मेघदूत.. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणारं कालिदासाचं मेघदूत म्हणजे प्रियतमेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराचं आर्त मन.. या आषाढात आपण कालिदासाचं हे महाकाव्य समजून घेऊया.
‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ अशी काव्याची साधी सरळ व्याख्या संस्कृत साहित्यात केली आहे. तर वर्डस्वर्थच्या मते, ‘थांबवता न येणारा भावनांचा खळाळता प्रवाह’ म्हणजे काव्य. मेघदूतात या दोनही व्याख्यांचा सुरेख संगम आहे. मेघदूत हे विरहरसात बुडालेल्या यक्षाच्या मनात मेघाला पाहून उचंबळून आलेल्या विचारांचं काव्य आहे. खरं तर यक्षाच्या एकटेपणाच्या निमित्ताने कालिदासासारख्या महान कवीला स्फुरलेलं काव्य आहे. विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि प्रेमात पागल झालेला तो यक्ष त्या चेतनाहीन मेघाला आपला दूत बनवून पाठवण्याचं निश्चित करतो. काव्याचा विषय पाहता तसा काहीच नाही. एखादी मुख्य कथा उपकथांच्या अंगानी हळुवारपणे फुलत जात आहे असं काही या काव्यात नाही. मेघदूत हा केवळ मेघाला आपल्या घरी जाण्यासाठी सांगितलेला मार्ग आहे, यक्षाच्या घराचा पत्ता आहे. इतर वेळी चित्रपट पाहायला गेल्यास त्यात कथानक नसेल तर आपली सहज प्रतिक्रिया असते, ‘शी.. चित्रपटाला काही कथाच नाही!’ पण कालिदासासारख्या सिद्धहस्त लेखकाचा स्पर्श होतो तेव्हा पत्ता सांगण्याच्या निमित्ताने एक सुंदर काव्य निर्माण होतं. काय आहे हे मेघदूत?
संस्कृत साहित्यात नायक हा अत्यंत महत्त्वाचा. नायकाचे गुण कसे असावेत यावर फार मोठी चर्चा संस्कृत साहित्यात आहे. पण मेघदूताच्या नायकाचं नावसुद्धा देण्याची आवश्यकता कालिदासाला वाटत नाही. कारण त्याच्या नायकाने प्रमाद केला आहे. नायक हे समाजाचे आदर्श असले पाहिजेत आणि तोच चुकत असेल तर त्याचं नाव कशाला द्या? आपल्या काव्याची सुरुवात करताना तो म्हणतो, ‘कश्चित्कान्ताविरहगुरुणा’ आपल्या प्रिय पत्नीचा भयंकर विरह सहन करणारा कोणी एक..! बरं हा विरह काही प्रिया माहेरी गेल्यामुळे नाही तर शापामुळे आहे. या शापामुळे आलेल्या विरहाचं कारण काय तेही देण्याची तसदी कालिदास घेत नाही आणि मग विद्वानांनाच त्याचं कारण शोधावंसं वाटतं.
यक्षाच्या या शापाविषयी एक कथा रचली गेली, यक्ष हे कुबेराचे सेवक. हिमालय हा त्यांचा निवास. अशाच एका यक्षाला कुबेराने पूजेसाठी सूर्योदयापूर्वी हजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली. आधीच हिमालय त्यात पहाटेची वेळ आणि त्यात ‘गळवावर फोड यावा’ तशी अवस्था म्हणजे या यक्षाचं नवीन लग्न झालेलं. स्वाभाविकपणे नूतन परिणित यक्षाला आपल्या कान्तेची ‘पहाटे पहाटे मिठी सैल झाली’ ही कल्पनाच सहन होत नाही. आणि मग त्या रसिक यक्षाला निसर्गाचं भान येतं. त्याच्या लक्षात येतं अरे, आपण तर फुलं पहाटे काढतो, ती कुठे उमलेली असतात. मग रात्रीच कळ्या काढल्या म्हणून कुठे बिघडलं? मनात कल्पना आल्याबरोबर यक्ष त्याबरहुकूम करतो आणि नेमकं तिथेच नशीब आडवं येतं. सकाळी कुबेर पूजेला बसतो आणि शेवटचं कमळ अर्पण करायला आणि ते उमलायला एक गाठ पडते. त्या कमळातून एक भुंगा बाहेर पडतो. हीही पुन्हा कविकल्पना. आख्खं लाकूड पोखरणारा भुंगा संध्याकाळच्या वेळी कमळातील मकरंद खायला बसतो आणि स्थलकाळाचं भान विसरतो. संध्याकाळी कमळाची एक एक पाकळी मिटत जाते आणि भुंगा आत अडकतो. पण ते कमळ पोखरून बाहेर येण्याची कल्पना त्याला सहन होत नाही. सकाळ होईल आणि मग पुन्हा कमळ उमललं की आपण बाहेर पडू असा विचार करून तो शांतपणे तिथेच बसून राहतो, असं कमळ आणि भुंग्यातलं सख्य. पण नेमका हा सख्यभावच यक्षाचं दुर्दैव ठरतो. यक्षाची लबाडी कुबेराच्या लक्षात येते. तो संतापतो आणि सरळ एक वर्ष प्रियपत्नीचा विरह सोसावा लागेल असा शाप देऊन मोकळा होतो. त्यात आणखी एक मेख अशी की, या शापात यक्षाला आपल्या सिद्धींचा वापर करता येणार नाही. कारण सिद्धी असतील तर हवं तेव्हा तो आपल्या पत्नीला भेटू शकला असता. आणि मग तो शाप वाटला नसता.
म्हणूनच काव्याचा आरंभ होतो तो,
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारप्रमत्त:
शापेनास्तंगमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।
यक्षश्चRे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसति रामगिर्याश्रमेषु।।
कोणी एक यक्ष आपल्या अधिकारात म्हणजे कर्तव्यात प्रमत्त होतो, चूक करतो. संस्कृतमध्ये अधिकार हा शब्द मराठीप्रमाणे नसून कर्तव्य अशा अर्थी येतो. ‘कर्मणि एव अधिकार: ते’ हे भगवद्गीतेतील वचन आपल्या सर्वाना ज्ञात आहे. तर स्वत:च्या कर्तव्यात चूक केल्यामुळे आपल्या स्वामीकडून मिळालेल्या शापाने प्रिय पत्नीपासून एक वर्ष दूर राहण्याचं दुर्दैव त्याच्या वाटय़ाला येतं. हा यक्ष मग अलकेपासून खूप दूर असलेल्या रामगिरीवर येऊन राहतो. कालिदासाच्या साहित्यात तपोवन, पावित्र्य या शब्दांना फार महत्त्व आहे. त्यामुळे तो म्हणतो, यक्ष येऊ न राहिला तो कुठे तर कोणी एके काळी सीतेसारख्या पतिव्रतेने स्नान केल्यामुळे जिथलं पाणी पवित्र झालं आहे अशा रामगिरीवरील आश्रमांत. नेमक्या शब्दांचा अगदी नेमकेपणाने वापर करण्यात कालिदास तत्पर, शब्दांचा उगीच फाफटपसारा नाही. यक्षाची विरह वेदना दाखवण्यासाठी तो आश्रमेषु असं आश्रम शब्दाचं अनेक वचन वापरतो. खरं तर येथे स्निग्ध म्हणजे घनदाट छाया देणारे वृक्ष आहेत. पण विरहात तळमळणाऱ्या यक्षाला अशा पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणीसुद्धा स्वस्थता नाही आणि म्हणूनच तो कोणत्या एका आश्रमात न राहता सतत एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात फिरत राहतो. विरहाने या यक्षाची काय अवस्था केल्येय,
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
त्या पर्वतावर ‘कतिचित’ म्हणजे काही महिने असा विरहात राहिल्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. संस्कृत साहित्यात कामदेवाचे अरविंद, अशोक, चूतमजिरी म्हणजे आंब्याचा मोहोर, नवमल्लिका, नीलोत्पल म्हणजे नीलकमल असे पाच पुष्पबाण मानले आहेत. पण प्रेमाचा परिणाम दाखवणारे उन्माद, ताप, शोषण म्हणजे बारीक होणं, स्तंभन आणि संमोहन असे आणखीही पाच बाण मानले आहेत. यातला शोषण हा परिणाम यक्षावर दिसू लागला आहे. अतिशय बारीक झाल्याने त्याच्या हातातील कनकवलय गळून पडले आहे. त्याचे मनगट रिकामे दिसत आहे. पण पत्नी जवळ नसल्याने त्याचेही भान यक्षाला नाही. हीच कल्पना शाकुंतलातही दिसते. तिथेही बारीक झालेला दुष्यंत सैल झाल्यामुळे पुढे येणारं कनकवलय मागे सारत आहे. साधारणपणे प्रेमात स्त्रियाच बारीक वगैरे होतात. पण इथे पती किंवा प्रियकरसुद्धा बारीक झाला आहे. यानंतर कालिदास दिन आपण ज्या ओळींवरून करतो ती ओळ येते,
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाष्टिसानुं
आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांवर जमलेले एखाद्या हत्तीप्रमाणे क्रीडा करणारे विशाल मेघ यक्ष बघतो. पण तो मेघ पाहून यक्षाची अवस्था अधिकच बिकट होते कारण,
मेघालोके भवति सुखिनोप्यन्यथावृत्ति चेत: कण्ठोषप्रणयिनि जने किं पुनर्दुरसंस्थे
सुखात असलेल्या माणसालासुद्धा मेघाला पाहून हुरहुर वाटते तर आपल्या प्रिय व्यक्तीला बाहुपाशात घेण्याची इच्छा करणारा दूर असेल तर त्याची काय अवस्था होणार? आपली जर ही अशी अवस्था तर आपल्या प्रियेचं काय झालं असेल. आपल्या विरहात, आपलं काही बरं वाईट झालं नाही ना अशा कल्पनेने कदाचित तिचे प्राणही तिला सोडून जातील. छे छे, हे असं होता उपयोगाचं नाही, आपण आपलं कुशल तिला कळवणं गरजेचं आहे. अशा विचाराने यक्ष त्या जलाने पूर्ण पण अचेतन अशा मेघाला आपला दूत म्हणून पाठवण्याचं निश्चित करतो. कालिदास म्हणतो, धूम, तेज, पाणी आणि वायू यांनी युक्त निर्जीव मेघ कुठे आणि संभाषणात चतुर असलेला दूत कुठे? खरंच, ‘कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु’ कामार्त लोकांना चेतन-अचेतनातील फरकसुद्धा कळत नाही. कालिदास जाता जाता जसे प्रेमीजनांविषयीचे सत्य सांगून जातो तसेच हवामानशास्त्रातील एक वैज्ञानिक सत्य केवळ एका ओळीत सांगतो. धूमज्योति:सलिलमरुतां संनिपात: क्वमेघ: अशा शब्दात मेघनिर्मितीचे जे तथ्य कालिदासाने सांगितले आहे ते नव्याने आपल्या साहित्याचा विचार करणाऱ्या हवामान शास्त्रज्ञांना अचंबित करते .
कालिदासाला किंवा सर्वच संस्कृत कवींना मनुष्यस्वभावाची चांगली जाणीव आहे. उद्धटपणाने कोणाला काम सांगितलं आणि सांगणारी व्यक्ती अधिकारावर असेल तर सेवक काम करेलही पण ते केवळ उरकण्याच्या हेतूनेच. तेच गोड बोलून एखादं काम सांगितलं, त्याच कौतुक केलं तर तो जीव तोडून ते काम करेल, हा मनुष्यस्वभाव असतो. एखाद्यला आपलं काम सांगायचं म्हणजे त्याच्याशी उद्धटपणे बोलून चालणार नाही. त्याच्याशी गोड बोलून, त्याला लाडी-गोडी लावली तर तो आपल्या कार्याला तयार होईल याचं भान यक्षालाही आहे. तो जवळ असलेली कुटजकुसुमांची ओंजळ मेघाला अर्पण करतो आणि त्याचे गोड शब्दात स्वागत करतो, ‘जगात विख्यात असणाऱ्या अशा पुष्कलावर्त वंशात तुझा जन्म झाला आहे. तू इच्छारूपधारी असा प्रत्यक्ष इंद्राचा प्रमुख अधिकारी आहेस. तुझा हा बंधू केवळ दुर्दैवामुळे त्याच्या पत्नीपासून दूर गेला आहे. ‘संतप्तानां त्वमसि शरणम’ अरे तापलेल्यांचा तूच तर आधार आहेस. (अर्थात हे तापणं दोन प्रकारे आहे. उन्हाने तप्त झालेल्या पृथ्वीला आणि लोकांना जसं तू शांत करतोस तसं तुझ्या आगमनाने दूरवर गेलेले वीर, प्रवासी परत येतात आणि आपली प्रेमाची) तुझ्याकडे मी याचना करतोय कारण नीच लोकांकडून कार्य पूर्ण होण्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी आपल्या कार्याला नाकारणे अधिक चांगले नाही का?’
त्याच्या ह्य बोलण्यावर मेघ अचेतन असल्याने काही उत्तर देत नाही, पण कदाचित तीच त्याची मूक संमती समजून यक्ष मेघाला त्याच गन्तव्य, जाण्याचं ठिकाण सांगतो. मेघाचं गन्तव्य आहे यक्षेश्वर कुबेराची नगरी अलका. तिथे जाऊन मेघाने आपला संदेश आपल्या पत्नीला द्यावा अशी यक्षाची इच्छा आहे. अलकानगरीच्या बाहेरील उद्यानात शिवाचा निवास आहे. त्याच्या मस्तकावरील चंद्रामुळे ह्या अलकेतील उंच सौंध केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीसुद्धा चंद्रधवल असतात. पण त्यामुळेच मेघाला अलकेत जाण्याचा आणखी एक फायदा यक्षाला दिसतो. कोणीही झालं तरी एखादं काम का करतं तर त्यातून मला काय मिळेल ह्या जाणिवेतून. जर तू माझा संदेश घेऊ न अलकेला गेलास तर अनायास तुला योगेश्वर शिवाचं दर्शन होईल. शिवाच्या सतत तिथे असण्याविषयी कालिदासाच्या मनात आणखी एक विचार असावा, त्याने तो कुठे स्पष्ट केला नाही पण तो असावा. यक्ष म्हणजे देवत्वाला पोचलेले. आयुष्य हे केवळ उपभोगासाठी आहे असा त्यांचा समज आहे. म्हणूनच तर देव, दानव आणि मानव या आपल्या तीनही अपत्यांना ब्रह्मदेवाने ‘द’ संदेश दिला. अक्षर एक पण जातीगणिक अर्थ वेगळा. मानव फक्त स्वत:चाच विचार करणारे, सगळं केवळ मलाच हवं असं म्हणणारे म्हणून त्यांनी ‘द’ चा अर्थ ‘दान’ असा घ्यावा, दानव हे अत्यंत क्रूर म्हणून त्यांनी ‘दया’ अशा अर्थी ‘द’ घ्यावा तर देव हे उपभोगात रमलेले म्हणून त्यांच्यासाठी ब्रह्मदेवाने ‘द’ चा अर्थ ‘दमन’ असा सांगितला आहे. अलकेत कोणत्याच गोष्टीची वाण नाही. शृंगाराला योग्य असं रात्रीचं चांदणं दिवसासुद्धा मिळत असलं तरी मदनारी शिवाच्या सतत सान्निध्याने यक्षांच्या शृंगारावर नियंत्रणही राहात असेल. शिवदर्शन हे प्रत्यक्ष अलकेत गेल्यावरचं फळ. पण वाटेतही अनेक फळं मेघाला मिळणार आहेत. जेव्हा हा मेघ पवनमार्गावर आरूढ होऊन पुढे पुढे जाईल तेव्हा तुझ्या आगमनाबरोबर त्यांचे दूर देशी गेलेले पती परत येतील याची खात्री झालेल्या स्त्रिया तुझ्याकडे दुर्लक्ष करतील हे कसं शक्य आहे? वाटेतील ह्या स्त्रिया आपल्या कुरळ्या केसांच्या बटा हाताने धरून तुझ्याकडे मोठय़ा कौतुकाने पाहतील. एखाद्या पुरुषाकडे स्त्रियांनी कौतुकाने पाहाणं हे फार मोठं फळ झालं नाही? तुझा मार्ग आनंददायी करण्याकरता पवनसुद्धा मंद मंद वाहील. तुझ्या डाव्या बाजूने चातक पक्षी मधुर कूजन करत तुला साथ देतील. तू जाताना जात असताना आकाशात बलाका जणू काही तुला त्यांची माला अर्पण केली आहे, अशा रूपात सेवा करतील. सुंदर स्त्रियांचं तुझ्याकडे पाहाणं हे तुझ्या नेत्रांना आनंददायी, मंद वारे हे स्पर्शाला आल्हाददायक आणि चातकांचं मधूर कुजन हे कर्णेद्रियांना उल्हसित करेल.
थोडक्यात तुझ्या ज्ञानेंद्रियांना आनंदित करणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी तुला वाटेत मिळतील. पण अशा अनेक फळांचा उपभोग घेत हा आपला दूत रमतगमत गेला तर भलतीच पंचाईत व्हायची. म्हणून यक्ष त्याला स्पष्टच सांगतो, ‘‘बाबा रे, एखाद्या फुलासारखा नाजूक असला तरी आशेचा बंध हा स्त्रियांना जीवनधारणेला उपयोगी ठरतो. हाच बंध तुटला तर दु:खाने अल्पावधीतच त्यांचे प्राणोत्क्रमण होण्याचा धोका असतो. म्हणून एक एक दिवस मोजत असलेल्या तुझ्या या दुर्दैवी बंधूच्या पत्नीला पाहायला तू वेगाने जा.’’
आपलं काव्य निदरेष व्हावं याविषयी कालिदास अत्यंत सजग आहे. कालिदासाने शरद ऋतूतील मेघाची निवड केली असती तर तो रिकामा मेघ अलकेपर्यंत पोहोचूच शकला नसता. त्याने ज्या मेघाला दूत म्हणून निवडलं आहे तो आषाढातला मेघ आहे. थोडक्यात पाण्याने भरलेला आहे. म्हणूनच तो दूपर्यंत जाऊ शकेल. अशा या मेघाला यक्ष आता रामगिरीचा निरोप घ्यायला सांगतो,
आपृच्छस्व प्रियसखममुं तुङ्गमालिङ्गय़ शैलं
वन्द्यै: पुंसां रघुपतिपदैरङ्कितं मेखलासु।
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य
स्नेहव्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो बाष्पमुष्णम्।।
आपल्या संस्कृतीत पुराणकथांचा फार मोठा साठा आहे. अनेक सुंदर कथा संस्कृत साहित्यात सापडतात. पावसाळ्यात पर्वतांभोवती नेहमीच मेघमालांचा गराडा असतो. पर्वत आणि मेघांच्या या सान्निध्याविषयी एक सुंदर कथा आहे. फार पूर्वी पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते नेहमी इकडून तिकडे उडत असत. त्यांच्या या उडण्याने पृथ्वी त्रस्त झाली. ती रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्याला म्हणाली, ‘‘देवा, तुम्ही माझं अचला असं नाव ठेवलंत. पण या पर्वतांमुळे मी सदैव चला आहे. एक तर माझं नाव बदला किंवा या पर्वतांचं काहीतरी करा.’’ ब्रह्मदेवाने इंद्राला योग्य त्या कारवाईची आज्ञा केली. इंद्राने आपल्या हातातील वज्र टाकून या पर्वतांचे पंख कापून टाकले. तेव्हापासून पृथ्वी अचला झाली. पण असं म्हणतात तुटलेला अवयव मूळ शरीरापासून दूर होऊ इच्छित नाही तसे हे पंख मेघांच्या रूपात त्या पर्वतांच्या अवतीभवती राहिले. या कथेचा उपयोग नेमकेपणाने कालिदासाने केला आहे. यक्षाचा निरोप घेऊन जायचे तर मेघाचा आणि रामगिरीचा विरह होणार म्हणून यक्ष म्हणतो, ‘‘बा मेघा ज्याच्या कटिप्रदेशावर रघुपतीची पावलं उमटल्यामुळे सर्वाना वंद्य आहे, पुन्हा पुन्हा होणाऱ्या दीर्घ विरहानंतर त्याच्याशी भेट झाल्यावर तुझ्या डोळ्यांत नेहमीच अश्रू उभे राहतात, अशा तुझ्या प्रिय मित्राला या शैलराजाला आलिंगन दे. त्याची संमती घे आणि नीघ.’’
मार्गातले हे काही फायदे मेघाच्या समोर ठेवल्यावर यक्ष मेघाला त्याच गंतव्य लक्षपूर्वक ऐकण्याची सूचना देतो. कारण स्पष्ट आहे, मार्ग फार दूरचा आहे, कुठे उगीच इकडे-तिकडे झालं तर गन्तव्याला पोचायला उशीर होईल, आधीच इतक्या महिन्यांचा विरह आणि त्यात तूही उशिरा पोचलास तर? मग माझ्या विरहिणीची काय बरं अवस्था होईल? म्हणून यक्ष म्हणतो,
मरग तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरुपं..
आता मी तुझा अलकेला जाण्याचा मार्ग सांगतो तो लक्षपूर्वक ऐक.. (क्रमश:)
या लेखातील ‘मेघदूता’ची दोन चित्रे ‘कालिदासानुरूपम्’ या वासुदेव कामत यांच्या चित्रमालिकेतील आहेत.