सेरोपेजिया सह्य़ाद्रिका, अ‍ॅपोनोगेटेन सातारेन्सिस, नीमेस्पिस कोल्हापुरेन्सिस, मोटॅसिला फ्लावा भीमा ही  विविध नावे लॅटिन भाषेतील असून याच नावाने जगात वैशिष्टय़पूर्ण अशा वनस्पती आणि पक्षी-प्राणी ओळखले जातात. यातील पहिल्या दोन वनस्पती या कासच्या पठारावर आढळतात, पाल कोल्हापूर परिसरात आढळणारी आहे; तर धोबी पक्षी हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमा नदीच्या खोऱ्यात आढळणारा आहे.  म्हणूनच या लॅटिन नावांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा आढळ असलेल्या स्थानांचा वापर करण्यात आला आहे. याच नावे या वनस्पती- प्राणी आता जगभर ओळखले जातात. हे केवळ आपले वैविध्यच नव्हे तर समृद्धी आहे.

मात्र गेल्या काही दशकांमध्ये या जैववैविध्याचा म्हणजेच ‘बायो’डायव्हर्सिटीचा उल्लेख येतो त्या त्या वेळेस आपले लक्ष केवळ आणि केवळ मोठे प्राणी असलेल्या वाघ-सिंहांकडेच जाते आणि आपल्याला लहान वनस्पती, पक्षी-प्राणी यांचा विसर पडतो. सरपटणारे प्राणी हे तर विषारीच असतात असे आपल्या मनात पक्के ठरून गेलेले आहे. त्यांना तर आपण खिजगणतीतही धरत नाही. फुलपाखरे म्हणजे केवळ कवितेत वास करणारी, बालपणी रंजक वाटणारी एवढेच आपल्या लेखी त्यांचे महत्त्व असते. पण साप आणि फुलपाखरे यांची संख्या कमी होणे किंवा त्यांचे नष्ट होणे ही आपल्याच मानवी आयुष्यावरील कुऱ्हाड असेल किंवा इशाऱ्याची घंटा असेल हे आपल्या गावीही नसते. फुलपाखरे प्रदूषित वातावरणात तग धरू शकत नाहीत. त्यामुळे फुलपाखरांचे अस्तित्व आपल्याला पर्यावरणाचे आरोग्य बरे किंवा चांगले असल्याचे सांगत असते. तर शीत रक्ताचे साप वातावरणातील उष्णता फार सहन करू शकत नाहीत. वातावरणातील तापमानवाढ त्यांच्या मुळावर येणारी असते. सध्या एकूणच पृथ्वीच्या तापमानवाढीची चर्चा आपण जगभर करतो आहोत. अशा वेळेस त्या तापमानवाढीचे संकेत देणारे साप किंवा सरपटणाऱ्या वर्गातील प्राणी महत्त्वाचे ठरतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला हा थेट संबंध आपल्याला ठाऊकही नसतो.

गेल्या काही वर्षांमध्ये आपण शेतीच्या कमी होत चाललेल्या उत्पादनाबद्दल बोलतो आहोत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दलही बोलतोय, पण या चर्चेच्या धुरळ्यात संख्येने कमी होत चाललेल्या आणि निसर्गाच्या अन्नसाखळीत परागीभवनाच्या माध्यमातून अतिमहत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लहान कीटकांकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यांच्या अस्तित्वावर आलेली कुऱ्हाड हेदेखील जंगलातील-शेतीतील उत्पादन कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कोणत्या फुलाचे परागीभवन कोणत्या कीटकामार्फत होणार हे निसर्गचक्रामध्ये ठरलेले आहे. ते चक्रच आपण विसरत चाललो आहोत. आपण शिवकालाच्या इतिहासाचे जेवढय़ा अभिमानाने स्मरण ठेवतो तेवढाच अभिमान एका वेगळ्या अर्थाने ‘महाराष्ट्रेन्सिस’ असलेल्या या आपल्या जैवसमृद्धीचाही बाळगायला हवा. म्हणूनच वाढीबरोबर होणारा हा आनंद (वर्धापन) द्विगुणित करण्यासाठी व त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्राचा हा ‘बायो’डेटा ‘लोकप्रभा’च्या पंचेचाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने सुजाण वाचकांसमोर ठेवला आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या नववर्षांमध्ये हे जैववैविध्य जपण्याचा संकल्प करूया!

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com