतात. तर कमी किमतीच्या दागिन्यांमध्ये केवळ १० टक्के दागिनेच हॉलमार्क असलेले असतात. भारताने थोडी काळजी घेतली आणि दागिन्यांवर हॉलमार्क असेलच, असा निर्णय घेतला तर भारतीय दागिन्यांना ४० टक्के जागतिक बाजारपेठ काबीज करता येईल, असे हा जागतिक अहवाल सांगतो. अर्थात याचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठाच फायदा होईल. सध्या सुरू असलेल्या सोन्याच्या सत्त्वपरीक्षेत भारताला केवळ उत्तीर्णच नव्हे तर अग्रेसर राहायचे असेल तर आपला मार्ग हॉलमार्कमधून जातो, हे निखळ सत्य आहे. त्या दिशेने पावले टाकत यंदाच्या विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करूया!
विजयादशमीच्या शुभेच्छा!