विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
दोन महत्त्वाच्या लक्षवेधी घटना या आठवडय़ात घडल्या. त्यातील पहिली महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे कोविडने आता समूहसंसर्ग प्रसाराची वेस ओलांडली आहे. अमेरिकेने तर २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर ज्या दिवशी संसर्ग नेमका कुठून सुरू झाला आहे ते शोधणे कठीण गेले, त्याच दिवशी समूहसंसर्ग झाल्याचे जाहीर केले. आपण मात्र ते टाळले. समूहसंसर्ग दाखविण्याइतकी आकडेवारी नाही, असा युक्तिवाद त्या प्रसंगी करण्यात आला होता. मात्र समूहसंसर्ग जाहीर केला जातो तो आकडेवारीवर नाही तर जेव्हा संसर्गाचे मूळ शोधणे अशक्य होते त्यावेळेस. मात्र समूहसंसर्ग जाहीर झाला तर सरकारची अडचण अधिक होईल आणि टीकेचे लक्ष्य होईल, या भीतीने ते टाळण्यात आले.
आता मात्र कोविडने समूहसंसर्गाची वेस भारतात ओलांडल्याचे कोविडच्या जनुकीय चाचण्या करून त्यांचे निदान करणाऱ्या प्रयोगशाळांची शिखर संस्था असलेल्या इन्साकॉगने जाहीर केले आहे. एखादा रोग किंवा विकार विशिष्ट भूप्रदेशात वेगात पसरतो त्यावेळेस त्यास साथ (एपिडेमिक) असे म्हटले जाते. तो वेगात जगभरच पसरू लागतो त्यावेळेस त्यास पॅन्डेमिक म्हटले जाते आणि त्याच्या संसर्गाचे मूळ शोधणेच कठीण होते, तो अतिवेगात संक्रमित होत आता कायम इथेच राहणार असे लक्षात येते त्यावेळेस त्यास एन्डेमिक असे म्हटले जाते. कोविडसोबत जगणे हे तर आता अनिवार्य असेच आहे आणि त्याने समूहसंसर्गाची पातळीही ओलांडली आहे.
नेमका याच वेळेस आता कोविडकाळात भारतातील कुटुंबांच्या आर्थिक स्थितीचे विवेचन करणारा अहवालही प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. कोविडकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लाखोंना रोजगार गमवावा लागला याची चर्चा सातत्याने होत आहे. मात्र त्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. आता पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात त्याची वानगी पाहायला मिळते आहे.
या सर्वेक्षणानुसार भारतातील २० टक्के गरीब कुटुंबांच्या बाबतीत त्यांची आर्थिक स्थिती २०१५—१६ च्या तुलनेत तब्बल ५३ टक्कय़ांनी घसरली आहे. या अहवालातील दुसरी लक्षणीय बाब म्हणजे निम्न मध्यमवर्गाचा प्रवास, गरिबीच्या दिशेने तर गरिबांचा अतिगरिबीच्या दिशेने सुरू आहे. डोळ्यात अंजन घालणारे दुसरे जळजळीत वास्तव म्हणजे उच्च मध्यमवर्गातील मंडळींचा प्रवास याच कोविडकाळात उच्च आर्थिक स्तराच्या दिशेने सुरू झाला आहे. तर श्रीमंत वर्गाचा प्रवास अतिश्रीमंतांच्या दिशेने. अतिश्रीमंत वर्गातील २० टक्कय़ांच्या संपत्तीमध्ये तब्बल ५६ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, भारतीयांमधली गरीब— श्रीमंत यांच्यामधली दरी आता अधिक रुंदावते आहे, सुदृढ समाजासाठी हे चांगले लक्षण निश्तिच नाही. शिवाय हा अहवाल शहरातील गरिबांच्या अधिक वाईट होत चाललेल्या स्थितीकडेही लक्ष वेधतो. ग्रामीण भागात पैसे नाहीत म्हणून लोकांचा ओघ शहरांच्या दिशेने येतो. शहरांमध्ये कष्ट उपसावे लागले तरी काही पैसे कनवटीला उरतात. मात्र कोविडकाळाचा जबर फटका शहरातील गरिबांना सहन करावा लागला आणि त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. आता तर कोविड इथेच कायम राहणार असल्याने (एन्डेमिक) आता त्याच्यासोबत जगण्याचे मार्गही शोधावे लागतील. पुढील आठवडय़ात देशाचा अर्थसंकल्प सादर होईल, त्यामध्ये देशातील विस्तारत जाणारी ही आर्थिक दरी कमी करण्याची संधी सरकारकडे असणार आहे. अर्थात सरकार या अतिमहत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देणार की त्यांची नजर येणाऱ्या काळातील निवडणुकांवरच असणार, हे येत्या मंगळवारीच स्पष्ट होईल!
