अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा प्रजासत्ताक दिनाचे विशेष पाहुणे म्हणून झालेला भारत दौरा चर्चेचा विषय ठरला. जाणकारांनी या दौऱ्याचं आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलं. ‘लोकप्रभा’ने या दौऱ्याविषयी तरुणाईची मतं जाणून घेतली..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ओबामांची भारतभेट ही फार मोठय़ा झगमगाटात पार पडली असं मला वाटतं. या दौऱ्यात झालेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अणुकराराची फुटलेली कोंडी आणि धर्मनिरपेक्षतेबाबत ओबामांनी केलेले विधान होय. ओबामांच्या दौऱ्याची सुरक्षा वगैरेबाबत निर्माण झालेली हवा अगदीच अनावश्यक होती. अणुकराराचा प्रलंबित प्रश्न सुटणे हे मोदींचे मोठे यश आहे. पण, ओबामांनी जाता जाता भारत जोवर धर्मनिरपेक्ष आहे तोवर तो प्रगती करेल असे म्हणणे हे देशातील मूलतत्त्ववाद्यांना चांगलेच उत्तर आहे. याशिवाय ‘मन की बात’मध्ये मोदी आणि ओबामांनी एकत्र देशाला केलेल्या संबोधनामुळे चांगला पायंडा पडला.
भूषण राऊत,
राज्यशास्त्र, तृतीय वर्ष, फग्र्युसन कॉलेज, पुणे.
एकेकाळी ज्यांना अमेरिकेत शिरण्याची परवानगी नाकारली गेली होती त्या नरेंद्र मोदी यांच्या भेटीला प्रत्यक्ष बराक ओबामा भारतात येतात, याच्यापेक्षा मोठा विरोधाभास नाही. खरं तर आधी मोदींना व्हिसा नाकारणे, नंतर पंतप्रधान झाल्यावर त्यांचं अमेरिकेमध्ये झगमगाटात झालेलं स्वागत आणि त्यानंतर ओबामांच्या तोंडी झालेला मोदींचा उदोउदो, या सर्वामागे काही मूलभूत राजकीय व आर्थिक अशी कारणे आहेत. रशियासोबत चाललेले वाद व चीनची आर्थिक उन्नती लक्षात घेतली की भारत हा देश जपान आणि ऑस्ट्रेलिया सोबतच अमेरिकेसाठी व्यापार व राजकीयदृष्टय़ा अगदी मोलाचा ठरतो. मोदी यांचे या दोनही देशांमध्ये झालेले जलद पातळीचे दौरे या संकल्पनेची साक्ष आहे. तसेच ओबामांचा भारतीय दौरा या एक उभरत्या युतीकडे वेध दर्शविणारा आहे असं मला वाटतं.
अंकित कवाडे,
राज्यशास्त्र, द्वितीय वर्ष, फग्र्युसन कॉलेज, पुणे.
ओबामांची भारत भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवीन अध्याय लिहिला गेला आहे. प्रलंबित अणुकरार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे भारताला ऊर्जा निर्मितीसाठी मदतच होणार आहे. आज आपण एका ग्लोबलाइझ जगात राहतो त्यामुळे एकटं राहणं कोणाच्याच हिताचं नाहीये. पाकिस्तान व चीन या शेजारील देशांसोबत भारताचे संबंध सलोख्याचे नाहीत. श्रीलंकेची चीनसोबत वाढत असलेली जवळीक व तिबेटप्रश्न या राजकीय पाश्र्वभूमीवर अमेरिकेसोबत सुधारत असलेले संबंध नक्कीच आशादायक आहे. सुरक्षेसंबंधीची मदत, व्यापार, दहशतवादविरोध व महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या गोष्टींमध्ये अमेरिकेने घेतलेल्या पुढाकाराचा आपल्या विकासात नक्कीच हातभार लागेल. ओबामांच्या भेटीने भारावून जाऊन भारताने बाजूच्या व इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू नये.
ऐश्वर्या चौधरी,
राज्यशास्त्र, द्वितीय वर्ष, फग्र्युसन कॉलेज, पुणे.
मैत्रीसंबंध जपावे
अनेक अभ्यासकांनी ओबामांचा भारत दौऱ्याला ‘फोटो सेशनची संधी’ असे म्हटले. पण, या दौऱ्याची मीमांसा दूरदृष्टी ठेवून केली पाहिजे. या दौऱ्याचे भारताच्या परराष्ट्र धोरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. चीनचा जगभर आणि आशियातही वाढणारा प्रभाव ही भारत आणि अमेरिका या दोघांना होणारी डोकेदुखी आहे. यासाठी दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. अमेरिका आणि इस्राएल यांची मदत भारताला दहशतवादाविरुद्ध महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी सहकार्य वाढवण्याचा भारताचा मनसुबा आहे. पश्चिम आशियात वाढत जाणाऱ्या धार्मिक अतिरेकाचे धोके भारतालाही आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाधार्जिणे होते. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिशाच राहिली नाही. अमेरिकेशी जवळीक साधणे भारताच्याच भल्याचे असेल. पूर्णपणे अमेरिकेशी जवळीक साधणे भारताला परवडणारे नाही, तरीही भल्याचा विचार करून अमेरिकेशी मैत्रीपूर्वक संबंध प्रस्थापित करावे.
सुयश देसाई, राज्यशास्त्र विद्यार्थी, एमए द्वितीय वर्ष, मुंबई विद्यापीठ
कोणत्याही देशांचे संबंध हे नेत्यांच्या केमिस्ट्रीबरोबरच ते देश ज्या तत्त्वांचा अवलंब करतात त्यावर अवलंबून असतात. अमेरिका आणि भारत यांची ओळख लोकशाहीवादी, सहिष्णू, मानवी अधिकारांची कदर करणारे अशी आहे. या भेटीवरून दक्षिण आशियात अमेरिकेचा बदललेला फोकस (पाकिस्तानकडून भारताकडे) मात्र स्पष्ट होतो. ज्या पद्धतीने ओबामांनी ‘केंद्र आशियामध्ये’ (स्र््र५३ ३ अ२्रं) हे धोरण स्वीकारले होते त्याचा प्रत्यय आला. आता चीनबरोबरच आशियामध्ये सत्तासमतोल करण्यासाठी भारतच योग्य, सबळ व प्रमुख देश असल्याचे सिद्ध झाले. पण सर्व निष्कर्ष तातडीने काढणे योग्य नाही कारण ‘आण्विक दायित्व’ कराराचे तपशील गुलदस्त्यातच आहेत. एका भेटीमध्ये अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेसाठी भारताने किंमत मोजली असणार व ती काय आहे हे पुढे यायला हवं. त्याशिवाय द्विपक्षीय नवीन अध्याय लिहिला जाणार नाही. द्विपक्षीय गुंतवणूक करारावर चर्चा होणे अपेक्षित होते. व्यावसायिक आघाडीवर व्यापार विस्ताराचे आश्वासन आणि ४०० कोटी डॉलरची गुंतवणूक ही अमेरिकेच्या लौकिकास शोभणारी गोष्ट नाही. बौद्धिक संपदा अधिकार, हवामान बदल, प्राधान्य व्यापार करार यांची शिष्टाई कशी होते यावरही या दौऱ्याचे विश्लेषण होईल.
शुभम जाधव, आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासक्रम, द्वितीय वर्ष, फग्र्युसन कॉलेज, पुणे
ओबामांचा भारत दौरा संपूर्ण जगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये अनेक बाबतीत सहकार्य वाढीस लागेल. अणुकरार, व्यापार धोरण, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, दहशतवाद, हवामान बदल अशा अनेक विषयांवर चर्चा आणि काही विषयांवर निर्णय झाले. ओबामांनी संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायमस्वरूपी सभासदत्वाच्या इच्छेला पाठिंबा दर्शविला. यामुळे भारतीयांच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असणार. पण, हे बदल कसे घडणार याबाबत स्पष्टोक्ती नाही. चीनची भूमिका, प्रादेशिक कटुता कशी झेलली जाणार याचीही कल्पना नाही. पुढचा काही काळ भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. अनेक संकटांना आव्हान देत मोदींना स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
निशिगंधा बाबरदेसाई,
राज्यशास्त्र, एमए द्वितीय वर्ष, मुंबई विद्यापीठ.
दौऱ्यामुळे आशावाद
ओबामांच्या दौऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अणुकराराबाबत चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र भारताचे परराष्ट्र धोरण प्रतिगामी नसून एका विशिष्ट ध्येयाला अनुसरून स्वयंप्रेरित होत आहे. ओबामांचा भारत दौरा एका मोठय़ा योजनेचा भाग असून त्यात जपान, ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा सहभाग आहे. यातून प्रशांत आणि हिंदी महासागर परिसरात चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या भेटीत झालेले काही महत्त्वाचे करार आणि भारतविकास योजनांसाठी दिली गेलेली आश्वसने, याबाबत चीनची अस्वस्थता दिसून येते. ल्ल अक्षय रानडे,
राज्यशास्त्र, एमए द्वितीय वर्ष, मुंबई विद्यापीठ.
‘राष्ट्र यशस्वी तेव्हा होतात, जेव्हा राष्ट्रातील महिलांचा त्यात महत्त्वाचा भाग असतो आणि राष्ट्राकडून त्यांना कशी वागणूक मिळत आहे यावर राष्ट्रांच्या प्रगतीची दिशा अवलंबून असते’- ओबामांनी भारत भेटीदरम्यान काढलेले हे उद्गार फार महत्त्वाचे आहेत. ओबामांचे हे उद्गार ऐकून भारावून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण, एका महिलेने ओबामांना सलामी दिली किंवा पथ संचलनात महिलांचा सहभाग जास्त दिसला तरीही भारतीय स्त्रियांची खरी परिस्थिती तशी नाही हे वास्तव आहे. भारताने अमेरिकेकडून अनेक गोष्टी स्वीकारताना त्यांचा सामाजिक उदारमतवादही स्वीकारण्याची आवश्यकता आहे. निदान अशा राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाच्या बोलण्यातून तरी काही गोष्टी शिकाव्या. महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना सामाजिक बदल घडवून आणणे महत्त्वाचे ठरेल. भारतातून सौदी अरेबियामध्ये गेलेल्या ओबामांच्या पत्नीने नकाब परिधान न केल्यामुळे तिथे गदारोळ झाला, तरीही अशी बंधने झुगारून देत त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. आज भारतीय स्त्रियांनी आणि पुरुषांनीसुद्धा त्याचा अर्थ समजून कृती करायला हवी. नाहीतर नुसता ओबामांच्या दौऱ्यांचा गवगवा करून त्यातून काही शिकलोच नाही तर त्यास काय अर्थ?
प्राजक्ता भिडे, राज्यशास्त्र, एमए द्वितीय वर्ष, मुंबई विद्यापीठ.