भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो. या साऱ्याला पाश्र्वभूमी आहे ती १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाची. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाईदल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता. खरे तर १९७१च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानच्या सततच्या कारवायांनी भारताच्या संयमाचा कडेलोट होणेच केवळ बाकी होते. अशा वेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्णयाविरोधात कोणाचीही बोलण्याची शामत नव्हती, अशा कालखंडात सॅम माणेकशॉ यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले. खरे तर बांगलादेश युद्धाच्या मुळाशी हा धाडसाचा पाया होता. त्यांनी नोव्हेंबपर्यंत थांबवण्याचा सल्ला दिला, जो मान्य करण्यात आला. तोपर्यंत सैन्याची जुळवाजुळवही व्यवस्थित करता येईल, याची खात्रीही देण्यास ते विसरले नाहीत. अखेरीस इरेस पेटलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी ती चूक केलीच. त्यांनी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. मात्र तेच लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुडय़ा त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तान नौदलाने केलेली नव्हती, किंबहुना तिकडची ताकद पूर्वेकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता, पण त्यालाच नौदलाने सुरुंग लावला. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये दीर्घकाळ केवळ भारतीय नौदलच सामथ्र्यशाली नौदल म्हणून वावरत होते.

आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. सामथ्र्य कायम आहे, पण त्यात काळानुसार वाढ करणे गरजेचे आहे. त्यात मात्र आपण काही प्रमाणात मागे आहोत. शिवाय दुसरीकडे चीनच्या नौदलाने भारताची पूर्व किनारपट्टी पुन्हा एकदा अशांत करण्याचा जणू विडाच उचलला आहे. आजवर सुरक्षित व शांत राहिलेल्या या किनारपट्टीला आता म्यानमारमधील चीनच्या नौदल तळ स्थापनेनंतर काहीसे चिंतेने ग्रासलेले आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्टींकडेच नव्हे, तर खाली हिंदूी महासागरामध्ये म्हणजेच तिसऱ्या बाजूलाही सागरावर बारकाईने लक्ष ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच गेल्या साधारणपणे सात वर्षांमध्ये चिनी नौदलाने त्यांच्या सक्षमतेचा वेग खूप मोठय़ा प्रमाणावर वाढवला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेली मुदत कटाक्षाने पाळण्यावर चिनी नौदलाचा असलेला भर. भारताची स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका येणार याची हाकाटी गेली १० वर्षे सुरूच आहे. यंदाच्या वर्षी तिचा सांगाडा प्रथमच पाहायला मिळाला. अद्याप त्यावर यंत्रणा बसविणे आणि त्यातही शस्त्रास्त्रे बसवून त्यांच्या यशस्वी चाचण्यांचा टप्पा पार करण्यास किमान अडीच वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत चीनने त्यांची विमानवाहू युद्धनौका मात्र दिलेल्या मुदतीत तयार केली आणि उर्वरित तीन युद्धनौकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बदलती परिस्थिती आपण ध्यानात घ्यायला हवी. जे त्यांच्या युद्धनौकांच्या बाबतीत तेच त्यांनी लढाऊ विमानांच्या बाबतीतही केले आहे. त्यांची निर्मितीही दिलेल्या मुदतीपेक्षा फार अधिक काळ न घेता करण्यात आली आहे. त्याबाबतीत चीन फारच काटेकोर आहे.

येणाऱ्या काळात कोणत्याही देशाला युद्ध हे सर्वार्थाने परवडणारे नसेल. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध होणे तसे कठीणच असेल, पण म्हणून सामथ्र्य किंवा शक्तिप्रदर्शनाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. याच पाश्र्वभूमीवर २०१६ या नव्या वर्षांच्या फेब्रुवारी महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीवर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रपती हे भारताच्या सर्व सैन्यदलांचे प्रमुख असतात. त्यांची मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या सन्मानार्थ सलामी देण्यासाठी भारतीय नौदलातर्फे पाच वर्षांतून एकदा नौदल ताफा संचलनाचे आयोजन करण्यात येते. यात फक्त भारतीय नौदलच सहभागी असते. २००१ साली प्रथमच मुंबई किनाऱ्यानजीक आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी आता दुसरे आंतरराष्ट्रीय संचलन विशाखापट्टणम किनाऱ्यानजीक समुद्रात होणार आहे. मैत्रीचा सेतू बांधणे हा तर यामागचा महत्त्वाचा हेतू असतोच, पण त्याचबरोबर आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करणे हाही त्यामागचा तेवढाच महत्त्वाचा सामरिक हेतू अशा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनांमागे असतो.

सागरी किनारा लाभलेल्या जवळपास सर्वच राष्ट्रांचा ८५ टक्के व्यापार हा सध्या सागरी मार्गानेच होत असतो. त्याला कोणताही सागरी देश अपवाद नाही. कारण हाच आर्थिकदृष्टय़ा स्वस्तातील मार्ग आहे. त्यामुळे या सागरी मार्गाचे, आपल्या व्यापारी मालाचे आणि सागरी हद्दीचे संरक्षण हाही त्या त्या नौदलांसाठी तेवढाच महत्त्वाचा विषय असतो. मात्र २६ नोव्हेंबर २००८ला सागरी मार्गाने येऊन दहशतवाद्यांनी मुंबईवर चढविलेल्या हल्ल्यानंतर या सागरी संरक्षणाला आणखी महत्त्वाचा कोन मिळाला आणि भारतासारख्या देशासाठी सागरी सुरक्षा अधिक महत्त्वाची ठरली.

आपल्याला तीन बाजूंनी सागरी किनारा लाभला असून सामरिक तज्ज्ञांच्या मते त्याच्या संरक्षणासाठी तीन विमानवाहू युद्धनौका आवश्यक आहेत. सध्या आपल्या हाती असलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका वारंवार डागडुजी करून आपण भरपूर वापरून झाली. दर खेपेस तिचे आयुष्यमान संपत आले की, आपण डागडुजी करून ते वाढवतो. मात्र आता तिची मर्यादाही संपुष्टात आली असून २०१७-१८ मध्ये तिला निवृत्त करावेच लागेल. सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय ताफ्यात दाखल झालेली असली तरी आजही ती शस्त्रसंभाराच्या बाबतीत १०० टक्के सज्जतेच्या टप्प्याला पोहोचलेली नाही, असे तज्ज्ञांना वाटते. म्हणजे केवळ एकाच विमानवाहू युद्धनौकेवर आपला भार असेल. तोपर्यंत भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका ताफ्यात दाखल होणे आवश्यक आहे.

पाणबुडय़ांच्या अपघातांच्या मालिकेनंतर आपला पाणबुडी ताफाही काहीसा शक्तिहीन झाल्यासारखी परिस्थिती होती. तिथेही आवश्यक संख्याबळ आपल्याकडे नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याकडेही लक्ष पुरवावे लागेल. दरम्यान, पाकिस्तानने मात्र आपला पाणबुडी ताफा सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. नौदलाच्या लढाऊ विमानांच्या बाबतीतही आवश्यक संख्याबळ आपण येत्या दोन वर्षांत गाठू अशी अपेक्षा आहे. त्या पातळीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या भारतीय नौदलाची असलेली एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे अलीकडे भारतीय नौदलात दाखल झालेल्या अद्ययावत स्टेल्थ विनाशिका आणि स्टेल्थ फ्रिगेटस्. यांच्याबाबतीत मात्र भारत जागतिक पातळीवर तोडीस तोड ठरतो. त्यांची बांधणी, डिझाइन आणि त्यांची कार्यक्षमता या बाबतीत या युद्धनौका इतर कोणत्याही देशांच्या युद्धनौकांपेक्षा कांकणभर सरस ठरतात. अशा पाश्र्वभूमीवर हे नौदल ताफा संचलन होते आहे. यात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून जागतिक जलमार्ग व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा भारताचा मानस आहे. सागरी चाच्यांच्या कारवायांना जागतिक पातळीवर आळा घालण्यात भारताचा वाटा सिंहाचा आहे, हे विसरून चालणार नाही. सागरी कारवायांमध्ये अलीकडच्या काळात भारतीय नौदल जगभरात सरस ठरले आहे. याचा फायदा घेऊनच या आंतरराष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळेच भारतीय नौदलातील मनुष्यबळ म्हणजेच नौसैनिक व अधिकारी जागतिक दर्जाचे असल्याचे आपण वारंवार सांगतो आहोत आणि ते खरेही आहे, पण शक्तिप्रदर्शनात सध्याच्या काळात तंत्रज्ञानाबरोबरच सामरिकशास्त्रात संख्याबळही तेवढेच महत्त्वाचे ठरते, याचे स्मरण भारताला ठेवावे लागेल.. तर हा सागरी सेतू अधिक परिपूर्ण ठरेल, कारण मैत्रीसाठी हात पुढे करणारे अनेकदा तुमचे सामथ्र्य पाहून मैत्री कुणाशी करायची हे ठरवत असतात, हे विसरून चालणार नाही! तसे झाले तर मैत्रीचे सागरी सेतू जगभरात उभारण्यात भारताला अडचण भासणार नाही!

विनायक परब
Twitter:  @vinayakparab

Story img Loader