ऐंशी नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटात एक सोकॉल्ड कॉमेडीची सुरुवात झाली. परिस्थितीजन्य फुटकळ विनोद, वात्रट धिंगाणा आणि काहीसा पाचकळपणा यातून दिसायचा. एक टिपिकल फॉर्म्युला त्यातून तयार झाला होता. हा लोकप्रिय फॉर्म्युला होता. कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटाने नेमका हाच फॉर्म्युला वापरला आहे.
शशी देशपांडे या उद्योजकाच्या आयुष्यातील बायकांचा तिढा दाखवणारं हे कथानक आहे. देशपांडेना दोन बायका असतात. पण दोघींनाही सतत संशय असतो की आपला नवरा अन्य मुलींच्या मागे लागला आहे. आणि त्याचवेळी देशपांडेच्या घरी दोन्ही बायका नसताना तिसरी नायिका येते. ती देशपांडेच्या गळ्यात पडते, त्यांचे दोघांचे फोटो काढते असं बरचं काही होत राहतं आणि तेवढ्यात देशपांडेची दुसरी बायको घरी येते. लंडनहून येणारी भाचीदेखील येते. आणखीनही काही पात्रं येतात. आणि मग सुरु होतो लपाछपीचा खेळ.
अतर्क्य वाटणा-या अशा या सा-या गोष्टी यापूर्वीदेखील चित्रपटातून आपण पाहिल्या आहेत. प्रेक्षकांनी त्या डोक्यावरदेखील घेतल्या आहेत. किंबहुना वर उल्लेख केलेल्या काळातील टिपिकल विनोदी फॉम्युर्लादेखील लोकप्रिय झाला आहे. पण या फॉर्म्युलाचा क्षीणपणा लवकरच उघडा पडला. कॅरी ऑन पाहताना हीच जाणीव वारंवार होते. अंतिमत: थोडेसे जरी लॉजिक वापरायचे ठरवले आणि चित्रपटासाठी दिग्दर्शकाला काही लिबर्टी द्यायची ठरवली तरी पडद्यावर निव्वळ धिंगाणाच जाणवत राहतो.
फार्स म्हणावा अशी काहीशी ही कथा आणखीन चांगल्याप्रकारे मांडता आली असती. पण केवळ वात्रटपणाच दाखवायचा असे ठरवूनच हे सारं काही बेतलंय की काय असे चित्रपट पाहताना वाटत राहते. वास्तव पातळीवर न घडणारी कथा दाखवताना काही घटकांचा विचार हा जाणीवपूर्वक करावा लागतो. तो नेमका येथे दिसत नाही. त्यामुळे अनेक चांगले प्रसंग बटबटीत होतात. नव्या चेह-यांना संधी मिळाली ही त्यातल्या त्यात उजवी बाजू. पण त्याचबरोबर जाणीवपूर्वक आलेल्या अनेक संवाद आणि प्रसंगांमुळे हे सारं कथानक विपरीत दिशेला जाताना दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज हा फॉर्म्युला पूर्णत: बाद झालेला आहे. असा फॉर्म्युला वापरायला बंदी नाही. पण तो वापरताना त्यात जर नावीन्य दाखवता आले असते तर नक्कीच ही कथा आणखीन चांगल्याप्रकारे दिसली असती. नेमकी सिनेमाकर्त्यांनी ही मेहनत घेतली नसल्याचे स्पष्ट जाणवते.
अथर्व 4 यु रिकिएशन अँड मिडिया प्रा लि. प्रस्तुत,
निर्माता : गणेश रामदास हजारे
दिग्दर्शन : विजय पाटकर
गीते : मंगेश कंगणें
संगीत : चिनार-महेश आणि निखिल ठक्कर
कलादिग्दर्शन : उज्वल जगताप
कथा : हेमंतएदलाबादकर
संकलन : सतीश पाटील
छायांकन : शब्बीर नाईक
नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार
कलाकार – पुष्कर श्रोत्री, मानसी नाईक, हेमलता बने, सागर कारंडे, संजय खापरे, सीमा कदम, स्नेहल गोरे, जयवंत वाडकर, विजय कदम