पावसाळ्यात डेनिम्स घालता येत नाहीत. स्कर्ट्ससुद्धा सांभाळणं कठीण होतं. मी ड्रेसेस वापरत नाही. अशा वेळी पावसाळ्यासाठी वेगळे पर्याय कोणते आहेत?
– स्वरूपा, २६.

बाहेर मुसळधार पडणारा पाऊस खिडकीतून पाहताना कितीही सुंदर वाटत असला तरी घरातून बाहेर पडताना कोणते कपडे घालायचे यावरून प्रचंड गोंधळ उडतो. फिक्कट रंगांवर चिखलांचे डाग पडतात, ते काही केल्या जात नाहीत. डेनिम्स तू म्हणते तशा भिजल्यावर जड होतात आणि सुकण्यासाठीही भरपूर वेळ घेतात. त्यामुळे त्या वापरता येत नाहीत. स्कर्ट्सचा घेरा सांभाळतानाही पावसाळ्यात नाकी नऊ येतात. पण या वेळी लेगिंग्स तुमच्या मदतीला येऊ शकतात. सध्या बाजारात लेगिंग्सचे भरपूर प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातील पॉलिएस्टरच्या लेगिंग्स पावसाळ्यात वापरायला उत्तम असतात. कारण त्या पावसात भिजल्या तरी पटकन सुकतात आणि वजनाने हलक्याही असतात. सध्या या लेगिंग्समध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न्स उपलब्ध आहेत. मिड काफपासून ते अँकल लेन्थपर्यंत विविध उंचीमध्ये या लेगिंग्स उपलब्ध आहेत. प्रिंटेड लेगिंग्स या सीझनमध्ये हिट आहेत. त्यांच्यासोबत प्लेन टय़ुनिक्स छान दिसतात.

मला रोज कपडय़ांना साजेशी ज्वेलरी घालायला आवडते. पण पावसाळ्यात कित्येकदा अँटिक ज्वेलरीला गंज पडतो आणि लाकडाच्या बांगडय़ांचा रंग उतरतो. अशा वेळी कोणती ज्वेलरी वापरावी? – चित्रा, २१.

चित्रा, ज्वेलरी प्रेमावर पावसाळ्यात काहीसे विरजण पडतेच. पावसात तू म्हणतेस तशी किती तरी सुंदर ज्वेलरी भिजून खराब होते. अर्थात त्यावर पर्याय आहेच. पहिल्यांदा तुला लाकडी बांगडय़ा किंवा नेकलेस वापरायचे असतीलच तर त्यांच्यावर पारदर्शक नेलपेंट्सचे दोन-तीन कोट्स लाव. त्यांचा रंग आधीच उडाला असेल, तर पोस्टर कलर्सनी त्यांना रंगाचा कोट दे आणि मग नेलपेंट लाव. त्यामुळे त्यांचा रंग पुन्हा जाणार नाही. प्लॅस्टिकच्या बांगडय़ा, नेकपीस किंवा कडे पाहाायला मिळतात. ते तू पावसाळ्यात वापरू शकतेस. ते पावसात खराब होत नाहीत. चंकी ब्रेसलेट्स, पेंडेन्ट्स अशी छोटी पण उठून दिसणारी ज्वेलरी पावसाळ्यात घालणं उत्तम. मुख्य म्हणजे पावसाळ्यात तू घरातही ज्वेलरी कशी ठेवतेस याकडेही लक्ष द्यावे लागते. ज्वेलरी वापरून झाल्यावर बॉक्समध्ये ठेवण्यापूर्वी ती नीट पुसून घे. या काळात मोत्याचे दागिने, अँटिक ज्वेलरी या विभागून वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्वेलरी खराब होत नाही.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader