नाशिक
ढगांचे काळेकुट्ट असणे, वाऱ्याने पिसाटणे, विजांचा लखलखता खेळ अधेमध्ये होत राहणे नि त्याने वेडेपिसे होत धुवाधार बरसणे असा एक दिवस जरी त्याने दिला तरी बास..
पाऊस नाशिकवर रुसला. महिना-दीड महिना गडप झाला. कधीतरी मागे त्याने प्रलय केला होता..धुवाधार बरसला होता.. तेव्हा तो नदीकाठी विसावयाचा, वाडय़ावाडय़ात पाण्याचे लोट घेत प्रवेशायचा.. छोटे गल्लीबोळ ही या शहराची ओळख. त्यांचे अस्तित्व जणू नाहीसे करण्याचा त्याने चंग बांधलेला. त्याचे कोसळणे, मातकट होणे, मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीना चिंब करणे.. सरळ साध्या सांडव्यावरून वेगाने धावत बाजारातल्या पावन पवित्र पेठेला, तांब्या-पितळ्याच्या भांडय़ाला सचैल स्नान घालत गंगेकडे रंग बदलत जाताना तो दिसला की गंगाकाठ शाहरायचा. घरं खाली करावी लागणारी ही भावना असायची.. तो मात्र तेथल्या प्रत्येक देवळात शिरणार. नतमस्तक होणार.. पुराणाचा, दंतकथांचा स्पर्श या नदीकाठी तसा तिकडे त्र्यंबकला झालेला.. इतिहास अख्ख्या लेण्यांना कवटाळून बसलेला. त्याला हे माहीत असायचे. म्हणूनच भाविक बनून तो तिथे जाणार, त्यांना भिजवणार हे ठरलेले होतेच.
शहर पसरलेले नव्हते तेव्हा जलधारांचा रुबाब भयचकित करणारा होता. गंगापूरला वर्दी दिली की त्याचे तांडव सुरू. माळरान नि कोरा करकरीत रस्ता.वस्ती तुरळक. त्यांना पाहायला तोवर कोणी कुठे थांबायचे नाहीत. भरगच्च आभाळधारांचे येणे नक्षत्राला धरून.. पंचांगाला साक्षी ठेवून येणार. त्यात सहसा बदल नसायचा. भट भिक्षुकांबरोबर हे ज्योतिषांचे गाव याचे भान त्याला होते. त्यांचे अंदाज सहसा चुकावयाचे नाहीत, ही भीड बाळगत तो यायचा. शाळा सुरू होण्यापूर्वीचे त्याचे आगमन. शहराला त्याची सवय झाली, पण ती लहरीपणाची..म्हणजे स्टेशन जवळ तो सपाटून यायचा. कॉलेजरोडला त्याचा पत्ताही नसायचा. तिथे आपले कडक ऊन नि कोरडेठाक रस्ते. त्यात सुसाट वारा. शरणागती घेत दोनचार झाडे उन्मळून पडलेली, आमच्याकडे नाही, तुमच्याकडे कसा. आता येणार. इकडेदेखील येणार. त्याचे येणे हे असे.
शिडकाव्यांची कोसळधार करणारे. भीज पावसाला प्रपातात नेणारे. पाऊस भेटला तेव्हा वय चिमुकले होते. कागदाच्या होडय़ा, साचलेल्या पाण्यात सोडणारे..आभाळाकडे पाहता त्याला कवेत घेऊ पाहणारे. चाळीवजा अनेक घराघरांत त्याचे पहिले दर्शन म्हणजे सचैल स्नानाचे. रोमारोमांत त्याचा तो ओघळ शुभ्र तर कधी गढूळ वर्षांव अंगभर घेत घामोळ्या जाणाऱ्या विश्वासाने अंगणात बसलेले आम्ही. कळत्या वयात, गोदेला पूर येणार म्हणून जागा पटकावून ठेवणारे, टेकावर, जात श्वास रोखत बसलेले, आमच्यातील कैक. उंचावरून गंगेत उडी ठोकणाऱ्यांकडे चकित होऊन पाहण्याचा नाद तसा अनेकांना लागला. पट्टीचे पोहणारे ही ओळख या कोसळधारांनीच दिली.
शहर विस्तारू लागले. गंगाघाट, घारपुरे घाट. सोमेश्वर, आनंदवल्ली. त्याच्या जलधारांच्या झणत्काराचा रौद्र अवतार पाहायला गर्दी होऊ लागली. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला हा मान सहज मिळाला. काळेसावळे आभाळ. ओथंबून आलेले ढंगांचे कैक पुंजके, चहूबाजूंनी ब्रह्मगिरीला घट्ट विळखा घालून बसायचे. उधाणात हा यायचा. अनावर झालेला, कुठूनही दृष्टीस पडायचा. त्याला फक्त शिवलिंगाच्या सान्निध्यात स्वत:ला सोपवून द्यायचे असावे.. आमचे तर्क चालायचे. तोवर गंध भरभरून घेत एक अघोषित वारी सुरू व्हायची.. अनवणी पायांना त्या ओल्या थंड मातीचा स्पर्श झाला की एकाच वेळेस बेभान व्हायचे..किंवा भानावर यावेसे वाटू लागायचे, ही सारी त्याची किमया.
गेल्या काही वर्षांत मात्र त्याला बाधा झाली. लहरीपणाला बेफिकिरीचा संसर्ग झाला. सरी तर पडण्यासाठी अगदीच नाखूश. डोंगरमाथ्यावरच कातवून बसलेल्या. तेथूनच शहराकडे टाकलेला कटाक्ष. त्यांना कसला राग हेच कळेना. कारखाने वाढले, औद्योगिक वस्त्यांचे पसरलेले जाळे. बांधकामाचे लांबलचक पट्टे शहराला वेढून बसलेले. कदाचित त्याला हे सारे नकोसे झाले असणार. आषाढापूर्वी बेभान उतावीळ होणारा तो फिरकलाच नाही. त्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रार्थना, पूजा, यज्ञ, धरणापाशी संचित होऊन बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली तसा असोशीने तो आला. त्या आभाळस्पर्शी थेंबांनी परिसराला हिरवेकंच केले. पहिल्या पानावर त्याच्या बातम्यांना जागा मिळाली. आपण चर्चेत आहोत. आपले येणे ब्रेकिंग न्यूज होतेच, हे पुन्हा एकदा अनुभवल्यावर खूश होत काही क्षण तो पडलादेखील. त्यानंतर मात्र मुंबईत तळ ठोकायचा ठरवून निघून गेला.
गेल्या कित्येक दिवस काहिलीच्या प्रदेशात आम्हाला ठेवलेल्या पावसाने प्रत्येक रात्र मात्र गारव्याची दिली. इगतपुरी, घोटीत शिरल्याक्षणी मुंबईकरांना जाणवायचा तो थंड शिरशिरी आणणारा रोमांच. पाऊस न येतादेखील त्याची चाहूल सांणगारा स्पर्श. घामट शरीर, मनाला विसावा देणारा पावसापूर्वीचा हा गारवा प्रत्येकाला आवडत होता. पण गोदेला वाट पाहायला लावणाऱ्या त्याची ही धरसोड वृत्ती इथे कोणाला सहन होईल. राग, निराशा नि हताशा. काही दिवसांपूर्वी तो आला.. तसाच उधाणत, आवेशाने, मनमोकळा, आजूबाजूच्या तालुक्यांना दुबार पेरण्याच्या संकटातून वाचवत. बळीराजाला दिलासा देत.. हातचे काही राखणे न जमल्यासारखा तो आला. त्याच्यावर रागवावे की माणूसपणा भिनत चालला त्याच्यात म्हणून हसावे कळेना. तोच रुसवा, तोच हट्ट, जणू त्याच्या वर्षभराचे वेळापत्रक माणसाने ठरवावे. त्याने त्याबरहुकूम वागावे. हे त्याला तरी का पटावे? खरेतर अनेकांची वेळापत्रके त्याने कोलमडून टाकली. वर्षां सहलीसाठी सज्ज झालेल्या कोणालाच तो सापडला नाही. रजा घेऊन धबधब्यातील वर्षांवासाठी आतुर व्हावे तर तिथे नेमकी ओहोळाची एक अस्पष्ट रेघ. शुभ्रता तीच पण त्यात वेगाचे आमंत्रणच नाही, खळखळाटाला किनार रितेपणाची. ओलेत्याचे धुंद गीत घेऊन पाऊस कवितांसाठी मैफल सजवावी तर तिथे तो नाहीच, शब्दाचा पाऊस पाडणाऱ्या साऱ्यांनी एकत्र यावे, आभाळमायेचे ध्यान करावे. घरादाराला घेऊन अस्पर्शित स्थळांना भेट द्यायला जावे ते केवळ त्याच्या आशेने. डोंगरमाथ्यावर तो मुक्कामाला येतोच म्हणून तिथे जावे तर रखरखीत सुळक्यावर पडलेल्या सावल्या मोजत परत यावे अशी स्थिती.
आता दीड महिन्यानंतर तो आला. त्याच्या येण्यात तो उत्साह नाही. श्रावण आलाय म्हणून लंपडाव खेळायला आल्यासारखा. पण तो आला त्यामुळेच झिम्माड झालंय सारे. प्रतीक्षा संपली, ढगांचे काळेकुट असणे, वाऱ्याने पिसाटणे, विजांचा लखलखता खेळ अधेमध्ये होत राहणे नि त्याने वेडेपिसे होत धुवाधार बरसणे असा एक दिवस जरी त्याने दिला तरी बास.. एक मात्र पक्के ठरवलंय त्याला आता बोल लावायचा नाही.. तो उदासलेला नकोय उधाणताच हवाय.