विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
कविवर्य, गीतकार गुलजार यांना ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात एकदा प्रश्न विचारला होता, सर्वात जास्त आनंद केव्हा होतो, त्या वेळेस ते उत्तरले होते, आपण कुठेतरी दूर प्रवासात असतो. कोणत्या तरी एका रस्त्यावर चहाच्या ठेल्यावर किंवा धाब्यावर क्षणभर उसंत घेत असतो आणि जवळच असलेल्या ट्रकमध्ये आपल्याच गीताचे सूर ऐकू येतात. पुढे प्रवासात तेच गीत, तेच सूर वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येतात. गाणं तुफान लोकप्रिय झाल्याची ती पावतीच असते.. तो सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. कार्यक्रम संपल्यावर गुलजारजींना विचारलं, खरं तर कोणतंही एफएम चॅनल लावलं किंवा मग कुठंतरी गाणी लावलेली आहेत, स्थळ कुठलंही असलं तरी अनेकदा आवाज लताबाईंचाच असतो. मग त्याला काय म्हणणार.. त्यावर गुलजारजी उत्तरले होते.. वो तो आसमाँ है. धरतीपर कहींभी जाओ आसमाँ तो होगाही!
लताबाईर्ंचे सूर हे असे आसमंतात सर्वत्र भरून राहिलेले असणारच. त्या देहाने हयात नसल्या तरीही, आणि हाच त्यांच्या कारकीर्दीचा विशेष आहे. मरावे परी, कीर्तीरूपे उरावे असे समर्थ रामदास म्हणतात तेव्हा त्यात कीर्ती म्हणजे केवळ लोकप्रियता नव्हे तर कार्यकर्तृत्वच अपेक्षित असते. लताबाईंचे कर्तृत्व हे असे शब्दश दशांगुळे व्यापून उरणारे असेच आहे. केवळ हजारोंच्या संख्येमध्ये गाणी एवढेच ते संख्याशास्त्रीय नाही तर गुणवत्तेच्या कसावरही त्या पूर्णत्वास उतरतात. राग- लोभ, आनंद-सुख, दुख, प्रेम, माया, रुसवा -फुगवा, करुणा आदी आणि अशा जेवढय़ा म्हणून भावना माणसाला व्यक्त करता येतात त्या त्या सर्व भावना व्यक्त करणारी गीते लताबाईंनी गायली. त्यामुळे साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाला आवडणारे, त्याच्या थेट काळजाला भिडणारे असे एक तरी गाणे लताबाईंचे असतेच असते. ‘लोकप्रभा’च्या ‘अनाहत नाद’ या प्रस्तुत ‘लता मंगेशकर विशेष’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू, शर्मिला टागोर या सर्वानीच ‘अभिनेत्रींचा आत्मा’ असा लताबाईंचा उल्लेख केला आहे.
अभिनेत्री स्मिता पाटीलच्या अकाली निधनानंतर तिची बहीण मन्या पाटील जेठमलानीने स्मिताच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. तेव्हा प्रत्येक छायाचित्र निरखून पाहात लताबाईर्ंनी त्यातल्या बारकाव्यांची चर्चा केली होती. तो काळ एरिअल फोटोग्राफीचा नव्हता. शूटिंग दरम्यान एका झाडावर चढून स्मिताने खाली पत्ते खेळत बसलेल्या स्पॉटबॉयचे टिपलेले ते चित्र किती अनोखे आहे, याची चर्चा लताबाईंनी तिथेच केली होती. केवळ गळा नव्हे तर कलात्मक नजर हेही त्यांचे गुणवैशिष्टय़ होते. ताजमहाल तर त्यांनी नानाविध अँगलने, कलात्मक पद्धतीने टिपला होता. दोन वर्षांपूर्वी मुलाखतीच्या निमित्ताने साधलेल्या संवादादरम्यान त्यांना जाणून घ्यायची होती, ती मिररलेस कॅमेऱ्याची जादू. या नव्या तंत्रज्ञानाने छायाचित्रणात नेमका काय फरक पडतो, ते याही वयात समजून घेण्याची उत्सुकता होती. पण रंगीतपेक्षाही आवडायचे कृष्णधवल चित्रणच त्यात कृष्ण आणि धवल या दोन रंगांच्या मध्येच जगाच्या साऱ्या छटा सामावलेल्या असतात, लताबाई म्हणाल्या होत्या.
अलीकडे वाद कशावरून होईल, सांगता येत नाही. निधनानंतरही त्यांच्यावर काहींनी टीका केली.. आता अनेकांना संधी मिळते आहे. वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांचा टीकाकारांनी उल्लेख केला. तेच कार्यक्रम व्यवस्थित पाहिले तर लक्षात येईल. लताबाईच मापदंड आहेत. परीक्षक म्हणतात, ‘क्या बात है, डिट्टो लतादीदी!’ गाणीही अनवट, अवघड निवडली जातात त्यातही त्याच असतात.. गुलजार म्हणतात तसं.. वो तो आसमाँ है, धरतीपर कहींभी जाओ आसमाँ तो होगाही!
