एखादी गोष्ट पुढील २० वर्षांत घडेल असे म्हटले की, अनेकदा ती गोष्ट नंतरच्या १० वर्षांतच घडल्याचा अनुभव गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अनेकांनी घेतला. मात्र आता २१ व्या शतकात घडत असलेल्या गोष्टींचा वेग एवढा प्रचंड आहे की, पुढील १० वर्षांत अपेक्षित असलेल्या गोष्टी अनेकदा वर्षभरातच घडताना दिसताहेत. त्यातही खास करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असलेला घडामोडींचा वेग अतिभन्नाट असाच आहे. रोजच्या दैनंदिन रामरगाडय़ात अडकलेल्या सामान्य माणसाला तर यामुळे काहीच कळेनासे झाले आहे. फीचर फोनची सवय होण्याआधीच स्मार्ट फोन येऊन दाखल झाला एवढेच नव्हे तर आता कामासाठी तो आवश्यकही ठरला आहे. त्याची गरज आता एवढी भासते आहे की, आधीच्या रोटी, कपडा और मकानमध्ये आता मकाननंतर मोबाइलचा समावेश झाला आहे. हातावर पोट असलेल्या आणि सतत फिरतीवर असलेल्या कष्टकऱ्यांसाठी तो वरदानच ठरतो आहे. कारण ऑफिसची जागा विकत किंवा भाडय़ाने घेणे न परवडणाऱ्यांसाठी तो ‘चालत्या-फिरत्या ऑफिस’चेच काम करतो. पण तंत्रज्ञानाच्या या झपाटय़ापुढे सामान्य माणूस गांगरून गेला आहे. अनेक बाबतींत तर असे होते की, विषयांचे महत्त्वही ठाऊक असते पण समोर येतात त्या केवळ बातम्याच. एखादा विषय साकल्याने समजून घ्यायचा असेल तर आताच्या जमान्यात तशी संधी वाचकांनाही फारशी मिळत नाही. वर्तमानपत्रांतील बातम्याही आता आकाराने लहानच झाल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये नियतकालिके, साप्ताहिके आणि मासिकांना मात्र तुलनेने अधिक संधी मिळते. हीच संधी घेण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला असून या मे महिन्यापासूनच आम्ही त्या संदर्भातील ‘लोक’जागर या नव्या उपक्रमाला सुरुवातही केली आहे. या महिन्यामध्ये आम्ही भविष्यातील महत्त्वाच्या अशा सौरऊर्जा या विषयावर चार भाग प्रकाशित केले. दर महिन्याला नवा विषय अशी या उपक्रमाची रचना असेल. या खेपेस प्रकाशित झालेल्या चार भागांमध्ये सौरऊर्जेच्या नावीन्यपूर्ण वापरापासून ते जागतिक स्तरावरील परिस्थिती, देशातील सद्य:स्थिती आदी महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह ‘लोकप्रभा’ने केला.
सौरमैत्री!
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असलेला घडामोडींचा वेग अतिभन्नाट आहे
Written by विनायक परब
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2017 at 01:06 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar energy