आपल्या सर्वाचे हे भाग्यच की, नानाविध प्रथा- परंपरा, त्यातही अनेकदा विरोधाभासात्मक परंपराही एकत्र खेळविणाऱ्या अशा या भारत देशात आपला जन्म झाला आणि दुर्दैव असे की, या प्रथा- परंपरांकडे आपण केवळ दंतकथा म्हणूनच पाहिले आणि त्याचा शास्त्रीय अभ्यासच केला नाही. काहींनी त्यांच्या अभ्यासामध्ये भावनेला किंवा धर्माला अधिक महत्त्व देत, त्याच अंगाने विचार करत त्याचे मूळचे महत्त्वच कमी केले आणि शास्त्रकाटय़ाची कसोटी नाकारण्याचे दुष्कर्मही केले. या साऱ्याचा परिणाम असा की, आपण आपली पाळेमुळे समजून घेण्यात कमी पडलो. समाजात खोलवर रुजलेल्या प्रथा- परंपरा चांगल्या की, वाईट हा वादाचा विषय ठरू शकतो. पण त्याचा शास्त्रीय अभ्यास हा केव्हाही चांगलाच असतो. कारण निपक्षपाती आणि शास्त्रीय अभ्यासामुळे आपल्याला लोकमानसिकता आणि देशवासीयांचा डीएनए समजून घेता येतो. त्याचा उपयोग देशाच्या भल्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणूनच आजवर केवळ मिथक बनून राहिलेल्या मात्र संपूर्ण देशात वेगवेगळ्या जातीजमातींमध्येही लोकप्रिय ठरलेल्या हनुमंत किंवा मारुती या दैवताचा शोध घेण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला आणि पुरातत्त्वविज्ञान ते अध्यात्माच्या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना लिहिते करत हनुमंत या मिथकाचा अनेक अंगांनी आढावा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

भारतातील प्रत्येक भाषेतच नव्हे तर आग्नेय आशियातील प्रत्येक देशात हनुमान आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या कथाही आहेत. अनेक पुराणांमध्ये त्याचा उल्लेख येतो. त्याचे पुरातत्त्वीय पुरावे नवव्या शतकापासून सापडतात, याचाच अर्थ तो त्याच्याही चार ते पाच शतके आधी जनमानसात रुजण्यास सुरुवात झाली, असे पुरातत्वविज्ञान सांगते. लहान मुलांच्या प्रत्येक पिढीला तर तो सुपरमॅनच वाटावा, पण त्याची ही कथा सुपरमॅनच्याही कित्येक शतके आधी अस्तित्त्वात आली. कुणी त्याच्या मुत्सद्देगिरीच्या तर कुणी त्याच्या दास्यभक्तीच्या प्रेमात आहे. गावाबाहेर असणारे त्याचे देऊळ नेहमीच बहुजनांसाठी खुले राहिले आहे. यादव, कलचुरी, चंडेल या सर्व साम्राज्यांनीच नव्हे तर मुस्लिम राज्यकर्त्यांनीही राजचिन्ह म्हणून त्याचा स्वीकार करावा, असे त्यात काय आहे. आजही मुस्लिम समाज अनेक ठिकाणी त्याचे पूजन करतो. बहुजनांमध्ये त्याची लोकप्रियता आहे. मारुती हा प्रसंगी कोपणारा असला तरी इतर कोपणाऱ्या देवतांना बळी देण्याची प्रथा आहे, तशी मारुतीसाठी बळी चढविण्याची प्रथा नाही, असे का? या साऱ्याचा शोध घेत भारतीय समाजाच्या डीएनएपर्यंत पोहोचायला हवे. या महाशोधामध्ये ‘लोकप्रभा’चा हा खारीचा वाटा.

मारुती किंवा हनुमंत याच्या भारतातील आणि आग्नेय आशियातील परंपरांचा, अध्यात्माच्या अंगाने त्याचप्रमाणे पुरातत्त्वविज्ञानाच्या अंगाने आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो; त्यावेळेस समोर येणाऱ्या माहितीच्या महाडोंगराचे वर्णन करण्यासाठी ‘भीमरूपी महारुद्रा’ लिहिणाऱ्या समर्थानी त्याच्यासाठी वापरलेल्या शब्दरचनेचाच आधार घ्यावा लागतो आणि मग लक्षात येते की, समर्थ म्हणतात तेच खरे.. तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे!

vinayak-signature
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, Twitter – @vinayakparab

Story img Loader