हिमालयात एव्हरेस्ट उत्तुंग तर आल्प्स्मधे हिमाच्छादित माँट ब्लांक. माँट ब्लांक हा आपल्याला फ्रान्स, इटली व स्वित्र्झलड या तीन देशांतून पाहता येतो, अर्थात केबल कारने थोडे वर गेल्यावरच. आम्ही फ्रान्स येथील शामोनी या ठिकाणी राहिलो होतो. शामोनी ही जागा एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पसारखी अगदी माँट ब्लांकच्या पायथ्याशी. सकाळी या डोंगराचे स्वच्छ दर्शन झाल्यावरच आपण केबल कारने वर जायचे की नाही ते ठरवू शकतो. कारण शिखर ढगाआड असल्यास पाऊस तरी पडणार किंवा स्नो फॉल तरी होणार. त्यामुळे मग आसमंत स्वच्छ होण्याची वाट पाहत बसावे लागते.
शामोनी येथून ल् फ्रांन्झ् या ठिकाणी केबल कारने वर गेलो. हिमालयासारख्याच, पण आल्प्सच्या रांगा समोरासमोर असल्याने एका डोंगरमाथ्यावरून वेगवेगळ्या दिशांना असलेल्या शिखरांचे दर्शन घेत निर्धारित स्थळी पोहोचायचे होते. ल् फ्रांन्झ् येथे पोहोचल्यावर समोरच माँट ब्लांकचे नयनरम्य दर्शन झाले. पण थोडाच वेळ. कारण जवळजवळ अर्धा डोंगर ढगांआड गेला. ल् फ्रांन्झ् डोंगरावर थोडेफार पठार आणि खाली दरी असल्याने टँडम फ्लाय करणारे उत्साही लोक दिसले. पॅराशूटप्रमाणे दिसणारा टँडमचा पडदा पसरवून उड्डाणाची वाट पाहत होते. थोडय़ाच वेळात धुक्याचा पडदा दूर झाल्यावर एकामागे एक असे सर्वजण पठाराच्या कडेला येऊन टँडममध्ये बसून पक्ष्यांप्रमाणे लीलया उडू लागले.
कधी मोकळ्या रानावर, तर कधी गर्द झाडीतून, तर लहानशा चढावर लाकडाच्या फळकुटय़ा टाकून केलेल्या फूट- दीड फूट उंचीच्या पायऱ्या चढत-उतरत असेच अडीच-तीन तासांनी आम्ही ल् फ्लाशिए येथे पोहोचलो. थोडा आराम आणि पोटपूजा करून डोंगर उतरायला सुरुवात केली. बसच्या रांगेत उभे होतो. पण कोणती बस आम्हाला पाहिजे हे काही माहीत नव्हते, त्यामुळे …………….शेजारच्या मदामला विचारले तेव्हा तिने आमचे शंकानिरसन केले व बोर्डवर लिहिलेले वेळापत्रक दाखवले. तिथे येणाऱ्या बसेसची वेळ दाखवली होती. ठरलेल्या वेळी बस आली. युरोपमधे बऱ्याच हॉटेलमधून बसचे, आपल्या तेथील वास्तव्यापर्यंत फ्री पासेस दिले जातात. या ठिकाणी कोणत्याही गंडोला, चेअर लिफ्टच्या तिकीट ऑफिसमधून रेल्वे, माऊंटन पास दोन तीन दिवसांसाठी कमी दरात मिळतात. त्यामुळे आपल्याला रांगेत उभे राहावे लागत नाही व आपला वेळ वाचतो. नाहीतर सीझन किंवा सुट्टीप्रमाणे तिकिटासाठी कमीत कमी दीड ते दोन तास सहज रांगेत उभे राहून नंतर ठरलेल्या गंडोला नंबरातूनच जावे लागते. शिवाय ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आणखी सवलत मिळते. हा पास त्या अवधीपर्यंत कितीही वेळा वापरता येतो.
शामोनी येथून माँट ब्लांक येथे समुद्रसपाटीपासून ३८४२ मी. उंचीवर जाऊन ऑग्लू दी मीडी, पाहिलच पाहिजे. त्याबरोबरच आर्गेटिन ग्लेशिअर, आइस केव्ह अशा आगळ्यावेगळ्या जागी तर जाऊन आलेच पाहिजे. अर्थात हे सर्व जरा महागच असतं, पण जाण्यापूर्वी इंटरनेटवरून माहिती घेऊन आपण आयोजन करू शकतो.
माँट ब्लांक हे युरोपमध्ये फ्रान्स, इटली या दोन्ही देशांतून मस्त दिसणारे एकमेव शिखर आहे. त्यामुळे त्यावर हक्क कुणाचा यावर पूर्वी बरेच वादविवाद, मतभेद होते. पण १८४० मधील एओस्टा कराराप्रमाणे त्या वेळी आखलेल्या अटलासप्रमाणे या शिखराचा दोनतृतीयांश भाग इटलीमधील एओस्टा व्हॅलीत डोकावतो, तर दुसरा एकतृतीयांश फ्रान्सच्या व्हाले ब्लांक व्हॅलीत. ऑग्लू डी मीडी येथे दोन टप्प्यांत केबल कारने वर जाता येते. सरळ उभी जाणारी ही जगातील सर्वात उंचावरील केबल कार. केबल कारला येथे टेली फेरिक असे म्हटले जाते. पहिला टप्पा ऑग्लू व्हिलेज. बरेच हौशी लोक इथपर्यंत केबल कारने सायकल घेऊन येतात व सायकल स्वार बनून परत जातात काहीजण धावतही जातात.
इथून पुढे दुसऱ्या टेलिफेरीकने वर जायचे असते. ऑग्लू डी मीडी म्हणजे फ्रेंच भाषेत दक्षिणेकडील सुई. हे टोक अगदी निमुळते आहे. अगदी चहूकडून बर्फाच्छादित असलेला हा आसमंत फारच नयनरम्य आहे. इथून जवळच २०१३ साली बांधलेली स्पेस डी व्हॉइड ही काचेची केबिन आहे. खालील ग्लेशिअरपासून आपण १००० मी. उंचीवर असतो व मागे माँट ब्लांकचे टोक. आपण अवकाशात असल्याचा हा एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो. ज्यांना व्हर्टिगोचा त्रास होत असेल तर त्यांनी जाण्यापूर्वी विचार करावा. पूर्वी या ठिकाणी वेधशाळा होती, पण तिथल्या हवामानामुळे बंद झाली. या शिखरावर विजेच्या धक्क्यापासून बचाव म्हणून मोठा विद्युत निवारक आहे. खाली गावातून तो पेन्सिलीच्या टोकाप्रमाणे दिसतो.
इथून पुढेही हेल ब्रोनर येथे जायचे असल्यास आणखी एका टेलिफेरीकमधून जावे लागते. हेल ब्रोनर हे ऑग्लू डी मीडीपेक्षा कमी उंचीवरील इटलीच्या हद्दीतील शिखर. खाली सभोवार आपल्याला बरेचसे रॉक क्लायंबर्स, माऊंटन क्लायंबर्स, स्नो वॉकर्स दिसतात. माँट ब्लांकचा हाइक जरी तेवढा उंचीचा नसला तरीही टेक्निकल असल्याने जरा अवघड आहे असे म्हणतात. पण आम्ही हायकिंग वगैरे केले नाही.
१८व्या शतकात माँट ब्लांकच्या उत्तरेला उतारावरील म्र डे ग्लेस हे ग्लेशिअर विंडहॅम व पोकाक असे दोन इंग्लिश हौशी ट्रेकर्स उतरून आले. त्यांनी याला बर्फाचा प्रचंड बॉक्स असे संबोधले. याची लांबी ७ कि.मी. ते खोली २०० मी. आहे. माँट ब्लांकच्या सभोवार असलेल्या ग्लेशिअर्सपैकी याचे आकारमान सर्वात मोठे आहे. ग्लेशिअर हालचाल चालूच असते. म्हणजे हल्लीच्या अभ्यासाप्रमाणे ग्लेशिअर हिवाळ्यात सततच्या हिमवर्षांवामुळे पुढे येते, पण उन्हाळ्यात हिम वितळल्यावर त्याची पीछेहाट होते. ते दरवर्षी ४० ते ५० मी. मागे हटते. त्यामुळे त्यात असणाऱ्या क्रीव्हासेस वाढतात किंवा घटतात. खाली असणाऱ्या वॉटर चॅनल्सचा प्रवाहही बदलतो. त्यामुळे त्यावर चालणाऱ्यांना सतर्क राहावे लागते.
१९०८ मध्ये इथे ग्लेशिअर खोदून बर्फाची गुहा केलेली आहे. बर्फाची गुहा आणि तिथे जाणारी माँटेनव्हर ही माथेरानच्या टॉय ट्रेनसारखीच झुकझुक गाडी. कुणाला चढत जायचे असल्यास रेल्वेला समांतर रस्ता आहे. कुणीकुणी ऑग्लो डी मीडी येथून या वाटेनेही खाली येतात. माँट ब्लांकनंतरचे हे इथले खास आकर्षण आहे. शामोनी येथून माँटेनव्हरने ल् मर्डे ह्य डी ग्लेस येथे जाण्यासाठी जंगलातले खडक फोडून ट्रॅक्स, बोगदे केले आहेत. उतरल्यावर थोडे खाली, पण मूळ ग्लेशिअरच्या सुरुवातीला आपण गंडोलामधून जातो. नंतर ४३० पायऱ्या उतरून परत वर येताना तेवढय़ाच पायऱ्या चढाव्या लागतात. आताचे जे ग्लेशिअर आहे ते पहिल्यापेक्षा बरेच मागे हटले आहे.
बर्फाची गुहाही २७ मी. लांब आहे. आतमधले बर्फाचे पुतळे स्फटिकासारखे चकाकतात. ती गुहा कशी केली गेली, तिथल्या लोकांचे राहणीमान, त्या वेळेचे उद्योगधंदे काय होते या सर्वाची शिल्पकृती आहे. प्रत्येक रचनेवर वेगवेगळे रंगीत प्रकाश किरण सोडल्याने दृश्ये फारच उठून दिसतात. दरवर्षी हिवाळ्यात बर्फामुळे ही गुहा झाकली जाते, परत उन्हाळ्यात (जून ते सप्टेंबर) बर्फ खोदून करावी लागते.
युरोपात जवळजवळ सर्वच देशांत आपण विमानाखेरीज कार किंवा रेल्वेने प्रवास करू शकतो. तसेच फ्रान्स व इटली या दोन देशांना जोडणारा माँट ब्लांक टनेल हा १२ किमी. लांबीचा बोगदा आहे. हा भरपूर रहदारीचा रस्ता आहे. शुक्रवार ते रविवार या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी २ ते ३ किमी लांब असा ट्रॅफिक जॅम असतो. येथे ठरावीक मर्यादेनेच गाडी चालवावी लागते, नाहीतर पोलिसांच्या जागरूकतेमुळे दंड भरायला लागतो. सर्व सुरळीत चालू असते. कुणाची घाई नाही, हॉर्न तर नाहीच. साधारण तासाभरात आपण एकीकडून दुसरीकडे आरामात जाऊ शकतो.
कोमेर हे इटलीमधील माँट ब्लांकच्या दक्षिणेला झुकलेले शिखराचे टोक. म्हणून पायथ्याशी असलेल्या या छोटय़ाशा टुमदार गावाला त्याचे नाव पडले असावे. या शिखरावरूनच फ्रान्स व इटली या देशांची सीमारेषा आखली गेली आहे. सदैव बर्फाच्छादित डोंगर शिखरे असलेल्या या दरीत हवामान सदा मस्त थंडगारच असते. लहानमोठे चढउतार असलेले कोमेर हे गाव आपल्याकडील हिल स्टेशन्सची आठवण करून देते.
फ्रान्समधील शामोनीप्रमाणेच कोमेर हे क्लायंबर्स, हायकर्स, ट्रेकर्स, स्कीअर्स यांची अतिप्रिय जागा. या सर्व धडाडीच्या अॅक्टिव्हीटीजसाठी आलेल्या हौशी लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. लागो डे मिग् या कोमेरपासून ५०० मी. उंचीवर आहे. ल प्लाड् या गावापासून शामोनी येथील हेल ब्रोनर एवढय़ा उंचीपर्यंत टेलीफेरीकने व पुढे स्की लिफ्टने पायथ्याशी पोहोचलो. हिवाळ्यात येथून स्की करत गावापर्यंत येतात. या लेकमधील पाणी हिवाळ्यात गोठते; शिवाय आसपासच्या डोंगरांवरून हिम उतरते. उन्हाळ्यात ते वितळते, पाण्याची पातळी वाढली की एप्रिल-मेमध्ये लेकच्या अवतीभोवती लहान झुडपांवर रंगीत फुले फुलतात. त्यामुळे ठिकाण अतिशोभिवंत दिसते. लहानलहान मासे व बेडकांनी तळे भरून जाते. कोमेरवर डोकावणारा, सर्वाकडे लक्ष देणारा म्हणून माँट शेतीफ् याला हायकर्स व्हर्जिन मेरी म्हणतात.
कोमेर टुरिस्ट शहर असले तरी लोक जरा आळशीच म्हटले पाहिजेत. सकाळी दहा वाजल्याशिवाय दुकानं उघडणार नाहीत. दुपारी लंच १ ते ४ पर्यंत, वामकुक्षी झाल्यावर आरामात व्यवहार चालू. परत रात्री आठ वाजता बंद. अगदी मोठमोठी सुपर मार्केट्स, पोस्ट, बँकाही हेच वेळापत्रक पाळतात. शाळांचा लंचब्रेकही दोन तास. डिनर जरा लेटच, पण रेंगाळणारे. म्हणजे एकामागून एक कोर्सेस असणारे. रुचकर फ्रेंच वाइन्स, रोस्ट डिशेस, क्रेंब्रुलीसारखी डेझर्ट्सबरोबरच ऑथेंटिक पिझ्झा, पास्ता चाखायचा असेल तर या भागांना भेट द्यायलाच हवी.