आपल्या कृषीप्रधान देशासाठी मान्सून हा अतिशय संवेदनशील घटक. त्यामुळेच उन्हाळा सुरू होत असतानाच मान्सूनची चर्चा सुरू होते. आता तर मान्सून आपल्या दारात येऊन ठेपला आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’ हा काही तरुणांचा गट दर वर्षी मान्सूनबरोबर देशभरात फिरून त्याचा अभ्यास करतो. या गटाची मान्सूनबरोबर फिरस्ती सुरू होते, त्याबरोबरच त्याचा रिपोर्ताजही गेली दोन वर्षे ‘लोकप्रभा’तून प्रसिद्ध केला जातो. या प्रकल्पाच्या या वर्षीच्या भ्रमंतीआधीचे यंदाच्या मान्सूनच्या अंदाजाविषयीचे प्रास्ताविक-
यंदा फेब्रुवारी-मार्चपासूनच लहरी हवामानाचा अनुभव भारतीयांना येत आहे. लांबलेली थंडी, उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिमालयात झालेली बर्फवृष्टी, त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांत झालेली अभूतपूर्व गारपीट. गारपिटीचे सत्र संपतेय न संपतेय तोच प्रशांत महासागरात एल निनो निर्माण होण्याचे अंदाज बांधले जाऊ लागले. एल निनो म्हटले की, आता भारतीयांना धडकीच भरते. अपेक्षेनुसार प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या एल निनोचे परिणामही आता दिसू लागले आहेत. मान्सून यंदा पाच दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आणि त्याचे आगमनही म्हणावे तसे दमदार झालेले नाही. पश्चिम किनारपट्टीवरून त्याची आगेकूच सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत चालू आठवडय़ात मान्सून पोहोचेलही, मात्र त्याचे आगमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहील. एल निनोच्या सावटाखाली मान्सून यंदा कशी कामगिरी करतो याकडे भारताचेच नाही, तर जगाचे लक्ष लागलेले आहे.
असा झाला मान्सूनचा प्रवास
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजाप्रमाणेच मान्सून यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झाला. १ जूनऐवजी ६ जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचल्यामुळे स्वाभाविकपणे त्याची पुढील वाटचालही लांबली आहे. ‘प्रत्येक मान्सून हा वेगळा (युनिक) असतो’ याचा प्रत्यय मान्सून यंदाही देताना दिसत आहे. अंदमानमध्ये मान्सून यंदा १७ मे रोजी म्हणजे त्याच्या तेथील आगमनाच्या सर्वसाधारण तारखेपेक्षा तीन दिवस आधी पोचला. मात्र तेव्हापासून केरळपर्यंतची त्याची वाटचाल संथ गतीनेच झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे असे घडल्याचे हवामानशास्त्रज्ञ सांगतात. मान्सूनच्या आगमनाच्या वेळी निर्माण झालेली कमी दाबाची क्षेत्रे नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. तसेच समुद्रातील बाष्प कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये एकवटून जमिनीकडे सरकते. ही दिशा मान्सूनच्या मार्गाला अनुकूल नसेल तर त्यामुळे मान्सूनची प्रगती काही काळ रोखली जाते. त्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा पूर्वपदावर येण्यास काही काळ जावा लागतो. म्हणूनच अंदमानमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या आधी पोहोचूनही केरळपर्यंतचा त्याचा प्रवास संथपणे झाला. यंदा मान्सूनचे प्रवाहही सुरळीत नसल्यामुळे ज्या भागांत मान्सून पोहोचत आहे तिथे पावसाचे प्रमाणही म्हणावे तसे चांगले राहिलेले नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मान्सूनने केरळपाठोपाठ पश्चिम किनारपट्टीवरून आगेकूच सुरू ठेवली आहे. ९ जूनपर्यंत त्याने किनारपट्टीवर गोव्याच्या दक्षिण सीमेपर्यंत मजल मारली आहे. याच काळात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हे क्षेत्र कोणत्या दिशेला सरकेल त्यावर मान्सूनचा पुढील प्रवास आणि पावसाचे प्रमाण अवलंबून असेल. मान्सूनच्या भारतीय भूमीत येणाऱ्या दोन शाखा असतात. एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली. अरबी समुद्रातून केरळमध्ये मान्सून प्रवेश करत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून तो ईशान्येकडील राज्यांतही प्रवेश करतो. सध्या मात्र, बंगालच्या उपसागरातली शाखा काहीशी संथ झाली आहे. ती पुढील आठवडय़ात सक्रिय होऊन मान्सून ईशान्येकडील राज्यांतही पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि कोलकाता या दोन्ही शहरांत मान्सून एकाच वेळी कसा पोचतो हे यावरून समजू शकेल.
जून कोरडा जाणार?
शास्त्रज्ञांचा एक गट मान्सूनच्या दमदार आगमनाबाबत साशंक आहे. नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सध्या क्षीण असल्यामुळे, तसेच त्यामध्ये सातत्याने अडथळे येत असल्यामुळे मान्सून ज्या प्रदेशात पोहोचेल तिथे आगमनादरम्यान मोठय़ा पावसाची शक्यता नसल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. १५ जूनपर्यंत मान्सूनचे प्रवाह सुरळीत होण्याची शक्यता नसल्यामुळे दक्षिण ते मध्य भारतापर्यंत या कालावधीत मोठा पाऊस अपेक्षित नाही. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. मान्सूनचे आगमन लांबले आणि जूनमधील पाऊसमान चांगले राहिले नाही, तर जूनचा पाऊस सरासरीखालीच राहण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर होईल असा कयास शास्त्रज्ञ बांधत आहेत.
एल निनोचा प्रभाव
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याचे संकेत आयएमडीने त्यांच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात दिले होते. ते अंदाज मान्सूनच्या आगमनापासूनच खरे ठरताना दिसत आहेत. पूर्व प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या उबदार पाण्याच्या प्रवाहांना एल निनो म्हटले जाते. तेथील समुद्रपृष्ठाचे तापमान सलग पाच महिने सरासरीपेक्षा ०.५ अंश किंवा त्यापेक्षाही अधिक नोंदले गेले की एल निनोची स्थिती पूर्णपणे विकसित अवस्थेत येते. जूनपर्यंत एल निनो ‘न्यूट्रल’ अवस्थेत म्हणजे तेथील तापमानाच्या सरासरीदरम्यान असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता जूनपासून एल निनो आकाराला येण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. त्यापुढे पाच महिने म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एल निनो विकसित अवस्थेत पोचेल. मात्र, तोपर्यंत मान्सूनचा हंगाम संपल्यामुळे मान्सूनवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
मात्र, एल निनो प्राथमिक अवस्थेत असतानाही त्याचा परिणाम मान्सूनवर होतो याची उदाहरणे आहेत. २०१२च्या जूनमध्ये एल निनो आकाराला येत होता. तेव्हा हवामान शास्त्रज्ञांना त्याच्या परिणामांची कल्पना नव्हती. २०१२ मध्ये मान्सूनच्या प्रगतीत आगमनादरम्यानच खंड पडला होता. त्यामुळे त्या वर्षी जूनचा पाऊस सरासरीखालीच राहिला होता. यंदाही तशीच काहीशी स्थिती उद्भवणार असल्याचे मान्सूनच्या सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
प्रशांत महासागरात एल निनो निर्माण होत असताना जगभरातील वाऱ्यांच्या प्रवाहात मोठे बदल घडून येतात. प्रशांत महासागरात उबदार प्रवाहांमुळे निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे मध्य आशियातील कोरडे वारे खेचले जातात. यामुळे नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. तसेच िहदी महासागरातील आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पही भारताच्या भूमीकडे न येता पूर्वेकडे खेचले जाते. याचा परिणाम म्हणून मान्सून काळात भारतातील पावसाचे प्रमाण कमी होते आणि देशाच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पहिल्या अंदाजात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, हे प्रमाण देशाच्या सर्व भागांत सारखे राहणार नाही. ज्या भागांत मुळातच पाऊस कमी पडतो तिथे पाऊस कमी पडल्यास त्या भागांत दुष्काळी स्थिती उद्भवू शकते. आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. ज्या वेळी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्या वेळी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
जगभरातील संशोधन संस्थांचे अंदाज एकत्रित करून अमेरिकेतील ‘नोआ’ संस्थेतर्फे एल निनोचा अंदाज दिला जातो. या संस्थेच्या सध्याच्या अंदाजानुसार सध्या पूर्व प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा एक अंशांनी अधिक नोंदले जात असून ही स्थिती पुढेही कायम राहणार आहे. येत्या जुल-ऑगस्टमध्ये एल निनो निर्माण होण्याची शक्यता ६५ टक्के असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. भारतीय मान्सूनसाठी जुल-ऑगस्ट हे महिने मोठय़ा पावसाचे असतात. या काळातील पावसावर एल निनोचे सावट राहिल्यास भारतासाठी स्थिती चिंताजनक बनू शकते.
मान्सूनचा सुधारित (चिंताजनक) अंदाज
एप्रिलमधील पहिल्या अंदाजात आयएमडीने देशभरात हंगामात ९५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. आता मात्र, मेपर्यंतच्या हवामानातील घडामोडींवर आधारित-सुधारित अंदाज आयएमडीने दिला आहे. त्यानुसार यंदा हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता आहे. विभागनिहाय अंदाजानुसार वायव्य भारतात तेथील सरासरीच्या ८५ टक्के, मध्य भारतात सरासरीच्या ९४ टक्के, दक्षिण भारतात ९३ टक्के, तर ईशान्य भारतात सरासरीच्या ९९ टक्केपावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचे महिने असलेल्या जुलमध्ये देशभरात त्या महिन्याच्या सरासरीच्या ९३ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्के पाऊस पडेल असे अंदाजात म्हटले आहे.
मान्सूनची वर्दी
मान्सूनचे आगमन झाल्याची वार्ता आज आपल्याला हवामान विभाग त्यांच्या वेबसाइटवरून देतो. मात्र, भारतात वर्षांनुवष्रे शेतकरी निसर्गातील बदलांतून मान्सूनचे आगमन निश्चित करतो आणि त्यानुसार आपल्या शेतीच्या कामांचे निर्णय घेतो. मान्सूनच्या आगमनाची वार्ता देणारे हे काही नसíगक घटक
बहावा : एप्रिलमध्ये उन्हाचे चटके बसू लागले की रस्त्यावरून जाताना पिवळ्या फुलांनी सजलेला बहावा आपले लक्ष वेधून घेतो. पिवळा बहावा फुलू लागला की त्यानंतर चाळीसेक दिवसांत पाऊस येणार याचा अंदाज आजही महाराष्ट्रातील शेतकरी बांधतात.
मुंग्या : पावसाळ्यापूर्वी घराच्या दुरुस्तीपासून शेतीच्या मशागतीची कामे शेतकरी करतात. तशीच तयारी मुंग्याही करीत असतात. मान्सूनच्या आगमनाआधी महिनाभर पावसाळ्यात लागणाऱ्या अन्नाची तरतूद शिस्तबद्ध पद्धतीने करणाऱ्या मुंग्या हेही मान्सून जवळ येतोय याची वर्दी देतात.
काजवे : मान्सून काळ अनेक पक्षी, प्राणी, कीटकांचा प्रजननाचा काळ असतो. अशा काळात आपल्या जोडीदाराला आकर्षति करण्यासाठी प्रत्येक जण खटाटोप करतो. असाच एक खटाटोप म्हणजे काजव्यांचा लखलखाट. उन्हाळ्यात सूर्यास्तानंतर काजवे चमकू लागले की पावसाळा जवळ आला आहे याची खात्री पटते.
समुद्रकिनाऱ्याची वाळू मान्सूनच्या आगमनासोबत समुद्राला एकाएकी उधाण येते. असा उसळलेला समुद्र किनाऱ्यावर गाळ वाहून आणतो. किनाऱ्यावरची सोनेरी वाळू त्या गाळामुळे काळपट झाली की मान्सून आल्याचे दक्षिण भारतात मानले जाते.
मृगाचा किडा : लाल रंगाच्या वेल्वेटसारखा दिसणारा मृगाचा किडा हा मान्सूनच्या पहिल्या पावसाला बाहेर पडतो. मृग नक्षत्रातील पावसात दिसणारा हा मृगाचा किडाही मान्सून दाखल झाल्याचे सूचित करतो.
इतर पक्षी : मोर आणि कोकिळेचे आवाज, कावळ्याची घरटे बांधण्याची लगबग, मलबार व्हिसिलग थ्रश या पक्ष्याची संगीतमय शीळ यांच्याद्वारे मान्सूनचे वातावरण सूचित होते.
भारत आणि मान्सून यांच्या नात्याचा शोध घेणारा संशोधन प्रकल्प- ‘प्रोजेक्ट मेघदूत’ २०११ मध्ये सुरू झाला. २०११ मध्ये ‘पश्चिम घाटातील जैवविविधता आणि मान्सून’, २०१२ मध्ये ‘मध्य भारतातील जनजीवन आणि मान्सून’ आणि २०१३ मध्ये ‘वायव्य आणि पश्चिम भारतातील समृद्ध इतिहास आणि मान्सून’ अशी सूत्रे घेऊन त्या त्या प्रदेशांचे आणि मान्सूनचे नाते शोधण्याचा प्रयत्न झाला. या अभ्यासदौऱ्यांतून २०१२ मध्ये महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ काव्यातील विज्ञान उलगडले, तर २०१३ मध्ये प्राचीन सरस्वती नदीचे वास्तवही समोर आले. ३०-३५ तरुण अभ्यासकांच्या गटांनी आतापर्यंत देशभरात २५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून मान्सूनचा पाठलाग केला आहे. पश्चिम घाटातील मुसळधार पावसाप्रमाणेच कच्छच्या रणातील वाळवंटी हवामानाचा वेध प्रोजेक्ट मेघदूतने आतापर्यंत घेतला आहे. तीन वर्षांत वीसपेक्षा अधिक जातीजमातींचे शेतकरी, मच्छीमार, आदिवासी यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या मान्सूनबद्दलच्या पारंपरिक ज्ञानाचे संकलन या प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.
पाच वर्षांच्या या संशोधन प्रकल्पाचे यंदा चौथे वर्ष! भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असणाऱ्या ईशान्य भारतातून प्रोजेक्ट मेघदूतची टीम जूनच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मान्सूनचा पाठलाग करणार आहे. जगातील सर्वाधिक पावसाचा विक्रम असणारे ‘चेरापुंजी’, ढगांचे साम्राज्य असणारे मेघालय, भारतातील पहिल्या सूर्यकिरणांचे दर्शन घेणारे अरुणाचल, ब्रह्मपुत्रेच्या विराट पात्राभोवती वसलेले आसाम या प्रदेशांत प्रत्यक्ष जाऊन मान्सूनचे स्वागत प्रोजेक्ट मेघदूतची टीम करणार आहे. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून प्रामुख्याने हा प्रवास असणार आहे. या भागांचे आणि मान्सूनचे एक विशेष नाते आहे. इथला प्रदेश, इथले लोक, इथला निसर्ग, इथली संस्कृती यांचा विकासच मान्सूनच्या सहभागातून झाला आहे. ईशान्य भारताचे आणि मान्सूनचे हेच नाते अभ्यासण्याचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूतच्या यंदाच्या प्रवासातून करण्यात येणार आहे.
एखाद्या वर्षी भारतात इतरत्र पाऊस कमी असला तरी ईशान्य भारतातील पावसाचे आकडे खूपच मोठे असतात. जगातील सर्वाधिक पावसाचा विक्रम असणाऱ्या चेरापुंजीमध्ये १ ऑगस्ट १८६० ते ३१ जुल १८६१ या वर्षभरात तब्बल २६ हजार ४६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मेघालयातील खासी टेकडय़ांमध्येच असणाऱ्या मॉसीनराम येथेही चेरापुंजीप्रमाणेच विक्रमी पावसाची नोंद होते. पावसाच्या प्रचंड प्रमाणाचा येथील भूगोलावर, निसर्गावर, समाजावर, संस्कृतीवर कसा परिणाम झाला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूत यंदा करणार आहे. येथील लोकजीवनात, कलेत, आíथक व्यवहारांत मान्सूनचे स्थान काय हेही या अभ्यासातून तपासले जाणार आहे. प्रचंड पावसामुळे ईशान्य भारतात पश्चिम घाटाप्रमाणेच जैवविविधता बहरली आहे. जगातील मोजक्या बायो डायव्हर्सटिी हॉटस्पॉटमध्ये ईशान्य भारताची गणना होते. या जैवविविधतेच्या जडणघडणीत मान्सूनची काय भूमिका राहिली आहे याचा अभ्यासही यंदाच्या मान्सूनच्या पाठलागातील एक गट करणार आहे.
‘लोकप्रभा’मधून गेली दोन वष्रे प्रोजेक्ट मेघदूतच्या पावसाच्या पाठलागाचे ‘लाइव्ह कव्हरेज’ देण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीही ईशान्य भारतातील मान्सूनच्या पाठलागाची दैनंदिनी- मान्सून डायरी आपल्या भेटीला येत आहे.