लोकशाहीमध्ये सामान्य माणसाची ताकद जबरदस्त असते, असे राज्यशास्त्र सांगते. ती अनुभवण्याचा राजकारणातील एकमात्र प्रसंग म्हणजे निवडणुका. या निवडणुकांमधील सामान्य माणसाच्या मतदानामध्ये ‘राजाचा रंक’ करण्याची क्षमता असते. निवडणुका वगळता ती सामान्य माणसाची ताकद अभावानेच जाणवते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात मात्र एका सामान्य माणसाने अर्थात ‘कॉमन मॅन’ने ही ताकद दैनंदिन वर्तमानपत्रात दाखवली, अर्थातच त्याचे जनक होते आर. के. लक्ष्मण. सोमवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी ‘आरकें’चे पुण्यात निधन झाले आणि सामान्य माणूस पोरका झाला. ‘आरकें’च्या त्या सामान्य माणसाने अनेक राजकारण्यांना त्यांच्या चुका दाखवत जमिनीवर आणले! ‘आरकें’ची व्यंगचित्रे नेहमीच चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांनी ओढलेल्या कोरडय़ांनंतर तर राजकारण्यांनाच नव्हे तर खुद्द पंतप्रधानांनाही आपला निर्णय मागे घेणे भाग पडले.
बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..
हजार शब्दांमधूनही जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सहज सांगून जाते, असे छायाचित्राबाबत म्हटले जाते. व्यंगचित्रांबद्दल बोलायचे तर वर्तमानपत्रांतील अग्रलेख जो परिणाम साधू शकणार नाही, त्याहूनही अधिक जबरदस्त परिणाम एक व्यंगचित्र साधून जाते. व्यंगचित्र हा दृश्यकलेचाच एक प्रकार आहे. दृश्याची ताकद जबरदस्त असते. त्याला माफक पण नेमक्या शब्दांची जोड मिळते तेव्हा ते अधिक टोकदार होते.
खरेतर व्यंगचित्रामध्ये अनेकदा एखादी घटना, निर्णय यावरची मल्लिनाथी असते तर कधी त्याची उडवलेली खिल्लीही असते. व्यंगचित्रकाराने व्यंगावर ठेवलेले नेमके बोट ते पाहणाऱ्या रसिकाच्या किंवा वाचकाच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवते, पण हीच स्मितरेषा ज्या व्यक्तीवर ते व्यंगचित्र बेतलेले आहे, त्याला पार अस्वस्थ करून सोडते. त्यालाच राजकारणी घाबरतात, कारण ती रेषा त्यांची वस्त्रे अलगद उतरवून त्यांना पार उघडे पाडते. आर.के. लक्ष्मण यांनी आजवर अनेकदा त्यांच्या व्यंगचित्रांतून अनेक राजकारण्यांना उघडे पाडले. पण ते करताना त्यांनी एक लक्ष्मणरेषा मात्र कायम पाळली. त्यांनी कमरेखाली वार कधीही केला नाही. अनेक व्यंगचित्रकारांना नेमके हेच भान राहात नाही आणि मग त्यांचे हसे तरी होते किंवा मग माध्यमाचा अनाठायी वापर केल्याची टीका तरी होते. ‘आरकें’नी मात्र ही लक्ष्मणरेषा कायम पाळली.
विशेष संपादकीय: कसे बोललात लक्ष्मण!
लक्ष्मणरेषेची दुसरी बाजू म्हणजे दाहकता. ती लांघण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दाहकता अनुभवणे.. त्याचा प्रत्यय तर अनेक राजकारण्यांनी आणि समाजकारण्यांनीही घेतला. पण ही तीच लक्ष्मणरेषा होती की, जिने भारतीय व्यंगचित्रकारांना व या कलेला देशातच नव्हे तर जगभरात सन्मान मिळवून दिला. ‘आरकें’पूर्वीही व्यंगचित्रकार झाले तरीही आज भारतात व्यंगचित्रकारांना मिळणाऱ्या मानाचे प्रमुख पाईक ‘आरके’ आहेत. ‘आरकें’ची ती लक्ष्मणरेषा ही सामान्यांसाठी मोठा आधार होती. त्या निमित्ताने राजकारणी-समाजकारण्यांवर त्या सामान्य माणसाचा वचक होता. त्यांच्या व्यंगचित्रात सामान्य माणसासोबत कावळाही दिसायचा. तो कावळा ‘आरकें’च्या तीव्र निरीक्षणशक्ती असलेल्या काकदृष्टीचा प्रतीकच होता.
‘आरके’ त्यांच्या व्यंगचित्रांतूनच अधिक बोलत. त्यांना भेटण्याचा आणि सविस्तर बोलण्याचा योग चार-पाच वेळा आला, तेव्हा जाणवले की त्यांच्या व्यंगचित्रामागची खरी ताकद म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती आहे. तीच निरीक्षणशक्ती बोलतानाही जाणवायची. मुंबई त्यांना प्रचंड आवडायची. मुंबईबद्दल विचारता ते म्हणाले होते, काही महिन्यांसाठी मुंबईत आलो होतो. हे शहर तेव्हा नव्याने उभे राहात होते. उंच इमारती तयार होत होत्या. वाटले थोडा काळ थांबावे, शहर पूर्ण होताना पाहावे, मग निघावे. आजही ६० वर्षांनंतर पाहतो शहर अजून मोठे होते आहे. आता आणखी मोठय़ा इमारती उभ्या राहात आहेत. वाटते आहे की, शहर पूर्ण होईपर्यंत राहावे.. त्यामुळे या नगराच्या प्रेमात पडून थांबलोय. एवढय़ा मोजक्या शब्दांत मुंबईचा गुणविशेष ‘आरके’ सहज सांगून गेले. ‘आरके’ खरेतर मुंबई अजून उभी राहतेच आहे.. शहराचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे, मग असे असताना तुम्ही का बरे आम्हाला सोडून गेलात?
विनायक परब