संपत्तीची उधळण आणि आवाजाचा दणदणाट याशिवाय अलीकडे आपले उत्सव साजरे झाल्यासारखे वाटतच नाहीत. दरवर्षी गणेशोत्सवात ही उधळण आणि आवाजाचा दणदणाट वाढतानाच दिसतो. तो आता एवढा वाढला आहे की, या गदारोळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) कष्टपूर्वक संपादन केलेले महत्त्वाचे यशही त्या गणेशोत्सवाच्या गदारोळासमोर झाकोळून गेल्यासारखेच झाले आहे. प्रसारमाध्यमांनाही सध्या रुची आहे ती लोकप्रिय गोष्टींचीच. त्यामुळे अनेक गल्ल्यांच्या राजांपुढे लागलेल्या दर्शनाच्या रांगांपलीकडे त्यांनाही फारसे काही दिसेनासे झाले आहे. त्यामुळे जे यश खरे साजरे व्हायला हवे, ते दुर्लक्षित राहिल्याची खंत आहे.
महाराष्ट्रात गौरींचे आगमन झाले त्याच दिवशी दुपारच्या वेळेस इस्रोच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रातील संशोधकांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी चुकला. कारण जीएसएलव्ही-एफ ०५ प्रक्षेपणासाठी सज्ज होते. ते या प्रक्षेपकाचे पहिलेच ऑपरेशनल उड्डाण होते आणि त्याच वेळेस त्यातील एक त्रुटी लक्षात आली. परिणामी संशयाची पाल तर मनात चुकचुकलीच, कारण जीएसएलव्हीच्या उड्डाणामधील एका अपयशाची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर जगभर झालेली होती. त्यानंतरची दोन उड्डाणे भारताने यशस्वी करून दाखवली होती. पण हे तिसरे आणि ऑपरेशनल उड्डाण यशस्वी होणे इस्रोतील संशोधकांसाठीच नव्हे तर देशासाठीही सर्वाधिक महत्त्वाचे होते. याला अनेक कारणे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तिसरे उड्डाण यशस्वी ठरल्यानंतर क्रायोजनिक इंजिनच्या क्षेत्रात भारत पारंगत झाल्याच्या मुद्दय़ावर शिक्कामोर्तब होणार होते. भारताच्या या यशाकडे अनेकांच्या नजरा होत्या. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील भारताचे यश हे केवळ वाखाणण्याजोगे असल्याचे तर या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्था असलेल्या अमेरिकेच्या नासानेही मान्य केले आहे. चांद्रयान-एकच्या यशस्वितेच्या वेळेस नासाचे प्रमुख म्हणाले होते की, आमच्या एका योजनेची तरतूद म्हणजे इस्रोचे वर्षांचे बजेट. असे असतानाही त्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्राप्त केलेले कौशल्य हे अमेरिकन संशोधकांनीही शिकण्यासारखे आहे. शिवाय भारत कमीत कमी खर्चात सर्वोत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगभर ओळखला जातो. म्हणूनच तर केवळ अविकसित किंवा विकसनशील देशच नव्हेत तर विकसित देशही त्यांच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताच्याच खात्रीशीर पर्यायाला पसंती देतात. कारण संपूर्ण प्रक्षेपणासाठी खर्च करण्यापेक्षा त्यांना भारताकडून स्वस्तात ते करून घेणे परवडणारे असते. आपल्यासाठी ते अधिक स्वागतार्ह एवढय़ाचसाठी की, त्यातून देशाला परकीय चलन मिळते आणि आपल्या गंगाजळीत भर पडते. याशिवाय हे उड्डाण यशस्वी झाल्यास क्रायोजनिक इंजिनच्या तंत्रज्ञानामध्ये निर्वविाद कौशल्य संपादन करणाऱ्या अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान व चीन या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारतालाही स्थान मिळणार होते, जे नंतर मिळालेही!
पण, हा पणच अधिक त्रासदायक वाटत होता. एवढे सारे प्रयत्न केल्यानंतरही एक त्रुटी राहिल्याचे लक्षात आले आणि उड्डाण ४० मिनिटे लांबले; परंतु त्यानंतर सायंकाळी ४.५० वाजता झालेले उड्डाण यशस्वी तर ठरलेच, त्याचबरोबर त्यानंतरच्या १७ व्या मिनिटाला इन्सॅट थ्रीडीआर भूस्थिर कक्षेत यशस्वीरीत्या स्थिरावला आणि संपूर्ण मोहीम यशस्वी ठरली. अर्थात नंतरच्या भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थिरावण्याचा भारतीय संशोधकांना बिलकूल ताण नव्हता. कारण त्यात ते माहीर आहेत. चांद्रयान-एक असो किंवा मग मंगळयान, पहिल्याच प्रयत्नात दूरवर असलेल्या चंद्राच्या कक्षेत आणि मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा भारत हा एकमात्र देश आहे. एवढय़ा दूर असलेल्या ग्रहांच्या कक्षेत उपग्रह नेऊन स्थिरावण्याचे कौशल्य असलेल्या संशोधकांसाठी भूस्थिर कक्षा हा लहान मुलांच्या खेळण्याइतकाच सोपा प्रकार होता. प्रश्न होता तो क्रायोजनिक इंजिनच्या यशस्वितेचा. कारण तिथे खरी कसोटी लागणार होती.
पीएसएलव्ही हा भारताचा उपग्रह प्रक्षेपक अगदी खात्रीचा आहे. त्याने आजवर अनेक यशस्वी उड्डाणे केली आहेत. मात्र भविष्यातील सर्व मोहिमा या लांब पल्ल्याच्या आणि त्या वेळेस अधिक वजनी यंत्रणा अवकाशात नेणाऱ्या असणार आहेत. त्यासाठी पीएसएलव्हीऐवजी अधिक किफायतशीर ठरेल तो उपग्रह प्रक्षेपक जीएसएलव्ही असणार आहे आणि त्यात क्रायोजनिक इंजिनची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हजार किलोपेक्षा अधिक वजनाच्या यंत्रणा वाहून नेण्याची क्षमता क्रायोजनिक इंजिनामुळे प्राप्त होते. इंधन आणि त्याला ज्वलनासाठी लागणारा ऑक्सिडायझर या दोन्हींचे ज्वलन एकाच क्षमतेने झाल्यास त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते, जी साधारणपणे सेकंदाला साडेचार किलोमीटर एवढा वेग प्रक्षेपकाला प्राप्त करून देते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाची कक्षा पार करणे अगदी सहज शक्य होते. एरवी पीएसएलव्हीमध्ये अधिक वजनाचे उपग्रह नेणे शक्य नव्हते. म्हणूनच जीएसएलव्हीचा घाट घालण्यात आला, पण हे सारे प्रकरण एवढे सोपे नव्हते. कारण यामध्ये तीन महत्त्वाच्या अडचणी होत्या. पहिली म्हणजे यातील इंधन आणि ऑक्सिडायझर यांची साठवणूक क्रायोजनिक तापमानामध्ये म्हणजेच उणे १८३ ते उणे २५३ अंश सेल्सियसमध्ये करावी लागते. शिवाय त्यांच्या ज्वलनाच्या वेळेस निर्माण होणारे सुमारे तीन हजार अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणारे तापमान नियंत्रितही करावे लागते.
हे तंत्रज्ञान हाच यातील कळीचा मुद्दा होता. कारण हे इंजिन तयार करण्यासाठी त्या अपेक्षित तापमानाला वितळणार नाहीत अशी संमिश्र धातूची साठवण टाकी तयार करावी लागते. अशा प्रकारचे उच्च तंत्रज्ञानाचे काम आपल्याकडे फारच कमी वेळेस होते. त्यामुळे अशा संमिश्र धातूच्या निर्मितीपासून इस्रोला काम करावे लागले. एरवी युरोप-अमेरिकेमध्ये सार्वजनिक उद्योग वर्षांनुवष्रे या क्षेत्रात असतात, शिवाय त्यांच्याकडे निधीही खूप मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतो. त्यामुळे ते काम अंतराळ संशोधन संस्थांसाठी तुलनेने सोपे असते. मात्र भारतात यातील अध्र्याहून अधिक गोष्टी विकसित करण्याचे काम इस्रोलाच तेही कमीत कमी निधीमध्ये करावे लागते. त्यामध्ये आपल्या संशोधकांच्या कौशल्याचा कस लागतो, किंबहुना म्हणूनच क्रायोजनिक इंजिनसह झालेल्या या जीएसएलव्हीच्या उड्डाणाला यशाचे अनेक पदर आहेत.
क्रायोजनिक इंजिन तयार करण्याचे प्रयत्न काहींनी केलेही, पण यश प्राप्त झालेले केवळ पाचच देश आहेत. कारण हे इंधन नेमके वापरले गेले, यशस्वी ठरले तर सूत नाही तर भूत अशी अवस्था आहे. त्यामुळेच गुरुवारचे हे उड्डाण यशस्वी झाले त्या वेळेस विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे प्रमुख संचालक के. शिवन म्हणाले की, खरे तर हा व्रात्य मुलगाच, पण आज मात्र तो अगदी शहाण्यासारखा वागला. अर्थात त्या व्रात्य मुलाला शहाणा करणे हेच इस्रोच्या संशोधकांचे स्पृहणीय असे महत्त्वाचे यश आहे.
इस्रोच्या या यशामुळे आता अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. सध्या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या जिओ नावाच्या एका वादळात सापडल्या आहेत. रिलायन्सच्या जिओने मोफत कॉल्स आणि कमी दरात डेटापॅक असे पॅकेज सादर केले आहे. त्यांचे दर एवढे कमी आहेत की, त्यामुळे आपले ग्राहक रिलायन्सकडे वळू नयेत यासाठी भविष्यात इतर कंपन्यांनाही दर कमी करावे लागतील आणि नव्या दरयुद्धाला सुरुवात होईल, असे म्हटले जाते. मात्र लोकांचा रिलायन्सबद्दलचा अनुभव फारसा चांगला नाही. येणाऱ्या काळात असेच दरयुद्ध अंतराळ संशोधन क्षेत्रात अपेक्षित आहे. कारण भारतीय जीएसएलव्ही इतरांपेक्षा अध्र्या किमतीत परवडणारा असेल आणि महत्त्वाचे म्हणजे खात्रीशीरदेखील. रिलायन्स आणि इस्रो यांच्यामध्ये खात्रीपूर्वकता किंवा विश्वासार्हतेचा महत्त्वाचा फरक हाच आहे. ही विश्वासार्हता तर इस्रोने चांद्रयान-एकच्या उड्डाणापूर्वीच प्राप्त केली होती. म्हणून तर नासाने विश्वासाने आपली यंत्रणा चांद्रयान-एकमधून चंद्रावर पाठवली. त्यामुळे आता या नव्या अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर इस्रोकडून अध्र्या किमतीत काम होणार असेल तर विकसित देशही इस्रोच्या खात्रीशीर मार्गाने जाणे पसंत करतील आणि त्याचा पुन्हा एकदा देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला फायदाच होईल.
जिओ इस्रो!
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com