लग्न हा ते करणाऱ्यांसाठी वैयक्तिक आणि दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय, मित्रमत्रिणी आणि प्रसंगी त्यांच्या स्वत:साठीही सामाजिक असा सोहळा असतो. अलीकडे यामध्ये दोन महत्त्वाचे ट्रेंड पाहायला मिळतात. पहिला ट्रेंड हा विकसनशील अर्थव्यवस्थेसोबत जाणारा अर्थात साजरे करण्याकडे असलेला कल याच्याशी संबंधित आहे, तर दुसरीकडे एक तुलनेने संख्यात्मकदृष्टय़ा लहान असलेला वाढता कल आहे तो छानछोकी न करता, साधेपणाने किंवा कमीत कमी खर्चात अथवा रजिस्टर्ड लग्न करून खर्चाचे उरलेले पसे सामाजिक संस्थांना देण्याचा.

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याने आणि त्यावर भविष्यातील समाजाची वीण कशी असणार, याचे संकेत मिळतात. याच विषयावर तरुण पिढीला काय वाटते, ते स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे सर्वेक्षण ‘लोकप्रभा’ने दिवाळी अंकात प्रसिद्ध केले होते. लग्न कसे करायचे आहे, यावर तरुणांनी दिलेली उत्तरे खूप महत्त्वाची होती. पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यास जवळपास सर्वानीच हरकत नाही, असे सांगितले होते. अलीकडे बॉलीवूडच्या चित्रपटांचा आणि टीव्ही मालिकांचा प्रभाव लग्न साजरे करण्याच्या पद्धतीवर होत असल्याचे लक्षात आल्याने, त्याही बाबतीत एक प्रश्न होता. त्यावर चित्रपट किंवा मालिकांचा प्रभाव नाही, असे सांगतानाच ‘पण परवडले तर करू’ असे सांगायलाही तरुण पिढी विसरली नव्हती. महत्त्वाचे म्हणजे अलीकडचा सर्वात मोठ्ठा ट्रेंड असलेल्या ‘डेस्टिनेशन वेिडग’ला (जे पारंपरिकपेक्षा अधिक खर्चीक असते) ५० टक्क्यांहून अधिक तरुणांनी पसंती दिली होती. हा सोहळा आयुष्यभर स्मरणात राहणारा म्हणून त्यावर खर्च करण्यास हरकत नाही, असे तरुणांचे म्हणणे होते. म्हणजेच निवडक कुटुंबीय आणि मित्र यांच्यासमवेत तो धडाक्यात साजरा व्हावा, गावजेवण नको, असा सूर होता. तरुणाईच्या या सर्व ट्रेंड्सचा वेध ‘लोकप्रभा’ने या ‘लग्नसराई’ विशेषांकामध्ये घेतलेला पाहायला मिळेल.

या भूतलावर माणूस अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच पुराश्मयुगापासून ते आताच्या २१ व्या शतकापर्यंत या लग्ननामक पद्धतीमध्ये अनेकविध बदल होत गेले आहेत, होताहेत आणि होत राहतीलही. सामाजिक बदलांचा तो एक महत्त्वाचा निकष राहिला आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या संस्कृतीकरणाचाही तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संस्कृतीचा एक पलू हा सामाजिक वावरामध्ये स्वत:वर समाजहितासाठी घातलेली बंधने किंवा आखून दिलेली सामाजिक चौकट जपणे हाही समजला जातो. मात्र यात काळानुसार बदल अपेक्षित असतात. ते झाले नाहीत तर त्या चौकटीला हळूहळू धक्के बसू लागतात आणि चौकट खिळखिळी होत जाते. पूर्वी लग्ने केवळ जातींमध्ये व्हायची, तर आता आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह हा फारसा वेगळा विषय राहिलेला नाही. हा मोठाच महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. लग्नाच्या संदर्भातील बदल आपल्याला समाज आणि शहर-गावांच्या समस्याही सांगतात. बुफे स्वीकारण्यामागे लागणारी कमी जागा व कमी वेळ याचे गणित आहे. अशा अनेक तुलनेने कमी महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्दय़ांमधील बदलही ‘लोकप्रभा’ने या विशेषांकामध्ये टिपले आहेत. केवळ लग्नेच्छुंसाठीच नव्हे, तर समाजाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे समाज-निरीक्षकांसाठीही हा विशेषांक महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास वाटतो.
विनायक परब