कलियुगामाजी थोर झाले बंड,
नष्ट लोक शंड झाले फार,
न धरिता सोय न पुसती कुणा,
येते जैसे मना तसे चाले,
सज्जनांचा वर टाको नेदी द्वारा,
ऐसिया पामरा तारी कोण?
या युगाला कलियुग म्हणतो आपण. अध्यात्म रामायणात म्हटले आहे, कलियुगात लोक सत्य विसरतील, पुण्य विसरतील, नास्तिक होतील, विवेक विसरतील आणि पाश्चिमात्यकरण स्वीकारतील. म्हणून आपण ते स्वीकारले आहे का? शब्दश: करण याचा अर्थ ‘साधन’ असा आहे. साधने ही माणसाच्या भाल्यासाठीही असतात आणि नुकसानासाठीही असतात; पण आधुनिक आणि पाश्चात्त्य ही जर करणे असतील तर त्यांचाही उपयोग दोन्हीसाठी झाला पाहिजे आणि तो होतोय. मग आपण कोणते करण स्वीकारलेले आहे?
असे म्हणतात आपली चार युगे-सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगाने संपताना पुढच्या युगाकडे एक शून्य भेट म्हणून मागितले आणि म्हणून माणसाचे आयुष्य कलियुगात १०० वर्षे इतके झाले. युगाने शून्यासोबत माणसाची विवेकबुद्धीसुद्धा नेली की काय कोण जाणे? युगानुयुगे माणूस वैज्ञानिक आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात बरीच प्रगती करतोय; परंतु या विवेकाचे मात्र तो काही करू शकला नाही.
आधुनिकीकरण म्हणजे काय आणि पाश्चिमात्यीकरण म्हणजे काय, याचे माझ्या बुद्धीने मला दिलेले उत्तर- आधुनिकीकरण म्हणजे जुन्या गोष्टींवर नव्या गोष्टींचा साज चढवणे आणि पाश्चिमात्यीकरण म्हणजे आंधळ्या डोळ्यांनी स्वीकारलेले आधुनिकीकरण. सगळ्यात पहिले आधुनिकीकरण- काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वर ‘अनुभूती’ नावाचा कार्यक्रम पाहिला. तो फारसा कुणाला पटला नाही; परंतु तो स्तुत्य होता. तरुणपिढीसाठी स्वीकारलेला तो एक मार्ग होता. हे ‘जमाने के साथ चलो’ या उक्तीला सार्थ आहे, पण म्हणून याने जुने टाकाऊ होत नाही. याचे अजून एक उदाहरण म्हणजे अवधूत गुप्ते यांच्या ‘एकतारा’ या नवीन चित्रपटातील नवीन इन्स्ट्रमेंट गितारा. हे तानपुरा आणि गिटार यांचा संगम आहे. माझ्या मते जुन्यासमवेत नव्याची सांगड हे म्हणजे आधुनिकीकरण.
आता पाश्चिमात्यीकरण- कपडे, तोकडे ते सुंदर ही आपली कपडय़ांबद्दलची संकल्पना. मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, कॉल सेंटरच्या नोकऱ्या, पब पाटर्य़ा, हँगआऊट्स ही आहे का आपली संस्कृती? हे तणावमुक्तीचे कलियुगातले मार्ग आहेत. ते असावेतच. पण ती आपली मूलभूत गरज तर होत नाही ना, याकडे मात्र आपणच लक्ष द्यायला हवे. याचाच मेळ आपल्याला साधता येत नाही म्हणूनच हे आंधळेपणाने स्वीकारलेले पाश्चिमात्यकरण. परदेशातील मुले त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षीच स्वत:च्या पायावर उभी राहतात आणि आपण? परदेशातील राजकारणात शिक्षणाला जास्त महत्त्व आहे आणि आपल्याकडे?
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात आहे तशी पुसटशी रेष आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यीकरण यांच्यात आहे. आपण कपडे ब्रॅण्डेड घालणार, ऑफिसला गाडीतून किंवा फर्स्ट क्लासमधून जाणार, हाताला फास्ट ट्रॅकचे घडय़ाळ, डोळ्यांवर रेबनचा गॉगल, अस्खलित इंग्रजी बोलणार पण आपल्या मुलाला बरे नसले की डॉक्टरांकडे नेण्याऐवजी त्याची मीठ-मोहऱ्यांनी नजर काढणार, मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रीला कोपऱ्यात बसवणार, रांगा लावून चेंगराचेंगरी करून देवाला नवस करणार आणि हाच देव नवसाला पावला म्हणून मोठमोठय़ा पाटर्य़ा करणार. हे आधुनिकीकरणाचे पोस्ट व्हर्जन की पाश्चिमात्यकरणाचे प्रीवियस व्हर्जन ?
आज पाश्चिमात्य देशात कोणताही किंतू मनात न बाळगता लंगिक शिक्षण दिले जाते. आपल्याकडे त्यावरचे प्रश्न विचारायलासुद्धा पी.सी.ओ.वरून फोन करावा लागतो. ऋग्वेदातील यम-यमी संवादात लंगिक सुखाची बिनधास्त चर्चा आहे. त्या काळातील स्त्रियांनी सूक्तसुद्धा रचली आहेत आणि आज स्त्रियांना साधा ओमचा उच्चार करायला बंदी? शनीच्या देवळात जायला बंदी? कौटिल्याने चौथ्या शतकात कौटिल्यनीती सांगितली त्याचा वापर आजही पाश्चात्त्य देश करत आहेत; पण कौटिल्य आपल्याच मातीतला असूनही आपण त्याच्या मालिकाच बघत बसलो आहोत.
पाश्चिमात्यीकरणामुळे फायदे झालेच. पण याचा दुष्परिणाम मात्र माणसाच्या मूलभूत गरजांपासून बुद्धीपर्यंत पोहोचला. कारण आपण फक्त वाईट तेच शोषून घेतले. त्यांची चिकाटी, मेहनती वृत्ती शोषून घेताना आपले बुद्धिरूपी गाळणे फाटले की काय?
पाश्चिमात्यीकरण हे करण म्हणून स्वीकारताना फायद्याच्या तुलनेत तोटेच जास्त आहेत आणि ते आपल्या लोकसंख्येलाही धरून नाही. त्यापेक्षा आधुनिकीकरण स्वीकारावे आणि बाह्य़ आधुनिकीकरणापेक्षा विचारांचे आधुनिकीकरण करावे. कौटिल्य, मनू, सावित्रीबाई फुले, सावरकर, स्वामी विवेकानंद यांना आधुनिकीकरणाचा खरा अर्थ उमगला. त्यासाठी कोणत्याही काळाची किंवा युगाची गरज नाही. ही गरज विवेकबुद्धीची आहे. ती पूर्ण झाली की ‘कलियुगाचे’ ‘आधुनिक युग’ व्हायला वेळ लागणार नाही. एवढेच म्हणावेसे वाटते -भगवद्गीतेचे सार न जाणता कुणी गीतेच्याच प्रेमात पडले
तिच्याही प्रेमात न विरघळता
तंत्रज्ञानात विरघळले
What’s app वर प्रेम जमलं Skype वर लग्न
तुझा पगार जास्त का माझा,
या वादात संसार झाला नग्न
१८ माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये
घर होतं १६व्या मजल्यावर
घरातले आजी-आजोबा मात्र वृद्धाश्रमाच्या शिक्क्यावर
dShiva’s, Black dog च्या नशेत मजा मात्र लुटली
आधुनिकीकरण की पाश्चिमात्यकरण या वादात मती मात्र खुंटली
याच मतीची माती होऊ न देणे
ही काळाची गरज
बा आधुनिकीकरणापेक्षा विचारांचे आधुनिकीकरण करू या की सहज..
आधुनिकीकरण की पाश्चिमात्यकरण
कलियुगामाजी थोर झाले बंड, नष्ट लोक शंड झाले फार, न धरिता सोय न पुसती कुणा, येते जैसे मना तसे चाले...
आणखी वाचा
First published on: 11-07-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modernisation or westernisation