विनायक परब –   @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
एका बाजूला कोविडकाळ सरता सरत नाहीए. आधी डेल्टा त्या पाठोपाठ आता ओमायक्रॉनची धाकधूक. बहुसंख्यांच्या हातचा रोजगार गेलेला आणि त्यात पलीकडे महागाई आ वासून उभी राहिलेली. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘काशी’ होण्याची वेळ येऊ नये यासाठी भाजपाने दमदार पावले टाकत काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा भव्यदिव्य असा सोहळा पार पाडला. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस वाराणसीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये तळ ठोकून होते. यंदाची निवडणूक तेवढी सोपी नसेल, याची कल्पना योगी आदित्यनाथ, मोदी-शहा सर्वानाच आहे. किंबहुना म्हणूनच भाजपाने त्याची मोर्चेबांधणी कसून केलेली दिसते. गेले तीन आठवडे उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन- लोकार्पण सोहळे सुरू आहेत. काशीचा सोहळा हा परमोत्कर्ष ठरावा, असाच होता. राममंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी आणून भाजपाने ३० वर्षांंपूर्वी भारतीय राजकारणाची दिशाच बदलली. त्यावेळी कुणी म्हटले असते की, हा पक्ष केंद्रात सत्तेत असेल तर त्याला लोकांनी वेडय़ातच काढले असते. मात्र अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचा त्यावरचा विश्वास मात्र पक्का होता. दुर्दैव म्हणजे सत्तेत येण्याची संधी मिळाली त्यावेळी आडवाणी यांच्याचवर राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली. मुद्दा आहे तो भाजपाची विजयी घोडदौड तशीच सुरू राहील का याचा. सध्या तरी पूर्णवेळ नित्यनेमाने सदासर्वकाळ केवळ राजकारण तेही एवढय़ा गांभीर्याने करणारा दुसरा पक्ष नाही. राजकारणाचा बारीकसा मुद्दाही भाजपाच्या नजरेतून सुटत नाही आणि विरोधकांच्या हातून संधी सहज निसटून जातात अशी अवस्था पलीकडे पाहायला मिळते आहे. हाती आलेल्या संधीचेही भांडवल करता न येणे हे सध्याच्या विरोधी पक्षीय राजकारणाचे महत्त्वाचे लक्षण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर काशीचा सोहळा महत्त्वाचा ठरतो. या निमित्ताने भाजपाने अनेक मुद्दे साध्य केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये भावनिक साद ठासून भरलेली होती. केवळ धर्म ही प्राथमिकता नाही तर त्यासोबत आधुनिकताही आहे, हे मनावर िबबवण्याचा प्रयत्न होता. विकास आणि विरासत, मंदिर आणि स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भरता असे शब्दप्रयोग करण्यात आले. एका बाजूला हे सुरू असताना काँग्रेसी सलमान खुर्शिद यांनी आयसिसची तुलना रास्वसंघाशी करून आयतेच कोलीत हिंदुत्ववाद्यांच्या हाती दिले. राहुल गांधींनीही हिंदू आणि हिंदुत्ववादी वेगळे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या भाषणात फारशी जान नव्हती आणि युक्तिवादही ठोस व ठाम नव्हता. शब्दप्रयोगांना कृतीचे जोरदार पाठबळ लागते अन्यथा ‘शब्द बापुडे केवळ वारा’ अशीच अवस्था होते. याची कल्पना मोदींनाही आहे. त्यामुळेच विकासाचे नवे अवतार विविध प्रकल्पांच्या माध्यमातून भाजपाने मतदारांसमोर खुले केले. यातील भावनिक आवाहन जबरदस्त जोशपूर्ण होते. प्रत्येक औरंगजेबासमोर दरखेपेस एक शिवाजी उभा ठाकेल, असे सांगणारे मोदी या पाश्र्वभूमीवर बाजी मारून जातात. पलीकडे विरोधकांकडे एकीचा अभाव आणि प्रभावी नेताही नाही, अशी भीषण अवस्था आहे. ममता बॅनर्जींनी नेतृत्व हाती घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय खरा, पण त्यांना अनेक मर्यादा आहेत. केवळ स्वत:चे राज्य वगळता त्यांचे देशात फारसे अस्तित्व नाही. आपचीही अवस्था तशीच, म्हणून आता दोन्ही पक्षांनी गोव्यात नवा प्रयोग सुरू केला आहे. आजही केवळ दोनच राज्ये हाती असली तरी संपूर्ण देशात पाय रोवून असलेली केवळ काँग्रेसच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार असतानाही २० टक्के मते काँग्रेसला मिळाली होती, ते त्यांचे सामथ्र्य आहे. मात्र काँग्रेसला आलेली मरगळ कायम आहे. स्वसामर्थ्यांचे भान फुंकणारा नेता नाही. एवढे सारे झाल्यानंतरही घराणेशाहीला मूठमाती मिळण्याची कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वोच्च नेतानिवड लटकलेल्या अवस्थेत आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता पराकोटीला पोहोचली आहे. या परिस्थितीत पार पडलेल्या काशीच्या सोहळ्याने भविष्यातील निवडणुकांचे परिमाण जवळपास निश्चित करण्याचे काम केले आहे. काशी धार्मिक केंद्र असले तरी बकाल हा तिचा दुसरा महत्त्वाचा परिचय होता. तो परिचय पुसतानाच पलीकडे समुद्राखालून ऑप्टिक फायबरचे जाळे पसरवून नव्या युगाला साद घालणारा पक्ष असा नवा परिचय देण्याचा प्रयत्न मोदींनी या सोहळ्यात केला. भाजपाने घालून दिलेल्या या चौकटीतच विरोधकांना निवडणूक खेळावी लागणार, असे चित्र आहे. या विरोधात उभे राहायचे तर विरोधकांना एकत्र येऊन नवा विचार, नवी भाषा, नवे नेतृत्व, नवी आशा असा पूर्णपणे नवा डाव टाकावा आणि खेळावा लागेल. अन्यथा भाजपाच्या जागांमध्ये घट झाली तरी काशी कुणाची होणार हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा