मेघदूत हे महाकवी कालिदासाचं अद्भुत असं काव्य नेमकं काय आहे हे आपण पाच लेखांकांमधून पाहिलं. काव्य म्हणून मेघदूत महत्त्वाचं, वेगळं, वैशिष्टय़पूर्ण कसं आहे, याविषयी..

‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ या काव्यलक्षणाचा पदोपदी (प्रत्येक पदात) अनुभव घ्यावयाचा असेल तर कालिदासाचे मेघदूत हे १२० श्लोकांचे चिमुकले खंडकाव्य वाचण्याला पर्याय नाही. कवीची सौंदर्यग्राही दृष्टी, सूक्ष्म अवलोकनशक्ती, निसर्ग व मानवाच्या नात्यातले विविध पदर, अचेतन वस्तूंचे मानवीकरण, रसाविष्कार आणि भावाभिव्यक्ती या सर्व निकषांवर मेघदूत शतकानुशतके रसिक मनांवर अधिराज्य गाजवीत आहे. कालातीत टवटवीतपणा हा या भावकाव्याचा गाभा आहे. कुणी एक यक्ष. त्याच्या हातून एक आगळीक घडते. त्याला पत्नीवियोगाचा शाप मिळतो. एवढय़ाच कथानकाला काव्यात्म परिमाण लाभले, एक अनोखे प्रतिभासंपन्न वळण मिळाले आणि पतिपत्नीच्या एकनिष्ठ प्रेमाला वैश्विक कोंदण मिळाले. चाळीसहून अधिक संस्कृत टीका, अनेकानेक भारतीय व पाश्चात्त्य भाषांत अनुवाद, नृत्य, नाटय़, गीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांच्या माध्यमांतून आविष्कार अशा सर्वागीण सहजाभिव्यक्तीने समृद्ध व परिपूर्ण असे हे मेघदूत समीक्षकांनाही ‘मेघे माघे गतं वय:’ म्हणावयास लावते. साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे हे काव्य अंत:करणाला भिडते, बुद्धीबरोबर हृदयस्थ भावनांनाही साद घालते असा सर्वाचा अनुभव आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर, भालचंद्र देशमुख, चिंतामणराव देशमुख, शांताबाई शेळके, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट यांसारख्या सिद्धहस्त लेखकांना या काव्याने मोहिनी घातली ती का आणि आजही मेघदूताच्या वाचनाने, केवळ स्मरणानेही पापण्या ओलावतात ते का हे तपासायला हवे.
कोणत्याही काव्याच्या समीक्षेचे अनेक निकष आहेत. ध्वनी, रस, अलंकार, गुण, रीती, वक्रोक्ती, औचित्य इत्यादी. लावण्यवती स्त्रीचे लावण्य नक्की कशात आहे हे जसे सांगता येत नाही त्याचप्रमाणे मेघदूताची मोहिनी काव्यशास्त्राच्या वरीलपैकी कोणत्या निकषाने पडते ते ठरविता येत नाही, म्हणून या लेखापुरती आनंदमीमांसा करणेच इष्ट. मेघदूतातील नितांतरमणीय निसर्गसौंदर्य, कालिदासाचे मधुस्रवी शब्द, रसस्यन्दी भाषा, शृंगारातील मनोहर विभ्रम आणि उन्नत उदात्त विचार या साऱ्या सरंजामाची ही अजब मोहिनी आहे. काही ठिकाणी हा आनंद ऐंद्रिय, शारीर स्तरावरचा आहे. क्वचित काव्यात्म पातळीवरचा, तर कधी अलौकिक. क्रमाक्रमाने चढत्या भाजणीत हा आनंद रसिक वाचक अनुभवू शकतो.
१) शारीर स्तर : मेघदूताचा आरंभबिंदूच या स्तरापाशी आहे. पहाटे पहाटे प्रियेच्या रेशीममिठीतून स्वदिठी सोडविणे अशक्य झाल्याने कुणी यक्ष प्रमाद करतो आणि त्यामुळेच त्याला एक वर्षांचा असह्य़ विरह सहन करावा लागतो. संपूर्ण मेघदूताला याप्रकारे विप्रलंभ शृंगाराची झालर आहे, जी करुणेच्या आडून सहृदय वाचकाला अनुभूत आनंदाचा भागीदार बनविते. पावसाच्या सरींवर सरी कोसळताहेत, जीवाला एक अनामिक हुरहुर लागतेय आणि या वेळेस जर आलिंगनक्षम व्यक्ती जवळ नसेल तर? सुखी माणसाचे मनही अशा वेळी कातर, हळुवार होते; मग ‘कण्ठोश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे’ विरही यक्षाची काय बरे अवस्था झाली असेल? नभ मेघांनी आक्रमिले असता, धरित्रीच्या हिरव्यागार शालूवर शुभ्रधवल भूच्छत्रे फुलली असता, कुडय़ाच्या व कदंबाच्या फुलांनी गंधित झुळूक वाहत असता आणि मोरांच्या केकांनी आसमंत भरला असता सुखी अथवा दु:खी (सर्व) माणसाचे मन आद्र्र होते, असे विरागी भर्तृहरीसुद्धा लिहितो. धीरोदात्त रामही वर्षांऋतूत सीतेच्या विरहात व्याकुळ झाला व लक्ष्मणास म्हणाला, ‘‘अहं तु हृतदारश्च राज्याच्च महतश्र्च्य़ुत:। नदीकूलमिव क्लिन्नमवसीदामि लक्ष्मण॥’’ पावसाने भल्याभल्यांची भंबेरी उडविली, मग यक्षाचा काय पाड? यक्षयक्षिणी मुळातच प्रणयासक्त युगुल मानले जाते. कुबेराच्या संपन्न नगरीतील हे जीव नित्य मदनाधीन असतात. ते स्फटिकगृहात, मंदाकिनीच्या शीतल तुषारांनी युक्त वायूचा आस्वाद घेत, कल्परुखातळी मधुमधुर रतिसुख अनुभवतात. कटिवस्त्राला हात घातला की त्यांच्या मादक स्त्रिया, केशराच्या चूर्णाने रत्नदीप मालविण्याचा वृथा प्रयत्न करतात, रतिसुखाने आलेल्या ग्लानीचा परिहार चंद्रकांत मण्यातून पाझरणाऱ्या जलबिंदूंनी करतात (उत्तरमेघ. ५-९) अशी शारीर पातळीवरील उद्दीपक वर्णने कालिदास करतो तेव्हा तो निस्संशय शृंगाररसाचा उद्गाता म्हणून रसिकांसमोर येतो.
‘कामार्ता हि प्रकृतिकृपणा चेतनाचेतनेषु’ असे सांगत अचेतनाचे मानवीकरण कालिदास करतो ते अत्यंत मनोरम आहे. अचेतन मेघ आणि जीवनदायिनी नद्या यांच्यावर प्रियकर-प्रेयसीचे रूपक करणे हे संस्कृत साहित्यिकांना नेहमीचे आहे; परंतु कालिदासाचे वैशिष्टय़ त्याच्या मांडणीत आहे, प्रणयातील नजाकतीत आहे. नायिकेचे जे काही प्रकार संस्कृत साहित्यिकांना माहीत आहेत, त्यातील प्राय: सर्व नायिका मेघाच्या प्रेयसीच्या रूपात वाचकाला भेटतात. आम्रकुटाजवळ (अमरकंटक) रेवा (नर्मदा) अवखळ आहे. तिच्या मूळ प्रवाहाला असंख्य जलप्रवाह मिळतात. ती आम्रकुटाच्या चहूबाजूंनी वाहत जाते. आकाशातून भ्रमण करणारा मेघ तिचा हा अवखळपणा कौतुकाने पाहतो. पुढे ती तरुण होते, तिचे पात्र विशाल होते, वन्य हत्तींच्या क्रीडेने, त्यांच्या मदस्रवाने ती गंधित होते तेव्हा मेघ तिचा आस्वाद घेतो. (पूर्वमेघ. १९, २०) एखाद्या जाणत्या प्रियकराने नवोढा मुग्धेला हळूहळू फुलू द्यावे आणि नंतर तिचा उपभोग घ्यावा अशी मखमली प्रीत इथे दिसते.
प्रसिद्ध विदिशा नगरीत गेल्यावर मेघाला भेटते एक अल्लड युवती वेत्रवती. हिच्या प्रवाहातील तरंग म्हणजे जणू तिच्या ताणलेल्या भुवया. ती वरवर मेघाला प्रतिबंध करतेय पण मनातून त्याच्या चुंबनासाठी आसुसली आहे. मेघ तर कामक्रीडेत कुशल, तो तिच्या तीरावर जरा गडगडाट करतो आणि झटक्यात मुखास्वाद घेतो. ‘तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मात्सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि॥ (२५) मल्लीनाथाने यावर भाष्य केले, ‘कामिनीनामधरास्वाद: सुरतादतिरिच्यते।’ प्रत्यक्ष मीलनापेक्षा चुंबन अधिक श्रेष्ठ ठरते.
पुढे मेघाच्या मार्गात येते ती निर्विन्ध्या. ही अनुभवी आहे. प्रेमाचे रंग ढंग ती जाणते, प्रियकराला आकृष्ट करण्याचे विभ्रम तिला ठाऊक आहेत. तिच्या प्रवाहात किलबिलणारी विहंगमाला जणू तिची किणकिणणारी मेखला. तर या मेखलेचा नाद करीत, आवर्तरूपी (नदीतील भोवरा) नाभी दाखवीत ती अडखळत चालते आहे, मेघाला आव्हान देत वाहात आहे जणू एखादी मदालसाच. स्वाभाविकच मेघ हा मोह टाळू शकत नाही. इथे कालिदास जाता जाता एक सुंदर अर्थातरन्यास लिहून जातो. ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’।(पूर्वमेघ.२९) प्रेम व्यक्त करण्याचा स्त्रियांचा मार्ग म्हणजे लाडिक विभ्रम होत. निर्विन्ध्या अडखळतेय कारण तिचा प्रवाह क्षीण झाला आहे, मेघाच्या विरहात ती कृश झाली आहे, विरहाने ती पांढरीफटक (तिच्या तीरावर जीर्ण पाने पडली आहेत) पडली आहे. यक्षाची पत्नी जशी त्याच्या विरहाने दीन झाली आहे, तद्वत निर्विन्ध्या दीन झाली आहे आणि म्हणूनच ती मेघाला आकृष्ट करण्यासाठी धडपडते आहे असे टीकाकार सांगतात.
गंभीरा ही नावाला साजेशी प्रौढा आहे, उदात्तनायिका आहे, शफर नावाच्या रुपेरी मासोळ्यांच्या रूपाने ती मेघाकडे प्रणयकटाक्ष टाकते. नुकताच ग्रीष्म संपल्याने तिचा प्रवाह आटला आहे. कटीवरून सरकलेले जलवस्त्र ती प्रवाहात पडलेल्या बांबूंच्या शाखाहस्तांनी धरून ठेवण्याचा वृथा यत्न करीत आहे तरीही तिचे दोन्ही तट (नितंब) उघडे पडले आहेत, असे असता, ‘ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थ:’ (पूर्वमेघ. ४४) ज्याने रतिसुखाचा आस्वाद घेतला आहे, असा अनुभवी मेघ तिला टाळून पुढे कसा बरे जाईल?
पुढे ब्रह्मावर्तात प्रवेश केल्यानंतर सरस्वती नदी लागते, आणि त्यानंतर गंगा, सुरनदी. मेघाचे नाते यांच्याशीही पती प्रियकराचेच आहे; मात्र आता कालिदासाच्या शैलीत भाषेत निव्वळ वासना, कामना नाही तर परिणत प्रेमाची गाढ तृप्ती जाणवते. सरस्वतीचे पान करून मेघ आंतरिक शुद्धी अनुभवतो (पूर्वमेघ. ५२), तर काळ्याकभिन्न सुरगजाप्रमाणे गंगेवर ओणवे होताना, तिचे स्फटिकासारखे निर्मळ जल पिताना त्याची सावली तिच्या प्रवाहात पडल्याने गंगेचा यमुनेशी अस्थानी संगम तर झाला नाही ना अशी शंका येते. (पूर्वमेघ.५४)
अचेतन मेघ आणि सचेतन स्त्री असाही प्रेमभाव कालिदासाने रंगविला आहे. उज्जयिनीच्या सौंदर्याभिमानी वारांगना चामरनृत्य करून थकतील तेव्हा मेघाने शीतल जलबिंदूंचा जरासा शिडकावा करताच त्या कशा आश्वस्त होतील आणि धन्यवाद देण्याकरिता मेघाकडे काजळभरले दीर्घकटाक्ष टाकतील असे रंजक चित्र कालिदास रेखाटतो. (पूर्वमेघ. ३८) कामिनींच्या या रूपदर्शनाचा लाभ मेघाला अनायास होईल असे सांगून यक्ष त्याला उज्जयिनीला जाण्यासाठी अजून एक कारण देतो. या सर्व प्रकारच्या शारीर स्तरावरच्या आनंदाचे वर्णन करताना कटी, नीवी, अधरास्वाद, चुंबनालिंगनादी कामव्यापारांचे उल्लेखही पदोपदी येतात आणि कालिदासाच्या कामशास्त्राच्या ज्ञानाची ग्वाही देतात.
२) काव्यात्म आनंद : वैदर्भी शैलीत अत्यंत रसाळपणे निसर्गाचे वर्णन करताना कवी हातचे काही राखून ठेवीत नाही अनंतहस्ते कवीने देता दो करांनी किती घ्यावे असा प्रश्न पडतो. काव्याशास्त्रातील रस ध्वनी, गुण अलंकारांनी काय किमया केली आहे ते पाहूया. ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमासृष्टिसानुंवप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श’ (पूर्वमेघ.२) एखाद्या बलाढय़ हत्तीप्रमाणे दिसणारा आषाढातील मेघ (म्हणजेच तो पाण्याने भरलेला काळा मेघ आहे) रामगिरीला, त्याच्या शिखराला धडकतो आहे, ढुशा मारतोय जसा हत्ती किल्ल्याच्या तटबंदीला. मन:चक्षूसमोर कुंचल्याविना केवळ शब्दांनी चित्र उभं करण्याची कालिदासाची हातोटी विलक्षण आहे. या मेघाला अवचित आलेला पाहून विरही यक्षाला त्याचे कौतुक वाटते. अवघ्या सृष्टीची सृजनोत्सुकता पाहून तो व्याकुळ होतो आणि कुडय़ाच्या फुलांची ओंजळ देऊन त्याचे स्वागत करतो. मेघाला आकाशात पाहून प्रोषितभर्तृका (पती दूरदेशी गेलेल्या स्त्रिया) न विंचरलेल्या केसांच्या गालावर आलेल्या चुकार बटा दूर सारून (उद्गृहीतालकान्ता:) मोठय़ा आशेने व विश्वासाने त्याकडे पाहतात आणि मनोमन सुखावतात की पावसाळा सुरू झाला म्हणजे त्यांचे पती प्रियकर परततील. यातील ध्वनी सहृदयसंवेद्य आहे. संपर्काची कोणतीही साधने उपलब्ध नसता, केवळ काळ्या ढगाच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या पथिकवनितांचा निरागसपणा, आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे त्यांचे मन, उचंबळून येणारी प्रेमभावना या सर्व गोष्टी कशा स्वाभाविक वाटतात, आणि यावर कडी केली आहे एका अर्थान्तरन्यासाने. ‘आशाबन्ध: कुसुमसदृशं प्रायशो ङ्ग्नानां सद्य: पाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्धि’ (पूर्वमेघ.९) आशेचा लवचिक तंतू आहे म्हणून विरहातही या स्त्रिया जगतात, अन्यथा त्यांची कुसुमपेलव हृदये कधीच भग्न झाली असती.
काळ्या मेघाच्या जोडीने शुभ्र बलाकमाला विहरते हे दृश्य केवळ सौंदर्यग्राही नाही, तर त्यांच्या पारस्परिक स्नेहाचे द्योतक आहे. राजहंसही मेघासोबत पुन्हा एकदा आपल्या मूळ निवासाप्रत मानसाकडे कूच करतात, प्रवासात एकटे वाटू नये म्हणून सोबत करतात असे कवी लिहितो. अचेतन मेघाला एकदा भाऊ मानले म्हटल्यावर त्याची काळजी घेणे ओघानेच आले नाही का? श्याम कृष्ण रंगीत मोरपिसांनी शोभतो, तद्वत् श्याम मेघ इंद्रधनुष्याच्या रंगांनी. हे इंद्रधनुष्य कोणते तर वारुळातील नागांच्या फण्यावरील मण्यांतून बाहेर पडणाऱ्या किरणांनी तयार झालेले.( पूर्वमेघ १५) कल्पनाविलास कसा आणि किती याला काही सीमा?
आम्रकूट पर्वत नावाला साजेसा काननाम्रांनी (गावठी, वन्य आंबे) भरलेला, त्या पिकलेल्या आंब्यांमुळे त्याचा विस्तार फिकट पिवळसर झाला आहे, त्याच्या उंच शिखरावर हा काळाकुळकुळीत मेघ विसावला आहे, हे दृश्य कालिदासाच्या नजरेला कसे दिसते तर ‘मध्ये श्याम: स्तन इव भुव: शेषविस्तारपाण्डु:’ आम्रकूट जणू धरणीमातेचा उघडा स्तनच होय. मुळात आंब्यांनी किंचित गौर झालेला स्तन आणि स्तनाग्राच्या स्थानी विराजमान झालेला काळा मेघ ही कल्पनाच अद्भुत आहे. स्तन्य पाजल्याने बालकाचे पोषण होते, त्याचप्रमाणे काळ्या मेघातून झरणाऱ्या पाण्याने लोकांचे पोषण होणार आहे हा जीवनदायक संदेशही यातून व्यक्त होतो. ‘उपमा कालिदासस्य’ अशी साधारण मान्यता आहे, परंतु मेघदूतात कल्पनेच्या भरारीने ज्या उत्प्रेक्षा कालिदास रचतो त्या लाजबाब आहेत.
‘सारङ्गास्ते जललवमुच: सूचयिष्यन्ति मार्गम्’ (पूर्वमेघ.२१)
या श्लोकात श्लेषामुळे निर्माण झालेले भिन्न अर्थ खूप मनोहर आहेत. ‘सारङ्गश्चतके भृङ्गे कुरङ्गे च मतङ्गजे’ असे सारंग शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत. ज्याचे अंग चित्रयुक्त आणि मनोहर आहे तो सारंग. म्हणजे मोर अथवा हरीण, सार म्हणजे मधुर गायन करतो तो सारंग म्हणजे भुंगा, सार म्हणजे जल देही अशी याचना करतो तो सारंग म्हणजे चातक पक्षी,(हा अर्थ दुर्गाबाईं भागवतांनी त्यांच्या कदंब या पुस्तकात दिला आहे) सार म्हणजे पाणी, त्याच्या जवळ जातो, रमतो तो सारंग म्हणजे हत्ती असे विविध अर्थ पाहताना मिळणारा काव्यमय आनंद विरळा. कालिदास सामान्यत: अर्थालंकार वापरतो, शब्दालंकार नाही, तरी या ठिकाणी श्लेषजन्य अर्थाची रमणीयता न्यारी आहे.
कैलासाच्या शिखरावर विराजमान काळा मेघ, याचे वर्णन करताना कालिदास कल्पना करतो की मुळात हिमधवल कैलास हा शिवाने तांडवनृत्यप्रसंगी केलेल्या अट्टहासामुळे (मोठय़ा हसण्याने) पांढरा झाला (मल्लीनाथ लिहितो, ‘हासादीनां धावल्यं कविसमयसिद्धम’) आणि त्याच्या टोकावर बसलेला काळा मेघ म्हणजे शंकराच्या नंदीने खेळ करत उकरलेल्या मातीचा जणू गोळाच. (पूर्वमेघ. ६१) आरंभी वप्रक्रीडेचा उल्लेख आला आहे, शिंगांनी अथवा दातांनी उकरण्याची आणि धडक देण्याची सवय हत्ती, बैल, रेडा यांना असते असे मल्लीनाथ म्हणतो.
उत्तरमेघात यक्षाने स्वत:च्या घराचे केलेले वर्णन तर चलच्चित्रासमान आहे. (उत्तरमेघ.१५-२०) कुबेराच्या प्रासादाच्या उत्तरेला, इंद्रचापाप्रमाणे रंगीत मण्यांनी उभारलेली कमान आहे, तीतून आत गेले की यक्षपत्नीने पुत्रवत् ममत्वाने वाढवलेला, फुलांच्या घोसांनी खाली वाकलेला लहानगा मंदार, पाचूच्या पायऱ्यांनी मढलेली, वैदूर्यनालाच्या सुवर्णकमळांनी काठोकाठ भरलेली, हंसांच्या कलरवाने निनादित विहीर, तिच्या तीरावर नीलमण्याने निर्मित, कनकमयकर्दलीच्या कुंपणाने परिवेष्टित क्रीडाशैल (विहाराकरिता निर्मिलेला उंचवटा) मोगरीचा लता मंडप, घराच्या दोहो अंगांना बकुल व रक्त अशोकाचे वृक्ष, त्यांच्या मध्ये पाचूच्या शिलेवर उभी केलेली सुवर्णयष्टी, तीवर नित्यनेमाने येऊन बसणारा आणि यक्षपत्नीच्या टाळीवर, तिच्या कंकणांच्या सुमधुर तालावर नृत्य करणारा मयूर असे हृदयंगम, काहीसे रहस्यमय भासणारे, हवेहवेसे वाटणारे, यक्षाच्या वैभवाचा हेवा वाटेल असे हे त्याच्या घराचे चित्र. वाचक एका विस्मयचकित करणाऱ्या दुनियेतच जातो हे वाचताना.
घर जर इतके सुंदर तर गृहस्वामिनी कशी असेल? कालिदास तिचेही प्रत्ययकारी चित्रण रेखाटतो. (उत्तरमेघ. १५ पासून) संस्कृत साहित्यसृष्टीत स्त्रीवर्णनाला काही तोटा नाही, तरी कालिदासरचित नायिका आदर्शभूत असते. पद्मिनी या प्रकाराची ही यक्षपत्नी सावळी आहे, तिचे दात एकमेकांना चिकटलेले व टोकेरी आहेत, तिचे डोळे चपळ हरिणीसारखे चंचल आहेत अशा तऱ्हेचे शारीरिक वर्णन कालिदास करतोच, पण त्याच्यापुढे जाऊन तिचे भावसौंदर्य रेखाटतो. विरहतप्त युवती पत्नी एकाकी झाली आहे, रडून डोळे सुजले आहेत, गुडघ्यात मान घालून विमनस्क बसली आहे. कधी ती घरातील मैनेशी बोलत असते, कधी यक्षाचे चित्र काढत असते, कधी मांडीवर वीणा घेऊन गीत गाण्याचा प्रयत्न करीत असते, गाताना यक्षाचे नाव घेताच अश्रू झरू लागतात, वीणेच्या तारा छेडल्या जात नाहीत म्हणून वारंवार त्या पुसत असता, गीत विसरून ती उदास होते. शापाचे किती दिवस उरले आहेत हे मोजत राहते. नीज कशी ती तिला माहीत नाही. डोळे आसवांनी भरल्यामुळे निद्रेला जागाच नाही तिथे. यदाकदाचित तिचा डोळा लागला असेल तर तिला उठवू नकोस, असे मेघाला सांगायला यक्ष विसरत नाही. जर तिचा डोळा लागला तर स्वप्नात ती यक्षाला स्वत:च्या मिठीत पाहात असेल, हे मीलन मोडण्याचे पातक मेघ कसे बरे करील?
३) अलौकिक आनंद : उज्जयिनीला पोचल्यावर मेघाने महाकाळाची आराधना करावी, असे त्याला यक्ष सुचवितो. संध्याकाळच्या वेळेस नटराज शिव जेव्हा तांडवनृत्यास आरंभ करेल तेव्हा मेघाने शिवाच्या शरीरास लपेटून राहावे, अशी सूचना. यामागचे इंगित काय, तर गजासुराचा वध केल्यानंतर त्याच्या विनंतीवरून शंकर रक्ताळलेले गजचर्म धारण करतो. हे बीभत्स दृश्य पाहून गौरी नजर वळवते, शिवाकडे पाहत नाही. गजचर्माऐवजी गजासारख्या काळ्या मेघाचे वस्त्र, ज्यावर संध्याकालीन प्रकाश पडल्याने ते किंचित लालसर (रक्ताप्रमाणे) दिसत आहे ते शंकराच्या शरीराभोवती पाहून भवानीला जुगुप्सा वाटणार नाही, उलट ती पुत्राकडे पाहावे असे कौतुकाने मेघाकडे पाहील आणि तिच्या त्या कृतज्ञ दृष्टीने मेघाला स्वजन्म धन्य झाल्यासारखे वाटेल असे कालिदासाला म्हणावयाचे आहे. ‘नृत्तारम्भे हर पशुपतेराद्र्रनागाजिनेच्छां शान्तोद्वेगस्तिमितनयनं दृष्टभक्तिर्भवान्या’॥ (पूर्वमेघ.३९)
कालिदासाची शिवपार्वतीच्या ठिकाणी असलेली अनन्यसाधारण भक्ती एक नितांतरम्य उत्प्रेक्षा होऊन पूर्वमेघाच्या ६३ व्या श्लोकात आपल्यासमोर येते. मेघ हा इंद्राचा कारभारी, म्हणून कामरूप, हवे ते रूप धारण करणारा. त्याने पुष्पमेघ होऊन देवगिरी पर्वतावर जाऊन कार्तिकेयावर फुलांचा अभिषेक करावा असे यक्षाने आधी सुचविले आहेच. (पूर्वमेघ.४६) आता यक्ष त्याला शिवभक्तीने कृतार्थ व्हायला सांगतो. यक्ष मेघाला सांगतो, ‘तू तुझ्या उदरातील जलाच्या साठय़ाचे स्तंभन कर, त्याचा घट्ट बर्फ कर आणि मग दे झोकून स्वत:ला कैलासाच्या उतारावर. शिव-पार्वती तिथे नित्य फिरावयास येतात, आणि सुकुमार गौरीला हिमालयाच्या चढावर चालल्याने श्रम होतात, अगदी सर्पकांकणे काढून ठेवलेला शिवाचा हात धरूनही; तेव्हा तिच्या मार्गावर जर तू स्वत:ला लोटलेस तर उदरातील जलौघाचा बर्फ झाल्याने तुझ्या गोलाकार पर्वाच्या आकाराला पायऱ्या पायऱ्यांच्या जिन्याचे स्वरूप मिळेल आणि गौरीला या पायऱ्या चढणे सोपे जाईल. ‘सोपानत्वं कुरु मणितटारोहणायाग्रयायी।’ किती भावमधुर कल्पना! हे निखळ शब्दचित्र आहे.
रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, कालिदासाच्या सर्व साहित्यात आनंदाच्या या छटा आहेत, आणि शारीर स्तरावरून प्रेमाचे उन्नयनही आहे. क्षणभर हे मानले तर उज्जयिनी या कालिदासाला अत्यंत प्रिय असलेल्या आणि महाकालाचे स्थान असलेल्या नगरीत आल्यानंतर यक्षाची कामासक्ती थोडी क्षीण झाली आणि त्याला दैवी, अलौकिक आनंदाची ओढ लागली असे म्हणावेसे वाटते. टागोरांचा सिद्धांत नाही मानला तरी प्रणयाचा आणि आनंदाचा उत्कर्ष केवळ शारीर सुखोपभोगात नसून त्यागाच्या, समर्पणाच्या एका अनोख्या अतूट तृप्तीत, समाधानात आहे हे उमजते. काळ्या मेघाला हा अलौकिक आनंद लाभला, तो कृतार्थ झाला, स्वार्थ विसरून तो परमार्थी झाला. भारतीय आध्यात्मिकताच एक प्रकारे यातून अभिव्यक्त झाली आहेसे भासते.
संपूर्ण मेघदूत हे काव्य ‘दिव: कान्तिमत् खण्डमेकम्’ (पूर्वमेघ. ३१) स्वर्गलोकीचा झळाळता तुकडा आहे असे काहींचे मत आहे, कारण या काव्याची समृद्धी, वैभव. मला तर वाटते की, हे काव्य ‘हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्ष:’(उत्तरमेघ.१५) आहे. फुलांच्या भाराने वाकलेला वृक्ष, याचे गुच्छ सहजी हाती येतात, प्रत्येक रसिकाला हवी तेवढी फुले सहज मिळू शकतात. मला पावलेली ही रसिकानंददायक शब्दफुले कालिदासाच्याच चरणी समर्पित!