पावसाच्या काळात काझीरंगाच्या परिसरातून जाणाऱ्या ब्रह्मपुत्रेला एवढा पूर येतो की जंगलातले प्राणी वाहून जातात. यावर उपाय म्हणून या परिसरातल्या गावांमधल्या लोकांनी प्राण्यांसाठी एक कृत्रिम उंचवटा तयार केला आहे.
संपूर्ण भारताला जोडणारा एक नसíगक दुवा म्हणजे मान्सून. भारताची अर्थव्यवस्था अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. पावसाच्या आकडेवारीचा कदाचित अभ्यास असेलही, पण तो आहे तुकडय़ातुकडय़ांमध्ये. मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही. मान्सून म्हणजे वारे, पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारी नसíगक स्थिती. त्याबरोबरच मान्सूनच्या पावसाचं स्वागत करण्यासाठी असलेल्या प्रथा, आणि एकूणच सांस्कृतिक वसा. या सगळ्याचा अभ्यास म्हणजेच मान्सूनचा अभ्यास. मान्सूनचा अशाच सर्वागांनी अभ्यास करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी एक गट तयार झाला. या गटामध्ये हवामान पत्रकार होते, शास्त्रज्ञ होते आणि काही विद्यार्थीही होते. मेघदूतामध्ये केलेल्या पावसाच्या ढगांचं वर्णन मान्सूनशी मिळतंजुळतं आहे असं लक्षात आल्यावर या गटाने आपलं नाव ‘प्रोजेक्ट मेघदूत’ असं ठेवलं. पाच वर्षांत भारताच्या विविध भागांमध्ये फिरून मान्सूनच्या पावसाचा आणि त्यामुळे होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्याबरोबर होत असलेल्या प्रथांचा अभ्यास करण्यासाठी हा गट सज्ज झाला.
‘प्रोजेक्ट मेघदूत’चं हे चौथं र्वष. या वर्षी ईशान्येकडील पावसाचा अनुभव घेण्यासाठी सध्या हा गट ब्रह्मपुत्रेच्या काठाने प्रवास करतो आहे. या गटाचा ईशान्येकडील हा प्रवास तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. टप्प्यामध्ये काझीरंगा, जोरहाट आणि माजुली अशी तीन ठिकाणं आहेत. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसांमध्ये मेघालय राज्यामध्ये फिरण्याचं नियोजन आहे. यामध्ये चेरापुंजी, मोहसिंराम या गावांना ते भेट देणार आहेत. त्यानंतर ब्रह्मपुत्रेला प्रदक्षिणा घालून परत गुवाहाटीमध्ये असं या वर्षीच्या प्रवासाचं नियोजन असणार आहे. या वर्षीच्या प्रवासाचा हेतू हे अधिक पावसाच्या प्रदेशांमधील लोकांचं राहणीमान कसं असतं, पावसाळ्यात त्यांनी काय प्रकारची काळजी घ्यावी लागते, पावसाचा परिणाम त्यांच्या रोजच्या जगण्यावर कसा होतो हे पाहाणं. त्याबरोबरच मान्सूनबरोबर येणारे या भागातले मुख्य प्रश्नही समजून घ्यायचे होते.
पावसाळ्यातील काझीरंगा
गेंडय़ांसाठी प्रसिद्ध असं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पावसाळ्यामध्ये पर्यटकांना पक्षी, प्राणी निरीक्षणासाठी बंद असतं. पावसाळ्यात इथे कशा प्रकारच्या समस्या येऊ शकतात हे बघणं आवश्यक होतं.
हे जंगल संपूर्णपणे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेलं आहे. काझीरंगामधलं मुख्य आकर्षण म्हणजे गेंडा आणि हत्ती. गेंडा हा आसामचं मानचिन्ह. पण काही तज्ज्ञांशी बोलताना अशी माहिती कळली की बाबर जेव्हा भारतात आला होता तेव्हा त्याने लखनौमध्ये गेंडय़ाची शिकार केली होती. म्हणजे गेंडय़ांचं क्षेत्र हे जवळजवळ उत्तरप्रदेशपर्यंत होतं असं लक्षात येतं. शिकारीमुळे आणि माणसाची वस्ती एकूणच वाढली असल्याने गेंडा आज फक्त काझीरंगामध्येच राहिला आहे. त्यामुळे जगात काझीरंगाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे हे जंगल ही वर्ल्ड हेरिटेज साईटदेखील आहे. ब्रह्मपुत्रेच्या काठावर आसल्याने हा भाग बऱ्यापकी सुपीक आहे. इथे प्राणी, पक्षी आणि वनस्पतींमध्ये विविधताही खूप आहे. इथे गवत हे खूप उंच उंच वाढत असतं. त्यामुळे हत्ती आणि गेंडे इथे असण्याचं आणि टिकण्याचं हे एक मोठं कारण आहे. हत्ती अर्धा बुडेल एवढं हे गवत उंच वाढत असतं.
मान्सूनमुळे ब्रह्मपुत्रेला पूर येतो तेव्हा पाण्याच्या जवळच्या भागामधले गेंडे वर सरकायला लागतात आणि काही तर मनुष्यवस्तीमध्येही शिरतात. त्याच्यावर इथल्या लोकांनी एक तोडगा काढला आहे. त्यांनी एक कृत्रिम उंचवटा तयार केला आहे. आता या प्राण्यांनाही अशी सवय झाली आहे की पाणी यायला लागलं की ते या उंच ठिकाणी येऊन थांबतात. पण पूर नेहमीपेक्षा जास्त आला की त्यांना ती जागाही पुरेनाशी होते. गेंडे आणि हत्ती पाण्यात पोहून जाऊ शकतात. पण प्रश्न निर्माण होतो तो इथे असलेल्या हरणांचा आणि डुकरे अशा छोटय़ा प्राण्यांचा. बरेचदा तर ते वाहूनही जातात, तर काही मनुष्यवस्तीमध्येही येतात. इथल्या लोकांना आता त्यांची सवय झाल्यामुळे ते त्या प्राण्यांशी आणि प्राणी माणसांशी जुळवून घेतात. पण काही वेळा हे प्राणी मोठय़ा रस्त्यावर आणि राष्ट्रीय महामार्गावरही येतात. गुवाहाटी ते तीनसुखियाला जाणारा राष्ट्रीय महामार्ग जातो या काझीरंगामधून आणि मुख्यत: या हाय-लाइनमधून. त्यामुळे अनेकदा वाहनांचा धक्का लागूनही इथल्या प्राण्यांचा मृत्यू होतो. प्राण्यांबाबत पुरात वाहून जाण्यापेक्षा, असं रस्त्यावर मृत्यू होण्याचं प्रमाण हे अधिक आहे. इथे १९८०, १९८९, २००० आणि २०१२ मध्ये मोठे पूर आले होते आणि त्यामध्ये अनेक प्राणी दगावले होते. मागच्या वेळेला म्हणजे २०१२ मध्ये जवळजवळ ६३२ प्राणी मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये हरणांची संख्या खूप मोठी होती.
इथल्या पावसाची अजून एक खासियत अशी की जेव्हा एल निनोमुळे देशाच्या इतर भागांत पाऊस कमी होतो, पण ईशान्येकडे यामुळे पाऊस अधिक असतो. त्यामुळे त्या काळात ब्रह्मपुत्रेला महापूर येतात. महापूर आल्यामुळे काझीरंगामधले प्राणी हायलाइनवर येतात आणि ते महामार्गावर आल्यावर गाडय़ांच्या धडकेने त्यांचे मृत्यू होतात. पण निष्कर्ष काढताना आपल्याला दिसतं की प्राणी गाडय़ांच्या धडकेने मरतात. पण प्रत्यक्षात ते मरण पावलेले असतात ते एल निनोमुळे. त्यामुळे एल निनोच्या काळात इथे विशेष काळजी घेतली जाते, हायवेवरची गस्त वाढते आणि इथल्या प्राण्यांना वाचवण्याचं विशेष प्रशिक्षण इथल्या वन अधिकाऱ्यांना दिलं जातं.
माजोली
माजोली हे आशिया खंडामधलं एका नदीच्या प्रवाहात असलेलं सर्वात मोठं बेट. याचा आकार जेव्हा १८६० सालच्या दरम्यान मोजला गेला तेव्हा १२ किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेलं हे बेट आहे. पंधराव्या शतकामध्ये एक मोठा भूकंप झाला होता. या भूकंपामध्ये जमिनीचा एक मोठा भाग उचलला गेला होता. त्याच्या नंतरच्या काळामध्ये १९५० च्या दरम्यान आणखीन एक भूकंप झाला होता आणि हे पात्र बदललं होतं. या बदलामुळे ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये हे बेट व्यवस्थित तयार झालं होतं. या बेटाचं एक वैशिष्टय़ असं की इथे शंकरदेव म्हणून एक संत होऊन गेले. १५व्या- १६व्या शतकात वैष्णव परंपरा ही या शंकरदेवांनी आसाममध्ये सुरू केली. त्याचं एक केंद्र त्यांनी माजोलीला सुरू केलं आणि काही मठ स्थापन केले होते. ही परंपरा कोणत्याही प्रकारच्या बळीला विरोध करते. हीच शिकवण या भागांत पसरावी म्हणून या मठांची किंवा या सत्रांची निर्मिती केली गेली होती. माजोली वसवण्यात या सत्रांचा आणि शंकरदेव महाराज यांचा मोठा वाटा आहे. या भागांत एकूण ६२ सत्रे होती. त्या सत्रांमधली २२ सत्रे आज शिल्लक आहेत. बाकीची सत्रे या बेटाच्या काही भागाबरोबरच पाण्याखाली गेली. २०११ मध्ये या बेटाचा आकार मोजला गेला. तेव्हा लक्षात आलं की त्याचं क्षेत्रफळ ५०६ किमीचं राहिलं आहे. म्हणजे अध्र्याहून अधिक बेट हे पाण्याखाली गेलं आहे. नवीन तयार झालेलं बेट, आदिवासी भाग असं असलं तरी या ३०० गावांच्या बेटावर पेट्रोल पंपापासून सर्व साधनं उपलब्ध आहेत.
या बेटांवर नििशग नावाची जमात आहे. ही जमात अरुणाचल प्रदेशातली आहे. नििशग या शब्दाचा अर्थ पाण्याच्या जवळ राहाणं असा होतो. या जमातीमधल्या लोकांची घरं फार वेगळ्या पद्धतीची आहेत. ही बांबूची घरं जमिनीपासून काही फुटांवर आहेत आणि प्रत्येक घराच्या खालच्या बाजूला त्यांचे प्राणी ठेवण्यासाठी जागा केली आहे. इथे कोंबडे असतात, आणि बाकी छोटे प्राणी असतात. इथली लोकं या खालच्या भागांत जेवायला बसतात आणि त्यांचं जेवण होताना जे सांडतं ते इथे असलेले कोंबडे-कोंबडय़ा टिपून घेतात. पूर येतो तेव्हा ही घरं बांबूने बांधलेली असल्याने वर उचलली जातात, पाण्यावर तरंगतात. पाणी जर जास्तीच वाढलं तर मात्र त्यांना इथून हलावं लागतं आणि जोरघाट किंवा मुख्य रस्त्याच्या दिशेने यावं लागतं. या बेटावर ज्योती नारायण नावाचा गाईड आहे. त्याला सरकारनेही काही पुरस्कार दिले आहेत. तो असं सांगतो की त्याने अशी अनेक गावं पाहिली आहेत की जी त्याच्या लहानपणी अस्तित्वात होती, पण आता ती पाण्याखाली गेल्याने अस्तित्वात नाहीयेत.
इथली जमात जेव्हा पुराच्या पाण्यापासून आपला बचाव करत बाहेर जाते, तेव्हा त्यांना बाहेर कुठे कोणी जमीन देत नाही आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. या ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या पहिल्या वर्षी आलेल्पीच्या जवळ कुटनाडमध्येही अशी माणसं भेटली होती की जी पाण्यामध्येच राहतात.
पूर येतो तेव्हा या सत्रांमध्ये प्रार्थना होत असतात. या प्रार्थनेमध्ये ते ब्रह्मपुत्रेला असं आवाहन करतात की, तू आजपर्यंत आमची खूप जमीन घेतली आहेस, तर तू पाण्याला थोडं आवरतं घे आणि जेवढं आत्ता राहिलं आहे तेवढं तरी आम्हाला राहायला राहू दे! ही सत्रेही थोडी हाय लाइनवर बांधली गेली आहेत, त्यामुळे जेव्हा बाकी जमिनीचा भाग पाण्याखाली जातो तेव्हा इथे पाणी आलेलं नसतं. इथली जमिनीची धूप थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. इथल्या राजकीय व्यक्तींच्या जमिनी बाहेर असल्यामुळे ते निघून जातात आणि सामान्यांना कोणी वाली उरत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. इथले युवक आता इथे मोठय़ा वृक्षांची लागवड करत आहेत, जेणेकरून या वृक्षांची मुळं पुरातही जमिनीला धरून ठेवतील.
ईशान्येकडच्या काही लोकांचं म्हणणं आहे की, पूर आवश्यक आहेत. त्याने जमिनीतल्या पाण्याची पुनर्भरणा होते. काझीरंगाच्या भागामध्ये मोठं गवतही वाढायला मदत होते. ब्रह्मपुत्रेच्या पुराबद्दल आणि पावसाबद्दल लोकांची आणखी मतं ऐकायला ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट ईशान्य भागात आणखी दोन आठवडे फिरणार आहे.