0kedare‘मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात’.. संदीप खरेंची सुश्राव्य कविता कानावर पडली आणि मन भूतकाळात रमले. लहानपणी तळ्यात मळ्यात हा खेळ खेळत असू, त्याची आठवण झाली. खेळ घेणाऱ्याने ‘तळ्यात’ म्हटले की पुढे उडी मारायची आणि मळ्यात म्हटले की एक पाऊल मागे उडी मारायची. हळूहळू आज्ञा देण्याचा वेग वाढत जायचा आणि पुढे-मागे उडय़ा मारताना हमखास चुकायला व्हायचे. 

बहिणाबाईंच्या काव्यपंक्ती आठवल्या. ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातयं ढोर, किती हाकया हाकया फिरी येतं पिकावर’. मनाचा चंचलपणा, मनाचे हिंदोळे आणि मनाने मारलेल्या भराऱ्या यांचे वर्णन अशा प्रकारे अनेक ठिकाणी सापडेल.
स्थिर आणि स्थायी अशा अवस्थेत आपले मन कधीच नसते. अनेक प्रकारचे विचारमंथन त्यात सुरू असते. अनेक कल्पना मनात फुलतात. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन, आकलन आपले मन सतत करत असते. या विचार कल्पनांमधून मनात भावभावना निर्माण होतात. आनंद, दु:ख, राग, मत्सर, आश्चर्य, उत्सुकता, द्वेष अशा काही मूलभूत भावना आपण अनुभवतो. याव्यतिरिक्त भावभावनांच्या अनेक छटा दिसतात. विचार आणि भावना यांच्याशी सुसंगत असे आपले वागणे असते. परीक्षेचा रिझल्ट छान लागला की ‘व्वा, मी केलेल्या कष्टांचे चीज झाले. आई-बाबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले’ असे अनेक विचार मनात येतात. मनात आनंद निर्माण होतो आणि तो आपण उडी मारून, टाळी वाजवून व्यक्त करतो. आपली विचारशक्ती, भावभावनांची अनुभूती आणि वर्तणूक यांच्यात संतुलन असते. आपल्या भावनांवर आणि वागण्यावर आपले सर्वसाधारणपणे नियंत्रण असते. कोणत्या परिस्थितीत कसे वागायचे हे आपले मन आणि बुद्धी योग्य पद्धतीने ठरवतात. असे असेल तरच मानसिक आरोग्य कायम राहते.
हे विचार, भावना आणि वर्तणुकीतील संतुलन मानसिक आरोग्याची सीमारेषा ठरवते. काही कारणाने हे संतुलन बिघडले तर मानसिक विकार निर्माण होतो. उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर दु:ख होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. काही दिवस आपल्याला अत्यंत उदास वाटते. खूप रडू येते. कशात मन लागत नाही. आपले दैनंदिन व्यवहारही ठप्प होतात. पण दु:खातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करतो. दैनंदिन जीवन पुन्हा रुळावर आणतो. आठवणींनी पुन्हा पुन्हा दु:खी न होता त्या ‘रम्य’ स्मृती आहेत असे म्हणायला लागतो. पण एखाद्याला हे जमत नाही. त्याच्या मनातले दु:ख संपत नाही; ते अतिशय तीव्र असते आणि नियंत्रणाबाहेर जाते. मनात विचारही अतिशय निराशावादी येतात. घरात, कामात कशातच लक्ष लागत नाही आणि कशात रसही वाटत नाही. १५-३० दिवस नाही तर अनेक महिने अशी मनोवस्था टिकून राहते.
अशा प्रकारे विचारविश्व, भावनिक विश्व आणि वर्तणूक यातील समतोल ढळतो. बऱ्याच कालावधीपर्यंत हे असंतुलन टिकते, त्याचा व्यक्तीच्या सामाजिक परिघातील व्यवहारावर अनुचित परिणाम होतो; निर्माण होणाऱ्या भावभावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या असतात आणि त्या व्यक्तीला या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागतो. अशा वेळी सीमारेषा ओलांडून ती व्यक्ती मानसिक विकाराने ग्रस्त झाली असे म्हणावे लागते.
अशा प्रकारे मानसिक विकार होण्याला अनेक जैविक (Biological), मानसिक आणि सामाजिक घटक जबाबदार ठरतात. आनुवंशिकता, मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडणे हे जैविक घटक, तर आयुष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट क्षणांचा सामना आपल्या मानसिक कुवतीप्रमाणे करणे हे मानसिक घटक. बदलती सामाजिक आर्थिक परिस्थिती, समाजातल्या घटना हे सामाजिक घटक. एका मध्यमवयीन नोकरदाराचे उदाहरण पाहू. ५०-५५ वर्षे वय असलेले हे गृहस्थ सरकारी नोकरीत आहेत. नुकताच ८० वर्षांच्या आईला अर्धागाचा झटका आला म्हणून महिनाभर रजेवर होते. त्याच सुमारास त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. दोन्ही घटनांनी त्यांच्या खिशावर चांगलाच बोजा पडला. तेवढय़ात बदलीची ऑर्डर आली. प्रत्येक गोष्ट मन लावून करण्याचा त्यांचा स्वभाव. आयुष्यात एकत्रितपणे घडणाऱ्या अनेक घटनांना सामोरे जाणे त्यांना अवघड गेले. बदलांना, अडचणींना सामोरे जाण्याची त्यांची क्षमता (coping) कमी पडू लागली. सतत चिंतामग्न राहू लागले. मनात विचार आला की त्यांच्या छातीत धडधडू लागायचे, घाम फुटायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि मनात भीती निर्माण व्हायची की आता हार्ट अॅटॅक (heart attack) येतो की काय! अशी प्रचंड भीती १५-२० मिनिटे वाटत राही. मनात सतत उदास वाटे. कधी कधी तर रडू कोसळे. आपल्या जगण्यातच काही अर्थ राहिला नाही असे वाटे आणि एखाद्या वेळेस आत्महत्या करावी असा टोकाचा विचार मनात येई. बदलीच्या ठिकाणी ते रुजूच झाले नाहीत. दोन महिने घरात बसून काढले. त्यांच्या वडिलांनाही असा त्रास होता हे त्यांच्या पत्नीला आठवले आणि मग त्यांनी तातडीने त्यांना डॉक्टरकडे नेले.
मानसिक आरोग्याच्या सीमारेषा कोणीही ओलांडू शकते. स्त्री-पुरुष, लहान मुले, तरुण, वृद्ध, श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित, शहरी, ग्रामीण असा कोणताही भेदभाव यात नाही. आपल्या जैविक घटकांवर, आनुवंशिकतेवर किंवा सामाजिक, आर्थिक संकटांवर आपले नियंत्रण नसते; परंतु आपली मानसिक क्षमता वाढवणे, ताण-तणावांना सामोरे जाण्याची शक्ती वाढवणे आणि आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे भान ठेवणे हे मात्र आपण करू शकतो.
डॉ. जान्हवी केदारे

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत