नेमेचि येतो या नियमाने ‘लोकप्रभा’चा बहुप्रतीक्षित पर्यटन विशेषांक पावसाळ्यात बाजारात येतो. या खेपेस आम्ही पर्यटनाच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली हॅपनिंग शहरे हा महत्त्वाचा विषय घेतला आहे. दुबई, हाँगकाँग व सिंगापूर या तीनही ठिकाणांना लाभलेला समुद्रकिनारा, त्यावर विकसित झालेली बंदरे, त्या निमित्ताने जागतिक व्यापारी केंद्रे म्हणून त्यांचा घडवून आणलेला उदय; त्याच वेळेस जागतिक दर्जाचे पर्यटन आणि मनोरंजन केंद्र व्हावे म्हणून जाणीवपूर्वक केलेले नियोजन आणि त्यामुळे आलेली भरभराट हा या सर्वाचाच विशेष आहे.
हे सर्व लेख व्यवस्थित वाचले तर लक्षात येईल की, यातील जमिनीची उपलब्धता असा विषय वजा केला तर हे सारे घडण्याची क्षमता असलेली दोन शहरे भारतात आहेत- पहिले अर्थातच मुंबई आणि दुसरे कोलकाता. या दोन्ही ठिकाणची संस्कृतीही भारतीयांबरोबरच विदेशी पर्यटकांनाही मोहवणारी आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर्स लांबीचा राणीचा रत्नहार पाहून भल्याभल्यांचे डोळे हरखून जातात. विशाल किनारपट्टी आहे, बंदर आहे, मात्र पायाभूत सुविधांच्या नावे बोंब आहे, अशी मुंबईची स्थिती आहे. सध्या सरकारने हाती घेतलेले मेट्रो रेल्वेचे जाळे आणि नवी मुंबईचा विमानतळ प्रत्यक्षात आला तर चित्र वेगळे असू शकते. किनारा आहे पण सागरी पर्यटनाची सुविधा नाही आणि जलमार्गे होणारी वाहतूकही नाही. गोराई ते नरिमन पॉइंट जलमार्गाचे स्वप्न बालपणापासून पाहणाऱ्या पिढय़ाही आता संपत आल्या तरी मार्ग अस्तित्वात आलेला नाही. कारण व्हिजन आणि नियोजन याची असलेली त्रुटी. हाँगकाँग असो किंवा मग दुबई अथवा सिंगापूर या प्रत्येक ठिकाणी कुणी तरी व्हिजन ठेवून नियोजनपूर्वक सारे काही घडवून आणले आहे. आपल्याकडचे व्हिजन दिसते ते केवळ निवडणुकांपुरते आणि तेही केवळ जाहिरातींमधूनच. बाकी प्रत्यक्षात त्याचीही बोंबच आहे. जी गत मुंबईची तीच काहीशी कोलकात्याचीही. विस्तीर्ण किनारपट्टी आहे, गंगेचा ओघ आहे. व्यापारी बंदर आहे मात्र मुंबईसारखीच व्हिजन आणि नियोजनाची बोंब आहे. या दोन्ही शहरांची ‘जागतिक क्षमता’ ब्रिटिशांच्या लक्षात आली होती. म्हणून त्यांनी ही दोन्ही बंदरे व्यापारउदिमासाठी विकसित केली. त्यानंतर मात्र आपल्याला या शहरांचा विकास म्हणावा तसा करता आला नाही. व्यापार-पर्यटन आणि भरभराट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मात्र तीन जागतिक शहरांनी दाखवून दिले आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. हिरवाईची दुलई पसरलेल्या अशा या ऋतूमध्ये निसर्गभ्रमंती. पावसाळी पर्यटन ओघानेच आहे. त्यातही अनवट, वेगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न ‘लोकप्रभा’ने दोन लेखांमधून केला आहे. याशिवाय केरळ, मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा मोहमयी फेराही आहेच. पर्यटन ही केवळ हौस नाही तर त्याने देशही जोडला जातो. ईशान्य भारतामध्ये असलेली तुटलेपणाची भावना नष्ट करण्यासाठी त्यांना पुन्हा जोडण्यासाठी आणि आपल्यालाही तिथल्या वेगळ्या वाटा धुंडाळण्यासाठी याचा फायदा होईल, याची जाणीव करून देणारा लेखही या विशेषांकात आहेच.
शुभास्ते पन्थान: सन्तु!
विनायक परब
@vinayakparab, vinayak.parab@expressindia.com