भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) तब्बल १६ टक्के भाग हा शेतीवर आणि पर्यायाने भारतीय मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळेच पाऊस चांगला किंवा वाईट झाला की त्याचे बरे-वाईट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतात.  एवढेच नव्हे तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. साखर, तांदूळ, गहू आणि कापूस या जगातील चार महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये जगभरात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या निर्यातीवर भारताची परकीय चलनाची गंगाजळी तर अवलंबून असतेच पण त्याचबरोबर जागतिक व स्थानिक बाजारपेठेतील या महत्त्वाच्या उत्पादनांचे दरही अवलंबून असतात. पाऊस चांगला झाला तर महागाई आटोक्यात राहते; नाही तर त्याचा फटका भारत वगळता इतरत्र अनेक देशांनाही बसतोच. भारतीय मान्सून हा अशा प्रकारे जगात इतरत्रही परिणाम करणारा ठरतो.

भारताच्या बाबतीत बोलायचे तर आपले जीवन हे पावसाशी थेट जोडलेले आहे. चांगल्या पावसामुळे जलसाठे वाढतात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. एवढेच नव्हे तर स्वस्तातील विद्युतनिर्मिती मानली गेलेली जलविद्युतनिर्मितीही मोठय़ा प्रमाणावर होते. एकविसाव्या शतकात प्रगती करायची तर विजेला पर्याय नाही. विजेमुळे देशातील उत्पादनप्रक्रिया वेगात होते. दुसरीकडे सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आजही आपली ६० टक्के जनता ही शेतीवरच जगणारी आहे. शेतीसाठी पाऊस सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. पाणी हे जसे शेतीसाठी आवश्यक आहे तसेच ते औद्योगिक प्रगतीसाठीही तेवढेच आवश्यक आहे. वाढलेले उत्पादन मग ते शेतीतील असो अथवा इतर; त्यामुळे ग्राहकाची क्रयशक्ती वाढते. त्यांच्या हातात पसे खेळू लागतात आणि याच पशांतून नवीन वस्तूंच्या खरेदीचे चक्र सुरू राहते आणि अर्थव्यवस्थेलाही गती मिळते. हे सारे होते ते मान्सूनमुळे. त्यामुळे हा मान्सूनचा पाऊस आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

गेल्या अनेक वर्षांत लहरी हा शब्दप्रयोग या मान्सूनला अधिक जोडला गेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाची खिल्ली उडवणारे अनेक विनोद देशभरात प्रचलित आहेत. त्याचा संबंध या भारतीय संशोधकांच्या प्रामाणिकतेशी नाही तर पावसाच्या या लहरीपणाशीच अधिक जोडलेला आहे. कारण तो मुळातच समजून घेणे कठीण आहे. जगभरात इतरत्र असलेल्या मान्सूनवरही संशोधकांनी काम केले आहे. मात्र भारतीय उपखंडातील मान्सून हा जगभरातील सर्वच संशोधकांसाठी मोठेच आव्हान ठरला आहे. त्याची व्यामिश्रता हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. ही व्यामिश्रता समजून घ्यायची असेल तर आपल्याला या क्षेत्रातील संशोधनावर मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. देशभरात सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जातो आहे. मात्र ज्या मान्सूनवर आपली अर्थव्यवस्था आधारलेली आहे, त्याच्या संशोधनासाठी गुंतवणूक करण्यावर आपण फारसे प्राधान्य दिलेले दिसत नाही.

पावसाच्या संदर्भातील वेधशाळेची भाकिते चुकली की त्यावर विनोद करण्यास पुढे सरसावणारे आपण सर्व याबाबतीत मात्र मागे आहोत, त्यामुळे या विनोदामागची विसंगती आपण आधी ध्यानी घ्यायला हवी. म्हणजे लक्षात येईल की, हा विनोद वेधशाळेवर नव्हे तर आपण आपल्या देशाच्या नियोजनावर केलेला विनोद आहे.

गेल्या अनेक वर्षांत मान्सूनचे महत्त्व लक्षात आल्यानंतर आपण वातावरणाच्या अभ्यासासाठी काही उपग्रहांमध्ये यंत्रणाही बसवल्या. तीन वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत करार करून उष्णकटिबंधातील हवामानाच्या आणि खासकरून मान्सूनच्या सखोल अभ्यासासाठीच मेघा-ट्रॉपिक्स हा स्वतंत्र उपग्रहच सोडला.  आता आपल्याला हे पुरते लक्षात आले आहे की, मान्सून तीन महत्त्वाच्या घटकांच्या क्रिया-प्रतिक्रियांवर अवलंबून असतो, जमीन, समुद्र आणि वातावरण. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी या तीन घटकांवर लक्ष केंद्रित करून केले जाणारे संशोधन भविष्यासाठी लक्ष्यवेधी ठरावे. यातही समुद्रातील वातावरण खूप महत्त्वाचे ठरते, हे जगभरातील सर्वच संशोधकांच्या लक्षात आले आहे. एल निनो आणि अल् निना यांचे प्रवाह मान्सूनवर परिणाम करतात. भूतलावर सर्वाधिक जागा व्यापून आहे तो समुद्रच. त्यामुळे समुद्राचा अभ्यास सखोल व्हायला हवा, हेही लक्षात आले. पण सर्वच संशोधकांचे लक्ष केंद्रित झाले होते ते प्रशांत महासागरातील या प्रवाहांकडे. पण गेल्या काही वर्षांच्या अभ्यासात भारतीय संशोधकांच्या हेही लक्षात आले की, भारतीय मान्सूनवर खूप मोठा प्रभाव आहे, तो िहदी महासागराचा. पण त्याचा फारसा सखोल अभ्यास झालेला नाही. म्हणूनच यंदाच्या पावसाळ्यात आता िहदी महासागरातील परिस्थितीचा अभ्यास सखोल करण्यासाठी सागरी संशोधक आणि हवामानतज्ज्ञ िहदी महासागराच्या पट्टय़ामध्ये एका संशोधक नौकेवर तब्बल ७० दिवस तळ ठोकून असणार आहेत. हवामानाच्या संदर्भात सर्वाधिक संशोधन करणाऱ्या ब्रिटनमधील एका विद्यापीठाशीही यासाठी करार करण्यात आला असून या विद्यापीठाने विकसित केलेल्या रोबो सोबत अभ्यास केला जाणार आहे. प्रत्यक्ष मान्सूनदरम्यान सागरतळामध्ये, खास करून तिथे असणाऱ्या उष्ण आणि शीत प्रवाहांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास या रोबोमार्फत केला जाणार आहे. हा रोबो सागरतळाशी बुडी मारणार असून त्याच्यामार्फत नोंदी केल्या जातील. असा अभिनव प्रयोग भारतीय संशोधकांनी प्रथमच हाती घेतला आहे. यामुळे भारतीय संशोधकांचे पावसासंदर्भातील दावे अधिक अचूक येतील, अशी अपेक्षा आहे.

गेल्या दहा वर्षांत भारतीय हवामानशास्त्र विभागाने बऱ्यापकी प्रगती केली आहे.  पूर्वी वर्षांनुवष्रे पावसाचा वेध घेण्यासाठी केवळ स्टॅटेस्टिकल मॉडेल वापरले जात होते. त्यानंतर त्यात डायनॅमिक मॉडेलची भर पडली आणि दोन्हींचा वापर सुरू झाला. आता नव्या संशोधनानंतर पूर्णपणे डायनॅमिक असलेले नवीन मॉडेल विकसित केले जात असून त्यामुळे अधिक अचूक अंदाज वर्तविला जाईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांत अचूकतेमध्येही बऱ्यापकी वाढ झाली आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

एकूण तीन प्रकारचे अंदाज हवामानशास्त्र विभागातर्फे जाहीर केले जातात. एक असतो सुरू असलेल्या ऋतुमानानुसार, दुसरा अल्प काळासाठी आणि तिसरा मध्यम कालखंड म्हणजेच साधारणपणे २० दिवसांसाठी. भारतीय संशोधकांनी आता २० दिवसांपर्यंतच्या अंदाजावर लक्ष केंद्रित केले असून तो शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरेल, कारण त्यांना पेरणीच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. याशिवाय येणाऱ्या काळात जिल्हावार अंदाजांबरोबरच त्याहीपेक्षा लहान क्षेत्रासाठी म्हणजे ब्लॉकसाठी अंदाज व्यक्त करण्याचे लक्ष्य आहे.

मात्र हे सारे करताना काही महत्त्वाच्या अडचणींचा सामनाही या विभागास करावा लागतो आहे, तो म्हणजे या संशोधन मोहिमांसाठी होणारा अर्थपुरवठा. हवामानाच्या अंदाजाच्या अचूकतेसाठी तुमच्याकडे असलेला विविधांगी डेटाबेस खूप महत्त्वाचा असतो. हा माहितीचा साठाच संशोधकांसाठी अतिशय उपयुक्त असतो. तो साठा करण्याची क्षमता अलीकडेच १.२ पेटाफ्लॉप्सवरून वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून ती २०१७ पर्यंत १० पेटाफ्लॉप्सपर्यंत नेली जाणार आहे. दुसरीकडे माहितीचे स्रोत वाढविण्यासाठी सध्या असलेल्या ८०० निरीक्षण केंद्रांची संख्या तब्बल सहा हजारांवर न्यावी लागणार आहे. शिवाय हा ‘बिग डेटा’ हाताळण्यासाठी महासंगणक आवश्यक ठरेल, तरच या ‘बिग डेटा’चा उपयोग होऊ शकेल. त्यासाठी सध्या केवळ ४०० कोटींची गुंतवणूक सरकारने केली आहे. गरज आहे ती यापेक्षाही अनेक पटींनी या क्षेत्रामध्ये गुंतवणूक येईल हे पाहण्याची. देशातील उत्पादकता आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) यांच्याशी ही गुंतवणूक थेट संबंधित असेल.

दुसऱ््या एका महत्त्वाच्या गोष्टीकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शेतकरी आजही पावसाच्या बाबतीत अवलंबून राहतात ते वेधशाळेपेक्षा पिढय़ान्पिढय़ा त्यांच्याकडे मौखिक परंपरेतून चालत असलेल्या ज्ञानावर. यात निसर्गाकडे त्यातील किडे-मुंग्या, प्राणी यांच्या वर्तनाकडे त्यांचे अधिक लक्ष असते. कारण प्राणी- किडे- मुंग्या यांचा अंदाज कधीच चुकत नाही. आपल्याकडे असलेल्या या पारंपरिक ज्ञानाचा विज्ञानाच्या अंगाने गांभीर्यपूर्ण सखोल अभ्यास करण्यामध्येही गुंतवणूक करण्याची हीच नेमकी वेळ आहे. अन्यथा लहरी पाऊस येईल आणि जाईलही. पण त्याचे नियोजन करण्यासाठीचे हत्यार आपल्याकडे नसेल आणि मग पालथ्या घडय़ावर पाणी अशीच आपली अवस्था कायम राहील!
vinayak-signature
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com