‘शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की इंग्रजी’ या विषयावर आपल्याकडे गेली अनेक वर्षे विचारमंथन सुरू आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी त्या चर्चेला एक नवा आयाम दिला. त्यानिमित्त-

आज आपल्या देशात शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरू आहे. महाराष्ट्रात नुकतेच भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसिक वाढ करते, कारण ते मूल ज्या वातावरणाचा भाग असते, त्या वातावरणाचे प्रतिबिंब त्याला मातृभाषेत, तिच्या शब्दांत दिसत असते. ते मूल त्याचा अनुभव घेऊ शकते, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहतो व त्यातूनच पुढे ते मूल ‘असे का?’ हा विचार करायला लागते. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळते. ‘ए’ म्हणजे अ‍ॅपल हे ते मूल शिकते ते घोकंपट्टीने; पण ते ‘अ‍ॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्याव्यतिरिक्त कुठेच आढळत नाही. याउलट आंबा ते झाडावर पाहू शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसिक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
या पाश्र्वभूमीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदिवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृश्य आहे. मुले त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांचे अजिबात लक्ष नाहीय, कारण त्यांच्या दृष्टीने काही तरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेले वा अनुभवलेले नाहीय. शेवटी कंटाळून ती मुले शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की, अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटरमध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी ‘सर्वात चांगले विनोदी दृश्य’ म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तिमत्त्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही; पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मात्र मागासलेली हा विचार कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्योगिक क्रांती झाली याचे श्रेय नि:संशय त्या भाषेचेच आहे; पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची ‘मातृभाषा’ इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्त्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शून्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्त्यांच्या खूप पूर्वीपासून होती, आयुर्वेदासारखे शास्त्र आपल्या देशात फारच पूर्वी विकसित झालेले होते. कालिदासाचे ‘मेघदूत’, ‘रामायण’, ‘महाभारत’ ही महाकाव्ये त्या काळी प्रचलित असलेल्या संस्कृत या समृद्ध ‘देशी’ भाषेतच आहेत. भगवद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्त्वज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले साहित्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पूर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही, तर प्रत्येक भाषा ही परिपूर्ण असतेच. तर मला एवढेच म्हणायचे आहे की, ज्ञानसाधनेसाठी मातृभाषा ही इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे, तर एकमेव असते.
आपल्या देशात प्रथम मोगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाटय़ाने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदुकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लिश शिक्षणतज्ज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागू केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढू नये, किंबहुना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा ‘रोबो’ नोकरवर्ग हवा होता, तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेमुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणे सोप्पे झाले, असे म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथे इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अध्र्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दराऱ्यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जितांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे, मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची- संस्कृतीची पुनस्र्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्षे एकसंध राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागू केलेल्या ‘रशियन भाषेचा’ जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हे समाजाला ताब्यात ठेवण्याचे वा एकसंध ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे.

Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्योगिक क्रांती झाली याचे श्रेय नि:संशय त्या भाषेचेच आहे; पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची ‘मातृभाषा’ इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्षे उलटून गेल्यावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देऊन ‘फाडफाड इंग्लिश’ बोलणारा, मात्र विचारशक्ती पुरेशा प्रमाणात विकसित न झालेला असा उच्चशिक्षित नोकरवर्गच तयार करीत आहोत, असे म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे हे खरेच! परंतु संपर्काची भाषा असणे व ज्ञानभाषा असणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे परिचित केवळ दहावी पास, तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले; परंतु इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करतात, कारण एका इंग्लिश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्षे शिपाई म्हणून काम करतात.! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबईसारख्या शहरात अनेक जण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तमरीत्या बोलू शकतात वा वाचू शकतात यात विशेष असे काहीच नाही, कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात; परंतु अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरे आहे.
जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते की, त्यांच्या देशात, त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्त्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्त्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्त्वाच्या देशांत शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.
नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात, या अर्थाचे विधान केले. खरे तर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचे मुख्य माध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्या वेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्त्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेव्हाच इंग्रजी भाषेचे महत्त्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे, तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलनेदेखील करण्याची तयारी ठेवावी लागेल, तरच देशी भाषांचे महत्त्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फडर्य़ा इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा बऱ्याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पाहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की, ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्यासारखा एकदा या वकिलाकडे, तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते, हा माझा अनुभव आहे.
सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसालादेखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे, असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. केन्द्र सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावे की रडावे या प्रश्नाच्याही पलीकडचा आहे व असतो. मी बँकेत नोकरी करत असताना रिझव्‍‌र्ह बँकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्रे यायची. पत्रे अगदी उच्चस्तरीय इंग्रजी भाषेत लिहिलेली असायची, पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेले एक वाक्य असायचे, ‘हम हिन्दी में पत्रव्यवहार का स्वागत करते हैं.’ म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशात सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही ‘नं. वन’वर आहे.
मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपडय़ात मंत्रालयासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते. आता इतक्या वर्षांनंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजूने पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाटा आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षित असोत वा अशिक्षित आई-बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मानत आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काही तरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करीत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात याकडे कोणीही लक्ष देण्याच्या मन:स्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरातले आई-बापदेखील महागडी फी भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. असे का करता, हे बहुतेकांना विचारले असता उत्तर एकच मिळते, इंग्लिश छान बोलता येते म्हणून. पुन्हा इंग्लिश छान बोलता येण्याने काय होणार असे विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळते. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्षे पाच ते पंधरा अशी महत्त्वाची दहा वर्षे केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असे काही तरी विचित्र चाललेय! मूल दिवसभर स्कूलमध्ये वेळ काढून घरी येते तर मम्मी त्याला ‘स्नॅक्स’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्कला दूध म्हणताना तो ऐकतो व दूध म्हणतो. त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दूध, से मिल्क..’. आता मुले गोंधळतात, की मग ही का दूध म्हणते. मग ती सांगते की दूधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरगे स्वत:शी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे. हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरगे ज्या समाजात वावरते तेथील शब्दसंपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही.

मूल दिवसभर स्कूलमध्ये वेळ काढून घरी येते तर मम्मी त्याला ‘स्नॅक्स’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्कला दूध म्हणताना तो ऐकतो व दूध म्हणतो. त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दूध, से मिल्क..’.

भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्दसंपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखादे मूल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व किमान एक तरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञानकक्षा रुंदावतात. मनुष्य जेवढय़ा भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो, पण या सर्वाचा पाया मात्र नि:संशय मातृभाषा असावी.

थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी.
आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरूपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भाषा जिवंत आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. आज आपण जी शुद्ध(?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फद्र्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर हे शब्द अरबस्थानातील आहेत हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेडय़ात काढू, पण ते खरे आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सिम-कार्ड असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/ भारतीय भाषेतील मेज, स्थानक असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. भाषाशुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतीलदेखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. उलट अवतार, जंगल, बंगला, गुरू, लूट, महाराज, मंत्र, रोटी असे किती तरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठय़ा सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफ र्ड डिक्शनरीत ७००हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे.
नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषारूपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल; परंतु त्याची सुरुवात वा त्यातील मोठेपणा आपल्या जनतेला कोणी तरी समजावून देणे गरजेचे आहे.

Story img Loader