सुमारे दीड वर्षांंपूर्वी संपूर्ण जगालाच करोना नावाच्या विषाणूने ग्रासले. त्या वेळेस अनेकांनी ‘वार्ता विघ्नाची’ या शब्दांमध्ये जगात भयकंप निर्माण करणाऱ्या महासाथीचे वर्णन केले. समर्थ रामदासस्वामींनी सुप्रसिद्ध आरतीमध्ये गणपतीच्या स्तुतीपर वर्णनात, त्याला ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ म्हणताना ‘वार्ता विघ्नाची’ असा उल्लेख केला आहे. इसवीसन पूर्व शतकांपासून विघ्न घेऊन येणारा विनायक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि नंतर गणपती म्हणून लोकमानसात रूढ झालेल्या गणेशाच्या रूपाकाराचा; त्याच्या त्या रूपाकाराच्या अन्वयार्थाचा आणि एकूणच शक्तिगणेश म्हणून समाजमनात दृढरूपाने मूळ धरण्याच्या त्याच्या स्थित्यंतराचा प्रवास अनोखा आहे. ‘लोकप्रभा’च्या या गणेश विशेषांकातील प्रणव गोखले व शमिका वृषाली यांचे अभ्यासपूर्ण लेख याच प्रवासाचे संशोधनात्मक वर्णन करणारे आहेत. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता; त्यामुळेच ती बुद्धीने समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
देवतांना सुप्रतिष्ठित करण्यासाठी पुराणे येतात, कथा- दंतकथा आणि नंतर सुभाषितेही येतात. याच लाडक्या गणरायाचा प्रवास डॉ. हर्षदा सावरकर आणि डॉ. मृणाल नेवाळकर यांनी रंजक साहित्यिक पद्धतीने उलगडला आहे. गणपतीची लोकप्रियता अशी की, इतर कोणत्याही देवतेपेक्षा तो सर्वाधिक नजरेस पडतो. मग घराच्या गणेशपट्टीपासून ते ‘दगडांचा देश’ असलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्लय़ांच्या दरवाजापर्यंत, मंदिरांच्या ललाटिबबापासून ते वाडय़ांच्या प्रवेशद्वारांपर्यंत यत्र-तत्र-सर्वत्र! या अनोख्या गणेशपट्टय़ांचा शोध आशुतोष बापट यांनी घेतला आहे. गणपतीला आपण प्रेमाने ‘बाप्पा’ म्हणतो, असा मान इतर कोणत्याच देवतेला लाभलेला नाही. यालाच पुढे नेणारी दादा- तात्या-मामा गणपतींची नंदुरबारची अनोखी प्रथा उज्ज्वल कुलकर्णी यांनी उलगडली आहे. लंबोदर असलेली देवता येते तिच हातात मोदक घेऊन पण हल्लीच्या फिटनेस- फ्रिक जमान्यात मोदक थोडे बदनाम झाले आहेत. म्हणूनच पोषणमूल्य तज्ज्ञ असलेल्या डॉ. अंजली कुलकर्णी यांचा नैवेद्याचे ताट हा वैज्ञानिक लेखही आम्ही विशेषांकात समाविष्ट केला आहे. मात्र तेवढय़ावरच न थांबता ‘लोकप्रभा’च्याच तुषार प्रीती देशमुख आणि मुसाफीर खवय्या या लोकप्रिय शेफ जोडगोळीने नैवेद्यासाठी वेगळ्या रेसिपीजही सादर केल्या आहेत. खवय्यांना त्या नक्कीच आवडतील, याची आम्हाला खात्री आहे.
सर्वत्र महिला आघाडीवर असलेल्या या जमान्यात मग गणरायाला साकारण्यात त्या तरी मागे का राहतील? महिला शिल्पकारांनी घेतलेली ही आघाडी राधिका कुंटे यांनी नोंदली आहे. गणपती ही कलेची देवता मग कलाकारांच्या सृजनशीलतेला गणेशोत्सवात धुमारे फुटले नाही तरच नवल. विजया जांगळे यांनी गणेशोत्सवातून करिअरची सुरुवात करणाऱ्या कला दिग्दर्शकांचा आढावा घेतला आहे. करोनोत्तर गणेशोत्सवाचा आढावा प्रवीण वडनेरे यांनी घेतला आहे तर शिवाजी गावडे यांनी बदललेल्या गणेशोत्सवावर एक दृष्टिक्षेप टाकला आहे. ..तर पाहताक्षणीच प्रेमात पडावे अशी प्रसिद्ध शिल्पकार विशाल शिंदे यांनी साकारलेली गणरायाची मूर्ती मुखपृष्ठावर विराजमान आहे, ती रसिक वाचकांना नक्कीच आवडेल!
अंधाऱ्या बोगद्यामध्ये गाडी शिरल्यानंतर काही क्षण जाणवणारी अनिश्चितता, तो मिट्ट काळोख.. गेले दीड वर्ष सारेच अनुभवत आहेत. अद्यापही अंधारलेला ‘करोना बोगदा’ संपायचे नावच घेत नाहीए. या अवस्थेत नित्यनेमाने येणारा आणि भक्तांना उत्साहाची लस देणारा गणेशोत्सव यंदा करोनाची काळोखी दूर करणारा ठरो. अर्थात केवळ गणेशाला साकडे घालून चालणार नाही तर मास्क कायम तोंडावर असेल आणि आपण शारीरिक अंतर राखून हा उत्सव साजरा करणार असू, तरच दुखहरण करणारा हा गणपती भक्तरक्षणार्थ सोबत असेल याचेही भान ठेवू या!
गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com