‘‘सामान्य माणूस इतरांच्या दु:खात आनंद शोधतो आणि खेळाडू मात्र पराभवालाही आनंदाने सामोरा जातो. खेळाडू जिंकलेल्या प्रतिस्पध्र्याचे मोकळ्या मनाने अभिनंदन करतात. सामान्य माणूस आणि खेळाडू यांच्यामध्ये हा महत्त्वाचा फरक असतो. लहानपणापासून तुम्ही वेगवेगळे खेळ खेळलात तर एक चांगला नागरिक सहज होऊ शकता.’’
प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कारविजेते ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात व्यक्त केलेल्या मतावर खरे तर या देशात राष्ट्रीय चर्चा व्हायला हवी होती. कारण त्यांचे हे विधान खूप बोलके आणि आपल्याकडील क्रीडा संस्कृतीच्या अभावामुळे आलेल्या समस्यांकडे निर्देश करणारे आणि त्याच वेळेस त्यावर थेट उपाययोजना सुचविणारे असे बहुआयामी आहे. खेळाडू असण्यामुळेच व्यक्तीकडे एक शिस्त आपसूक येत असते. शिवाय ज्या सहिष्णुतेवरून देशभरात गेले काही महिने कल्लोळ सुरू आहे ती सहिष्णुता म्हणजेच स्वत:चा पराभव मान्य करून दुसऱ्याचा विजय स्वीकारणे, मान्य करणेही खेळातूनच सहज येते. हार-जीत तर असतेच पण जिंकण्यासाठी विजिगीषु वृत्तीने लढण्याची शारीरिक आणि मानसिक कणखरताही याच खेळांतून येते. पण मग अशा या खेळांना आपण किती महत्त्व देतो? या साऱ्याकडे आपण किती लक्ष देतो?
रिकामी जागा दिसली की, राजकारण्यांचे लक्ष तिच्याकडे जातेच जाते. मुलांच्या खेळांवर गंडांतर येते. ही जमीन शहरात किंवा निमशहरी भागांत असेल तर आताशा तिथे क्लबसंस्कृतीचा नवीन ट्रेण्ड रुळतो आहे. जिमखाने आणि क्लबसंस्कृती म्हणजे क्रीडासंस्कृती असे वाईट समीकरण रूढ होते आहे. त्यामुळे खेळ हे श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता अधिक. थोडा वेगळा विचार का नाही करीत आपण? समुद्राच्या लाटांवर आरूढ होणारा कोळीपुत्र उत्तम जलतरणपटू का नाही होऊ शकत? हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या महिलाच अधिक संख्येने एव्हरेस्ट सहज सर का करू शकतात? काश्मिरी युवकांची फुटबॉल आणि कबड्डीची टीम समुद्रसपाटीवरच्या राज्यांमध्ये सरस का ठरते? यामागच्या विज्ञानाचा शोध घेण्याची गरज आहे. प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो. वेगवान धावपटू आफ्रिकनच का असतात? मग आपल्याकडे ते डीएनएचे समीकरण कुणाच्या अधिक जवळ जाणारे आहे? या प्रश्नांचा विचार आपण करीतच नाही. विज्ञानाच्या अंगाने भिडले की, प्रश्नाच्या मुळाशी जाता येते.
दुसरा धडा आपण घ्यायला हवा तो म्हणजे आपल्याकडे असलेला क्रीडासंस्कृतीचा अभाव. ही संस्कृती पोसली जाण्यासाठी पोषक वातावरण असायला हवे. त्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या तासाला महत्त्व द्यावे लागेल. अभ्यासाएवढाच खेळाचा तासही महत्त्वाचा आहे, हे मनात ठसवावे लागेल, अन्यथा मग पीटीचा तास इतर विषयांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वापरणाऱ्या किंवा मग सोसायटीतील मुलांच्या खेळण्याच्या मोकळ्या जागांवर गंडांतर आणून त्यावर पार्किंगची सोय करणाऱ्या आपल्याला ऑलिम्पिकमध्ये आपली पदकांची पाटी कोरीच का? असे विचारण्याचा नैतिक अधिकारही असणार नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट वगळता इतरही अनेक उत्तम खेळ आहेत हा मुद्दाही समजून घ्यावा लागेल. त्यासाठी रिओ इथे होणारे हे ऑलिम्पिक निमित्त ठरावे, यासाठी ‘लोकप्रभा’चा हा ऑलिम्पिक विशेषांकाचा खटाटोप!
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com