पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा तजेला होता. मातीचा सुवास, झऱ्या-ओढय़ांमधून वाहणाऱ्या पाण्याचा अखंड पण शांत स्वर – हे पावसाळ्याची जाणीव करून देत होतं.

गुरुवारी शहरात पावसाच्या जोरदार सरी पडून गेल्या आणि धनगरवाडीतल्या शंभूनं रविवारीच केलेलं भाकीत आठवलं. ‘डोंगूर जवल आले, आता तीन-चार दिसात येईन पौस’ हे त्याचे शब्द तंतोतंत खरे ठरले होते. शनिवारी एस.टी.ने एका मोठय़ा रानाच्या जवळच्या गावाला येऊन ठेपेपर्यंत एस.टी.तल्या लोकांशी बोलताना कळलं की गेले दोन-तीन दिवस इथेही चांगला पाऊस झालाय.
मित्रांना जंगल आणि प्राणी पाहायचे होते. आता पाहायला मिळणार होतं पावसातलं जंगल आणि जंगलातला पाऊस. गारव्याने माझं मन सुखावलं होतं. आत्ता ढग डोक्यावर नव्हते पण आसमंतावर लवकरच त्यांचं साम्राज्य पसरण्याची चिन्हं होती.
िशदेवाडीला उतरलो. गावापासून तीन-एक मलांवर झोलाईची देवराई. तिथवर पोहोचेपर्यंत बूट चिखलाने माखले होते. भिजायला झालं होतं ते वाऱ्यामुळे पानांवरून पडणाऱ्या पाण्यामुळे. वाटेत अनेक ओहोळ लागले. जिवंत झालेले. गढूळ पाणीवाले. पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे माती, पालापाचोळा असं सगळं भरपूर प्रमाणात वाहून येणार, ओहोळ गढूळ असणार – हे साहजिकच होतं. मागच्या रानात फिरताना पिण्याजोगं पाणी मिळेल की नाही अशी एक शंका उगीचच कुणीतरी विचारूनही झाली. ‘बघू’ इतकं उत्तर पुरेसं होतं.
देवराईतल्या झोलाईला नमस्कार केला आणि ‘भरपूर प्राणी बघायला मिळू दे’ अशी प्रार्थना आमच्या एका मित्राने केली. तेवढय़ात शेकरूने ‘टक टक टक टक’ असा आवाज करत आशीर्वाद दिला. तो नक्की काय होता हे कळायला मार्ग नाही, पण प्रत्येकाने आपापल्या इच्छांप्रमाणे अर्थ लावला. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा तजेला होता. मध्येच उन्हाची तिरीप पर्णछतातल्या पानांवरच्या पाण्याच्या थेंबांवर पडे आणि एखाद्-दोन-चार पानं लकाकून जात. मातीचा सुवास, झऱ्या-ओढय़ांमधून वाहणाऱ्या पाण्याचा अखंड पण शांत स्वर – हे पावसाळ्याची जाणीव करून देत होतं. सकाळची वेळ होती, पक्ष्यांचेही स्वर कानावर पडत होते. पण आज सगळे जण मोठे प्राणी बघायला मिळतील या आशेने जंगलात आल्याने, त्यांना पक्ष्यांकडे बघायला वेळ नव्हता. ते काय सांगताहेत ते ऐकायचं देखील नव्हतं.
राईच्या मागच्या रानात तासभर चालून मग एक चढ चढून वर आलो तो तिथे एक चांगला ओहोळ होता. मागच्या एका कडय़ावरून येणारं पाणी स्वच्छ होतं. ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला’ अशी चर्चा सुरू असतानाच – ‘याला वाघाचं पाणी म्हणतात’ – अशी माहिती दिल्यावर कुणाला तरी ठसका लागलेला जाणवला. पण सगळ्यांनी मनसोक्त पाणी पिऊन घेतलं. जरा आसपास पाहणी करून आलो. जरा उंचावर एका भल्या मोठय़ा झाडावर बेचकी आणि आजूबाजूला चांगल्या दोन-तीन फांद्या होत्या. तिथून ओहोळ स्पष्ट दिसत होता. त्या फांद्यांवर निवांत बसणं शक्य होतं. संध्याकाळपासून तिथे दबा धरून बसू असं ठरलं. तोवर मात्र रानात मनसोक्त हुंदडायचं होतं.
एक-दोन ठिकाणी दगड रचून त्या ओहोळापासून त्या झाडापर्यंत येण्याची वाट कुठून आहे याच्या दगडी खुणा तयार केल्या. लगोरी खेळायला रचतात तशा. मग दिवसभरात कुठे फिरू या, रात्रीचं जेवण संध्याकाळी किती वाजता करायचं? कुठे ? कसं? या सगळ्या चर्चा करून झाल्या आणि भटकायला निघालो. प्राण्यांचा वावर जिकडे असू शकेल अशा दाट जंगलात आज जायला नको, जरा वेगळ्या दिशेने जाऊ – असा विचार एकाने मांडला. आपली चाहूल लागली तर प्राणी संध्याकाळीही पाण्यावर येणार नाहीत असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला होता. त्यावर होकार भरला. जरा भटकून दुसरा एक ओढा शोधून काढला आणि त्याच्या आजूबाजूने डोंगरमाथ्याकडे चढायला लागलो.
आता ढग चांगलेच भरले होते. वारं यायला तयार नव्हतं. डास, चिल्टं किंवा तत्सम काहीतरी सारखं चावत होतं. अगदी चालतानाही. शिवाय उकडत होतं फार. बोलायला बंदी केलेली होती. आजूबाजूला कोणता प्राणी असला तर तो आवाजाने बिचकून निघून जाईल – दिसणार नाही – एवढं एकदा सांगून पुरलं होतं. चमू शिस्तीचा होता, त्यामुळे मी जरा सुखावलो होतो. पुढे एका ओलसर जागेवर एकाला जळू दिसली. पानावर आपली शेपूट रोवून तिची गमतीदार वळवळ सुरू होती. त्याने ते पान उचललं आणि वळू त्याच्या बोटाकडे वळली. मग ते पान त्याने उलटं फिरवलं. तरी तिची वाटचाल परत त्याच्या बोटाकडेच. हा खेळ त्या जळूशी चाललेला असताना, दोन तीन जळवा त्याच्या बुटात शिरून त्यांचं ‘हॉट िड्रक’ प्यायला लागलेल्या होत्या. त्या जळवांवर मीठ टाकायला म्हणून सॅक उघडायची तोवर रिपरिप सुरू झाली आणि बघता बघता धो-धो पाऊस कोसळायला लागला.
आता कुठे आडोशाला थांबलो तरी सतत पायाखाली काय आहे, आणि बुटात जळू-बिळू शिरली तर नाही ना? असेच विचार यायला लागले. जळवा झाडावर वावरतात का? पावसाच्या थेंबांबरोबर अंगावर तर पडणार नाहीत ना? – अशी शंकाही एकाने विचारून झाली. तेव्हा गंमत वाटली, पण खूप हसायला यायला लागलं थोडय़ा वेळाने. कारण पावसाने झोडपून काढल्यामुळे प्रत्येकालाच थंडी वाजायला लागली होती. आणि ओले कपडे अंगावर असताना थंडी वाजायला लागली की हात चोळणं आणि निर्थक विनोद करून जोरजोरात हसणं – याला पर्याय राहात नाही. मग पाऊस थांबायची वाट न पाहता आम्ही चालायला लागलो.
उंच झाडांच्या भल्या थोरल्या बुंध्यांवरून फेसाळत खाली येणारं पाणी, झाडांच्या पानांवरून हळूच जमिनीवर पडणारे थेंब – यांमुळे एक लक्षात आलं की हे पाणी थेट जमिनीवर पडलं तर जमिनीची जितकी झीज करेल, जितकी माती इथून वाहून नेईल, तितकी ते करत नाही. ज्या जमिनीवर हे झाड उभं आहे – तिचं ते स्वत: पाऊस झेलून रक्षण करतं आहे. शिवाय त्याच्या तळाशी उगवलेल्या लहानसहान वनस्पती, गवत, फुलं, बिळं, वारुळं यांचंही आपोआप रक्षण होतं आहे. वाटेवर अनेक दगडांवर किंवा मरून पडलेल्या झाडांच्या बुंध्यांवर उगवलेली शेवाळी, भूछत्र दिसली. आशेचा लहानसा किरण दिसला की आपल्या मनातल्या अनेक इच्छा जशा डोकं वर काढायला लागतात, तसे अनेक वनस्पतींना थोडक्याशा पावसाने अंकुर फुटतात. कितीतरी फळं / बिया यांतून हिरवे कोंब डोकं बाहेर काढतात. हे सारं शांतपणे सुरू असतं. काही जिवांना कंठ फुटतो, पण बहुतेक बाकी सारी सृष्टी मौनातच या साऱ्याचा आनंद घेते.
हे सारं पाहताना, वनाचे श्लोक आठवायला लागले. त्यातलं ‘जलचक्रा’त केलेलं पावसाचं वर्णन आठवलं.
कुठे डोंगरांच्या माथी तुषार
कुठे हत्तिसोंडेसम पुष्ट धार
कुठे पडतसे टणकशी मस्त गार
जाणा परी हे पाणीच सारं !
भिजवून माती चिखला बनविते
वा भूमिपोटी झिरपोनि जाते
कुठे सान धारा मिळती झऱ्यातें
कुठे पाणी गवतातला थेंब होते!
झिरपले जरी का धरणीमध्ये ते
दगडांत भेगा, तयातून वाहते
कुठे सूक्ष्म धारा एकत्र येती
दगडांतुनी काय चोरोनि नेती?
किती क्षार त्यातील किती खनिजे
झिजले जळें अन् मिळाले तयातें !
जळातूनि काही पुढे सरकताती .
तळां राहती, काही वाहोनि जाती
उतारांवरोनी कुठे काही माती
जळाच्या सवे जाई वाहोनि पुढती !
झऱ्यातुनी तीच ओढय़ात येते
पुढे वाहुनी ती सरितेस मिळते
जरा आणखीन काही दिवसांनी इथे आलं तर जमिनीवर पडलेला बराच पालापाचोळा कुजायला लागलेला असेल. पाण्याबरोबर तो वाहून जाईल. त्यातच पडलेल्या बेडूक-सरडय़ा-खेकडय़ांचे अवशेष कुजून, तुटून त्या पाण्याबरोबर वाहायला लागतील. कुठे खडकावरून येणारं पाणी स्वच्छ नितळ दिसलं तरी ते त्या दगडातली काही खनिजं आपल्याबरोबर घेऊन पळत असेल. ती खनिजं पाण्याला थोडीच वापरायची आहेत? पाण्यातले कैक जीव त्यांचा वापर करतील. पुढे ओढय़ा-नद्यांमधून ती योग्य तिथे जाऊन पडतील. किनारे समृद्ध करतील. काही समुद्रांना मिळतील. ठिकठिकाणी खडकावर – प्रवाहाचा जोर नाही पण पाणी आहे – अशा भागात गोगलगायी दिसतील.
संथ गतीने, गुपचूप – संपूर्ण सृष्टीतले सगळे जीव त्यांची त्यांची कामं पार पाडत राहतात. त्यांच्यामुळे चक्रं सुरळीत चालत राहतात.
मध्येच कुठेतरी पडलेलं झाड दिसलं. माणसाच्या दृष्टीने ते धडधाकट असलं तर ‘लाकूड’ अन्यथा ‘एक सडलेली, निरुपयोगी, टाकाऊ’ गोष्ट. आत्ता मुक्त भटकणं चालू आहे. जरा पाच मिनिटं थांबून ते पडलेलं झाड पाहिलं तर एकापेक्षा एक आश्चर्ये समोर येतील. त्या ‘मृत’ झाडाच्या बुंध्यावर उगवलेली अनेक प्रकारची शैवालं, नाना प्रकारच्या बुरशा, कुत्र्याच्या छत्र्या – म्हणजे कवकं. ओल्या झालेल्या, विघटन व्हायला लागलेल्या त्या बुंध्याच्या सालींच्या आत असलेल्या अनेक जिवांच्या वस्त्या. हालचाल केल्याशिवाय दिसणार देखील नाहीत इतके लहानसे बेडूक. मेलेल्या किडय़ा-बेडकांची शरीरं तोडून तोडून वाहून नेणारे डोंगळे. मध्येच वाट वाकडी करून एखाद्या अर्धमेल्या मॉथवर तुटून पडणारे किंवा एखाद्या गांडुळाला जिवंत तोडून त्याचे तुकडे नेणारे. त्या बुंध्याला पोखरणारे वाळवीचे किडे. त्यांच्यावर टपून बसलेले कितीएक पक्षी. त्या पक्ष्यांना गिळंकृत करायला, त्याच बुंध्याच्या आसऱ्याला राहिलेला एखादा साप.
कधी झाड थकले झाले आजोबा
फांद्या गळाल्या गेलीच शोभा !
बुंधा रिकामा टोचोनि त्यांते
सुतार, भुंगे घरे कोरती ते
किती वाळवीचे किडे त्यांमध्ये ते
पक्ष्यांस कित्येक ते अन्न होते
कधी ते कडाडून खालीच पडते
त्याच्यावरी मग भूछत्र येते
झऱ्याकाठी असले कधी झाड पडले
लागे बरी ओल ते झाड सडले !
तयाची पुन्हा छान झालीच माती
झऱ्याच्या सवे जाई वाहोन पुढती
चार-पाच तास हे सगळं पाहात िहडताना अनेकदा हे असे ‘वनाचे श्लोक’ आठवले. त्यातली कितीतरी प्रकरणं डोळ्यासमोरून तरळून गेली. एकमेकांशी बोलताना या लहान लहान गोष्टींमधून जंगल आणि पर्यायाने निसर्ग कळत जातो – हे लक्षात यायला लागलं. कोळ्याच्या अनेक ठिकाणी तुटलेल्या जाळ्यातून निसर्गात अन्नजाल का निर्माण झालं हे लक्षात आलंच पण त्या जाळ्यावर पडलेले पाण्याचे थेंब पाहताना त्याची कणखरता आणि त्यातलं सौंदर्य – दोन्ही समोर आलं.
एव्हाना फक्त गवे किंवा बिबटय़ा बघण्याने जंगल बघितलं असं होत नाही- हे सगळ्यांना पुरेपूर कळलं होतं. आत्ता पाऊस झाला आहे, असंख्य झरे वाहताहेत. ओढय़ांना भरभरून पाणी येतंय. तेव्हा आता तुम्हाला पाहायचे असलेले गवे आणि बिबटे – पाण्यावर कशाला रे येणार? हे विचारल्यावर सगळ्यांनाच जाणवलं – की अरे – आपल्या डोक्यात प्रकाश कसा पडला नाही अजूनपर्यंत? मग आता रात्री कुडकुडत झाडाच्या फांद्यांवर जागरण करत बसायला लागायचं नाही, असं सगळ्यांनी स्वत:चं समाधान करून घेतलं.
आता भूक लागली होती. आडोसा कुठे आहे ते शोधून सोबत आणलेल्या पूर्णब्रह्माची पूजा करावी असा सूर लागायला लागला. मग एकाने झोलाईच्या देवळात बसून खाऊ अशी कल्पना काढली. ‘गाढवा, देवराईत जाऊन काही खायचं नाही. आत काही न्यायचं नाही, काही बाहेर आणायचं नाही. तिकडे बसून खाऊ काय?’ असं म्हणून त्याला वेडय़ात काढलं. भटकायला बाहेर पडल्यावर कुणाच्या तरी खोडय़ा काढल्याशिवाय किंवा कुणाला तरी ‘चावल्या’शिवाय आम्हा भटक्यांना चनच पडत नाही. आता पाऊस थांबला होता. उघडीप आहे तोवर जरा मोकळ्यावर जाऊन पट्कन खाऊन घ्यावं असं ठरलं. खाणं झालं. परत थोडी पायपीट केली. मग पुन्हा दाट झाडीत घुसलो. देवराईत. देवळातच मुक्काम करावा का – यावर थोडा खल झाला. देऊळ काही पूर्ण बांधलेलं, बंदिस्त नव्हतं. पावसाचा, जनावरांचा सामना करायला लागला असताच. शिवाय परत चूल पेटवून खिचडी , चहा वगरे करता आलं नसतं. शेवटी िशदेवाडीत जाऊन राहण्याचं ठरलं.
तेवढय़ात पुन्हा पावसाची जोरदार सर आलीच. उद्या परत जंगलात येऊन फिरू असा विचार करून, पावसाने पानांवर धरलेल्या तालावर, चिंब भिजलेले आम्ही, डोळे आणि कान उघडे ठेवून, अमुक दिसावं अशी अपेक्षा न करता परतत होतो, तेव्हा सावध झालेले तीन गवे शेजारच्या झाडीतून आम्हाला पाहात होते.

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच
Mumbai felt hotter on Wednesday due to humidity despite
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त
Story img Loader