पहिल्या महायुद्धाची, पहिली ठिणगी पडली त्याला गेल्याच आठवडय़ात १०० वर्षे पूर्ण झाली. पहिल्या महायुद्धाची सुरुवात २८ जुलैला झालेली असली तरी त्याची ठिणगी मात्र जून महिन्यातच पडली होती. संपूर्ण जगभरामध्ये त्या निमित्ताने विविध लेख-आठवणी प्रसिद्ध झाल्या. संपूर्ण जगाचा इतिहास आणि राजकारणालाच या महायुद्धाने कलाटणी दिली.. त्याचे संदर्भ आणि आठवणी जागविल्या जात असतानाच दुसरीकडे आता जग २१ व्या शतकातील नव्या मोबाइल महायुद्धाला तयार होत आहे. त्याचे पडघम गेल्या काही महिन्यांत वाजू लागले आहेत. योगायोग असा की, पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण होत असतानाच या मोबाइल महायुद्धाचीही ठिणगी पडली. सुमारे दोन आठवडय़ांमध्ये दोन महत्त्वाच्या घटना जगभरात घडल्या. त्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. कारण दिसायला तरी या घटना म्हणजे उत्पादन बाजारपेठेत आणण्याची घोषणाच होत्या. पण ई-कॉमर्सच्या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येईल की, या घटना म्हणजे प्रॉडक्ट लाँच नाही तर नव्या मोबाइल युद्धाची ती ठिणगीच आहे! सारे काही होणार आहे ते अर्थकारणासाठी.
ई-कॉमर्सवरून सुरू झालेल्या पहिल्या पातळीच्या ग्राहकयुद्धाची परिणती नंतर महायुद्धात होऊ शकते असे कुणी २० वर्षांपूर्वी सांगितले असते तर फारसा कुणाचा विश्वास बसला नसता. अगदी आज जगङ्व्याळ पसरलेल्या अॅमेझॉन डॉटकॉमचा संस्थापक असलेल्या जेफ बेझोसचाही विश्वास बसला नसता कदाचित. कारण अॅमेझॉन सुरू करताना काही तरी भव्यदिव्य करावे आणि जगभर पसरावे एवढीच त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण महत्त्वाकांक्षा मात्र जबरदस्त होती म्हणून तर त्याने आपल्या कंपनीला जगातील सर्वात मोठय़ा नदीचे नाव बहाल केले. अॅपलसारख्या मोठय़ा झालेल्या अनेक आयटी कंपन्यांची सुरुवात गॅरेजमधून झाली म्हणून त्यानेही गॅरेज असलेले घर घेतले आणि तिथून अॅमेझॉनची सुरुवात केली. एखादी गोष्ट ऑनलाइन खरेदी करता येते यावर तेव्हा फारसा कुणाचा विश्वास नव्हता. आता अमेरिका आणि युरोपमध्ये अध्र्याहून अधिक व्यवहार ऑनलाइन होतात. बेझोसने पुस्तकांपासून सुरुवात केली आणि पहिले पुस्तक ऑनलाइन विकायला त्याला तब्बल एक वर्ष लागले. पण आज तुम्ही पाहिलेत तर असे लक्षात येते की, जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ज्या पुस्तकांच्या ऑनलाइन विक्रीपासून अॅमेझॉनने सुरुवात केली, त्या अॅमेझॉनला प्रकाशक घाबरतात तरी किंवा त्यांच्या टाचेखाली येऊन त्यांचे व्यवसाय बंद तरी झाले. कोणताही प्रकाशक आपले पुस्तक जेवढय़ा वेगात ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो, त्यापेक्षा कमी वेळेत आणि अधिक वेगात अॅमेझॉन ग्राहकांपर्यंत पोहोचते. नंतर फक्त पुस्तकच का, असा विचार बेझोसच्या मनात आला आणि आता तुम्हाला कोणतीही गोष्ट अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरून खरेदी करून २४ तासांत घरी मिळवता येते. मग तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात का असेनात!
अर्थात अशा अॅमेझॉनला जगातील सर्वात मोठय़ा असलेल्या भारत आणि चीन या दोन बाजारपेठा न खुणावत्या तर नवलच! यंदाच्या आयपीएलच्या मोसमात अॅमेझॉनने भारतात प्रवेश केला आणि इतर अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले! त्याच्या प्रभावी जाहिरातीही त्यांनी केल्या. भारतीय माणूस हा क्रिकेटवेडा आहे, हे लक्षात घेऊन सुरुवात आयपीएलदरम्यान करण्यात आली. भारतीयांच्या मानसिकतेचाही अॅमेझॉनने चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळेच डिलिव्हर्ड म्हणजेच खरेदी केलेला माल कोणतीही कुरकुर न करता परत घेण्याची जाहिरात भारतात सर्वाधिक काळ दाखविण्यात आली. अॅमेझॉनने फक्त ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील कंपन्यांनाच आव्हान दिलेले नाही तर त्यांनी कुरिअर हाताळणाऱ्या कंपन्यांनाही अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये अॅमेझॉनचा हा व्यवसाय काही केवळ ई-कॉमर्सपुरता म्हणजे ऑनलाइन खरेदी-विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्यांनी रिटेलमध्येही हातपाय पसरले आहेत. त्यांनी थेट वॉलमार्टलाच आव्हान दिले आहे. किरकोळ खरेदीसाठी आता वॉलमार्टमध्येही जाण्याची गरज नाही, कारण अॅमेझॉनने सारे काही घरबसल्या मोबाइलवर अॅप्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ज्या कंपन्या वॉलमार्टसाठीची उत्पादने तयार करतात त्याच कंपन्या अॅमेझॉनसाठीही उत्पादने तयार करतात. कमी किमतीचे युद्ध सुरू आहे! पण अॅमेझॉनने त्या सर्वात मोठय़ा नदीप्रमाणेच महामहत्त्वाकांक्षा ठेवली आहे. त्यामुळेच त्यांचा वावर आता रोबोटिक्सपासून ते थेट स्पेसशिप अर्थात अंतराळयानापर्यंत असा पाहायला मिळतो आहे.
असाच अंतराळयानाच्या संदर्भातील प्रयोग गुगलनेही करून पाहिला. अॅमेझॉनने हे सारे करताना ज्या बडय़ा कंपन्यांना धक्के दिले, त्यात गुगलचाही समावेश आहे. अॅमेझॉन जे काही करते त्यात असलेले पैसे लक्षात आल्यानंतर गुगलनेही त्यात शिरकाव केला, पण आज तरी गुगलला अनेक मर्यादा आहेत, त्या बाबतीत आणि भविष्य हे मोबाइलमध्ये आहे, हे अॅमेझॉनला लक्षात आले म्हणूनच त्यांनी गेल्याच आठवडय़ात फायर फोन बाजारात आणला. इतर कोणत्याही स्मार्टफोनसारखाच असलेला हा फोन वेगळा ठरतो तो त्यावर असलेल्या फायरफ्लाय या बटणामुळे. हे बटण तुम्हाला थेट जागतिक बाजारपेठेतच उभे करते. या फोनच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या ग्राहकांच्या डेटाबेसच्या माध्यमातून अॅमेझॉन पुढील खेळी रचणार आहे. त्यामुळे फोन हे केवळ माध्यम आहे, लक्ष्य वेगळेच आहे.
अॅमेझॉनची भारतातील प्रतिस्पर्धी कंपनी म्हणजे फ्लिपकार्ट! आयआयटीयन असलेल्या दोघांनी सुरू केलेल्या या कंपनीने गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत चांगलाच जम बसवला; इतका की अॅमेझॉनची भारतीय बाजारपेठेतील पहिली स्पर्धा त्यांच्यासोबतच असणार आहे. फ्लिपकार्ट ही भारतीयांची कंपनी, अर्थात त्यामुळे त्यांचा भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास तसा दांडगा. त्यामुळेच त्यांनी चाल केलेल्या खेळींना बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता अनेक व्हेंचर कॅपिटल फंड त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यांनीही आता फ्लिप ही उत्पादनांची मालिकाच स्वतहून बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यात आतापर्यंत पेनड्राइव्ह, कॅमेरा, हेडफोन आदींचा समावेश होता. गेल्याच आठवडय़ात त्यांनीही डिजिफ्लिप टॅब्लेट बाजारात आणला आहे. डय़ुएल सिम, कॉल करण्याची सोय असलेला सात इंची टॅब्लेट हादेखील बाजारातील ग्राहकांची माहिती आणि त्यांच्या वर्तनाचा डेटाबेस असणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात २४ तासांत डिलिव्हरी हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यांनीही आता या माध्यमातून भारतीय ग्राहकांना बाजारपेठेचा थेट अॅक्सेस दिला आहे. २००७ ला सुरू झालेल्या या कंपनीने आता ई-कॉमर्सच्या बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारली आहे.
पलीकडे चीनमध्ये तर आणखी एक तगडा स्पर्धक तयार असून तो या सर्वाना जागतिक बाजारपेठेत चारी मुंडय़ा चीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याचे नाव अलीबाबा डॉटकॉम. चिनी नागरिकाने स्थापन केलेल्या या कंपनीने चीनची पूर्ण ई-कॉमर्स बाजारपेठ व्यापली असून चीनमधील ९९ टक्के आर्थिक व्यवहार हे त्यांच्या अलीपे या संकेतस्थळाच्या माध्यमातून होतात. अॅमेझॉन आणि ई- बे या ई-कॉमर्स क्षेत्रातील बडय़ा कंपन्या जेवढा व्यवहार करतात तेवढा एकत्रित व्यवहार एकटी अलीबाबा करते. या कंपनीनेही आता अमेरिका प्रवेशाची जय्यत तयारी केली आहे आणि येत्या काही दिवसांत ती जागतिक बाजारपेठेत उतरेल तेव्हा मोबाइल महायुद्धाचे रणशिंग फुंकले जाईल. सर्वाचे शस्त्र असेल मोबाइल आणि ग्राहकांची माहिती असलेला डेटाबेस या मोबाइल युद्धाची रणनीती ठरवील!
युद्धनीतीमधील तज्ज्ञांनी तर यापूर्वीच जाहीर केले आहे की, भविष्यातील युद्धे ही प्रत्यक्ष रणभूमीपासून खूप दूर खेळली जातील. कदाचित ती दोन देशांमधील नसतीलही. त्याचे स्वरूपही पूर्णपणे वेगळे असेल! त्यात तंत्रज्ञानाचा वापर हा शस्त्राप्रमाणे होणार आहे. केंद्रस्थानी असेल ते अर्थशास्त्र. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तयार केलेल्या बनावट नोटा भारतात पकडल्या जातात तेव्हा त्या नोटा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छुप्या युद्धाची ती सामग्री असते! थोडक्यात काय, तर अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचला की, देशाची व्यवस्था गडगडायला सुरुवात होते! अर्थशास्त्र हे सर्वात जास्त प्रभावी असते. त्यामुळे दिसायला ते ई-कॉमर्सच्या कंपन्यांमधील युद्ध असल्याप्रमाणे भासेल, पण त्यांची अर्थकारणाची व्याप्ती पाहिली तर ती अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असणार आहे. त्या अर्थाने पाहायचे तर हे २१ व्या शतकातील मोबाइल महायुद्धच असेल.. त्याचे पडघम अलीकडेच वाजले आहेत, फक्त ते आपल्याला ऐकू आलेले नाहीत, इतकेच!
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा