कोकण
कोकणातल्या गावागावाकडचा पावसाळा असा अधीर करणारा असतो. म्हणूनच, मुंबईत काम करणारा चाकरमानी, पावसाळ्याची वर्दी मिळताच गावाकडं धाव घेतो.

वरून सूर्याचे चटके, आणि शेतातून फुटणाऱ्या भाजावळीच्या झळा.. अशा वैशाख वणव्याने तापलेल्या कोकणाच्या निळ्याशार आकाशावर ढगांचे काळे तुकडे साचू लागतात, आणि मृगाच्या चाहुलीने शेतकरी हरखून जातो. काही दिवसांतच, भाताच्या मळीतला एक कोपरा हिरव्या रोपांनी बहरणार असतो. मग पाऊस बरसू लागेल, रोपं तरारतील, शेतात तळं झालं, की वीतभर उंचीच्या रोपांचा तो ताटवा, अवघ्या शेतात झुलू लागेल.. ज्येष्ठातल्या कोवळ्या पावसासोबत खेळत वाढू लागेल, आषाढाच्या सरी अंगावर झेलत पोटरीला येईल, श्रावणाच्या कोवळ्या उन्हासोबत डोलत रोपारोपाच्या पोटरीतून डोकावणाऱ्या दूधभरल्या लोंब्यांचा सुगंध आसमंतात परमळू लागेल, आणि त्या गंधानं बेभानलेला वारा अवघ्या रानावर गिरक्या घेत, श्रावणसरींशी खेळू लागेल.. शेताच्या बांधावरल्या पिवळ्या तिळफुलांची रांगोळी हिरवाईच्या नक्षीला देखणेपण देईल आणि लांब डोंगरांवरून वाहणाऱ्या ओहोळांचं पांढरं फेसाळतं पाणी धबाधबा कोसळत हिरवाईच्या भेटीला आतुरल्यागत धावू लागेल.. घरोघरीच्या लहानमोठय़ा डोळ्यांमध्ये अशा विचारांची पावसाळी कारंजी फेर धरू लागतात..

Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
Health , Mumbai Municipal Corporation ,
प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला
BMC issues stop work notice to 78 sra projects construction sites violating air pollution guidelines
प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक झोपु प्रकल्पांना नोटिसा; उल्लंघन सुरू राहिल्यास बांधकामांना स्थगिती
water connections with outstanding dues
ठाणे : थकबाकी असलेल्या अडीच हजार नळ जोडण्या महापालिकेकडून खंडित
Panvel municipal Corporation, air pollution, year 2024
पनवेलमध्ये यंदा प्रदूषण नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा

उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या घराघराबाहेरील पत्र्याच्या पडवीवर एका सकाळी अचानक पावसाचे ताशे तडतडू लागतात, आणि पावसाळा सुरू झाल्याची दणदणीत चाहूल लागते. पहिल्या पावसाच्या दमदार धारा अंगावर घेत धुसमुसळेपणानं स्वत:भोवती रिंगण धरणारा वारा झाडांनाही कवेत घेऊ लागतो, आणि अंगणात उतरणाऱ्या पागोळ्यांच्या धारांचे कण पडवीच्या लाकडी रेज्यातून घरात शिरून तरंगू लागतात. त्या ओल्या गारव्यानं अवघ्या घराला एक मस्त शिरशिरी येते, आणि उन्हाळ्यानं कोमेजलेलं अवघं घर जागं झाल्यागत तरारून उठतं. घराघरातली पावसाळ्याआधीची कामं उरकलेली असतात, छपरावरली कौलं परतवून झालेली असतात, तरीही, कुठं काही राहिलं नाही ना, या काळजीनं स्वयंपाकघरातल्या गृहिणींमध्ये आणि ओटीवरल्या पानसुपारीच्या बैठकीत उगीचच चर्चा सुरू होते. ‘कुकारा’ दिला जातो, आणि कामावरला ‘पैरा’ अवघ्या घराला चक्कर मारून सारं ठाकठीक असल्याची खात्री करून घेतो. तशी वर्दीही देतो आणि घर पुन्हा निर्धास्त होऊन नव्या हंगामाच्या स्वागताला नव्या उत्साहानं तयार होतं. पावसाळ्यात घराबाहेर पडायची सोय नसते. एकदा तो कोसळायला सुरुवात झाली, की आकाशातल्या काळ्याकुट्ट ढगांना खळ नसतो. तो बरसतच राहतो. गावातून वाहणाऱ्या नदीला उन्हाळ्यात अवकळा आलेली असते. पहिल्या पावसानंतर मात्र नदीला लालतांबडय़ा फेसाळत्या पाण्याचा ‘हौर’ येतो, आणि बेदरकार मस्तवालपणानं वाहणारं तांबारलेलं पाणी किनारा सोडून गावातही घुसतं. अवघा गाव, वर्षांकाठी कधीतरी, एकदाच दिसणारं नदीचं ते रौद्ररूप डोळ्यात साठवण्यासाठी काठावर गोळा होतो. मस्तीभरल्या तरुणाईला ते फेसाळत रोरावणारं पाणी आव्हान देतं, आणि चड्डय़ा, लंगोटय़ा कसून धडाधड पाण्यात सूर मारले जातात. प्रवाहाच्या वेगाला आव्हान देण्याची स्पर्धा सुरू होते, आणि उलटय़ा दिशेनं पोहत काठ गाठायची धडपड करणाऱ्या तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला प्रोत्साहन देताना गावकरी हरखून जातात.. रोरावत, उसळत वेगानं समुद्राच्या दिशेनं वाहणारं तांबडंभडक पाणीही, त्या तरुणाईशी अवखळपणे खेळू लागतं. रौद्ररूप विसरतं, आणि आव्हानं पेलण्याच्या उमेदीचं कौतुक करत, त्यांना अंगाखांद्यावर अलगदपणे झेलत किनाऱ्यावर आणून सोडतं. मग काठावरल्या गर्दीचा टाळ्यांचा कडकडाट होतो, आणि पावसानं ओथंबलेली गर्दी घरोघरी परतते.
तोवर घरोघरी चुलीवरचे कांदापोहे तयार झालेले असतात. माजघरात चवईच्या -रानकेळीच्या- पानांची रांग मांडली जाते, आणि ओलेत्यानंच बसलेल्या पंगतीच्या पुढय़ातील पानापानावर कांदापोह्य़ाचे वाफाळलेले ‘पर्वत’ ओतले जातात. पानाच्या डाव्या कोपऱ्यात, ‘आगोट’चं, हिरव्याकंच कैऱ्यांचं तवंगभरलं खमंग लोणचं पोह्य़ांकडे पाहात हासत असतं. मग तोंडातोंडाला पाणी सुटतं, आणि प्रत्येक घासाला लोणच्याची चव देत पोह्य़ांची पानं पोटात रिती होऊ लागतात. एखाद्या स्वयंपाकघरात कुळथाच्या पिठीचा खमंग वास दरवळू लागतो, आणि वाफाळलेल्या पेजेवर कुळथाच्या पिठीची पातळशी धार सोडून लसणाच्या लालभडक चटणीसोबत कालवलेल्या पेजेचे भुरके मारण्याची स्पर्धा पंगतीत सुरू होते.. पंगत संपते आणि माजघरातली गर्दी, सोप्यावर गोळा होते.. कुणी झोपाळ्यावर बसून चौसोपीच्या मधल्या अंगणात चारही कोपऱ्यांवरल्या पन्हळीतून धबाधबा ओतलं जाणारं पावसाचं पांढरंफेस पाणी न्याहाळत हलके झोके घेऊ लागतो, तर कुणी आरामखुच्र्या पटकावून नुसतंच आढय़ाकडे पाहात कानात पावसाचा नाद साठवू लागतो. अचानक कुणीतरी एका ताटातून वाफाळत्या चहाचे कप घेऊन समोर अवतरतो, आणि ‘सुख म्हणजे हेच’, या साक्षात्कारानं भारावलेले सारेजण, चहाच्या चवीत बुडून जातात.
.. बाहेर कोसळणारा पाऊसही तोवर चांगलाच स्थिरावलेला असतो. आकाशात दाटलेले सारे ढग जमिनीवर पुरते ओतल्याखेरीज आता तो थांबणार नाही, हे तोवर नक्की झालेलं असतं. मग पावसाळ्याचा तो पहिला दिवस, असाच, सुस्तपणे, कानात पावसाच्या ताशांचा तडतडाट साठवत बसून राहण्यात, पागोळ्यांच्या धारांमधून नाचत जमिनीवर उतरणाऱ्या आणि कोसळत्या सरींनी तयार केलेल्या निळसर पडद्यापलीकडून धूसरपणे डोकावणाऱ्या डोंगररांगा न्याहाळण्यात संपून जातो. तिन्हीसांजाही काहीशा लवकरच अवतरतात, आणि देवघरातला दिवादेखील संध्याकाळी नेहमीपेक्षा लवकरच उजळतो.
कुंदकुंद झालेल्या हवेत धूप आणि अगरबत्त्यांचा मंद सुगंध दरवळू लागतो. एखाद्या घरात, प्रथेप्रमाणे प्रार्थनेचे सूर घुमू लागतात, आणि पावसाच्या पागोळ्यांचा नाद त्यामध्ये मिसळून एक आगळे संगीत घराघरात फेर धरू लागते.. हा क्षण पहिल्या पावसाच्या पहिल्या संध्याकाळीच अनुभवता येतो. नकळत तो मनात साठवला जातो आणि पुढे कधीतरी, एकटं असताना, हरवलेल्या पावसाची रूपं आठवताना जिवंत होतो. डोळ्यासमोर उभा राहतो, आणि मन मागे जातं.. पावसाळ्यातील पहिल्या सरीच्या आणि पुढल्या सगळ्या पावसाळ्यांच्या आठवणींनी मनं ओलीचिंब होऊन जातात..
कोकणातला पावसाळा दर वर्षी असाच असतो. पाऊस पडत असताना परसातल्या झाडाच्या पानापानानं पहिल्या पावसाचे थेंब आपल्या अंगावर साठवून ठेवलेले असतात. पाऊस ‘उघडतो’, मग त्या पानांनाही अवखळपणाची लहर येते. वाऱ्याची हलकीशी झुळूक येते आणि आकाशातले ढग विसावलेले असतानाही, झाडाखाली टपोऱ्या थेंबांचा सडा पडू लागतो. अचानक होणाऱ्या या शिडकाव्यानं झाडाखाली थांबलेला कुणी शिरशिरून उठतो, आणि फसगत लपवतच पुढे चालू लागतो..
याच दिवसांत घराघरात सणांचा उत्साहही उतू चाललेला असतो. गावातल्या गणपतीच्या कारखान्यातल्या मूर्ती आकार घेत असतात. आषाढ ओसरू लागला की घरोघरी मंगळागौरींची तयारी सुरू होते, आणि गावाबाहेरच्या हिरव्याकंच डोंगरावरच्या पानाफुलांचं भाग्यच जणू उजळून जातं. रानफुलांच्या सजावटीनं घराघरातील मखरं उजळून निघतात. एखाद्या घरातल्या माहेरवाशिणीची पहिली मंगळागौर म्हणजे जणू गावाचा उत्सव होऊन जातो, आणि दिवसभराच्या पावसाळी कुंदपणानं सर्दावून गपगार झालेले रस्तेही रात्रीच्या वेळी जागे होतात. रहदारी न्याहाळत आनंद उधळतात. रात्रभराचं जागरण असलं, तरी रस्ते पेंगुळतच नाहीत. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणं अंगावर घ्यायला जणू आतुरलेले असतात. गावाबाहेरच्या शेतांवरच्या हिरव्या पोपटी भाताच्या रोपटय़ांना धरलेल्या ओथंबत्या लोंब्या आता पिवळसर रंग धारण करू लागलेल्या असतात. गावाबाहेर लांबवर पसरलेल्या या हिरव्यापिवळ्या गालिचातूनच सकाळसकाळी कुठून तरी मोराची लांबलचक आरोळी उठते आणि गावाबाहेरची झाडंझुडपंही जागी होऊन तरारू लागतात.. अशा उत्साहातच गणेशोत्सवही पार पडतो..
कोकणातल्या गावागावाकडचा पावसाळा असा अधीर करणारा असतो. म्हणूनच, मुंबईत काम करणारा चाकरमानी, पावसाळ्याची वर्दी मिळताच गावाकडं धाव घेतो. डोक्यावर इरलं घेऊन शेतावरच्या गुडघाभर चिखलात ओणवं होऊन भाताची लावणी करताना, काठावरच बसून हरभऱ्याची उसळ, तांदळाच्या भाकरीची न्याहरी करताना आणि तिन्हीसांजेला घरी परततानाच वाटेतल्या ओढय़ावर आंघोळ करून ताजेतवाने होताना अनुभवलेली मजा मनात साठवल्यानं त्याला शहरातील धकाधकीतही उत्साहानं काम करण्याचं नवं बळ मिळतं. गावाकडच्या पावसाच्या अशा असंख्य आठवणी त्याच्या मनाच्या कोपऱ्यातल्या एका मखमली कप्प्यात कोरून ठेवलेल्या असतात.
.. शहरात परतल्यावर कधीतरी एखाद्या सकाळी वाफाळलेल्या चहाचे घुटके घेताना खिडकीबाहेरचा चौकटीतला निसर्ग त्याला खुणावू लागतो, समोरच्या झाडांची हिरवाई साद घालू लागते. पावसाची एखादी सर समोरून सरसरत गायबही होते, आणि घराच्या आसऱ्यानं बसलेल्या कबुतरांचे थवे पंख फडफडवत उगीचच पाण्याचे कण अंगावर झेलत एखादी चक्कर मारू लागतात. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. खिडकीच्या जाळीतील ‘बगिच्या’तलं, गावाकडच्या बागेतून मुद्दाम आणून लावलेलं एखादं रोपटंही त्या पावसात खुलून फुलतं, तेव्हा हा चाकरमानीही हरखून जातो. गावाकडची ती खूण त्याला अस्वस्थही करते. मग त्या कुंडीतल्या रोपटय़ावर तो हलका हात फिरवतो, आणि कौलारू घराच्या पडवीत ओघळणाऱ्या पागोळ्यांचा आवाज नकळत कानात घुमू लागतो.. चहा गार झाला तरी त्याला ते लक्षातच येत नाही. कधीतरी तो भानावर येतो. डायनिंग टेबलावरच्या प्लेटमधील कांदेपोहेदेखील थंड झालेले असतात. शेजारची ‘बेडेकर लोणच्या’ची बरणी पाहूनही त्याच्या तोंडाला पाणी सुटतच नाही.. कसेतरी चार घास घशाखाली घालून तो पेपर उघडतो, आणि गावाकडची पावसाची बातमी शोधू लागतो.. अधीरपणे!!
सर्व छायाचित्रे : अतुल घाग

Story img Loader