नागपूर
पावसाच्या सरींना सुरुवात झाली की, लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचीच पावलं आपोआप घराबाहेर पडायला लागतात. पाऊस एन्जॉय करणं शिकावं ते नागपूरकरांकडूनच..
पाऊस म्हटलं की पहिल्यांदा आठवतात त्या सौमित्राच्या ओळी. ‘पहिला पाऊस पहिली आठवण.. पहिलंच घरटं पहिलंच अंगण..’ या ओळी आठवतात, पण ही आठवण कित्येकदा पहिली नसतेच, पण तरीही प्रत्येक वेळी ती पहिल्यांदाच अनुभवावीशी मात्र वाटते. अशा वेळी चातकासारखी पावसाची वाट पाहणारे नागपूरकर पाऊस पडला रे पडला की, थेट फुटाळ्यावर जाऊन धडकतात. गेल्या आठ-दहा वर्षांतलं ते ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हटलं तरीही चालेल. पाऊस एन्जॉय करायला शिकवला ते याच फुटाळाच्या चौपाटीनं!
पावसाच्या सरी अंगावर झेलत हुंदडण्याचा आनंद काही औरच, पण तो घरात कसा एन्जॉय करणार! मग हळूच घरातनं पावलं बाहेर पडतात आणि डोळ्यासमोर फक्त आणि फक्त दिसते ती फुटाळा चौपाटी! गार वारा, भिजलेली झाडं, दिवसालाच पडणारा मंद प्रकाश आणि चिंब भिजलेली तरुणाई पाहावी ती इथंच. ‘त्याला पाऊस आवडतो, तिला आवडत नाही..’ या सौमित्राच्या ओळीही इथं फिक्या पडतात आणि एक, दोन असे करता करता पाऊस न आवडणारी तो किंवा तीसुद्धा पावसात भिजायला लागतात. पावसाच्या सरी अंगावर घेत इतरांवर त्याचे तुषार उडवतानाचा आनंद काही औरच! अलीकडच्या दोनेक वर्षांत चायनीज, पिझ्झाच्या मोठमोठय़ा लकाकणाऱ्या दुकानांनी फुटाळाला घेरलंय खरं, पण एरवी या दुकानांवर उडय़ा मारणारी हीच तरुणाई हातात गरमागरम भुट्टे घेऊन मस्तीत धुंद झालेली असतात. एकीकडे चिंब तरुणाई आणि दुसरीकडे लाल झालेल्या निखाऱ्यांवर कणसं भाजणारी मंडळी. बिच्चारे!!! पोलीसदादा आलेत की, ठेला घेऊन धावाधाव करणारे भुट्टाविक्रेते पाहायला मिळतात ते इथंच! खरं तर तरुणाईची ही एन्जॉयमेंट म्हणजे भुट्टेविक्रेत्यांसाठी पावसाळ्यातील अधिकच्या कमाईचे साधन, पण अधूनमधून पोलीसदादा त्यांना चाप लावतो आणि पुन्हा थोडा वेळात ते चिंब भिजलेल्या तरुणाईच्या सेवेसाठी हजर. एकीकडे तरुणाई बेधुंद होऊन एन्जॉय करीत असते, तर दुसरीकडे चौपाटीच्या कोपऱ्याकोपऱ्यात सौमित्राचा पहिला पाऊस अनुभवणारं प्रणयाराधनही सुरू असतं. मग हळूच ‘प्यार हुआ, इकरार हुआ..’ हे राज कपूरचं गाणं आठवतं. पाऊस म्हणजे प्रेम, पाऊस म्हणजे मैत्र आणि पाऊस म्हणजे अगदी सबकुछ! एकीकडे गरमागरम भुट्टे आणि दुसरीकडे गरमागरम पकोडे.. नागपुरातील पावसाची हीच तर खरी खासियत! याच फुटाळ्यानं नागपूरकरांना पाऊस एन्जॉय करायला शिकवलंय. दिवसाला किमान हजारो नागपूरकर पर्यटक इथं अंगावर पाऊस झेलतात.
नुकतीच मिसरूडं फुटू लागलेली पोरं पाऊस आला की, शाळेला दांडी मारून लगेच फुटाळ्यावर अगदी तयार म्हणून समजा. तरुणाई कॉलेजला बंक मारून, तर कार्यालयीन मंडळीसुद्धा अर्धा दिवस रजा टाकून याच डेस्टिनेशनला पाऊस सरी अंगावर घ्यायला हजर असतात. सहकुटुंब पाऊस एन्जॉय करणारेही इथं कमी नाहीत. पावसाळ्यात फुटाळा म्हणजे जत्राच जणू. स्वातंत्र्यदिन आणि मैत्री दिनाला पाऊस आला की, मग आणखीच उधाण येतं. बिचाऱ्या पोलिसांनाही यांना आवरण्यासाठी कसरत करावी लागते, पण पावसासमोर त्यांना ऐकतोच कोण! याच फुटाळ्यावर कधीकाळी भिजलेल्या आणि अंकुर फुटलेल्या डाळीचा पदार्थ मिळायचा. नागपूरकर त्यासाठी अक्षरश: वेडे होते. आता त्याची जागा गरमागरम भुट्टय़ांनी घेतलीय.
अंबाझरी तलावाची कथासुद्धा न्यारीच! गेल्या वर्षी नागपूरकरांनी या अंबाझरी तलावाचा ‘ओव्हर फ्लो’ला अक्षरश: लुबाडले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फार क्वचितच हा तलाव ‘ओव्हर फ्लो’ होतो, पण गेल्या वर्षी तो खऱ्या अर्थानं मस्त ‘ओव्हर फ्लो’ झाला. तब्बल महिनाभर त्यातून पडणाऱ्या जलधारांनी कधी स्वत: भिजत, कधी इतरांना भिजवत खऱ्या अर्थानं पाऊस एन्जॉय करायला शिकवलं. आजोबा, मुलगा, नातू या तिन्ही पिढय़ा या जलधारात न्हाऊन निघाल्या. या वेळी त्या पावसानं निराशा केलीय, पण अंबाझरी ‘ओव्हर फ्लो’ होणार, या एका कल्पनेनं नागपूरकर अजूनही त्या तलावावर चकरा मारतात.
पाऊस मस्त धो धो पडतोय अन् फुटबॉल नाही खेळणार, असं कधी घडलंय का! तर नाहीच.. जराही पाऊस आला की, भल्या मोठय़ा कस्तुरचंद पार्कसह शहरातल्या साऱ्याच लहान-मोठय़ा मैदानं अन् गल्लीबोळांमध्ये तळं साठलंच म्हणून समजा. या पाण्यात चिखल तुडवत फुटबॉल यथेच्छ उसळत असतो. तिही मजा काही औरच! बच्चेकंपनी अक्षरश: या पार्कवर धम्माल उडवतात. बेभान, बेधुंद होऊन त्यांचा तो खेळ चाललेला असतो. कुणी पडतं, कुणी खेळता खेळता मध्येच त्या चिखलवजा पाण्यात लोळतं आणि त्यांचं ते बेभानलेपण बघणाऱ्यांनाही तिकडे ओढतं. थोडय़ाच वेळात या बच्चेकंपनीत तरुणाई सहभागी होते आणि पुन्हा नव्यानं फुटबॉलचे डाव रंगतात. एरवी याच मैदानावर मोठमोठय़ा जाहीर सभा होतात, पण पावसाळ्यात कस्तुरचंद पार्क म्हणजे या बच्चेकंपनीसाठी हक्काचं ठिकाण.
शहरातील फुटाळा, अंबाझरी किंवा मग कस्तुरचंद पार्क, पण त्याहूनही नागपूरकर केल्या दोन वर्षांत पाऊस अनुभवायला जातात ते लगतच्या गर्द हिरवाईत. नागपूरपासून अवघ्या ५०-६० किलोमीटर अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्प. पावसाळ्यात इथं प्रवेश नाही, पण रामटेकजवळच तयार झालेल्या खिंडसी जलाशयाच्या मागच्या बाजूला एक मोठं अॅडव्हेंचर हब उभारलं गेलंय. या अॅडव्हेंचर हबवरसुद्धा पाऊस एन्जॉय करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. चार चाकी अन् दुचाकीवरून कुणीही सहज जाऊ शकतं, पण सायकलचं फॅड मात्र गेल्या वर्षांपासून वाढलंय खरं! पाऊस पडला रे पडला की, यांच्या सायकली घरातून बाहेर पडल्याच म्हणून समजा. सायकल चालवून चालवून किती चालवणार, पण ही मंडळी हा ५०-६० किलोमीटरचा पट्टाही सहज पार पाडतात. कारण, डेळ्यात साठवलेला असतो चिंब धुंद पाऊस. अंगावर पाऊस झेलत, माळरान तुडवत हे ग्रुप्स खऱ्या अर्थानं पाऊस एन्जॉय करतात. वाटेतच कधी नगरधनच्या किल्ल्याची रपेट किंवा मनात आलं तर मग कोलितमाराचं जंगल. पण पाऊस म्हटल्यावर मग ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत पोरीही मागं राहणं शक्यच नाही. गेल्या वर्षीपासून या पठ्ठय़ांनीसुद्धा सायकल सफारीनं पाऊस अनुभवला. चक्क ४० किलोमीटरचा रस्ता पार करत त्या १५-२० जणी मैत्रबनला जाऊन धडकल्या.
‘वो सिकंदरही दोस्तो कहलाता है, हारी बाजी को जितना जिन्हे आता है..’ असं म्हणत भर पावसात सायकलची रपेट मारणाऱ्यांची संख्या वाढतच चाललीय. दिवसेंदिवस हा ग्रुप मोठा होत चाललाय आणि त्यांना हा पाऊसदेखील कमी पडत चाललाय. पावसाच्या वेगानं त्यांच्या सायकलींची चाकं फिरू लागतात आणि पाऊस आणि तरुणाईची जुगलबंदी, असा सामना आणखीच रंगत जातो. नागपूरकरांचा पाऊस म्हणजे हा अस्साच!