प्रश्न : साधारण वयाच्या चाळिशीत छातीत, गळ्याखाली किंचित डाव्या बाजूला स्नायू स्फुरण पावतात असं काही तरी होतं. हल्ली गळ्याच्या खाली खड्डा असतो. तेथे किंचित दाब आल्यासारखं होतं. जास्तकरून सकाळी भरभर काम करताना उपाशीपोटी हे होतं. अ‍ॅसिडिटी झाली की खूप होतं. घशाशी आंबट पाणी येऊन पडतं. प्रेशर नसतानादेखील सकाळी डोकं बऱ्याच वेळी भणभणतं. नाश्ता केल्यावर थांबतं. छातीत असं झालं की भीती वाटून चक्कर येईल असं वाटतं. चाळिशीतच स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरू झाला. तसेच सोरायसिसचा त्रासही आहे. संपूर्ण बरा झाला तरी अधूनमधून होतच असतो. छातीतल्या या त्रासाबद्दल नेमकं निदान कोणीच करत नाही. प्रत्येक वेळी घाबरून जायला होतं. महिना अध्र्या महिन्यातून असा त्रास होत असतो. अडीच वर्षांपूर्वी अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. नंतर गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यावर धाप लागली.

डॉ. अविनाश सुपे : तुमच्या या त्रासाचं कारण पित्त किंवा अ‍ॅसिडिटी हेच असावं असं वाटतं. तुमची आजारपणं पाहता त्यासाठी दिली गेलेली औषधं बरीच उष्ण असल्याने तुमचा हा त्रास वाढला गेला असावा. शिवाय तुमच्या मनातील चिंतादायक विचार यात आणखी भर घालत असतील. यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करून पाहाव्यात –
१. सकाळी उठल्यावर एखादं फळ खावं, दूध प्यावं, शक्यतो चहा / कॉफी घेणं टाळा. त्यामुळे रिकाम्या पोटाची अ‍ॅसिडिटी व तिचा त्रास कमी होईल.
२. तुमची अँजिओप्लास्टी झालेली आहे, वजनही बहुधा जास्त असावं. त्यामुळे छातीत काही त्रास जाणवल्यास कार्डिओग्राम व हृदयासंबंधी इतर तपासण्या कार्डिओलॉजिस्टच्या सल्लय़ानं करून घ्यावात. यामुळे हृदयाला पुन्हा नव्यानं काही रक्तवाहिन्यांना अडथळ्याचा त्रास होतो का याचं निदान होईल.
३. तुम्हाला मानेचा स्पॉन्डिलिसिस आहे असं तुम्ही म्हटलंय, तर मधून मधून चक्कर येण्याचं तेही कारण असू शकतं. त्यासाठी इलाज आहेत.
४. तुम्ही स्पॉन्डिलिसिससाठी व सांधेदुखीसाठी तीव्र वेदनाशामक औषधे खाऊ नका. त्याऐवजी हल्ली वेदनाशामक पॅचेस बाजारात उपलब्ध आहेत ते वापरा.
५. अ‍ॅसिडिटीची औषध घ्या, कमी नाही वाटलं तर डॉक्टरच्या सल्लय़ाने जरूर पडल्यास एन्डोस्कोपी करून घ्या.
६. मन शांत ठेवा.

प्रश्न : रोज अति दारूसेवनामुळे माझ्या शरीराची हानी झाली आहे. एलएफटी खूपच वाईट आहे. पोटाचा आकार मोठा झाला आहे. मूळव्याध, डोक्यात मुंग्या येणं, लघवीला कमी होणं, झोप नाही, हातपाय थरथरणं, असे बरेच विकार आहेत. माझ्या व्यसनामुळे घरचं वातावरण तंग असतं. मुलं घाबरतात, पत्नीचा रक्तदाब, मधुमेह वाढतो. आईची झोप उडाली आहे व खूप अशक्तपणा आला आहे.

डॉ. जान्हवी केदारे : तुमची व्यसन सोडण्याची इच्छा पाहून खूप बरं वाटलं. तुम्ही स्वत: ठरविल्यानंतर योग्य पद्धतीने इलाज जर केले तर या वयात आणि इतक्या वर्षांच्या व्यसनानंतरही दारूचं व्यसन सुटू शकतं. मुंबईत घाटकोपरमध्ये असलेलं राजावाडी हॉस्पिटल किंवा परळचं केईएम हॉस्पिटल दोन्ही ठिकाणी व्यसनाचा इलाज होऊ शकतो. केईएममध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे. दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार व्यसनमुक्ती केंद्राचा बाह्य़रुग्ण विभाग सुरू असतो. तेथे संपूर्ण इलाज होऊ शकतो. तुमचे रिपोर्ट्स पाहता तुम्हाला फिजिशियन किंवा गॅस्ट्रो इन्टेरॉलॉजिस्टच्या (पोटाच्या विकारावरील डॉक्टर) सल्ल्याची गरज आहे. तीदेखील सोय केईएममध्ये होऊ शकते. आपल्या कुटुंबालाही योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
आपणदेखील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना आपले प्रश्न विचारू शकता..
त्यासाठी ‘लोकप्रभा’ देत आहे व्यासपीठ..
संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.

Story img Loader