४४-वर्धापनदिन विशेष अंक
पहिल्या महासंगणकाने एका तासात कूटगणित सोडवले त्या वेळेस वैज्ञानिकांसह संपूर्ण जगाला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता. त्यानंतर मानवी गुणसूत्रांची रचना समजून घेण्यात मानवाला यश आले, त्या वेळेस ते खूप मोठे यश मानले गेले होते. त्यानंतर महासंगणक किती वेगात काम करू शकतो हे पाहण्यासाठी अलीकडेच एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामध्ये सर्वाधिक शब्द असलेला ‘विकिपीडिया’ दुसऱ्या भाषेत आणण्यासाठी महासंगणकाला किती काळ लागेल ते पाहण्याचा निर्णय झाला. संपूर्ण ‘विकिपीडिया’च्या इंग्रजी ते स्पॅनिश या भाषांतरासाठी नव्या महासंगणकाला केवळ १७ मिनिटे लागली. हा झपाटा विलक्षण आहे!
सध्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी अवघ्या काही दिवसांत एवढय़ा वेगात बदलत आहेत की, त्यामुळे कालचे आज जुने होते आणि आजचे उद्या पुराणे. भविष्यात नेमके काय घडणार आहे, याचा वैज्ञानिक अंदाज व्यक्त करणाऱ्या शास्त्राला फ्युचरॉलॉजी असे म्हणतात. त्यातील तज्ज्ञ भविष्यवेत्त्यांबद्दल अगदी अलीकडे म्हणजे २१ व्या शतकात प्रवेश करेपर्यंत असे म्हटले जायचे की, पुढील २० वर्षांतील नेमके अंदाज ही तज्ज्ञ मंडळी व्यवस्थित व्यक्त करतात; पण २००५ हे असे वर्ष होते की, डॉन टॉपस्कॉटसारख्या भल्या भल्यांनीही सांगितले की, तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे होत असलेल्या एकूणच बदलांचा झपाटा एवढा विलक्षण आहे की, ज्या गोष्टी २० वर्षांत होतील, असे सांगितले जाते आहे त्या अवघ्या साडेतीन ते चार वर्षांमध्येच घडताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यवेत्त्यांनाही काळाच्या पुढे झेप घेण्यासाठी स्वत:ला त्या झपाटय़ापेक्षाही अधिक वेगाने पुढे न्यावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता जगावर राज्य करणार असे म्हणता म्हणता आज त्या राज्याला सुरुवातही झाली आहे. अनेकांना तर त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कुठे होतोय याचीही नेमकी कल्पना नाही. वॉशिंग मशीनपासून ते फेसबुक, ट्विटपर्यंत सर्वत्र त्याचा वापर होतो आहे. विशिष्ट प्रकारचा चष्मा वापरली जाणारी ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ ही केवळ डिजिटल गेम्समध्ये वापरली जाईल, असे अगदी अलीकडेपर्यंत वाटत होते. मात्र आता त्याचा वापर प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात होताना दिसतो आहे. आता खेप आहे की, कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगची. हा मानवी प्रज्ञा आणि प्रतिभेच्या दिशेने जाणारा संगणकाचा अनोखा प्रवासच ठरणार आहे, कारण आजवर असे मानले जात होते की, यंत्राला स्वत:ची बुद्धिमत्ता नसते. जी असते ती कुणा एका मानवाने त्यात फीड केलेली असते आणि त्याला माणसाप्रमाणे स्वत:चे स्वत: शिकता येत नाही. मात्र आता कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगमध्ये संगणक मानवी मेंदूप्रमाणे, मात्र मानवी मेंदूच्या शतपटीने अधिक वेगात विचार तर करतोच, पण त्यात तो नव्याने अनेक गोष्टी शिकतही जातो. याचाच वापर भविष्यातील अनेक शोधांसाठी होणार आहे. त्या माध्यमातून आजवर गूढ राहिलेल्या अनेक गोष्टींची उकल होणार आहे. मंगळावर असलेल्या अनेक बाबींपासून ते आजही मानवी शरीरातील न उकललेल्या सूक्ष्म गोष्टी कळण्यापर्यंत अनेकविध गोष्टींचा समावेश असणार आहे.
नेमके कोणते बदल होत आहेत, त्याचे आकलन होण्याच्या आधीच गोष्टी प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. चालकरहित वाहन केवळ अशक्यच असे वाटत असताना आता एका देशाचा प्रवास चालकरहित वाहनांच्या दिशेने सुरूही झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याही प्रयोगात लक्षात आलेली बाब म्हणजे झालेल्या अपघातांना मानवी चुका कारणीभूत होत्या, यंत्र नव्हे. आजूबाजूला सारे काही डिजिटल होते आहे. केवळ पाय आत ठेवल्यावर पायानुसार रूप धारण करणारे बूट असते तर असा विचार करण्याची वेळ निघून गेलीय, कारण बायोवेअर असलेले असे बूट आता आदिदास या आघाडीच्या कंपनीने बाजारातही आणले आहेत. त्यात तर शरीराच्या तापमानानुसार व हालचालींनुसार बूटच स्वत:ला वेगळ्या पद्धतीत घडवतात एखाद्या सजीवाप्रमाणे. हेही सारे केवळ विलक्षणच आहे. बोट्स म्हणजे संगणकीय सॉफ्टवेअर जे स्वयंचलित पद्धतीने कामकाज करते. दिवसभरात सामान्य माणूसही वेगवेगळ्या पद्धतीने किमान सरासरी १५ बोट्सशी संबंधित व्यवहार करतो, मात्र त्याची त्याला स्वत:ला कल्पनाही नसते. इंटरनेट ऑफ थिंग्जनेही असेच आपले आयुष्य पार बदलून जाणार आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कामगारवर्गाला घरचा रस्ता दाखविला असून तिथे आता रोबोट्स म्हणजेच यंत्रमानवाने काम करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रोबोट्समुळे काम निर्विघ्न आणि बिनचूक होते, हे कंपन्यांना आता लक्षात आले आहे. गोष्टी डिजिटल झाल्यामुळे सरकारी यंत्रणांमध्ये पडलेला महत्त्वाचा फरक तिथल्याच एका विचारी अधिकाऱ्याच्या लक्षात आला. माणूस गेला, त्याचा जागा यंत्र किंवा संगणकाने घेतली आणि भ्रष्टाचार कमी झाला. मानवी संबंध जिथे जिथे कमी झाले व त्यांची जागा यंत्रांनी घेतली तिथे तिथे मिळालेले यश हे मानवालाच आता स्वत:च्या आयुष्याबद्दल वेगळा विचार करण्यास भाग पाडायला लावणारे आहे. अशा वेळेस सामान्य माणसाचे काय होणार, हा सतावणारा प्रश्न ठरतो आहे. मुळातच गोष्टी डिजिटल झाल्यामुळे आजवर आपल्याच मस्तीत असलेल्या आयटीमधील कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे, कारण किमान ५० टक्क्यांच्या नोकऱ्या जाणार, असे नासकॉम, गार्टनर आदींना लक्षात आले आहे. नोकऱ्या टिकवायच्या तर नवीन कौशल्ये संपादन करायला लागणार आहेत आणि ही कौशल्ये सतत परजत राहावी लागणार आहेत. नवीन गोष्टी सातत्याने शिकाव्या लागणार आहेत. अन्यथा या जगातून कालबाह्य़ ठरण्याची भीती असेल. एकदा एका ठिकाणी नोकरीला चिकटला की, मग आयुष्यभर पाहायला नको, हा विचार केव्हाच कालबाह्य़ झाला आहे. भविष्यातील ६५ टक्के नोकऱ्या अशा असतील, की ज्याचा विचारही माणसाने आता केलेला नाही आणि हे पुढील अवघ्या १५-२० वर्षांत होणार आहे, असे गार्टनरने म्हटले आहे.
१९ वे शतक भौतिकशास्त्राचे, २० वे रसायनशास्त्राचे होते, तर आता २१ वे जीवशास्त्राचे असणार आहे. सर्वाधिक बदल याच क्षेत्रात अपेक्षित आहे. या साऱ्याचा हा आवाका यावा यासाठीच ‘लोकप्रभा’ने ४४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘व्हिजन २०२५’ असे सूत्र असलेला एक छोटेखानी विभागच केला आहे. जग बदलवणारे जेनेटिक्समधील सर्वात महत्त्वाचे प्रयोग सध्या अमेरिकेतील येल विद्यापीठात सुरू आहेत. तेथील सेंटर फॉर जिनोम अॅनालिसिसचे कार्यकारी संचालक व येल युनिव्हर्सिटी ऑफ स्कूल ऑफ मेडिसीनमधील प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांना लिहिते केले आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा झपाटा आणि आवाका समजून घेऊन बदलासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये झटणारे संगणकशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक पाठक यांच्या लेखाचा समावेशही या अंकात केला आहे. खरे तर हे सारे वाचल्यानंतर वाचकांना काही प्रश्न निश्चित रूपाने पडतील. त्यातील एक महत्त्वाचा असेल, तो म्हणजे मग माणसाचे होणार काय? त्यातही सामान्य माणसाचे कसे होणार? त्याने काय करायचे? गुढीपाडवा हा काही केवळ नववर्ष साजरा करण्याचा दिवस नव्हे, तर यानिमित्ताने वाचकांनी नवविचारांची गुढी उभारून भविष्यासाठी सज्ज व्हावे, असे ‘लोकप्रभा’ला वाटते. म्हणून हा खटाटोप. वाचकांना त्यासाठी उद्युक्त करणे हे ‘लोकप्रभा’चे कर्तव्यच आहे
या विषयावर चिंतन केले तर असे लक्षात येईल की, भविष्यातील रोजगाराच्या संधीही वेगळ्या असतील आणि बहुतांश ठिकाणी त्यासाठी वेगवेगळी कौशल्ये आपल्याला आत्मसात करावी लागणार आहेत. शिवाय सातत्याने कौशल्ये शिकत राहावी लागतील, माहितीच्या संदर्भात स्वत:ला सातत्याने अपडेट करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म विचारांपर्यंत पोहोचणारी शिक्षणपद्धती स्वीकारावी लागेल. केवळ कारकून तयार करणारी शिक्षणपद्धती उपयोगाची असणार नाही, कारण कारकुनांचे काम यंत्रे करणार आहेत. त्यामुळे यंत्रापेक्षा वेगळे कौशल्य असेल तरच रोजगाराची संधी उपलब्ध असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नवे तंत्रज्ञान, नवीन संधी घेऊन येणार आहे, अशा सकारात्मक नजरेनेही पाहावे लागेल. या साऱ्याची सुरुवात आपल्या शिक्षणपद्धतीपासून करावी लागेल. विचार करायला प्रवृत्त करणारी व पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला लावणारी शिक्षणपद्धती आपलीशी करावी लागेल.
या साऱ्या बदलात मानवी शरीर हे मात्र तसेच असणार आहे. त्याची काळजी वाहण्याचे व त्याचा वापर करण्याचे कसबही असणार आहे. मानवी जिद्द, उमेदही कायम असेल. म्हणूनच अशी जिद्द व उमेद वाढविणाऱ्या महिला क्रीडापटूंच्या यशोगाथा या विशेषांकाचा महत्त्वाचा भाग आहेत. काही मूल्ये, काही विषय मात्र या साऱ्या वादळातही कायम टिकतील. विषय टिकले तरी त्यातही खूप अंतर्गत बदल होणार आहेत. त्यातीलच एक संगीत. त्या संगीतातील आत्मानुभूती देण्याची क्षमता कायम असेल. संगीत हे चिरकाल टिकणारे आहे. मात्र त्यासाठी स्वरांना गुलाम नव्हे तर त्यांना शरण जायला हवे, असे सांगणारी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची मुलाखतही आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. किशोरीताईंची स्वरश्रीमंती, त्यामागचा अभ्यास व चिंतन वाचकांपर्यंत पोहोचवणारी मुलाखत हा या अंकाचा ऐवज आहे! तंत्रज्ञानाच्या विलक्षण झपाटय़ातही आत्मानुभूतीचा, चैतन्याचा अनुभव देणारे अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतच असेल, हा दिलासा या झपाटापर्वात महत्त्वाचा ठरावा!
सर्वाना गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com