टीव्ही मालिका- नाटकं- सिनेमे यात अतिरंजित आणि हास्यास्पद पद्धतीने दाखवलेला सासू-सुनेमधला विसंवाद आपल्या खऱ्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येक घरात वेगवेगळ्या रूपात असतोच. तो निर्माण होण्याची कारणं आपल्याला दिसत असतात, पण दूर करण्याचे रामबाण उपाय मात्र अजून सापडलेले नाहीत. या विसंवादामुळे कुटुंबातली माणसं एका घरात राहून वेगळ्या दिशांना तोंड करून जगतात, दुरावतात, दु:खी होतात, निराशेने खचून जातात किंवा मग्रुरीने उन्मत्त होतात. अधिकार-जबाबदारी, हक्क-कर्तव्य यांच्या गोंधळात सापडून रोजचं सरळ सोपं आयुष्य गुंतागुंतीचं करून टाकतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचा अतिरेक करून उधळलेली तरुण पिढी आणि बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखू न शकलेली आणि बदलाचा वेग सहन करू न शकणारी, चिडचिड करणारी वडील पिढी यांच्यात एक असह्य़ तणाव निर्माण झालेला सगळीकडे दिसतो. 

लग्न म्हणजे दोन आयुष्यं एकरूप होणं आणि दोन कुटुंबं परिवारासहित एकमेकांशी जोडली जाणं, ही काही आता नव्याने सांगण्यासारखी गोष्ट राहिली नाही. लग्नाआधी एकमेकांना न भेटता- न पाहता आई-वडिलांवर विसंबून लग्न करणारी पिढी पूर्वी कधी आपल्या समाजात होती हे आताच्या पिढीला ‘विअर्ड’ वाटतं. आपलं लग्न स्थळ शोधून-पाहून जुन्या पद्धतीने झालं आहे हे सांगताना काही जण थोडेसे ओशाळलेले सुद्धा असतात. स्थळ शोधून पाहून-ठरवून केलेल्या लग्नात आता नवरा-नवरी निर्णय घेण्याआधी एकमेकांना भेटतात, चार गोष्टी विचारतात-सांगतात हा एक चांगला बदल आपल्याकडे झाला आहे. त्यामुळे संसारात पदार्पण करताना जोडीदाराबद्दल पुष्कळ गोष्टी माहीत असतात आणि मनाची थोडीफार तयारी झालेली असते. पण एका मुलाचं लग्न ठरताना एक नवाच प्रकार घडलेला मी नुकताच ऐकला.
मुलगा पसंत पडल्यानंतर निर्णय पक्का करण्यापूर्वी त्या मुलीने मुलाच्या आईशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या बाई चकित झाल्या. माझ्याशी काय बोलायचं असेल हिला अशा संभ्रमात पडल्या. भेट ठरली. एका शनिवारी दोघी मुलाच्या घरी भेटल्या. त्या मुलीने अतिशय मोकळेपणाने आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की, ‘‘परदेशात जाण्याचं आकर्षण मला फारसं नाहीये. पण इथे मिळणाऱ्या पैशात चांगलं, आरामशीर आयुष्य मला हवंय हे मात्र नक्की. लग्नानंतर आपण दोघी जर एका घरात राहणार असू, एका जवळच्या आणि नाजूक नात्याने कायमच्या बांधल्या जाणार असू तर त्या नात्यात, बंधनात थोडा आपुलकीचा, समजुतीचा भाग असावा असं मला वाटतं. लग्न होऊन मी इथे आले तरी तुमचं घर आत्ता जसं आहे तसंच राहील, फक्त माझी भर पडेल त्यात. तुम्ही वयाने, मानाने आणि अनुभवाने मोठय़ा आहात. मला नोकरीसाठी दिवसाचा बराच वेळ घराबाहेर काढावा लागतो. मग दोघींनी मिळून घर सांभाळायचं तर त्यासाठी आपल्याला कोणत्या आणि किती तडजोडी कराव्या लागतील ते आपण आधीच बोललो तर आपल्याला सोपं जाईल. मी थोडा प्रॅक्टिकल विचार करणारी आहे. बोलणं टाळून उगाच गुंते वाढवण्यापेक्षा घरातल्या घरात समोरासमोर बसून मोकळेपणी बोललं की गोष्टी सोप्या होतात. म्हणून मी आज तुमच्याशी बोलायला आल्येय.’’ त्या बाई थक्क झाल्या. भावी आयुष्याचा इतका स्पष्ट आणि सरळ विचार करणारी ही मुलगी समजायला सोपी असेल. चांगली बायको आणि चांगली सून नक्की होईल असा त्यांना विश्वास वाटला. मग दोघी सविस्तर बोलल्या. जेवायला आलेली ती मुलगी चहाच्या वेळेपर्यंत तिथे रमली. त्या दोघींना एकटय़ा सोडून बाहेर गेलेला पुरुष वर्ग दुपारी परत आला तो हिला घरात बघून चकित. तिने तिथल्या तिथे आपला होकार जाहीर करून टाकला.
अतिशय नवलाईची अशी ही घटना ऐकली तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. वैवाहिक आयुष्यातला विसंवादाचा एक मोठा धोका वेळीच ओळखून त्यावर उपाय शोधण्याचा इतका चांगला विचार तिने केला म्हणजे ती खरीच सुशिक्षित म्हटली पाहिजे. आयुष्याकडून आपल्याला काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल, याबद्दल अगदी स्पष्ट कल्पना असतील तिच्या. तिच्या हेतूबद्दल कोणतीही शंका माझ्या मनात आली नाही. उलट तिने केलेला विचार सगळ्यांनी अनुकरण करावं असाच आहे असं वाटलं.
आता मुलींची लग्नं वाढलेल्या वयात होतात. त्यामुळे त्यांची मतं, आवडी-निवडी घट्ट झालेल्या असतात. एका रात्रीत ते बदलणं शक्य नसतं. नवीन वातावरण स्वीकारायला, स्वत:ला थोडंसं बदलायला त्यांना वेळ दिलाच पाहिजे. पण सासू त्यांच्यापेक्षा वयाने किमान ३० वर्षांनी मोठी असते. तिची मतं आणि आवडी-निवडी सुनेपेक्षा ३० र्वष जुन्या आणि अनुभवाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या म्हणून जास्त घट्ट असतात. शिवाय घर उभं करण्यासाठी तिने खस्ता खाल्लेल्या असतात. त्यामुळे तिला अधिकार मिळालेला असतो. सुनेसाठी आपल्या पद्धती थोडय़ा बदलायला, सुनेचं काही स्वीकारायला तिलाही थोडा वेळ लागेलच ना! काल घरात आलेली सून आज लगेच अधिकार गाजवायला लागली, आपलं ते खरं म्हणायला लागली तर ठिणग्या उडणारच. अशा वेळी आपण सासूला असमंजस ठरवून मोकळे होतो, तिची बाजू समजून घेत नाही.
घरात आलेल्या परक्या मुलीला सासूने समजून घ्यावं असं सगळे सांगतात. म्हणजे नेमकं काय करायचं ते मात्र कित्येकदा सासवांना कळत नाही. मध्यमवर्गी घरातली सुशिक्षित सासू एखाद्या चुकीकडे दुर्लक्ष करण्याचा मोठेपणा एक-दोन वेळा दाखवते. त्यानंतर ती चूक दाखवून देते आणि सुनेला संधी देते. आता या शिकलेल्या मुलींना सांगावं तरी किती वेळा? पुन:पुन्हा सांगूनही चुका होत राहिल्या तर त्या चुकांना बेजबाबदारपणाचा रंग येतो आणि तिथे सासूचं बिनसतं. आपण काहीही न सांगता समजून घेण्याची अपेक्षा सासूकडून करण्यापेक्षा सुनांनीसुद्धा वेळेवर आपली अडचण सौम्य शब्दांत सांगून टाकली पाहिजे. मुलीच्या नवऱ्याने तिच्या पाठीशी राहावं अशी रास्त अपेक्षा असते. पण म्हणजे काय करावं? तिचा शारीरिक छळ होत असेल तर तिला त्यापासून वाचवणं, मानसिक छळ होत असेल तर तिला दिलासा देणं हे व्हायला हवंच. अलीकडच्या पुष्कळशा तरुण मुलांना याची पुरेशी जाणीव असते, ते तसं वागतातही. पण पुन्हा पुन्हा सांगूनही आईचं म्हणणं आपली बायको समजून घेत नाही म्हणून आईने ऐकवलेल्या दोन कडक शब्दांवर जर बायको थयथयाट करणार असेल, तिला घरात काम करण्यावरून काहीही न बोलण्याविषयी आग्रही राहणार असेल तर हा आग्रह नवऱ्याने का मानावा? लग्नापूर्वीचं फुलपाखरी आयुष्य नंतरही तसंच चालू राहावं, मनमुराद जगता यावं अशा अपेक्षा पुऱ्या झाल्या नाहीत तर त्याचा अर्थ छळ-घुसमट असा कसा घेतात या मुली? आणि अशा वेळी नवऱ्याने आपल्या घरच्यांची बाजू घेतली तर आकांडतांडव करून छळ केल्याची ओरड करणाऱ्या मुलींना सहानुभूती का दाखवावी कोणी? नव्या सुनेला एखादा पदार्थ आवडत नसेल, कशाची अ‍ॅलर्जी असेल तर ‘आमच्याकडे नाही हो असले चोचले चालायचे’ असं म्हणून तिच्या त्रासाची जराही पर्वा न करता तिच्यावर सक्ती होत असेल तर अशा वेळी नवऱ्याने तिची पाठराखण केली पाहिजे. पण चहाचा कप हातासरशी विसळून ठेव, स्वत:चं जेवलेलं खरकटं ताट स्वच्छ करून घासायला टाक, अगदी पहाटे उठायची गरज नाही पण ७ वाजता उठून घरातलं एखादं हलकं काम करीत जा, थोडी शिस्त आणि व्यवस्थितपणा हवी तुझ्या वागण्यात असं सांगणं यात सुनेवर असा कोणता अन्याय होतो, तिचा छळ होतो ते सासवांना खरंच कळत नाही.
बचत, काटकसर, चैन, आल्या-गेल्याचा पाहुणचार आणि इतर कित्येक गोष्टीत प्रत्येक घराच्या सुरुवातीपासून काही पद्धती ठरलेल्या असतात. घरातल्या इतर चार माणसांनी एका मुलीसाठी त्या बदलणं आणि एका मुलीने पुरेसा वेळ घेऊन इतर चार माणसांसाठी त्या स्वीकारणं यात रास्त काय? तयार खाण्याची पाकिटं, प्रसाधनाच्या मोठाल्या बाटल्या, भाज्या-फळं, कपडे अशी ढीगभर खरेदी करायची. मग त्याची मुदत संपली, स्टाईल गेली किंवा खाण्याची वस्तू नासली की बिनदिक्कत सगळं फेकून द्यायचं. अशा वेळी सासू खर्चावरून काही बोलली तर लगेच ‘मी कमावते, मी खर्च करते.’ वस्तू वाया गेल्याची जराही खंत न करणं हे माज आल्याचं लक्षण आहे, असं कुणी म्हटलं तर घर डोक्यावर घ्यायचं. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करण्यापेक्षा घरात नोकर ठेवावे यात काहीच चूक नाही. एक का दहा ठेवा, पण तुमचं लक्ष असू द्या. वेळ पडली तर स्वत: ओटय़ाशी उभं राहून किमान वरणभाताचा कुकर लावायची तयारी ठेवा. अन्न वाया जाऊ देऊ नका, घासलेली भांडी, घडी घातलेले कपडे वेळच्या वेळी जाग्यावर ठेवा, हात पुसायचे टॉवेल-सोफ्याची कव्हरं-पडदे नियमित धुवायला टाका. घरात किमान व्यवस्थितपणा आणि स्वच्छता टिकवा असं सांगणं म्हणजे सुनेला मोलकरणीसारखी राबवणं होत नाही हे यांना कुणी सांगतच नसेल असं नाही, पण वयाचा आणि नियमित हातात येत असलेल्या पगाराचा तोरा त्यांच्या बुद्धीवर झाकण घालतो.
आपण ज्या वातावरणात मोठय़ा झालो ते सोडून सासरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मुलींना जड जातं, थोडा वेळ लागतो हे खरंच आहे. ते समजून घेतलं पाहिजे. पण शिस्तीच्या आणि सभ्यपणाच्या वेगळ्या कल्पना असलेल्या काळात, साध्या वातावरणात वाढलेल्या सासवांनाही लांडे, तलम कपडे वापरणं आवडत नाही. आणि एखाद्या सासूने तसे कपडे वापरू दिले नाहीत तर त्या बदल्यात ती फक्त वाईटपणा पदरात बांधून घेते. तिला मात्र कुणी समजून घेत नाही. साध्या सरळ बोलण्याला आरोप केल्याचं आणि दुसऱ्या कोणावर किंवा टीव्ही मालिकेतील एखाद्या पत्रावर केलेल्या कॉमेंटला टोमणे मारल्याचं रूप दिलं तर मग सासू झालेल्या बाईने तोंड उघडायलाच नको घरातल्या तरुण पिढीसमोर?
अशा कित्येक घटना घरोघरी घडत असताना वर उल्लेख केलेल्या ‘त्या’ मुलीने आधीच सासूशी मोकळं बोलण्याचा जो निखळ सुज्ञपणा दाखवला तो नि:संशय कौतुकास्पद. लग्न झाल्यानंतर ‘त्या’ सासू-सुना गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील, प्रसंगाने झालेले मतभेद वाढू देणार नाहीत आणि गैरसमज, चिडचिड यांना तर थाराच देणार नाहीत. तसंच व्हावं यासाठी त्या दोघींना आणि त्यांच्या घरातल्या इतरांना मनापासून शुभेच्छा!
राधा मराठे