पावसात चिंब भिजून नायकासोबत रोमँटिक गाणारी खूबसूरत नायिका प्रियांका चोप्राने अनेक चित्रपटांमधून रंगवली आहे. पण, म्हणून तिला पाऊस आवडतो हे समजल्यावर तिलाही पावसाळ्यातला रोमान्स, प्रणय खुलवत असणार असा निष्कर्ष आपण काढणार असू तर तो साफ चुकीचा ठरेल. पंजाबमधून मुंबईत स्थिरावलेल्या आणि मुंबईतून साऱ्या जगभर फिरणाऱ्या प्रियांकाला पाऊस आवडतो तो मुंबईचाच..
मला पावसाळा आवडतो. विशेषत: मुंबईतला पाऊस मला खूप खूप आवडतो. मला माहिती आहे..मुंबईतला पाऊस असा आहे ना की त्याच्यात भिजण्याचा आनंद तुमच्या मनाला शिवत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीच्या नको नको त्या गोष्टी आठवायला लागतात. पावसात खूप चिकचिकाट असतो. भरपूर अडचणी असतात. सगळीकडे चिखल, पाणी तुंबणं वगैर वगैरे हे इथे पहिले आठवणं अगदी साहजिक आहे. पण मला इथलं पावसातलं वातावरण आवडतं. पावसाला सुरुवात झाली की घरातली सगळ्यात महत्त्वाची आणि आवडती जागा असते ती म्हणजे खिडकी. त्या खिडकीत बसून जेव्हा वर आकाशात मी ते मोठे काळे ढग बघते तेव्हा मला खूप आनंद होतो. काळ्या ढगांची रांगच्या रांग फिरत फिरत आकाशात जमा होणं, त्यांचा तो आपापसात भांडल्यासारखा येणारा घुमड घुमड आवाज असतो तो ऐकायला मला खूप आवडतो. ते सगळंच इतकं छान आणि वेगळं असतं.
मला मुळातच पाऊस आवडतो. त्यामुळे पावसाळ्याबरोबर म्हणून येणाऱ्या शहरातल्या बाकी सगळ्या वाईट गोष्टी माझ्या खिजगणतीतच येत नाहीत. पावसात आणि केवळ पावसात म्हणून करायच्या अशा माझ्या कित्येक गोष्टी असतात. जेव्हा केव्हा बाहेर सुंदर पावसाच्या धारा बरसत असतात ना तेव्हा मला गरम गरम सूप प्यायला खूप आवडतं. पुन्हा एकदा तसंच खिडकीत गरम गरम सुपाचं बाऊल घेऊन बसायचं आणि एक एक गरम गरम घोट घशाखाली उतरवत बाहेरच्या पावसातल्या थंडीचा अनुभव घ्यायचा. मग आपल्या मित्र-मैत्रिणींना जमवायचं, त्यांना एकत्र घेऊन मस्त एका छानशा उबदार खोलीत बसून गप्पा मारायच्या. बाहेर अगदी धो-धो पाऊस पडत असेल ना तेव्हा त्यांच्याबरोबर नाहीतर घरच्यांबरोबर त्याच वेळी होम थिएटरवर चित्रपट बघायलाही मला जाम मजा येते. फक्त माझी अट एकच असते.. त्यावेळीही खिडक्या उघडय़ा असल्या पाहिजेत. चित्रपट बघतानाही बाहेरच्या पावसाचा टिपटिप आवाज मला घरात ऐकायला आलाच पाहिजे, असे सगळे माझे खास पावसाळ्यातले उद्योग असतात.
आणखी एक गोष्ट जी मला फक्त पावसातच करायला आवडते किंवा पावसात मला माझ्याशी जोडून घेणारे असे ते खास क्षण असतात.. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल. पावसात मला पोहायला खूप आवडतं. स्विमिंग पूल किंवा निळ्याशार अथांग समुद्रात पोहायला मला खूप आवडतं. निळ्या आकाशातून बरसणाऱ्या धारा आणि खाली अथांग पसरलेल्या निळ्या समुद्रातून पोहतानाचा अनुभवच माझ्यासाठी फार वेगळा असतो. माझे स्वत:चे स्वत:साठीचे असे जे खास क्षण आहेत त्यातला हा एक क्षण असतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर मी कुठेही असेन. पाऊस पडायला सुरुवात झाली की हा खास क्षण अनुभवणं मी कधीच विसरत नाही. आणि मुंबईतच नव्हे मी जिथे असेन तिथे पावसाचा क्षण, पावसातला आनंद अनुभवण्यासाठी मी अक्षरश: आसुसलेली असते.
मी इथल्या पावसाच्या प्रेमात!- हुमाईमा मलिक
(अभिनेत्री, चित्रपट- राजा नटवरलाल)
मुंबईतला पाऊस मला खूप आवडतो. इथला पाऊस खूप रोमँटिक आहे. पावसाची गंमत ती त्याचीच असते. ती त्या निसर्गाशिवाय कोणीच आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसात मुंबई गाठायची म्हटल्यावरच मला पावसाची स्वप्नं पडायला लागतात. यावर्षी इथे आल्यापासून मी पाऊस अनुभवते आहे. पावसाचे एक गाणंही आम्ही ‘राजा नटवरलाल’साठी शूट केलं. अगदी संपूर्ण गाणं त्या पावसात चित्रित झालं आहे. काय सांगू मी माझे तर पावसाचे सगळे ‘शौक’ या एकाच पावसात पूर्ण झाल्यासारखे वाटत आहेत. पाकिस्तानातही पाऊस पडतो, पण मला नेहमीच मुंबईतला पाऊस आवडतो. तिथेही ढग गडगडतात, पाऊस बरसतो. पण, भारतात पावसाळा जितका मोठा असतो तितका तो पाकिस्तानमध्ये नसतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाला रे झाला की आपण मुंबईत आलं पाहिजे, असं वाटायला सुरुवात होते. कसं आहे ना इथे पावसाला सुरुवात झाली की तो सतत बरसत राहतो. पाकिस्तानमध्ये तो असा थांबून थांबून पडत असतो. पण, एक गोष्ट नक्की की पाकिस्तान खूप स्वच्छ शहर आहे. तिथले रस्ते सुंदर आहेत. त्यामुळे एकदा पाऊस पडायला लागला की रस्त्यांवरून फिरत त्याचा अनुभव घ्यावासा वाटतो. मुंबईत पाऊस पडला की जागोजागी पाणी भरतं, ट्रॅफिकच्या समस्या सुरू होतात.
पण, तरीही मी इथल्या पावसाच्या इतक्या प्रेमात आहे ना की हे सगळं चित्र असं पाटीवरून पुसून टाकावं तसं मी ते मनातून पुसून टाकते. आणि मग माझ्या मनात पाली हिलवरचा पाऊस रुंजी घालायला लागतो. मला तिथला पाऊस खूप आवडतो. आकाशात काळे ढग भरून येतात, वातावरण कुंद होतं आणि तेव्हा पाली हिलवरचं जग एखाद्या खेडेगावासारखं हिरवाई पांघरून बसलेलं असतं. त्या जागी पावसातला तो रोमान्स साद घालतो, मनात घर करून राहतो आणि मग पावलं भर पावसातही आपोआप समुद्राकडे वळतात. मग बांद्रा, जुहू बीच असं समुद्राच्या काठाकाठाने फिरत फिरत पाऊस साठवण्यात माझे दिवस जातात. मी मनापासून सांगते मुंबईतल्या पावसाची तुलना जगात कुठल्याही शहरात पडणाऱ्या पावसाशी होऊ शकत नाही.
हिल स्टेशनची ट्रिप… – दिव्यांका त्रिपाठी
(ये है मोहब्बतें.)
केरळचा पाऊस बघणं, अनुभवणं म्हणजे स्वर्गसुख असं म्हणतात. मी हे स्वर्गसुख अनुभवलंय. मागच्याच वर्षी मी सुट्टी घेऊन केरळला फिरायला गेले होते. तिथे हाऊस बोटचा आनंद घेणं हा एक वेगळा अनुभव असतो. मीही एक दिवस हाऊस बोटवर होते. नेमका तेव्हाच पाऊस पडायला सुरुवात झाली. चहूबाजूंना पाणी, हिरवळ आणि थंडगार वातावरण याचा आनंद काही औरच. पावसाच्या ऋतूत भिजलं नाही तर तो पूर्णच होत नाही असं मला वाटतं. मला मरिन ड्राइव्हवर जायला आणि मनसोक्त भिजायला खूप आवडतं. एखाद्या हिल स्टेशनवर जाऊन पावसाचा आनंद घ्यायलाही मी नेहमी तयार असते. पाऊस सुरू झाला की माझी एक तरी ट्रिप हिल स्टेशनवर ठरलेली असते. या थंडगार वातावरणात गरमागरम चहाची मजा आणखी निराळी.
चतन्याचा ऋतू – अंगद म्हस्कर
(हृदयी प्रीत जागते)
पाऊस चतन्याचा ऋतू आहे असं मला वाटतं. पावसाळा वातावरण तर प्रसन्न करतंच, पण जगण्याचं चक्रही सुरू ठेवतं. पाण्याला जीवन म्हटलं जातं. त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू ठरतो. पाऊस पडला नाही की तिथूनही बोललं जातं आणि खूप कोसळला तरी तिथूनही बोललं जातं. पण तो असायलाच हवा. सगळ्यांसाठीच. प्रत्येक पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा मी ठरवून भिजत असतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी छत्री, रेनकोट वापरायला लागलोय. त्याआधी काही र्वष मी यापकी काहीही वापरत नव्हतो. कॉलेजमध्ये असताना एका वर्षांतला पाऊस मला चांगलाच आठवतोय. ‘सिग्नल’ नावाची एकांकिका करण्याविषयी आमची चर्चा सुरू होती. घाटातल्या रेल्वे सिग्नलवर आधारित ही एकांकिका करायचं ठरलं होतं. त्यासाठी तिथे जाऊन येऊ या म्हणून आम्ही त्याचक्षणी निघालो. कर्जतच्या पुढे घाट लगेच सुरू होतो. बोगदा पार केला की रेल्वे सिग्नलचं केबिन होतं. आम्ही तिथे जाताना व्यवस्थित पोहोचलो, पण येताना त्रास झाला. पाऊस कोसळत होता. त्यात रस्ता नवीन. कसंबसं मार्ग शोधत, तिथे थांबणाऱ्या एका इंजिनमध्ये बसून आम्ही कर्जत स्टेशनला पोहोचलो. नंतर ती एकांकिका काही कारणास्तव झाली नाहीच, पण त्यानिमित्ताने हा अनुभव मला आला.
भुट्टय़ाशिवाय पाऊस अपूर्ण -मनीष पॉल
(झलक दिखला जा)
पाऊस आणि लाँग ड्राइव्ह हे माझं सगळ्यात आवडतं कॉम्बिनेशन आहे. पावसाचं वातावरण जरी झालं तरी मी लगेच गाडी घेतो आणि ड्राइव्हला जातो. तर मग तुफान पावसातली तर गोष्टच वेगळी. या ड्राइव्हला जोड असते ती भुट्टय़ाची. पावसाळा सुरू झाला की मी पहिली गोष्ट कोणती करत असेन तर ती भुट्टा खाण्याची. हे केल्याशिवाय मला पावसाळा सुरू झाल्यासारखाही वाटत नाही आणि पूर्ण झाल्यासारखाही वाटत नाही. मला वाटतं पावसाचा आनंद घ्यावा तो बाल्कनीमध्ये बसून. मस्त एका हातात गरमागरम चहा किंवा कॉफी तर दुसऱ्या हातात भजी आणि समोर कोसळणारा पाऊस. माझ्या बाल्कनीत असं मी तासन्तास बसू शकतो. दुसरं कशाचंच भान राहत नाही. मला वाटतं की असा स्वत:चा वेळ कधीतरी घ्यावा. त्यासाठी पाऊस हे निमित्त नक्कीच असू शकतं.
चहा आणि मित्रांची मैफील – आमिर अली
(एफ आय आर)
मी पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो कारण तो उन्हाळ्याच्या नकोशा वातावरणातून आपली सुटका करतो. तो हवेत थंडावा तर आणतोच, पण मस्त रोमँटिक आणि रिलॅक्स मूड तयार करतो. पावसाळ्यात एक प्रकारचा सुस्तपणा येतो. अशा वेळी मस्त चहाचा कप आणि मित्रांची मैफील जमली की बास, पावसाळ्याचा मस्त मूड तयार होतो.
पावसाळ्यात मला बाइकने लोणावळ्याला जायला आवडते. कधीही कोणताही प्लॅन न बनवता असंच बाईक काढायची आणि निघायला आवडतं. मी एकदा असंच कोणाला न सांगता एक दिवस लोणावळ्याला गेलो होतो. तो माझ्यासाठी पावसाळ्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता.
पावसाळ्याच्या दिवसात मला प्रचंड भूक लागते. त्यामुळे समोसे ते भजीपर्यंत सर्वाचा फडशा पाडतो. शूटिंग असताना मात्र मला लोकेशन जितकं जवळ असेल तितकं चांगलं वाटतं. कारण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आपला अर्धा दिवस निघून जातो.
माझ्यासाठी उत्सवच – जुई गडकरी
(पुढचं पाऊल)
माझ्यासाठी पाऊस म्हणजे उत्सवच असतो. मी मूळची कर्जतची असल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात मी अनेकदा पाऊस अनुभवला आहे. पाऊस रंगात आला की, भावाला मनवायचं, बाईक काढायची आणि लाँग ड्राइव्हला जायचं हा माझा ठरलेला कार्यक्रम. सोबत गरमागरम चहा-कॉफी, भजी असतेच. कॉलेजला असताना ट्रेन्स बंद होणं ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट होती. साधारणपणे पावसाळ्यात जे करायचं नसतं तेच करायला मला फार आवडतं. बाहेरचं खाणं हे तर माझ्या यादीत पहिलं. पाऊस जसं त्याचं सुंदर रूप दाखवतो तसंच रौद्र रूपही दाखवतो हे मी खूप जवळून अनुभवलंय. २६ जुलच्या पावसाच्या दिवशी माझं एक रेकॉìडग होतं. त्यासाठी कॉलेजमधून आम्ही काही जण एकत्र जाणार होतो. उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजच्या आतमध्येच खूप पाणी साचलं होतं. त्यामुळे तिथून बाहेर पडताना जी कसरत करावी लागली आहे ते अजूनही लक्षात आहे. तिथून कसंबसं बाहेर पडले. पण कर्जतला घरी काही जाऊ शकले नाही. उल्हासनगरमध्येच एका मत्रिणीकडे राहिले. जवळपास ४-५ दिवसांनंतर मी माझ्या घरी गेले होते. पावसाचं रौद्र रूप बघितलं असलं तरी त्याची माझ्या मनातली जागा तशीच आहे.
गोवा, पाऊस आणि मी… -ललित प्रभाकर
(जुळून येती रेशीमगाठी)
मी क्वचितच छत्री, रेनकोट किंवा विनचीटर वापरतो. मला मनसोक्त, मनमोकळेपणे भिजणं खूप प्युअर वाटतं. पाऊस नसल्यावर थंडगार वातावरणासाठी आपण महाबळेश्वर, माथेरान अशा ठिकाणी जातो. पण पावसात भिजायला मात्र असं कोणत्याही ठिकाणावर जावं लागतं नाही. आपल्याला हवं तितका वेळ, हवं तेव्हा, हवं तिथे भिजता येतं. तो आपला पावसाशी डायरेक्ट कनेक्ट असतो असं मला नेहमी वाटतं. मागच्या वर्षी ‘तक्षकयाग’ या आमच्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग गोव्यामध्ये होता. प्रयोग झाला की एक दिवस थांबून गोवा फिरायचं असं मी आणि माझ्या मित्राने ठरवलं होतं. प्रचंड पावसात आम्ही तो एक दिवस मस्त एन्जॉय केला. पावसात भिजत मनसोक्त फिरलो. त्यावेळी पाऊस इतका पडत होता की दहा फुटांवरचंही फारसं दिसत नव्हतं. अशात आम्ही बाइकवरून फिरलो. थंडी वाजत होती पण फिरायचं काही आम्ही थांबवलं नाही. मोठमोठय़ाने गाणी म्हणत, फोटो काढत त्या दिवशी खूप धमाल केली. गोवा, त्यात तुफान पाऊस म्हणजे दुधात साखरच.
पाऊस आणि आइसक्रीम
– रुपाली भोसले (बडम्ी दुरसे आये है)
पाऊस म्हणजे सुंदर वातावरण. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पावसाळा आला आणि मी भिजले नाही असे कधीच होत नाही. हल्ली शूटिंगमुळे मला ही संधी मिळत नाही पण असे असले तरी पाऊस जाण्याआधी एकदा तरी पावसात मनसोक्त भिजून घेणार आहे. माझी मैत्रीण मोनिका आणि मी एकत्र पावसात भिजायचा प्रोग्रॅम करतो. मग गेट वे असो किंवा बँड स्टँड असोत, आम्ही भरपूर फिरून घेतो.
लोक पावसाळ्यात भजी पकोडे खातात, पण माझी आवड थोडीशी वेगळी आहे. मला पावसात भिजताना मेवाड आइसक्रीम खायला आवडतं. पावसात भिजताना हातावर येणारे आइस्क्रीमचे ओघळ सांभाळत ते खाण्याची मजाच काही और आहे. या वेळी ‘बडम्े दुरसे आये है’ची शूटिंग करताना सहज म्हणून मी दिग्दर्शकाकडे एकतरी पावसाचा सीन ठेवायचा हट्ट केला आणि त्याने तो मंजूर केला त्यामुळे या वेळी सेटवरच पावसाची मजा घ्यायची संधी आम्हाला मिळाली. नाही तर शूटिंगच्या वेळी बाहेर कोसळणारा पाऊस पाहत हताशपणच हातात असतं.
मुंबई म्हणजे पाऊस – ऋत्विक धंजानी
माझे बालपण दुबईला गेले त्यामुळे मुंबईबाबत मला फारशी माहिती नव्हती. पण योगायोग असा की, दरवर्षी जेव्हा मी सुट्टीमध्ये मुंबईला यायचो तेव्हा, इथे दोन गोष्टी कायम असायच्या. त्या म्हणजे गणपती उत्सव आणि पाऊस. त्यामुळे मुंबई म्हणजे गणपती आणि पाऊस हेच समीकरण माझ्या डोक्यात खूप वर्षे होते. लहानपणापासून भारतातील पाऊस अनुभवायची संधी मला मिळत होती. मला पावसात क्रिकेट खेळायला खूप आवडते. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेदरम्यान माझे आणि आशाचे सूत जुळले आणि मजेची गोष्ट म्हणजे त्या मालिकेत जेव्हा आम्ही भेटायचो किंवा आमच्यावर काही महत्त्वाचा सीन शूट होणार असेल, तेव्हा तो पावसातच होत असे. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही पावसात खूप मजा केली. पण प्रत्यक्षात अजूनही आम्हाला पावसात भिजायची संधी मिळाली नाही. यंदा ती मिळेल अशी आशा करूयात.
पाऊस म्हणजे मस्ती – दीगंगना सूर्यवंशी
(‘वीरा’ एक वीर की अरदास, स्टार प्लस)
पावसाळा हा माझा सर्वात लाडका ऋतू आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मी खूप आनंदी असते. मला स्वत:ला पावसात चिंब भिजायला, बाईकवर फिरायला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस म्हटला की, माझ्या मस्तीला सुरुवात होते. सध्या आम्ही पावसाळ्यात शूटिंगमध्ये व्यस्त आहोत. पण म्हणून पावसाची मजा घेणं बंद नाही केलं. सेटवर मी विशाल, शिवीन, फरनाझ आम्ही सर्वच जण पावसात एकमेकांना भिजवत असतो. आम्हा सर्वानाच पाऊस खूप आवडतो. त्यामुळे सेटवर पाऊस पडायला लागला की आमच्या मस्तीला सुरुवात होते. मला पावसात मित्रांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर जायला खूप आवडतं. तसंच गरमागरम आणि मस्त झणझणीत पदार्थ खायला आवडतात.
माझ्या घरी पाऊसपार्टी – करण कुंद्रा
(‘एम टीव्ही फना’ एम टीव्ही)
पाऊस म्हटला की मी पूर्णपणे वेगळा माणूस होऊन जातो. मला घरात बसून पावसाची मजा घ्यायला आवडते. त्यामुळे पावसाची सुरुवात झाली की मी माझ्या मित्रांना बोलावून घरी पार्टी करतो. मग गरम गरम चहा आणि पकोडे यांचा बेत शिजतो. पावसाळ्यात अमुकच खावे असा माझा काहीच नियम नाही आहे. पण फक्त खात राहावं आणि मित्रांसोबत छान वेळ घालवावा. पावसाळ्यात मी कित्येक तरुणांना बाईकिंग करताना पाहतो, पण मला या दिवसांमध्ये बाईक चालवणे थोडे धोकादायक वाटते. पावसाळ्यातील शूटिंग म्हटलं की, मला माझ्या ‘कितनी मोहोब्बत है’ मालिकेदरम्यानचे दिवस आठवतात. त्या मालिकेसाठी माझ्यात आणि कृतिकामध्ये काही रोमँटिक दृश्ये चित्रित केली होती. त्या वेळी आम्ही दोघांनीसुद्धा पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला होता.