महाभारत किंवा रामायण प्रत्यक्ष घडले आहे का किंवा त्याचे पुरावे काय हे दोन्ही प्रश्न समस्त भारतवर्षांमध्ये आजवर सर्वाधिक चर्चा झालेले आणि अनेकांना स्वारस्य असलेले प्रश्न आहेत. मात्र या स्वारस्यामागे अनेकांचे हितसंबंधही त्यात गुंतलेले आहेत. कुणाला हे सारे आपले वैभव म्हणून डांगोरा पिटायचा असतो तर कुणाला किती हा मागास समाज असे त्यातून दाखवून द्यायचे असते. कुणाला त्यातून त्या काळीही आमच्याकडे दूरसंवेदन यंत्रणा अस्तित्वात होती हे संजयाच्या माध्यमातून सांगायचे असते तर कुणाला अगदी तेव्हापासून स्त्रियांवर होणारा अत्याचार ठासून सांगायचाच असतो. मात्र खरे तर या साऱ्याकडे आपापले भगवे, हिरवे, निळे आदी चष्मे बाजूला ठेवून केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून व पुराव्यांच्या आधारे पाहण्याची गरज आहे. असाच एक प्रयत्न अलीकडेच पुरातत्त्व विज्ञानाच्या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी केला. यापूर्वीही महाभारताच्या कालनिश्चितीचे प्रयत्न झाले. कुणी खगोलीय बाबींच्या आधारे त्याचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्न केला तर कुणी इतर कोणत्या तरी कालगणनेच्या आधारे प्रयत्न केला. मात्र त्यात कोणत्याही कालनिश्चितीबाबत इतर कोणताही ठोस पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे कालगणनेच्या इतर कोणत्याही पद्धतीशी त्यांचा निष्कर्ष जुळला नाही. मात्र अगदी अलीकडे काही पुराविदांनी असा प्रयत्न केला आणि महत्त्वाचे म्हणजे पुरातत्त्वीय उपलब्ध पुराव्यांच्याच आधारे नव्हे तर भाषाशास्त्रीय पुराव्याच्या आधारे केलेल्या या प्रयत्नांना आता दखल घेण्याएवढे यश लाभले आहे. या साऱ्याचा आढावा वैज्ञानिक पद्धतीने घेतला जावा आणि त्यावर चर्चा व्हावी, हाच या विषय निवडीमागचा ‘लोकप्रभा’चा विचार आहे. ‘लोकप्रभा’च्या वर्धापन दिन विशेषांकाची ही कव्हरस्टोरी पुरातत्त्व विज्ञानाच्या क्षेत्रातील दोन दिग्गज तज्ज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर आणि डॉ. अरविंद जामखेडकर यांनी लिहिली आहे. गरज आहे ती, आपापले चष्मे बाजूला ठेवून या संशोधनाकडे पाहण्याची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा