भारताच्या विविध भागांत फिरून, स्थानिक लोकांशी बोलून मान्सूनचा थांग लावायचा प्रयत्न गेली चार र्वष ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या माध्यमातून सुरू आहे. या चार वर्षांतील अनुभवांचा आढावा आणि यावर्षीच्या गंगेच्या खोऱ्यातील मान्सून डायरीची सुरुवात.
जून महिना आला आणि गेल्या चार वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा मान्सूनचा अभ्यास करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मेघदूत’चे अभ्यासक नव्या जोमाने, तयारीला लागले आहेत. यावर्षी या प्रवासाची दिशा वेगळी, प्रदेश वेगळा, पण उद्देश तोच आणि तीच ऊर्जा. ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची खबरबात घेऊन सलग चौथ्या वर्षी ‘लोकप्रभा’ची ‘मान्सून डायरी’ आपल्यासमोर यावर्षीही येत आहे.
‘प्रोजेक्ट मेघदूत’ नक्की काय?
गेली चार र्वष ‘प्रोजेक्ट मेघदूत’ भारताच्या विविध भागात फिरून, स्थानिक लोकांशी बोलून मान्सूनचा थांग लावायचा प्रयत्न करत आहे. या शोधाचं हे पाचवं वर्ष. प्रत्येक वर्षीचा मान्सून हा वेगळा असतो, ऋतुमान वेगळं असतं. त्यामुळे त्याच्या येण्याचे आणि न येण्याचे विविध परिणाम आपल्याला भारताच्या सर्व भागांमध्ये बघायला मिळतात. त्याबरोबरच एल निनोसारख्या हवामानाच्या परिस्थितीचा आणि मान्सूनचा कसा संबंध आहे आणि त्याने नक्की परिणाम काय होतात, हेही आपल्याला बघायला मिळतं. मान्सूनच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून त्याच्याकडे कसं बघितलं जातं? या मान्सूनबद्दल आपलं पारंपरिक ज्ञान आपल्याला काय सांगतं? हे सर्व बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि मान्सूनच्या विविध पैलूंचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी २०११ मध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची सुरुवात झाली.
चार वर्षांचा आढावा
गेल्या वर्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या या गटाने मान्सूनचा पाठलाग तिरुअनंतपूरममधून सुरू केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांत भटकून पावसाचे आणि त्या प्रदेशाचे नाते काय आहे हे तपासण्याचाही प्रयत्न केला गेला.
कोवलमच्या किनारी पालथ्या होडय़ांवर बसून समुद्राकडे एकटक पाहणारा मल्याळी मच्छीमार असो किंवा पावसाळ्यात छत्र्यांचा व्यवसाय करून कोटय़वधी रुपये कमावणारा अलेप्पीचा व्यापारी असो. पावसाचे भारतीय जीवनावर किती थेट आणि खोल परिणाम होतात हे ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या पहिल्या वर्षी जवळून पाहता आले. त्याचप्रमाणे कोकणातील खारवी मच्छीमार, मेळघाटातला कोरकू आदिवासी, गडचिरोलीचा गोंड आदिवासी, कोल्हापूरजवळचा कुणबी शेतकरी, घाटातला धनगर अशा अनेकांशी संवाद साधून त्यांचे पावसाचे आडाखे आणि पिढीजात त्यांना मिळालेले निसर्ग निरीक्षणाचे ज्ञान समजावून घेतले.
त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१२ मध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची सुरुवात शेकडो वर्षांपूर्वी कालिदासाने जिथे बसून आपले ‘मेघदूत’ हे महाकाव्य लिहिले त्या रामटेकपासून झाली. या गटाचा पुढचा प्रवासही कालिदासाने त्या मेघाला सांगितलेल्या मध्य भारतातल्या वाटेवरून झाला. या वर्षी फक्त महाराष्ट्रातला काही भाग आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून हा प्रवास होणार असं नियोजन होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भापासून ते बुंदेलखंडपर्यंत असा प्रवास योजला होता. मध्य भारतामध्ये मुख्यत: दोन भागांमधले नैर्ऋत्य मोसमी वारे एकत्र येतात. साधारण मध्य प्रदेशाच्या मध्यात, अरबी समुद्राकडून येणारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे दोन्ही एकत्र येतात. त्यामुळे या भागामध्ये पाऊस नेमका कोणत्या वाऱ्यांमुळे आहे ते कळत नसतं. हा सगळा प्रदेश ऐतिहासिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा मानला जातो. इथे काही प्राचीन राजवटी होऊन गेल्या म्हणून आणि शेतीच्या दृष्टीनेही या भागाचं महत्त्व फार आहे. या भागातही आपल्याला बरीच भौगोलिक विविधता पाहायला मिळते. टेकडय़ांबरोबरच इथे बरीचशी सपाट जमीनही आपल्याला पाहायला मिळते. भौगोलिक विविधतेबरोबरच, किंवा म्हणूनच इथे खाद्यपदार्थामध्येही बरीच विविधता या गटाला पाहायला मिळाली. या सगळ्याच गोष्टींमध्ये पाऊस नेमका कसा काम करतो हे या गटाला पाहायचं होतं. याला धरूनच अजून एक धागा या गटाने पकडला होता, आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा ‘मेघदूत’ या काव्याचा. या काव्यामध्ये उल्लेख केलेल्या मार्गावरून जायचं आणि त्या काव्यामागचा अर्थ जाणून घ्यायचा असंही काम या गटाने करायचं ठरवलं होतं. कालिदासाने लिहिलेल्या या मेघदूत काव्यातल्या ढगाचा प्रवास महाराष्ट्रातल्या रामटेकपासून सुरू होऊन तो कुरुक्षेत्रापर्यंत जाऊन संपतो. हा सर्व भाग मध्यभारतामध्ये येतो. म्हणूनही या मार्गाचा अभ्यास करायचा असं ठरवलं होतं.
या दुसऱ्या टप्प्यात मेघदूताचा मार्ग बघता बघता हाच मान्सूनचा मार्ग आहे हे या गटाच्या लक्षात आलं. दुसऱ्या टप्प्यातल्या अभ्यासामध्ये मान्सूनचा आणि मेघदूत या काव्याचा संबंध लावणं आणि त्यानुसार आत्ताच्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याचं मूलभूत काम ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने केलं. मेघदूत काव्य आणि प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती असा अभ्यास करणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’ हा कदाचित जगात एकमेव गट असेल.
तिसऱ्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यातला पहिला भाग अगुम्बे ते म्हसवड असा होता. अगुम्बे हा कर्नाटक राज्यामधला प्रदेश. पश्चिम घाटातला सर्वात अधिक पाऊस इथे पडतो. तिकडून महाराष्ट्रातला दुष्काळी भाग म्हणजे माण तालुका असा पहिल्या टप्प्यातला प्रवास या गटाने पूर्ण केला. यामध्ये घाट, कोकण आणि काही दुष्काळी प्रदेशांतला मान्सून या गटाने अनुभवला होता. या पहिल्या भागामध्ये १५ लोक सहभागी झाले होते आणि सर्वत्र अभ्यासाचं काम जोरात सुरू होतं. या १५ जणांमध्ये काही पीएच.डी करणारे होते ते अगदी अकरावी-बारावीमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.
तिसऱ्या वर्षांच्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात या गटाने पश्चिम भारत पालथा घातला. इथे पाऊस सगळ्यात उशिरा पोहोचतो आणि कमी काळ राहतो. त्यामुळे अशा प्रदेशामधल्या लोकांची पावसाच्या पाण्याची गरज, ते काही पाणी वापराच्या वेगळ्या पद्धती पाळतात का, असा सगळा अभ्यास या वर्षी या गटाला करायचा होता. त्याबरोबरच या प्रदेशात काहीशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली सरस्वती नद या नदीचा आणि तिच्यामध्ये दडलेल्या गुपितांचा शोध या गटाने घेतला. त्याबरोबरच पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ म्हणजे राखीगढी. या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास केला. ही राखीगढी ३०० हेक्टरमध्ये पसरली आहे. ही जागा मोहंजोदडोपेक्षाही मोठी आहे. एवढंच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही जागा सिंधुसंस्कृतीपेक्षाही प्राचीन असणार आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार इथे मिळालेले अवशेष हडप्पा किंवा मोहंजोदडोवर मिळालेल्या अवशेषांपेक्षा प्राचीन आहेत. या सर्व कारणांमुळे राखीगढी ही जागा अतिशय महत्त्वाची ठरते.
भारताची सर्व अर्थव्यवस्था ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे पाऊस! या पावसाचा म्हणजेच मान्सूनचा असा खोलवर अभ्यास भारतात खूप कमी घडतो, किंबहुना कोणताच अभ्यास फार उत्साहाने होताना दिसत नाही. जर अशा गोष्टीचा अभ्यास नाही, तर काही शे वर्षे जुनी नदी, तिच्या आजूबाजूची संस्कृती याचा अभ्यास अभावानेच होणार हे निश्चित! राखीगढी इथला भारतीय पुरातत्त्व विभागाचा मोडकळीला आलेला, गांजलेला फलक, आपली या सगळ्याकडे बघण्याची अनास्था दर्शवत आहे.
प्रकल्पाचा चौथा टप्पा सुरू झाला २०१४ च्या जून महिन्यात. या वर्षी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा अभ्यास करण्याची योजना आखली गेली होती. तिसऱ्या वर्षी सर्वात कमी पाऊस असणाऱ्या वायव्य भारतातून मान्सूनचा पाठलाग केल्यानंतर या वर्षी त्याच्या थेट विरुद्ध टोकाचा अनुभव ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला मिळण्याची अपेक्षा होती. इथला प्रवास झाला तो ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून. मेघालयातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांना भेट देऊन गुवाहाटी, काझिरंगा, जोरहाट, माजूली, दिब्रूगढ, तिनसुकिया, रोईंग, धेमाजी, इटानगर, तेझपूर, गुवाहाटी अशी ब्रह्मपुत्रेच्या अरुणाचल, आसाममधील पात्राभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
भारताच्या या भागामधल्या मान्सूनचा अभ्यास करताना या भागाची भौगोलिक स्थिती लक्षात घेणं आवश्यक होतं. इथे बंगालच्या उपसागरावरून जाणारे वारे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन इथे येतात. दुसरं म्हणजे वर्षभरामध्ये पश्चिमेकडून येणारे वारेही हिमालयाला आडून इथे वाहत असतात. त्यामुळे वर्षांतल्या हिवाळा सोडूनच्या काळात ईशान्य भारताला पाऊस मिळत असतो. अर्थातच वर्षभरामधला सर्वाधिक पाऊस हा मान्सूनच्या काळात मिळत असतो. याबरोबरच इथला सर्व भाग हा डोंगराळ आहे, त्यामुळे इथेही वारे अडतात आणि पावसाचं प्रमाण वाढतं. अशा दोन-तीन गोष्टी जुळून आल्याने भारताच्या ईशान्य भागात सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक म्हणजे किती? तर वर्षांला ११-१२ हजार ते
चौदा हजार मिलिमीटपर्यंत पाऊस पडतो, म्हणजे मुंबईच्या तिप्पट पाऊस.
आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं की, ज्या भागामध्ये पाऊस फार आहे, त्या भागामध्ये पाण्याविषयी, पाण्याचं नियोजन करण्याविषयी अतिशय अनास्था आहे. सर्वाधिक पाऊस पाडत असला तरी ईशान्य भारतात पावसाळा संपला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहतो. ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेल्या गुवाहाटी शहरामध्ये तर पाण्याचा प्रश्न बिकट आहे. एवढंच काय, तर देशातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणाऱ्या चेरापुंजी येथेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच. कारण एकच. पाण्याचं नियोजन नाही. जशी वस्ती वाढायला लागली तसं पाण्याचं नियोजन केलंच गेलं नाही. पावसाला गृहीत धरलं जातं आहे. इथे पाण्याचं नियोजन केलं तर ते फक्त याच भागाला समृद्ध करणार नाही, तर खाली उत्तर प्रदेश, बिहारच्या भागामध्येदेखील त्याचा उपयोग होईल. त्यामुळे या सर्व भागात पाणी साठवायचं हेच मोठं आव्हान आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे.
या टप्प्यात चेरापुंजीला ही भेट दिली. तेथील प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या लोकांचा, ते या परिस्थितीवर मात कशी करतात, तग धरून कसे राहतात याचा अभ्यास केला. चेरापुंजीमध्ये आता पावसाचं प्रमाण काही मानवनिर्मित कारणांमुळे कमी होतं आहे, अशी धक्कादायक माहितीही तेव्हा मिळाली.
‘प्रोजेक्ट मेघदूत’ या गटाविषयी
हवामानाचा अभ्यास करण्यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळ, मोठमोठ्ठाली यंत्रे, स्टेट ऑफ दी आर्ट सामग्री लागणार अशी एक सर्वसाधारण कल्पना सर्वाचीच असते; पण या प्रकल्पामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वानी ही समजूत खोटी ठरवली आहे. हा गट कोणत्याही शास्त्रीय संस्थेने पुरस्कृत केलेला नाही. कोण्या एकाचा आर्थिक पाठिंबा नाही. एवढंच नव्हे तर यात काम करणाऱ्या, फिरणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या कोणालाही कसलंही मानधन मिळत नाही.
केवळ जिज्ञासेपोटी, ज्ञानाची भूक भागवण्यासाठी, पावसाचा अभ्यास करत ही मंडळी भारतभर फिरत आहेत. यातले सर्व जण २० ते ३५ या वयोगटातले आहेत. यातले बरेचसे शास्त्र विषयाचे अभ्यासक आहेत. काही हवामानशास्त्र शिकत आहेत, काही जैवविविधतेमध्ये अभ्यास करत आहेत. बरेचसे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांचा अभ्यास करत आहेत. काही समाजशास्त्राचे अभ्यासक, तर काही कलाकारदेखील. पत्रकार तर आहेतच. फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्सही आहेत. दरवर्षी या प्रकल्पामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. या सगळ्या प्रकल्पाला माध्यमांनीही चांगली साथ दिली आहे.
प्रकल्पाचा मुख्य अभ्यासक मयूरेश प्रभुणे याने या स्वयंसेवी प्रकल्पाविषयी सांगितले, ‘‘सध्या या सगळ्या प्रकल्पाचं स्वरूप स्वयंसेवीच आहे. प्रत्येक जण जो ‘प्रोजेक्ट मेघदूत’मध्ये सहभागी होतो तो त्याच्या प्रवासाचा खर्च उचलतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही किंवा अशी मदत मिळावी म्हणून आम्ही हा प्रकल्प करतो आहोत असं अजिबात नाही. मी व्यक्तिगत यामध्ये दीड ते दोन लाख रुपये खर्च केले असतील. यामध्ये दरवर्षी सहभागी होणारेही पूर्ण वर्ष पैसे साठवून ठेवतात आणि आठवडा-दोन आठवडे त्यांना त्या विषयाची ओढ वाटते म्हणून आणि पावसाचा अभ्यास व्हायला हवा आहे अशी त्यांची इच्छा असते म्हणून पैसे साठवून या प्रकल्पात सहभागी होतात. प्रत्येक वेळा आम्ही प्रवासाच्या शेवटी जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा प्रत्येकाच्याच बोलण्यात असं येतं की, या पावसाने त्यांना एक शास्त्रज्ञ, अभ्यासक म्हणून तर नक्कीच, पण एक माणूस म्हणून नक्कीच समृद्ध केलं आहे.’’
मेघदूत.. यापुढचा प्रवास
‘प्रोजेक्ट मेघदूत’ या प्रकल्पाचं हे पाचवं वर्ष. या वर्षीच्या अभ्यासाचा, प्रवासाचा टप्पा पुढच्या आठवडय़ापासून सुरू होईल. जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत हा प्रवास सुरू राहील असं सध्याचं नियोजन आहे. या वर्षीच्या अभ्यासाचं केंद्रस्थान आहे गंगा आणि गंगेचं खोरं.
भारताच्या उत्तराखंड राज्यातल्या उत्तरकाशी या जिल्हय़ात उगम पावणारी ही नदी कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, पटणा असं उत्तर भारत पार करत करत पूर्वेला बंगालच्या उपसागराला मिळते. गंगेचा हा प्रदेश भारताच्या एकूण भौगोलिक आकाराच्या एक तृतीयांस आहे. म्हणजे भारताची साधारण ८० कोटी जनता या गंगेच्या प्रभावक्षेत्रात येते असं म्हणता येईल. त्यामुळेच या नदीला जसं भौगोलिक महत्त्व आहे तितकीच ती राजकीयदृष्टय़ाही महत्त्वाची आहे! या वर्षीचा प्रवास गंगा जिथे समुद्राला मिळते, तिथपासून ते गंगेच्या मुखापर्यंत, असा उलटा करणार आहेत.
याबरोबरच, हे वर्ष एल निनोचं असल्याने याचा परिणाम भारताच्या उत्तरेवर कसा होतो हेही तपासून पाहायची योजना या गटाने आखली आहे.
हा प्रवास झाल्यावरचं खरं काम सुरू होईल, असं या गटाबरोबर काम करणाऱ्या काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीचं संकलन करून या सर्व माहितीचा मान्सून एन्सायक्लोपीडिया सर्वासमोर आणणं हे ‘प्रोजेक्ट मेघदूत’चं यापुढचं उद्दिष्ट आहे. या एन्सायक्लोपीडियासाठी सर्व भागांमधल्या छोटय़ा छोटय़ा गटांनी तिकडच्या हवामानाची आणि पावसासंबंधी इतर माहिती गोळा करून आमच्यापर्यंत पोहोचवणं हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर यात जेवढा लोकसहभाग वाढेल तेवढं हे ज्ञान विस्तृत होत जाईल. म्हणून आम्ही ज्या ज्या भागात जातो तेव्हा स्थानिक पत्रकार, विद्यार्थी-प्राध्यापक यांना बरोबर घेऊन काम केलं जातं. त्यांच्या भागाचा पावसाबद्दलचा अनुभव विचारला जातो आणि त्यांनाही प्रकल्पाला हवी असणारी आकडेवारी जमा करायला, माहिती द्यायला उद्युक्त करतो. अर्थातच प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्यांची संख्या तर वाढत आहेच, पण या सर्वाचं ज्ञान एकत्रित झाल्यामुळे आणखीनच समृद्ध होत आहे.
हा गट जिथे जिथे जातो, ज्या-ज्या माणसांशी बोलतो, जे पावसाबद्दलचं स्थानिक ज्ञान सांगणारे भेटतात ते सगळे आता किमान साठी-सत्तरीच्या पुढचेच असतात. आणखीन काही काळानंतर हे स्थानिक ज्ञानही लोप पावत जाईल. त्यामुळे हा मान्सून एन्सायक्लोपीडिया आणि एकूणच सगळा प्रकल्प लवकरात लवकर लोकांसमोर आणायचा आमचा प्रयत्न आहे.
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com