‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या प्रवासामधला हा शेवटचा टप्पा. गंगा जिथे समुद्राला मिळते अशा गंगासागरपासून हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील विस्तृत गाळाची मैदाने पहात, गंगेला मिळालेले पावित्र्य समजून घेत, गंगेत सांडपाणी सोडत माणसाने ती कशी अस्वच्छ केली आहे हे या गटाने अभ्यासले. आता हा गट गंगा जिथे उगम पावते अशा हिमालयात प्रवास करत तिथल्या निसर्गाचा अभ्यास करणार आहे.

हिमालय आणि त्याच्या आसपासच्या भागात दरडी कोसळणे हे नेहमीचेच झाले. त्यात परत पावसाळ्याच्या दिवसात या घटना सततच घडत असतात. या दरडींचे मुख्य कारण म्हणजे इथली भुसभुशीत जमीन. इथली सर्व माती ही गाळाने बनलेली असल्याने माती धरून ठेवण्यासाठी पक्का खडक नाही. त्यामुळे थोडय़ाच पावसानेदेखील माती यायला लागते. अनेक ठिकाणी मोठमोठे धोंडे असतात. त्याला आधार म्हणून थोडीच माती असते. ही माती गेली की तो कधीही कोसळू शकतो.
हिमालयात पाऊस कायमच रिमझिम पडतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ज्या प्रकारे पाऊस होतो तसा इथे अजिबातच होत नाही. कदाचित, आपल्याकडे येणाऱ्या थेंबांची प्रक्रिया उंचावरून वरून खाली येईपर्यंत सुरू असते. एक थेंब दुसऱ्याला मिळतो आणि मोठ्ठा होतो. पण या भागात आपण त्या ढगांच्याच उंचीवर असतो, म्हणून पावसाचे थेंब फार मोठे होत नसावेत. पण असा पाऊस वर्षभर पडतो. त्याचे काही निश्चित असे वेळापत्रक नसते. पण सर्वात जास्त पाऊस हा मान्सूनच्याच काळात पडतो. त्यामुळे इथली खरीप आणि रब्बी, दोन्ही पिके ही पावसावरच अवलंबून असतात. उत्तर काशीमधून येताना काही पूल हे कोसळलेले दिसले. हे २०१२ मधल्या मोठय़ा पुराचे अवशेष. त्यानंतर बांधले गेलेले पूल हे लष्काराने बांधलेले आहेत. ते लोखंडी आणि सहज परत बांधता येण्याजोगे आहे.
या भागातले पाणी हे दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्या नदीचे नसून फक्त भागीरथीचे आहे. त्यामुळे हे आधीच्या पाण्यापेक्षा निश्चितच वेगळे कळून येते. इथल्या अनेक छोटय़ा-छोटय़ा नद्यांवर, ओढय़ांवर वीज निर्मितीसाठी बांधलेले छोटे-छोटे संच आपल्याला दिसून येतात. कारण ते टर्बाइन फिरायला लागणारा वेग सहजच मिळवता येत असतो.
उत्तर काशीच्या पुढे काही काळ थंडी फार नव्हती. पण जसजशी गाडी उंचीवर पोहोचू लागली तसे तसे सगळ्यांचे गरम कपडेही बाहेर येऊ लागले. यानंतर येते ते हरसील. गंगेच्या दृष्टीने या स्थानाचे एक वेगळेच महत्त्व आहे. हिवाळ्यामध्ये, म्हणजे साधारणत: ऑक्टोबरपासून ते अक्षय्य तृतीयेपर्यंत गंगोत्री हे ठिकाण बंद असते. कारण बर्फ पडायला लागला असतो. या कित्येक फूट बर्फात वावरणं अशक्यच. त्यावेळेस गंगोत्रीला जी गंगेची प्रतिमा आहे ती या हरसीलला ठेवली जाते. हा प्रवास साधारण २० एक किलोमीटर्सचा आहे, पण तरीही या चढाईसाठी लोकांना दोन दिवस लागतात. दरवर्षी रीतसर पालखी घेऊन हा प्रवास केला जातो. याशिवाय हरसील प्रसिद्ध आहे ते उत्तम दर्जाच्या सफरचंदासाठी.
या प्रवासामध्ये शेवटचे दोन टप्पे अतिशय धोकादायक होते. अनेक ठिकाणी माती वाहून गेल्यामुळे दरड सहज पडू शकेल अशीच चिन्हं होती. लोक तिथे त्यावेळेपुरती माती भरतात आणि गाडी पास होते. हे सगळे रस्ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे आहेत. हे लोक पावसाळ्यात सतत कामात असतात. अंधार पडला की तेवढीच काय ती त्यांना विश्रांती. कारण अंधारामध्ये या भागातून कोणीच प्रवास करत नाही. इथे कुठेही दरड कोसळली तर प्रवाशांना मदत म्हणून दर दहा किलोमीटर्सवर यांचे जेसीबीज असतात. कॉल केल्यावर लगेचच ही मंडळी येतात, माती, दगड बाजूला केले जातात आणि रस्ता पुन्हा सुरू होतो. त्यामुळे दरड कोसळली तरी एका तासापेक्षा जास्त वेळ आपल्याला थांबावं लागत नाही. पण असं रोजच होत असल्यामुळे हा एक तास काढणंसुद्धा अवघड जातं. पण इथले सरावलेले चालक दरडीचा अंदाज घेऊन दरड येत असताना सरसकट गाडी पुढे मारतात.
गंगोत्री
गंगोत्रीला गटाचे दोन भाग केले गेले. एक गट इथल्या मुख्य मंदिरात भेट द्यायला गेला आणि दुसरा इथल्या फॉरेस्ट ऑफिसरला भेटायला गेला. इथलं अभयारण्य हे चीनच्या सीमेपर्यंत विस्तारलेलं आहे आणि इथे लेपर्ड, स्नो लेपर्ड, ब्लू शिप हे बघायला मिळतात. हिवाळ्यामध्ये हे स्नो लेपर्ड अगदी मुख्य मंदिराच्या आवारातही येत असतात. या ब्लू शिप म्हणजे भरल(हिमालयीन निली भेड), इथे अगदी उंच चढाईवरही सहजपणे चालताना दिसतात. त्या मुद्दाम दगडाखालची माती मोकळी करतात, जेणेकरून दरड कोसळेल आणि त्यांना तिथे मिळणारी खनिजे खाता येतील. दरडींचा असाही फायदा! दुसरा गट मुख्य मंदिरामध्ये मुलाखती घेण्यासाठी गेला होता. तिथले एक पुजारी पुण्याच्या सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिरातही पुजारी म्हणून काम करतात. त्यांचे नाव सेमवाल. आणखी दोन-चार लोकांना नाव विचारले तर त्यांचीही आडनावे सेमवाल. हे सेमवाल म्हणजे सेमवाल घराणे. यांची गोष्ट फारच रंजक आहे. इथल्या टिहरीच्या राजाने गंगोत्रीमध्ये पूजा करण्यासाठी वतन दिले. तिथल्या मूळच्या पुजाऱ्याला पाच मुले होती. तो गेल्यावर ही जबाबदारी या पाच मुलांवर आली. मग आळीपाळीने हे तिथली पूजा करू लागले. या सेमवाल कुटुंबीयांनी इथे एक ट्रस्ट स्थापन केला आहे. त्यातून इथले सर्व कामकाज बघितले जाते. कदाचित शासनालाही व्यवस्था ठेवता येणार नाही इतकी स्वच्छता आणि व्यवस्था इथे आहे. ही पाच जणांची व्यवस्था होती २०० वर्षांपूर्वी. आता या पाचाचे अडीचशे झाले आहेत. यामधले सगळेच आता पूर्ण वेळ पुजारी नाहीत. काही डॉक्टर आहेत, इंजिनीयर आहेत, बँकेत कामाला आहेत, वकील आहेत आणि शिक्षकसुद्धा आहेत. त्यांची बारी येते तेव्हा हे इथल्या पारंपरिक वेशात पूजेला उभे राहतात. त्यामुळे तुम्हाला इथे पूजा सांगणारा कोणीही असू शकतो. गटाला भेटलेला पुजारी हा एम.एस्सी. जियोग्राफी झालेला होता. तरीही ही परंपरा सांभाळण्यासाठी तो इथे त्याची बारी आली की येत असतो.
गंगा स्नान
गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करणे हे पवित्र समजले जाते. हे जसे गंगासागराच्या इथे आहे ते तसेच कोलकाता, पाटणा, वाराणसी सगळीकडेच दिसले. पण गंगोत्री, म्हणजे अगदी त्या उगमापाशी स्नान करणे म्हणजे महापवित्रच! पण ते तेवढे सोपे नाहीये! तिथल्या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी खाली, नदीच्या जवळ उतरले आणि दगडावर पाय ठेवला तर तो दगड बर्फाच्या एवढा गार. कारण इथले सगळे पाणी हिमनद्यांमधून येणारं असल्याने याचे तापमान एखादा डिग्री असेल. त्या एवढय़ा गार पाण्यात तो कॅन भरेपर्यंत उभे राहणे हे एक मोठे दिव्याचे होते. या पाण्यात दहा सेकंदाच्या वर थांबलं की हात बधिर व्हायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये इथे आंघोळ करणे किती अवघड असेल याची कल्पनाही करवत नाही. पण इथले हे सेमवाल पुजारी या गार पाण्यात पूजेच्या आधी स्नान करण्यासाठी पहाटे चार वाजता येत असतात.
गंगोत्रीला बाकी काही फारसे बघण्यासारखे नाही. इथे पाइनचे मोठे वृक्ष आहेत. राहण्यासाठी येत्या काळात काही हॉटेले उभारली गेली आहेत. ३००-४०० रुपये एवढय़ा स्वस्त दरात आपल्याला इथे राहता येते.
परतीचा प्रवास
गंगोत्रीहून दुपारी निघून रात्रीपर्यंत हरसीलला पोहोचायचे असे नियोजन होते. हरसीलच्या जवळ एका घोटिया नावाच्या गावाला भेट द्यायची होती. इथे धनगर जमात राहते. त्यांच्या प्रत्येकाकडे ३००-४०० मेंढय़ा आहेत. मांस आणि लोकरीसाठी या पाळल्या जातात. आपल्या इथल्या धनगरांप्रमाणे त्यांचाही फिरण्याचा एक निश्चित काळ आहे. सप्टेंबरच्या नंतर ते खालच्या भागात, उत्तर काशी जातात आणि मार्च-एप्रिलमध्ये परत वर येतात. तोपर्यंत इथेही चरण्यासाठी मुबलक गवत मिळत असते. स्थलांतराचाही प्रकार हजारो वर्षांपासून सुरू झाला आणि आजही जगभरातील अनेक भागांमध्ये तो टिकून आहे.
हिमालयातला बदलता मान्सून
गेल्या सात ते आठ वर्षांमधला स्थानिकांचा असा अनुभव आहे की इथला रिमझिम पाऊस आता बदलायला लागला आहे. तो मुसळधार व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट इथे पोहोचल्यापासून पाऊस सततच पडत होता. पुण्यात जसा नेहमी पाऊस पडतो तसा पाऊसदेखील इथे दरडी कोसळण्यासाठी पुरेसा आहे. खालून एखादी गाडी जोरात गेली तरी त्याने वरून माती खाली येते. या बदललेल्या पावसाचे परिणाम एक म्हणजे दरडी कोसळणे आणि दुसरे म्हणजे दरडी कोसळून पिके नष्ट होतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कोटय़वधी रुपयांचे पिकांचे नुकसान या भागात झाले आहे. याबरोबरच लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होतो, कारण पूर येतो, दरड कोसळते तेव्हा घरे, माणसेही त्याखाली गाडली जातात.
उमारमण सेमवाल त्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, गंगा नदी ही खूप वेगळी वागायला लागली आहे. त्यामुळे २०१२ नंतरच्या पुरामुळे सगळ्यांनी पाऊस थोडा वाढला की आपले सामान बांधून वरच्या भागात जायचे अशी सवयच करून घेतली आहे. अशा कायमच्या भीतीखाली इथली लोक राहत आहेत.’ घरांचे असे तर रस्त्याचे काय होत असेल, याची कल्पना करता येईल. कधीही दरड कोसळेल अशा भीतीमध्येच वाहतूक सुरू असते. खरे म्हणजे इथे रस्ते आणि घरेही बांधू नये अशीच इथली परिस्थिती आहे. असे सर्व तज्ज्ञही सांगतात. पण माणूस अजूनही अशा खडतर परिस्थितीमधून वाट काढत राहतो आहे.
दरडी पडून नुकसान होत असले तरीही त्या पडल्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये एवढा सुपीक प्रदेश तयार झाला आहे. ज्यावेळेस बिहारमधला माणूस केळीचे उत्पादन घेतो आणि पिके चांगले आल्यामुळे खूश असतो, तेव्हा हिमालयात राहणाऱ्या लोकांनी त्या दरडी झेलल्या असतात.
भारतीय हवामानशास्त्र संस्थेच्या एका अहवालानुसार गेल्या काही वर्षांत वेस्टर्ली वारे हे मान्सूनच्या वाऱ्यांना भिडत आहेत. यामुळे हिमालयाचा पाऊस वाढला आहे असे म्हणता येईल. गेल्या काही वर्षांत हा पाऊस वाढण्याचे प्रमाण जास्तच आहे. या वाऱ्यांमुळेच हिमालयामध्ये अतिवृष्टी होत असते. या अतिवृष्टीचे परिणाम आपण २०१२ आणि २०१३ या दोन सलग वर्षांमध्ये बघतच आहोत. केदारनाथच्या ढगफुटीमध्ये सहा हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हा आकडा झाला मोजल्या गेलेल्या मृतदेहांचा. नंतरच्या काळात खाली वाराणसीपर्यंत मृतदेह सापडत होते असेही सांगितले जाते. अनेक लोक उपासमारीने गेले. माणसांबरोबर खेचरेही गेली. त्यांची तर काही गणनाच नाही. अनेक लोकांना आपली गावे कायमची सोडावी लागली. कारण गंगा, भागीरथीच्या उपनद्या आपल्या नियमित प्रवाहापेक्षा कित्येक फूट उंचीवरून वाहत होत्या. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अशी गोष्ट रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच दुर्मीळातली दुर्मीळ अशीच आहे. पण आता हे सातत्याने इथे घडताना दिसत आहे. ज्या वाऱ्यांनी हे होते आहे ते का याचे कारण शोधावे लागणार आहे.
इथे राहणारे बरेचसे मूळचे या भागातले नाहीत. फाळणीनंतर बरेचसे पंजाबी आणि सिंधी लोक इथे राहायला आले आहेत. पण हे असेच घडत राहिले तर अख्खा उत्तराखंड राज्याचा हा प्रश्न होऊन बसेल, कारण इथली ८० टक्के जनता अशीच हिमालयाच्या कुशीत राहते. या ८०टक्के लोकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लवकरच काहीतरी तोडगा काढायला हवा आहे. जपान जर कायम अशाच भूकंपाच्या क्षेत्रात राहत असेल तर तशी उपाययोजना आपल्यालाही करता येईल. पण त्याचा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी रस्ते बांधणे कठीण तिथे मनुष्यवस्ती वाढावी का? ती वाढवावी का? अशा मूलभूत प्रश्नांकडे आपण वेळीच लक्ष द्यायला हवे.
‘प्रोजेक्ट मेघदूत’चा हा पाचव्या वर्षांतला प्रवास आता संपला आहे. हा गट आता अशा आपत्तींची सूचना, नागरिकांच्या मदतीने तिकडच्या स्थानिकांना आधीच कशी देता येईल यावर विचार करत आहेत. अशी व्यवस्था तयार झाली तर आपल्याला केदारनाथ किंवा माळीणसारख्या दुर्घटना टाळता येतील!
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader