डोंगरभटकंतीसाठी निमित्त शोधणाऱ्यांसाठी पावसाचा काळ म्हणजे तर सृजनाच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठीचं आमंत्रणच..
पाऊसभरल्या आकाशातल्या मेघरूपातल्या घटांना वाऱ्याने गदागदा हलवले आणि विजांनी कडाका काढला की सरी सांडायला वेळ लागत नाही. आकाशातल्या मुळाक्षरांना ढगांच्या वेलांटय़ा आणि विजांच्या मात्रा लगडल्या की वाऱ्याच्या हुंकारासंगे रानारानात, पानापानांत आणि मनामनांत पावसाचे काव्य रुणझुणते. अशा वेळी डोंगर भटक्यांना सभोवतालचे हिरवे रान खुणावू लागते. पहिल्या पावसातला रस्त्यावरचा चिकचिकाट, ट्रॅफिकचा खोळंबा, नेमका घरी येताना होणारा वैताग असले सगळे शहरी नखरे झाले की एसी आणि पीसीच्या युगातल्या भटक्यांना आडरानातले गडकिल्ले, आडोशाच्या गुहा, कपारी, चिखलणी होऊन लावणीला तयार झालेली भातखाचरे, सुपरसॉनिक वारा कधी एकदाचा अनुभवतो असे होते.
मग एकदा असाच सगळी जगरहाटीची ओझी झुगारून देऊन भटक्या एखाद्या वीकेंडला ट्रेकला सज्ज होतो. पाठीवरच्या सॅकमध्ये एकात एक दोन प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये कोरडय़ा कपडय़ांचा सेट, खाऊचं सामान, रात्रीच्या स्वयंपाकाचा शिधा, आवर्जून घेतलेलं पापडाचं पाकीट, रेडिमेड सूप सॅशे, काही भांडी, मित्राच्या मित्राकडून उसना आणलेला स्टोव्ह असं सगळं पाठुंगळी मारून एसटी स्टँडवर खुणेच्या जागी शुक्रवारी रात्री हजर होतो. मनात कित्येक ‘टु डू’जची लिस्ट असते, फोन बिल भरायची वेळ आलेली असते, आयटी रिटर्न पेंडिंग असतं, प्रोजेक्ट डिलिव्हरीजचं शेडय़ूल कायमच टाइट असतं, बॉस डोक्यावर बसलेला असतो. पण आता कानात वारा शिरलाय, मागे हटणे नाही. शेवटी पावसात भिजत ट्रेक करूनच हे सगळं सहन करायला आणि तडीस न्यायला ऊर्जा मिळणार असते. ठरलेले भिडू हजर होतात, ओळख नसलेल्यांची ओळख होते, मध्यरात्रीची गाडीची वेळ होते आणि तिकीट काढून खिडकीच्या फटीतून येणारा गार वारा आणि पावसाचे चुकार थेंब अंगावर घेत घेत स्वप्नांच्या दुनियेत हळूहळू एकेक जण हरवून जातो. रस्त्यात कित्येक धक्के खात खात गाडी तालुक्याच्या गावी पोचते तेव्हा घडय़ाळात पहाटेचे अडीच-तीनच वाजलेले असतात. पायथ्याच्या गावाला जाणारी पहिली एसटी सकाळी सहाला. मग तिथेच स्टँडवर मच्छरांना हटवत काढलेल्या डुलक्या.
पहाटेच स्टँडला जाग येते ते वाढलेल्या गाडय़ांच्या वर्दळीने आणि कॅन्टीनमधल्या कामगारांच्या खाकरण्याने. पेपरवाले, सामूहिक दंतमंजन करणारे १५-२० बिहारी मजुरांचे टोळके सकाळ झाल्याची खात्री करून देतात. मग डोळे चोळीत उठायचे आणि तिकडे जाऊन चूळ भरून गरमागरम चहा मारायचा. एव्हाना आपली एसटी आलेली असते आणि आपले सगळे भिडू आपापल्या बोजक्यांसहित स्वत:ला गाडीत उचलून फेकतात. गावाबाहेर पडलेली एसटी जशी मोकळ्या रस्त्याला लागते तसा सृष्टीने या पावसाळ्यात ल्यालेली नवलाई समोर दिसू लागते. रिमझिम पाऊस, थंड वारा, छत्र्यांच्या आणि इरल्याच्या आडोशाने चाललेली शाळकरी मुले, त्यांचा उत्साह नजरेत भरतो. रस्त्यातल्या गावांच्या मुख्य चौकांत डेअरीला दूध घालायला सायकलवर आलेले गावकरी गाडीची वाट पाहात गप्पा मारत बसलेले असतात. हिरव्या शेतांमधून वळणावळणांच्या रस्त्यावरून आपला हा लालडबा धावू लागतो आणि एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. उसाची शिवारं जाऊन दिसू लागलेली भातखाचरं आणि वाढलेली डोंगरांची उंची म्हणजे आपण सह्यद्रीत पोहोचल्याची खात्री असते.
हवेतला गारठा, आकाशी कुंद ढग, रिमझिम पावसाच्या सरी अशा टिपिकल पावसाळी वातावरणात गाडी नाना प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांनी भरून जाते. एक ग्रामीण महाराष्ट्राचे मिनिएचर रूपच तिथे अवतरलेले असते. शाळेला जाणारी खाकी चड्डीतली पोरं, आठवडे बाजारला निघालेली माय, तालुक्याच्या गावी कामानिमित्त निघालेला गडी, नातवाला भेटायला निघालेली म्हातारा-म्हातारी अशा एक ना अनेक रूपांत माणूसपण सामोरे येत असते. पायथ्याचे गाव आले की आपापल्या सॅक्स पाठुंगळी मारून गर्दीच्या धक्क्यांमधून कसेबसे आपले मुटकुळे खाली घ्यायचे आणि पावसाचा पहिला शिडकावा डायरेक्ट अंगावर झेलायचा. यासाठीच तर आपण इथवर आलो, पावसात चिंब भिजायला. एक शहारा अंगावरून सर्रकन फिरून जातो. शहरातल्या पावसापेक्षा हा पाऊस किती वेगळा. अगदी भारून टाकणारा. चोहोबाजूंनी उठावलेल्या डोंगररांगा, त्यावरून खाली झेपावणारे चंदेरी जलप्रपात, अंगाखांद्यावर खेळणारे कापशी ढग, खाली समोर हिरवे कार्पेट. चिखलणी करून तयार केलेली खाचरे, लावणीच्या प्रतीक्षेतली भातरोपं, किती पाहू अन् किती नको. गावात पोहोचेपर्यंत पाऊस चिंब करून टाकतो. ओलेत्या अंगानेच गावाबाहेर शिवाराच्या वाटेवर एका खोपटात टेकायचं. जास्तीचं सामान तिथेच सोडायचं आणि गरजेपुरत्या वस्तू बांधून, बिनदुधाचा कोरा वाफाळता चहा घेऊन तरतरी आली की सोबतीला एखादा गावातला सडा गडी घ्यायचा आणि त्याच्याशी पाऊसपाण्याच्या गप्पा करत रिमझिम पावसातच गडाची वाट चालू लागायची. सभोवतालची खाचरं पाण्यानं तुडुंब भरलेली, त्या पाण्याला कुठून कुठून बांध फोडून वाट करून दिलेली. भातरोपे काढणीला आलेली. काही ठिकाणी रोपे काढणारे भलरी दादा. त्यांना रामराम घालत बांधांवरून उडय़ा मारत पुढे निघायचे. पायथ्याची एखादी नदी, ओढे, गुडघा-गुडघा पाण्यातून एकमेकांचे हात धरून धडधडत्या हृदयाने ओलांडायचे आणि चढाला लागायचं. पहिली धाप लागलेली असते, नशिबाने पावसामुळे घामापासून सुटका असते. थोडाफार दम टाकत पहिल्या पठारावर जरा टेकायचं. भिजलेला ब्रेड-बटर, ब्रेड-चटणी पोटात ढकलायची आणि पुढली वाट चालू लागायची.
अध्र्याहून दिवस अर्धा संपतो तसा मुक्कामाची गुहा आलेली असते. खूप सारा निवांत वेळ शिल्लक असतो. इंग्रजीत “ेी ३्रेी” म्हणतात तो हाच. खास ‘स्व’ला शोधण्याची ही वेळ. ओले कपडे बदलून ठेवणीतल्या कोरडय़ा कपडय़ांची पिशवी बाहेर येते. ओलसर गुहेतही त्यातल्या त्यात कोरडी जागा बघून पथारी टाकली जाते. ट्रेकच्या गप्पा सुरू होतात. त्यासोबत खास आठवणीने आणलेले आले ठेचून चहाच्या आधणात टाकले जाते. दूधपावडर वगैरे टाकून फर्मास चहा बनतो. टपरीच्या कटिंगची सवय असली तरी हा आजचा चहा मात्र फुल्ल ग्लासभर हवा असतो. गरम ग्लासने हात शेकत चांगला अर्धा पाऊण तास सोबत्यांच्या गप्पांचा फड रंगतो. तोवर बाहेर अनपेक्षितपणे पाऊस थांबलेला, आकाश निवळलेले, थोडेफार धुकटं हटून आसपासच्या परिसराचे भान यायला लागते. अशाच निवळलेल्या वातावरणात कायमच ओळखीच्या असलेल्या गडाची फेरी करून घ्यायची आणि अंधारायच्या आत पुन्हा गुहेत परतायचे. वाटाडय़ाने कुठूनशी कोरडी लाकडे आणलेली असतात. शेकोटीच्या धुरासोबत पुन्हा गप्पा रंगतात, त्यातच एखाद-दुसरा पापड भाजून त्यासोबतच केलेल्या सूपच्या वाडग्यासोबत एंजॉय करायचा. रात्र पडते तसा वाटाडय़ा पुन्हा बाहेर पावसात जाऊन बॅटरीच्या प्रकाशात कुठूनसे काही खेकडे पकडून आणतो. व्हेज पब्लिकसाठी फक्त बटाटा खिचडी आणि बाकी पाप्यांसाठी खेकडय़ाचा रस्सा असा फर्मास बेत शिजतो. वाफाळती खिचडी आणि सोबतचा रस्सा तंद्री लावून टाकण्यास पुरेसा असतो.
रात्री सगळी आवराआवर होऊन उबदार स्लीपिंग बॅगच्या आडून पुन्हा गप्पा रंगतात. अरे, अमुक अमुक ट्रेक कसला खतरी आहे, अरे त्या तमक्या गुहा पाहिल्यास का, अरे आपली अमुक अमुक घाटवाट राहिली आहे, अरे इतिहासात अमके अमके काही संदर्भ आहेत, तमुक तमुक हेमाडपंथी मंदिर फार सुंदर आहे.. एक ना अनेक विषय. बाहेर पावसाने आता जोर धरलेला असतो, बेडकांची गाणी सुरू झालेली. अशातच झोप लागून जाते आणि पुन्हा इहलोकातल्या स्वप्नांच्या दुनियेतून आपण भासमान स्वप्नांच्या दुनियेत शिरतो. पहाटवाऱ्यात गारठय़ाने झोप चाळवते, बाहेर पावसाची रिपरिप चालूच, मनात एक ना अनेक विचार, काही आयुष्यातल्या भरारीची स्वप्ने, त्या सगळ्यांसाठी बांधून घेतलेल्या ऊर्जेच्या अस्तित्वाची जाणीव.. आणि त्या सर्वाना सामावून घेऊन पावसातही स्थितप्रज्ञ असा सह्यद्री.. हा अनुभवच फार सुंदर असतो. अगदी कायम हवाहवासा वाटणारा.
उजाडते तसे सकाळचा पुन्हा एक चहाचा राऊंड होतो, नाश्त्याला कोरडा खाऊ पुरतो, आवराआवर होते आणि उतरणीला लागतो. दुपार होईतो पायथ्याला पोचतो. मग पुन्हा वाटाडय़ाच्या खोपटावर ओले कपडे बदलून पिठलंभात ओरपायचा. त्याच्या पोराबाळांना खाऊ आणि आणलेली वह्य-पुस्तकं-पेन्सिली देऊन टाकायची, त्यांच्या डोळ्यांतली चमक बघून दोन दिवसांत कमावलेल्या ऊर्जेला इग्नाईट केलं की आपण पुन्हा जगरहाटीची आव्हानं नव्याने स्वीकारण्यास तयार! मग परतीच्या एसटीत बसलो तरी मन मात्र मागेच रेंगाळत राहातं.. त्या पठारावर फिरतं, त्या गुहेत विसावतं, धबधब्यांसवे कडय़ावरून झेपावतं, ढगांसारखं डोंगरांवरून फिरून येतं, खोपटातल्या पोरांसोबत हुंदडतं आणि त्यांच्या डोळ्यांसारखं निरागस होतं. मग त्याला चिकटलेली अनेक व्यावहारिकतेची जळमटं निघून गेलेली असतात. पुढल्या ट्रेकपर्यंत शहरी जगण्याला नक्कीच एक नवा अर्थ गवसलेला असतो.
छायाचित्र : प्रीती पटेल