आपल्या देशातल्या मान्सूनचा वेध घेणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट यंदाच्या वर्षी इशान्य भारतात ब्रह्मपुत्रेच्या काठाकाठाने फिरणार आहे. उर्वरित देश आणि इशान्येकडचा प्रदेश यात मान्सूनमुळे काय वेगळेपण आहे ते यावेळच्या अभ्यासातून समजून घेता येईल.

‘प्रोजेक्ट मेघदूत’चं हे चौथं र्वष. गेली तीन र्वष भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरून मान्सूनचा अभ्यास ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट करतो आहे. मान्सूनबरोबर येणाऱ्या स्थानिक प्रथा, सणांचा अभ्यास करत, निसर्गात होणारे बदलही हा गट गेली तीन र्वष टिपतो आहे. यावर्षी हा गट पर्यावरण अभ्यासक, हवामान शास्त्रज्ञ आणि काही पत्रकारांबरोबर ईशान्य भारतातला मान्सून अनुभवणार आहे. पण त्याआधी या अभ्यासाची सुरुवात कशी झाली, आणि यंदा ज्याचा अभ्यास केला जाणार आहे त्या ईशान्येकडील मान्सूनबद्दल थोडंसं.
दरवर्षी उन्हाळा संपत आला की चर्चा असते ती मान्सूनची. मान्सून कुठे पोचला, त्याची चाल यावर्षी कशी आहे, यावर तर्क बांधले जातात. शेतकरी आपला पिकांचा विचार करतो, व्यावसायिक पावसाळ्यात होणाऱ्या उलाढालींचा विचार करायला लागतो, आणि सर्वसामान्य माणूस पावसाळ्याबरोबर येणाऱ्या खरेदीचा म्हणजे छत्र्या, रेनकोट आणण्याची तारीख ठरवत असतो. थोडक्यात मान्सून पाऊस हा प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्याचा, घरगुती ते वाहिन्यांवरच्या चर्चाचा अविभाज्य भाग बनलेला असतो. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या मान्सूनचा समग्र अभ्यास मात्र आपल्याकडे उपलब्ध नाही.
‘प्रोजेक्ट मेघदूत’ची सुरुवात
प्रत्येक वर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्यामुळे त्याच्या येण्याचे आणि न येण्याचे विविध परिणाम आपल्याला भारताच्या सर्व भागांमध्ये बघायला मिळतात. नक्की हे परिणाम काय आहेत, आपलं पारंपरिक ज्ञान काय सांगतं हे सर्व बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि मान्सूनच्या विविध पलूंचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी २०११ मध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची सुरुवात झाली.
कालिदासाने शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘मेघदूत’ या काव्याचे साहित्यिक महत्त्व सर्वानाच माहिती आहे. या काव्यात त्याने रेखाटलेल्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन, त्या मेघाचा मार्ग मान्सूनच्या प्रत्यक्षात असणाऱ्या प्रवासाशी मिळताजुळता आहे.
मान्सूनचा वेध घेण्याचा प्रयत्न त्याने स्वत: किंवा तत्कालीन तज्ज्ञांनी त्या काळीदेखील केला होता हे ‘मेघदूत’ या काव्यावरून स्पष्ट होतं. आणि म्हणूनच भारताला जोडणाऱ्या या मान्सूनचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट मेघदूत’ हे नाव देण्यात आलं.
यापूर्वी मान्सूनचा एक समग्र अभ्यास झालेला नाही. शोधनिबंध किंवा मोठमोठय़ा संस्थांनी जे अभ्यास केले आहेत ते तुकडय़ा तुकडय़ांमध्ये असतात. म्हणजे मान्सून होऊन गेल्यावर त्याचा अन्नधान्यावर कसा परिणाम होतो, याचा गेल्या तीन वर्षांचा आढावा किंवा दुष्काळ अथवा पुरामुळे किती नुकसान झालं याची आकडेवारी असती. पण मान्सूनची ही एकत्रित प्रक्रिया आहे, असा कोणी त्याचा अभ्यास केलेला नजरेसमोर येत नाही.
‘चेसिंग..’ ते प्रोजेक्ट मेघदूत
आम्ही आमच्या प्रवासाला ‘चेसिंग द मान्सून’ असं म्हणत असलो तरी ‘मेघदूत’ या शब्दाला एक वेगळा अर्थ होता. कालिदासाच्या ‘मेघदुता’मध्ये कल्पना अशी आहे की, तो ढग एका यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रेयसीकडे चालला आहे. तो एका ठरावीक मार्गाला धरून प्रवास करतो आहे. तो मार्ग मान्सूनशी मिळताजुळता आहे असं काही लोकांनी सांगितलं होतं. आम्ही आमच्या दुसऱ्या वर्षीच्या प्रवासात ते तपासणार होतो. काही माहिती एकत्रित करून आणि मग ती कायमस्वरूपी सगळ्यांसाठी जतन करून ठेवणं हे आमचं काम होतं, त्यामुळे ‘मेघदूत’ हे नाव खूप योग्य वाटलं.
अगदी अशा प्रकारचा नाही, पण मान्सूनचा या प्रकारचा अभ्यास भारतात झाला आहे. हा अभ्यास केला आहे, एका ब्रिटिश पत्रकाराने. अलेक्झांडर फ्रेटर हा एक ब्रिटिश पर्यटक आणि लेखक. त्याने भारतात मान्सूनच्या काळात फिरून पाऊस आणि त्याच्या निमित्ताने त्याला दिसणाऱ्या दृश्यांची टिपणे काढली होती. १९८७ मध्ये फ्रेटर यांनी मान्सूनच्या आधीपासूनच भारतात तळ ठोकला होता. तेव्हा उत्तर-मध्य भारतात कडक उन्हाळ्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती त्यांनी अनुभवली होती. त्यानंतर मान्सूनच्या दक्षिण भारतातल्या आगमनापासून त्याचा उत्तरेकडे पाठलाग केला. या प्रवासामध्ये त्याने विविध लोकांशी बोलून, पावसाचा लोकांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे. आपला सर्व प्रवास त्यांनी पुस्तकरूपी प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाचं नाव ‘चेसिंग द मान्सून’.
पाऊस असताना प्रत्यक्ष बाहेर पडून फिरावं आणि प्रत्यक्ष पाऊस अनुभवावा असाच विचार करून ‘प्रोजेक्ट मेघदूत’ची आखणी होत होती. पण हा प्रयोग प्रत्यक्षात यायला जरा उशीर झाला. मग २०१० मध्ये पहिल्यांदा ‘खगोल विश्व’च्या कॅम्पसमध्ये मान्सून हा विषय अभ्यासायला सुरुवात झाली. मुलांना घेऊन एक टीम सिंहगडावर गेली. पहिले मान्सूनचे वारे कसे येतात हे पाहिलं. तेव्हा या गटाने मनात हे नक्की केलं होतं की, पुढच्या वर्षी आपण नक्की मान्सूनच्या मागावर जायचं.
या सगळ्या प्रवासामध्ये असं एक प्रकर्षांने जाणवलं की, माणसाचा आणि पावसाचा संबंध खूप कमी झाला आहे. माणसं पावसापासून लांब गेली आहेत. एक तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाणी उपलब्ध केलं आहे. मग ते धरणाने असो किंवा बोअरने असो. त्यामुळे आता पडणारा पाऊसच आपण वापरायचा आहे हे बंधन आपल्यावर नाही. ते पावसाचं पाणी कोणीतरी साठवील आणि ते आपल्या घरापर्यंत येईल अशी खात्री आपल्याला आहे. या खात्रीमुळे आपल्या पूर्वजांचा जो पावसाकडे बघायचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. नळाला पाणी नाही आलं तरी आपण टँकर मागवू. भले आपल्याला त्यासाठी जास्त पसे मोजावे लागतील. पण पाणी नक्की मिळेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य, त्यात शहरी पावसाकडे एक नसíगक संसाधन म्हणून पाहात नाहीयेत. त्यामुळे आपण आपलं पाणी साठवावं ही भावना कमी आहे. आणि एक प्रकारे या संसाधनाला गृहीत धरलं जातंय.
‘प्रोजेक्ट मेघदूत’मध्ये येणारा प्रत्येक जण त्याच्यासाठी हा पावसाळा खूप वेगळा होता हेच सांगत असतो. आपण आपल्या घराच्या खिडकीतून अनुभवतो तो पाऊस किंवा अगदी घराच्या गच्चीमधून दिसणारं पावसाचं चित्र म्हणजे छत्री घेऊन जाणारे लोक, हातात चहाचा कप घेऊन पाऊस बघणारे एखादे काका किंवा आपल्या दुचाकीवरून भिजत काढलेली पावसाळी सहल यापलीकडे नाही. पण तुम्ही प्रत्यक्ष, जमिनीवर उभे राहून पाऊस अनुभवता, तेव्हा त्या अनुभवाची तीव्रता खूप असते. म्हणजे कल्पना करा, आपण एखाद्या शेतात आहोत. एकेकी पाऊस पडायला लागला आहे, समोर भात लागवड सुरू आहे. आपण रेनकोट घातला आहे पण तरीही तो काढून संपूर्ण भिजतो आहोत. ही तीव्रता खूप गोष्टी शिकवणारी असते.
गेल्या तीन वर्षांचा प्रवास
तीन वेगवेगळ्या पद्धतीने तीन वेगळ्या भागांमध्ये मान्सूनच्या प्रवासाचा वेध घेत ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा प्रवास सुरू आहे. गेल्या तिन्ही वर्षांमधल्या प्रवासाचा रस्ता वेगळा, अभ्यासाचं स्वरूप वेगळं, उद्देश वेगळा. मात्र या तीनही वर्षांमधल्या प्रवासामागचं सूत्र एकच- भारतातल्या मान्सूनचा शोध. या शोधामध्ये केवळ याचा हवामानशास्त्रीय दृष्टिकोन बघितला गेला नव्हता. तो या सगळ्या अभ्यासाचा उद्देशही नाही. या अभ्यासामधून ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला भारत समजून घ्यायचा होता, भारतातल्या विविध परंपरा, संस्कृती, माणसं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा.. आणि या सगळ्याला जोडणारा एक समान धागा- ‘मान्सून.’
या संपूर्ण भारताला जोडणाऱ्या धाग्याचा अभ्यास करताना तो एकूण पाच टप्प्यांत करायचा असं नियोजन केलं होतं. हे नियोजन पाच वर्षांचं होतं. या नियोजनानुसारच आजपर्यंत ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने आपला प्रत्येक वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या पहिल्या वर्षी हा प्रवास पश्चिम घाटापासून केला. हा पहिल्या वर्षांचा प्रवास २०११ सालच्या जूनच्या पहिल्या आठवडय़ामध्ये केला गेला होता. पहिल्या वर्षीची थीम होती डायव्हर्सटिी. म्हणजेच ‘मान्सून’ची विविध रूपं पाहण्याच्या उद्देशाने या प्रवासाचं नियोजन केलं गेलं होतं. मान्सून जेव्हा पश्चिम घाटात पोहचतो तेव्हा आपल्याला बरीच विविधता पाहायला मिळते. विविधता फक्त पावसाची किंवा निसर्गाची नाही, पण माणसांमध्ये आपल्याला ही विविधता बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या वर्षी या टीमला ही विविधता आणि या विविधतेमुळे होणारे परिणाम हेदेखील पाहायला मिळाले. म्हणजे अगदी काही बदलत्या व्यावसायिक गरजांमुळे बेरोजगार झालेले मच्छीमार दिसले आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या या चार महिन्यांत नवीन तंत्रज्ञान वापरून, मग ते पर्यावरणाला कितीही घातक का असेनात, तर ते तंत्रज्ञान वापरून कोटय़ाधीश झालेले मच्छीमारही बघायला मिळाले. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी बांधून ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट काही नव्या अभ्यासकां-बरोबर दुसऱ्या वर्षीच्या मान्सूनचा वेध घ्यायला सज्ज झाला होता.
दुसरं वर्ष सुरू झालं २०१२ च्या जून महिन्यामध्ये. यावर्षी मध्यभारतातून मान्सूनचा पाठलाग करायचा असं नियोजन होतं. यावर्षी फक्त मध्य प्रदेश हे राज्य घेतलं होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भापासून ते बुंदेलखंडपर्यंत असा प्रवास योजला होता. मध्य भारतामध्ये मुख्यत: दोन भागांमधले नर्ऋत्य मोसमी वारे एकत्र येतात. साधारण मध्य प्रदेशाच्या मध्यात, अरबी समुद्राकडून येणारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे दोन्ही एकत्र येतात. त्यामुळे या भागामध्ये पाऊस नेमका कोणत्या वाऱ्यांमुळे आहे ते कळत नसतं. हा सगळा प्रदेश ऐतिहासिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा मानला जातो. अगदी इथे काही प्राचीन राजवटी होऊन गेल्या म्हणून आणि शेतीच्या दृष्टीनेही या भागाचं महत्त्व फार आहे. या भागातही आपल्याला बरीच भौगोलिक विविधता पाहायला मिळते. टेकडय़ांबरोबरच इथे बरीचशी सपाट जमीनही पाहायला मिळते. भौगोलिक विविधतेबरोबरच किंवा म्हणूनच इथे खाद्यपदार्थामध्येही बरीच विविधता पाहायला मिळाली. या सगळ्याच गोष्टींमध्ये पाऊस नेमका कसा काम करतो हे या गटाला पाहायचं होतं. याला धरूनच अजून एक धागा या गटाने पकडला होता आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा ‘मेघदूत’ या काव्याचा. या काव्यामध्ये उल्लेख केलेल्या मार्गावरून जायचं आणि त्या काव्यामागचा अर्थ ओळखायचा असंही काम या गटाने करायचं ठरवलं होतं. कालिदासाच्या या मेघदूत काव्यातल्या ढगाचा प्रवास महाराष्ट्रामधल्या रामटेकपासून सुरू होऊन तो कुरुक्षेत्रापर्यंत जाऊन संपतो. हा सर्व भाग हा मध्यभारतामध्ये येतो. म्हणूनही या मार्गाचा अभ्यास करायचा असं ठरवलं होतं. या दुसऱ्या टप्प्यात मेघदूताचा मार्ग बघता बघता हाच मान्सूनचा मार्ग आहे हे या गटाच्या लक्षात आलं. दुसऱ्या टप्प्यातल्या अभ्यासामध्ये मान्सूनचा आणि मेघदूत या काव्याचा संबंध लावणं आणि त्यानुसार आत्ताच्या परिस्थितीचं विश्लेषण करणं हे खूपच मूलभूत काम ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने केलं.
तिसऱ्या वर्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट पश्चिम भारतात फिरला. हा भाग सगळ्यात कमी पावसाचा प्रदेश आहे. इथे पाऊस सगळ्यात उशिरा पोहचतो आणि कमी काळ राहतो. त्यामुळे अशा प्रदेशामधल्या लोकांची पावसाची पाण्याची गरज, ते काही पाणी वापराच्या वेगळ्या पद्धती पाळतात का, असा सगळा अभ्यास यावर्षी या गटाला करायचा होता. त्याबरोबरच या प्रदेशात काही शे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली सरस्वती नदी, या नदीचाही शोध या गटाने घेतला.
या वर्षी ईशान्य भारतामध्ये
प्रोजेक्टचा आता चौथा सीझन सुरू झाला आहे. गेल्या वर्षी सर्वात कमी पाऊस असणाऱ्या वायव्य भारतातून मान्सूनचा पाठलाग केल्यानंतर यावर्षी त्याच्या थेट विरुद्ध टोकाचा अनुभव ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला मिळण्याची अपेक्षा आहे. प्रोजेक्ट मेघदूतच्या चौथ्या सीझनची सुरुवात १५ जूनपासून झाली. यावर्षीचं लक्ष्य आहे ईशान्य भारत. हा प्रवास १५ जून ते २६ जून या कालावधीत ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून होणार आहे. १५ तारखेला गुवाहाटीमध्ये पोहोचल्यावर गुवाहाटीमधल्या काही पत्रकारांना भेटून ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने आपल्या प्रवासाची सुरवात केली. मेघालयातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांना भेट देऊन गुवाहाटी, काझीरंगा, जोरहाट, माजूली, दिब्रूगढ, तिनसुकिया, रोइंग, धेमाजी, इटानगर, तेझपूर, गुवाहाटी अशी ब्रह्मपुत्रेच्या अरुणाचल, आसाममधील पात्राभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे.
या वर्षी एल निनोच्या पाश्र्वभूमीवर मान्सूनची आतापर्यंतची प्रगती म्हणावी तशी समाधानकारक नाही. पावसाच्या प्रदेशातही पर्जन्यमानाचे आकडे सरासरीखालीच नोंदले जात आहेत. आसामच्या बहुतांश भागात आतापर्यंत पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मेघालय आणि अरुणाचलमध्येही परिस्थिती तशीच आहे. तांत्रिकदृष्टय़ा मान्सून या भागात पोहचला असला तरी पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. चेरापुंजी आणि मॉसिन्राम या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांचा समावेश असणाऱ्या पूर्व खासी हिल्समध्येही पाऊस सरासरीपेक्षा ४२ टक्के कमी झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आसाम, मेघालयमध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
Migratory birds started arriving in Gondia district due to increasing cold in European countries
नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार,पक्षी प्रेमींना पर्वणी

ईशान्य भारताचं वेगळेपण
भारताच्या या भागामधल्या मान्सूनचा अभ्यास करताना या भागाची भौगोलिक स्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे. बंगालच्या उपसागरावरून जाणारे वारे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन इथे येतात. दुसरं म्हणजे वर्षभरामध्ये पश्चिमेकडून येणारे वारेही हिमालयाला आडून इथे वाहत असतात. त्यामुळे वर्षांतला हिवाळा सोडून इतर काळात ईशान्य भारताला पाऊस मिळत असतो. अर्थातच वर्षभरामधला सर्वाधिक पाऊस हा मान्सूनच्या काळात मिळत असतो. याबरोबरच इथला सर्व भाग हा डोंगराळ आहे, त्यामुळे इथेही वारे अडतात आणि पावसाचं प्रमाण वाढतं. अशा दोन-तीन गोष्टी जुळून आल्याने भारताच्या ईशान्य भागात सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक म्हणजे किती, तर वर्षांला ११, १२ हजार ते चौदा हजार मि.मी. पर्यंत पाऊस पडतो. म्हणजे मुंबईच्या तिप्पट.
मागच्या वर्षी वर्षांला ३०० मि. मी. पाऊस पडणाऱ्या भागाचा अभ्यास या गटाने केला होता. त्यामुळे उष्ण वातावरण, कोरडी जमीन अशी स्थिती त्यांना बघायला मिळाली होती. आणि इथे अगदी उलट परिस्थिती असणार आहे. याचा परिणाम इथल्या वनस्पतींवर आणि एकूणच निसर्गावर कसा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. याबरोबरच इथल्या माणसांमध्ये, त्यांच्या व्यवसायांमध्ये पावसाने काय बदल केला आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.
ब्रह्मपुत्रेच्या काठाने
केवळ पंधरा दिवसांमध्ये अख्खा ईशान्य भारत पालथा घालणं शक्य नाही. त्यामुळे या गटाने ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील ठिकाणांचा अभ्यास करायचं ठरवलं आहे. ईशान्य भागामधलं सर्व पाणी वाहून नेणारं पात्र म्हणजे ब्रह्मपुत्रा. हे पात्र इतकं विशाल आहे की, इथे लोक त्याला नदी न म्हणता ‘नद’ असं म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र अतिशय विशाल आहे. पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात इथे पाणी फार जास्त नसतं.
पाण्याचं नियोजन नाही
आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं की, ज्या भागामध्ये पाऊस फार आहे, त्या भागामध्ये पाण्याविषयी, पाण्याचं नियोजन करण्याविषयी अतिशय अनास्था आहे. एवढा अधिक पाऊस पडत असला तरी ईशान्य भारतात पावसाळा संपला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहतो. ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेल्या गुवाहाटी शहरामध्ये तर पाण्याचा प्रश्न बिकट आहे. एवढंच काय तर चेरापुंजी, जिथे भारतातला सर्वात जास्त पाऊस पडतो तिथेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच. कारण एकच- पाण्याचं नियोजन नाही. जशी वस्ती वाढायला लागली तसं पाण्याचं नियोजन केलंच गेलं नाही. पावसाला गृहीत धरलं जातं आहे. इथे पाण्याचं नियोजन केलं तर ते फक्त याच भागाला समृद्ध करणार नाही, तर खाली उत्तर-प्रदेश – बिहारच्या भागामध्ये पाण्याचा उपयोग होईल. त्यामुळे या सर्व भागांत पाणी साठवायचं मोठं आव्हान आहे हे लक्षात येतं आहे.
या नियोजन नसल्याचा परिणाम इथल्या पिकांवर पण झालेला दिसतो. मागच्या वर्षी हरयाणामध्ये असं दिसलं होतं की पाणी अतिशय कमी असताना देखील तिथले शेतकरी भूगर्भातल्या पाण्याचा उपसा करून शेती करत होते आणि भूगर्भातील मौल्यवान पाणी खर्ची घालत होते. इथे आपल्याला विरुद्ध मानसिकता दिसते. इथे पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे आधी साठवायची गरज वाटत नाही आणि पाणीच साठवलं नाही म्हणून हिवाळ्यामध्ये रब्बी पिकं घेतली जात नाहीत.
पुढच्या दिवसांमध्ये हा गट ब्रह्मपुत्रेच्या काठाने प्रवास करत इथल्या स्थानिकांचं या सर्व परिस्थितीवर काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Story img Loader