हल्ली धकाधकीच्या जीवनात चारदोन दिवस बाहेर कुठे तरी जाऊन यावेसे वाटणे तेवढेच साहजिक असते. ताण तर हलका होतोच पण ऊर्जाही मिळते. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पण आपण पर्यटनाला जातो म्हणजे नेमके काय करतो, असा प्रश्न स्वतला विचारला तर औटघटकेची मजा यापेक्षा फारसे काही हाताला लागत नाही, म्हणूनच या खेपेस पर्यटन विशेषांकामध्ये दीर्घकाळ स्मरणात राहील व केवळ आठवणीने ऊर्जा मिळेल आणि प्रेरणाही असे महत्त्वाचे काही वाचकांच्या हाती देण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला. त्यातून ‘काय पाहाल व कसे पाहाल?’ या मालिकेचा जन्म झाला. मंदिरे, लेणी, अभयारण्ये-जंगले, किल्ले व वस्तुसंग्रहालये पाहायची म्हणजे नेमके काय करायचे ते तज्ज्ञांमार्फत आम्ही वाचकांसमोर मांडले आहे. त्यामुळे वाचकांना निश्चितच नवी दृष्टी मिळेल.
जंगलात जाताना आपले तोंड पूर्णपणे बंद आणि सर्व संवेदना जागृत ठेवाव्या लागतात, तरच जंगल उलगडत जाते. पण आपण तोंड बंद ठेवण्याचा पणही पाळू शकत नाही, त्यामुळे जंगल कळत तर नाहीच पण प्राण्यांना त्रासही होतो, याचीही जाणीव आपल्याला नसते.
लेणी, किल्ले आणि संग्रहालयातील वस्तू हे सारे काही आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपण त्यांचे म्हणणे ऐकत नाही. अर्थात त्यासाठी आपल्याला थोडी अभ्यासाची जोड द्यावी लागते. अभ्यास असा शब्द उच्चारला तरी अनेकदा आपल्याला असे वाटते की आपण मौजमजेपासून दूर जातो आहोत. पण हे लक्षात घ्यायला हवे की, पर्यटनासाठीच्या या अभ्यासाचा शालेय अभ्यासाशी काहीही संबंध नाही. हा अभ्यास आपल्या पर्यटनाला पूरक आणि विषयाची मौज वाढविणारा आहे. म्हणजेच कान्हेरीच्या लेणींमधील दोन मदारींच्या उंटाची शिल्पाकृती पाहून आपल्याला त्या लेणींचा थेट प्राचीन रेशीम मार्गाशी असलेला संबंध उलगडतो त्या वेळेस होणाऱ्या आनंदाला परिसीमाच नसते. किल्ल्यांकडे थोडय़ा वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर इतिहासासोबतच भूगोलही वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो. कोणतीही लेणी ही डोंगरकपारीत अतिउंचावर नाहीत आणि खाली असलेल्या गावापासून दूरही नाहीत, याचे कारण आपल्याला समजते त्या वेळेस आपल्याला काही तरी नवे गवसल्याचा आनंद तर मिळतोच पण त्याच वेळेस भविष्यात लेणी पाहण्याची एक वेगळी नजरही मिळत असते.
संग्रहालय पाहताना प्रत्यक्षात आपण जिरेटोप पाहतो किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाने वापरलेली तलवार पाहतो, त्यामागच्या अनेक गोष्टी समजून घेतो तेव्हा चिलखत फोडून आरपार गेलेल्या तलवारीचे एका लढाईचे दाखविलेले प्रसिद्ध चित्र म्हणजे भाकडकथाच आहे, याचा उलगडा आपल्याला होतो आणि संग्रहालयाकडे आपण नव्याने पाहू लागतो. आपलाच इतिहास अधिक पक्का होतो. आपल्याकडील मंदिरे म्हणजे एके काळच्या सामाजिक संस्थाच होत्या. त्याची रचना आपल्या पूर्वजांनी अतिशय जाणीवपूर्वक केली होती. त्या काळी गावातील माणसांचा सर्वाधिक वावर विविध कारणांनी इथेच असायचा म्हणून या सामाजिक संस्थांकडे पाहण्यासाठी एक वेगळी नजर आपल्या पूर्वजांनी विकसित केली होती हे कळणे आपल्यासाठी ‘डोळे उघडणारे’ असते. मग आजच्या काळातील सोशल नेटवìकग आणि त्या वेळच्या मंदिरांमधील रचना यामध्ये आपल्याला खूप साम्यस्थळे दिसू लागतात. कारण मंदिरे हीच त्या काळातील सोशल नेटवìकगची महत्त्वपूर्ण माध्यमे होती. या सर्व उलगडय़ांतून मग आपले आयुष्य एवढे उजळून निघते की, त्यातून मिळणारी ऊर्जाच नव्हे तर प्रेरणाही आपल्याला दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरते. कधी त्यामुळे आपली मरगळ सहज झटकली जाते तर कधी ताणतणावाला केवळ त्या आठवणीनेही सहज मुक्ती मिळते. नजर अशी वेगळी विकसित झाली की, पर्यटन हे केवळ फिरस्ती न राहता प्रकाशवाटच ठरते. अशा प्रकाशवाटांसाठी शुभेच्छा!
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com