दरवर्षी देशाच्या एका भागात फिरून तिथल्या मान्सूनचा अभ्यास करणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट यावर्षी निघाला आहे गंगेच्या खोऱ्यात. या प्रवासातला पहिला टप्पा होता विदर्भात. तिथे ‘नीरी’च्या कार्यालयाला भेट देणं अपरिहार्य होतं..

गेली चार र्वष ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या प्रकल्पाद्वारे भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फिरून, मान्सून आणि माणूस यांमधल्या वेगवेगळ्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी तरुणांचा एक गट भारतभर फिरतो आहे. यामध्ये पावसाचा हवामानशास्त्रीय अभ्यास, पाऊस आणि जैवविविधता आणि पावसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम, अशा तीन विस्तृत विषयांवर अभ्यास होणार आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’ हा प्रकल्प ‘सिटिझन्स सायन्स’ या गटाच्या स्वयंसेवी सदस्यांनी मिळून, गेली पाच र्वष सतत सुरू ठेवला आहे. यावर्षी त्यांचा प्रवास गंगेच्या खोऱ्यातून होणार आहे.
गंगेच्या दिशेने..
‘प्रोजेक्ट मेघदूत’ च्या पाचव्या वर्षांत गंगेच्या खोऱ्याचा अभ्यास करण्याची योजना आखली गेली आहे. गंगा नदी ही भारताचा कमीत कमी एकतृतीयांश भाग व्यापते. लोकसंख्येच्या दृष्टीनं बघितलं तर गंगेच्या खोऱ्यामध्ये भारताची एकतृतीयांश लोकसंख्याही राहते. त्यामुळे भारताच्या सामाजिक व्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या मान्सूनचा अभ्यास या गंगेच्या खोऱ्याच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच आहे. कलकत्त्यापर्यंतचा प्रवास
‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट पुण्याहून सर्व साधनसामग्री बरोबर घेऊन कलकत्त्याच्या दिशेने २५ जून रोजी रवाना झाला. या वर्षी सगळा प्रवास हा महामार्गावरूनच होणार आहे. पुण्याहून संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रवास सुरू करून, हा गट नागपूरला रात्री पोहोचला. दुसऱ्या दिवशी नागपूर येथे काही संस्थांना भेटी देऊन, रायपूर मार्गे कोलकात्यात पोहोचला. वाटेमध्ये येणाऱ्या विविध नैसर्गिक बदलांचा अभ्यास सततच सुरू होता.
एक कायमच लक्षात येणारी आणि तशी अगदी स्पष्ट बाब म्हणजे, भूगोल बदलला की निसर्ग बदलतो, जैवविविधता बदलते. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या पाचही वर्षांमध्ये ही बाब अतिशय स्पष्ट रूपाने दिसली होती. यावर्षीही रस्त्याने प्रवास करताना ही बाब प्रत्यक्ष जाणवली. साधारण जालना जिल्हा सोडून, सुलतानपूर येईपर्यंत म्हणजे जिथे मराठवाडा आणि विदर्भाची सीमारेषा येते तिथे. त्या ठिकाणी येईपर्यंत, पाऊस व्यवस्थित येऊन गेल्याची चिन्हं दिसत होती. पण तरीही एक वेगळं हवामान जाणवत होतं. नंतर पहाटे जेव्हा गट विदर्भात पोहोचला तेव्हा पासून पुढे, म्हणजे अगदी जिथपासून विदर्भाची सीमा सुरू होते तिथपासून एक प्रकारचं हिरवं गवत दिसत होतं. पावसाच्या काळात जसं वाढतं तसं. या सीमेच्या अलीकडे अगदी काहीही नाही आणि सीमा ओलांडून पुढे गेलो की लगेच हे गवत असा मजेशीर प्रकार अनुभवायला मिळाला. हे निरीक्षण अगदी बारीक असलं तरी त्यामुळे आपल्याला त्या भागाचं विशिष्ट नक्कीच बघायला मिळतं. विदर्भामध्ये पाऊस हा बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम म्हणून येतो. पावसाने आत्ता महाराष्ट्र व्यापला असला तरी विदर्भात पाऊस आधीच आला आहे हे इथल्या जमिनीवर उगवणाऱ्या लहान गवतावरून कळून येतं. या पावसाला धरूनच पुढे शेतीविषयक काही गोष्टीही बघायला मिळाल्या. काही शेतकऱ्यांची पेरणी झालेली होती, काही ठिकाणी लहान लहान रोपंही यायला लागली होती. मराठवाडय़ातील शेतीमध्ये अजून पेरणी झालेली बघायला मिळाली नाही.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …

नागपूर आणि नीरी NEERI
नागपूरला नीरी नावाची एक प्रसिद्ध संस्था आहे. ही राष्ट्रीय संस्था निसर्ग आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारचा अभ्यास करते. कोलकात्याला पोहोचणं आवश्यक असलं तरीही गंगा नदीविषयी माहिती घेण्यासाठी नीरी या संस्थेला भेट देणं महत्त्वाचं होतं. ही संस्था सीएसआयआर (CSIR) म्हणजेच, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या अंतर्गत येते. अधिक नैसर्गिक तंत्रज्ञान तयार करणं, त्यावर अभ्यास करणं हे या संस्थेचं काम आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे अधिक प्रभावशील कसे करता येतील यावरही ही संस्था काम करते. या जलशुद्धीकरणाच्या कामाचा अनुभव असल्याने भारत सरकारने दिलेल्या प्रकल्पांपैकी गंगेच्या शुद्धीकरणाविषयीचा प्रकल्पही नीरीकडे आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नीरीमधल्या शास्त्रज्ञांना गंगा नदीचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास, गंगा नदीच्या उगमापासून ते ती जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंत एका सर्वेक्षणाद्वारे करायचा आहे. हे सर्वेक्षण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, विस्तृतपणे करायचं आहे. याविषयी हा गट सतीश वाटे या नीरीच्या संचालकांना भेटला. वाटे यांनी आणखी काही याच विषयात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर गटाची भेट घालून दिली आणि या प्रकल्पाबद्दल आणि गंगेच्या शुद्धीकरणाच्या विविध पैलूंबद्दल चर्चा झाली. या सगळ्यामधला त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा भाग म्हणजे, गंगेच्या शुद्धीकरणासाठी आजपर्यंत अनेक संस्थांनी आणि शासनानेही अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. या सर्व संस्थांनी सांगितलेले उपायही चांगले आहेत. परंतु यामध्ये प्रश्न असा आहे, की जोपर्यंत आपल्याला या सर्व समस्येचं मूळ कळणार नाही, तोपर्यंत सर्वानी केलेले उपाय हे केवळ वरवरचेच राहतील. मूळ प्रश्नाला हात घातलाच जाणार नाही आणि या मूळ प्रश्नाची, समस्येची उकल करण्यासाठी नीरीकडे हा प्रकल्प देण्यात आला आहे.
या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी नीरीने गंगा नदीचे वेगवेगळे टप्पे पाडले आहेत. आणि त्यानुसार या लहान लहान भागांचा अभ्यास करून ते एक मॉडेल करत आहेत. त्याच्यामध्ये, गंगा नदीमध्ये मुळात पाणी किती आहे, त्यात पावसाचं किती पाणी दरवर्षी मिसळलं जातं, या नदीला किती उपनद्या येऊन मिळत आहेत, या सगळ्यांमध्ये नदीला अशुद्ध करणारे किती प्रवाह आहेत या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. यामध्ये मानवनिर्मित स्रोत काय, यांच्यावरही सर्वेक्षण होणार आहे. हे प्रदूषणाचे घटक नक्की कुठून उगम पावतात हे शोधलं जाणार आहे. असं गंगेचे लहान लहान भाग करून, गंगेच्या संपूर्ण पात्राचा अभ्यास नीरी ही संस्था करणार आहे. नुकताच या गटाने एक चाचणीसाठी सर्वेक्षणाचा प्रयोग करून पाहिला. गंगानदीच्या उगमासून ते अगदी गंगा जिथे समुद्राला मिळते, तिथपर्यंत, प्रत्येक टप्प्यावरचं पाणी गोळा केलं आणि त्याची चाचणी घेतली. हे सगळं सर्वेक्षण पूर्ण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. पण काही टप्प्यांवरची काही निरीक्षणं आपल्याला आत्ताच बघायला मिळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सर्वेक्षणानंतर आपल्याला हे समजेल की कुठल्या भागात कशा प्रकारचं प्रदूषण होतं आहे. या प्रदूषित पाण्यात नवीन पाणी मिसळलं गेल्यावर ते पाणी कशा प्रकारचं आहे. या पाण्यामध्ये नैसर्गिकरीत्या शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी चालते, मग या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी काय प्रकारची पद्धत वापरावी लागेल, अशा प्रकारची माहिती आपल्याला या सर्वेक्षणातून मिळेल.
यातून आपल्याला गंगा पवित्र का याचे काही शास्त्रीय खुलासेही कदाचित मिळतील. म्हणजे फक्त हिंदू धर्मामध्ये नाही, तर अकबर किंवा औरंगजेबलाही पिण्यासाठी गंगेचं पाणी लागायचं, अशी नोंद इतिहासात आहे. जगभरातले व्यापारी जेव्हा इथला भाग ट्रेड-रूट म्हणून वापरायचे तेव्हा, परत जातानाही ते त्यांच्याबरोबर गंगेचं पाणी बरोबर न्यायचे. जहाजामधून जाताना, प्रवास करताना, त्या प्रवाशांनी आणलेलं पाणी खराब व्हायला लागायचं, पण गंगेच्या पाण्याला मात्र काहीही न होता जसंच्या तसं राहायचं. हे का, कारण या नदीच्या पाण्यामध्ये स्वत:ला शुद्ध करणारे काही घटक उपलब्ध असावेत. काहींचं म्हणणं असं की नदीच्या उगमाच्या जागी या नदीमध्ये काही रेडिओएक्टिव्ह घटक मिसळले ज्यामुळे ही नदी शुद्ध राहू शकते. यामुळे बाकीच्या, पाण्यात असलेल्या जीवाणू आणि विषाणूंना तग धरून राहता येत नाही. काहींच्या मते या पाण्यात असे काही विषाणू आहेत की जे जीवाणूंना संपवून टाकतात आणि त्यामुळे हे पाणी कायमचं शुद्ध राहतं. इथे काही वनस्पती उगवतात कदाचित त्यामुळेही अंतर्गत शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू राहत असेल. इथल्या स्थानिकांनी सांगितलेल्या एका गोष्टीप्रमाणे, एका कॉलरा झालेल्या मृत व्यक्तीला गंगा नदीच्या पाण्यात सोडलं गेलं. नंतर या मतदेहाचे इथले नमुने घेतले तर इथे कॉलराचे जीवाणू सापडले नाहीत. मग कोणत्या मार्गाने हे पाणी शुद्ध झालं ही अभ्यास करण्याजोगीच गोष्ट आहे. पण प्रत्येक नदीची प्रदूषण धारण करण्याची काहीतरी कमाल मर्यादा आहे. आज आपण या क्षमतेच्या खूपच पुढे गेलो आहोत, पण, ही क्षमताही गंगेची किती आहे, हे तपासून पाहण्यासारखी गोष्ट आहे. सध्या आपल्याला हे पाणी दूषित न करणे म्हणजेच शुद्धीकरण असं मानावं लागणार आहे. त्यामुळे नदीमध्ये नक्की कोणत्या प्रवाहामधून, आजूबाजूच्या उद्योगांमुळे दूषित पाणी येतं आहे हे या सर्वेक्षणात आपल्याला कळणार आहे. कारण आपण काही पावले उचलली तर गंगा स्व:ची स्वत:ला शुद्ध करून घेऊ शकते, असे गुणधर्म तिच्यामध्ये आहे.
गंगेचं एक समर्पक चित्र कळण्यासाठी नीरी मधली ही भेट खूपच महत्त्वाची ठरली. यासगळ्या गोष्टींमध्ये मान्सून या नदीला कशा प्रकारे मदत करतो हे पाहाणे आता आमचं काम होतं.

मध्य भारतातली जंगलं
नागपूर सोडल्यावर छतीसगढमार्गे पुढे कोलकात्याला जायचं होतं. या मार्गावर गेलं की पुढे थेट जंगलच सुरू होतं. हे जंगल थेट पश्चिम बंगालपर्यंत सोबत होतं. हे जंगल इथं असण्याचं कारणच मुळात मान्सून हे आहे. भारताचा नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात, ही क्षेत्रे आंध्र प्रदेशपासून वायव्येकडे सरकतात किंवा ओरिसाकडून वायव्येला जातात. ही कुठूनही गेली तरी ती याच क्षेत्रातून जातात, त्यामुळे या भागाला पाऊस हा कायमच चांगला मिळतो. त्यामुळे या अरण्यांचा उल्लेख अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि झारखंड या भागांतली जंगलं ही अतिशय दाट आहेत. या ठिकाणी असे पर्वत नाहीत की जे वाऱ्यांना अडवतील आणि मग पाऊस पडेल, जसं आपल्याला पश्चिम-घाटामध्ये बघायला मिळतं. पण केवळ हवामानाच्या कारणामुळे इथे पाऊस जास्त पडतो. या सगळ्या भागांमध्ये आदिवासींचं प्रमाणही खूप आहे. अनेक प्रकारच्या जाती-जमाती इथे अनेक वर्ष राहत आहेत. त्यामुळे पावसामुळे निसर्गातली विविधता इथे आहेच. पण, या विविधतेमुळे असलेली मानवी समाजांमधली विविधताही आपल्याला बघायला मिळते.
छतीसगढ आणि झारखंडच्या सीमेवर एक खरखरी नावाचं एक गांव होतं. या गावामध्ये जाऊन बऱ्याच लोकांशी ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट बोलत होता आणि त्यांची जीवनशैली समजून घेत होता. छत्तीसगढमध्ये पोहोचल्यापासून इथे तलाव दिसत होते. हे तलाव नक्की कधी बांधले गेले याचा पत्ता कोणालाच नाही. या भागामध्ये पाऊस आहे, तरी पण इथे प्राचीन तलाव आहेत, याचाच अर्थ इथे कधी ना कधीतरी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं असणार असा अंदाज बांधता येऊ शकतो. कारण आजपर्यंत असा अनुभव कुठेच नाहीये की जिथे भाताचं पीक घेण्याइतकं मुबलक पाणी उपलब्ध आहे, पण तरीही पाणी साठवण्याच्या काही सोयी करून ठेवल्या आहेत. त्यामुळे हे जेव्हा बांधले गेले होते त्याकाळच्या हवामानाचं चित्र आपल्याला रंगवावं लागणार.
या गावामध्ये कोरा आणि सोहोरा जातींचे आदिवासी राहतात. इथे बोलायला लागल्यावर कळलं की इथे ४० वर्षांपुढच्या माणसांचं शिक्षण झालं नव्हतं. आणि ते पारंपरिक पद्धतीनी शेती करतात. इथे पाऊस रोहिणी नक्षत्रामध्ये पडतो आणि आद्र्रा नक्षत्रात शेतीचं काम सुरू होतं. त्यांच्या पंचांगानुसार पहिल्या टप्प्यात पाऊस नीट येणार असून नंतर त्याचं प्रमाण कमी होणार आहे. गेली पाच सहा वर्ष त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे परतीच्या मान्सूनचा. हा मान्सून सप्टेंबरच्या महिन्यात इतका जास्त पडतो की कापणीच्या वेळेस पीक वाहून जाण्याची भीती निर्माण होते. इथल्या तरुण लोकांमध्येही नक्षत्र आणि पाऊस हे समीकरण पक्कं लक्षात आहे. आजपर्यंत भेटलेल्या नव्या पिढीत हे पारंपरिक ज्ञान अभावानेच दिसून आलं आहे. त्यामुळे ही मंडळी पावसाचा अंदाज घेऊन पुढच्या नक्षत्रात पेरणी करतात, म्हणजे तोटा होत नाही. या पद्धतीमुळे जवळजवळ ५० टक्क्यांनी त्यांचं पीक वाचत आहे. परत छतीसगढम्मध्ये एस.एम.एस सेवा सुरू झाली आहे, ज्याद्वारे त्यांना हवामानाचा अंदाज मिळू शकतो आणि त्यानुसार ते आपल्या शेतीचं नियोजन करू शकतात. म्हणजे बदलते ऋतू ओळखून आणि त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने इथले आदिवासी आपली शेती आणि बरोबरच आपली जीवनशैली बदलत्या ऋतुमानानुसार बदलत आहेत.
यानंतरचा प्रवास हा परत जंगलांमधूनच होता. यानंतर कोलकात्त्याला पोहोचून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गंगा नदीच्या अभ्यासामधला पुढचा टप्पा सुरू झाला.

पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि झारखंड या भागांतली जंगलं ही अतिशय दाट आहेत. या ठिकाणी असे पर्वत नाहीत की जे वाऱ्यांना अडवतील आणि मग पाऊस पडेल, जसं आपल्याला पश्चिम-घाटामध्ये बघायला मिळतं. पण केवळ हवामानाच्या कारणामुळे इथे पाऊस जास्त पडतो. या सगळ्या भागांमध्ये आदिवासींचं प्रमाणही खूप आहे.
प्रज्ञा शिदोरे response.lokprabha@expressindia.com

Story img Loader