ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटात अँग्री यंग मॅनचा जन्म झाला. सर्वसामान्यांना त्यांच्या भावना मांडणारा, त्यांची बाजू घेवून लढणार एक मसिहा हवा असायचा. कधी तो सामान्यामधूनच परिस्थितीमूळे तयार व्हायचा, कधी तो एखादा गुंडागर्दी करणारा बडा दादा देखील असायचा. दुष्टांना धडा शिकवणारा, गरीबांचा तारणहार असायचा. त्याची सर्व गैर कामं त्याने समाजासाठी केलेल्या कामाआड खपून जायची. हा फॉम्र्युला सुपरडुपर हिट ठरला. तोच अलिकडच्या काळात दाक्षिण्यात चित्रपटांनी उचलला. त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांनी त्यात मसाला भरला. अतिभडक रंग, भपकेबाज गॉगल्स, कोणत्याही गाण्यात जथ्थ्यांनी नाचणारा चित्रविचित्र समूह. हाणामारीचा प्रत्येक प्रसंग स्लो मोशनमध्ये, फुल्ली अ‍ॅक्शपॅक्ड असा.  इतर सर्व कलाकारांचे रंग काहीही असोत, नायिका मात्र एकदम चकचकीत मेकअप केलेली. महत्त्वाचं घागरा-चोळी, परकर-पोलक प्रकारातले कपडे आणि वर झिरमिरित दुप्पटा. दाक्षिण्यात्यांच्या लोकप्रिय चित्रपटांचे हे अगदी व्यवच्छेदक लक्षण. याचे मराठीतले थेट रुपांतर ‘गुरु’मध्ये दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिण्यात्यांची इतकी री ओढाल्यानंतर थोडफारं मराठी नाविन्य उरते ते केवळ संवादांमध्ये. कारण ते मराठीत आहेत म्हणून. चटपटीत म्हणावे असे आणि पुढील एकदोन महिने तरुण पोट्ट्यांच्या तोंडी रुळतील असे हे संवाद हा एक भाग सोडला तर इतर बाबतीत फारसं काही नवीन आढळत नाही. भावभावनांचा मसाला, खलनायकाचा बाष्फळ म्हणावा असा बालिश क्रूरपणा, टिपिकल सेट, झगमगाट, दारिद्रय मांडण्याची तीच तीच पद्धत आणि शेवटी एकदम सत्याग्रह. सगळंच फिल्मी.

लोकप्रिय चित्रपट करणं काही वाईट नाही. त्यात मसाला असावा हेदेखिल मान्य करुया. पण निदान वास्तवाशी काहीतरी संदर्भ असावा. कथानकात आजचं वास्तव दाखवताना जे तारतम्य दाखवले आहे ते तारतम्य किमान कपडेपटाबाबत थोडे तरी असावे. गावातील दादाच्या टोळक्यातील धोतर नेसलेली पैलवान मंडळी ही आज महाराष्ट्रात नेमकी कुठे दिसतात? परकर पोलक आणि वर झिरमिरित दुपट्टा हा तर यापुढे ग्रामीण नायिकेचा अधिकृत गणवेशच आहे, असे या चित्रपटानंतर जाहीर करायला हरकत नाही.

स्पेशल इफेक्टसचे अनेक प्रयोग यात झाले आहेत. लोकप्रियतेसाठी ते फायदेशीरदेखील ठरतील. पण सायकलवरचा पाठलाग सेफिया टोनमध्ये दाखवून दिग्दर्शकाने नेमकं काय साधलंय हे कळत नाही. हे दृश्य थेट चार्लीचॅप्लिन काळातील चित्रपटांची आठवण करुन देते. कसलाही संदर्भ नसताना मध्येच येणारे हे रुपांतरण प्रचंड खटकते. कलाकारांच्याबाबतीत फार काही वेगळेपण जाणवत नाही. अंकुश मागच्या पानावरुन पुढे चालू असेच म्हणावे लागेल. उर्मिला कानेटकरला तर चकचकीत आणि बडबडीत नायिका एवढचं काम ठेवलं आहे.

मसालापट असो नाही तर अन्य कोणाताही प्रकार असो, दिग्दर्शकाची म्हणून स्वत:ची एक छाप चित्रपटात दिसायला हवी. गुरुमध्ये हे अजिबात जाणवत नाही. गुरु जर उद्या एखाद्या दाक्षिण्यात भाषेत डब करुन प्रदर्शित केला तर सहज खपून जाईल इतकं साध्यर्म आहे. चित्रपट हा काही बोधपट नसावा, आमची चार घटका करमणूक व्हावी असे जरी एका मोठ्या वर्गाचे म्हणणे मान्य केले तरी डोकं बाजूला ठेवूनच चित्रपट पाहायचा असतो की काय असं गुरु पाहील्यावर नक्कीच वाटू शकते.

कथासूत्र – गुरु म्हणजे अंकुश चौधरी या गावाकडच्या तरुणाने मुंबईत अनेक उचापत्या (झोल) करत बस्तान बसवलेलं असते. लोकांच्या कल्याणासाठी तो हे सारे उद्योग करत असतो. एकदा पोलिस पाठलागावर असताना तो ज्या इमारतीत लपलेला असताना तो एका व्यक्तीचा खून होताना पाहतो. खून करणारे लोक त्याच्या मागे लागतात. त्यांचा ससेमिरा सोडवण्यासाठी तो काही दिवस परत त्याच्या गावी जातो. तर गावात येणाºया मेगा सिटी प्रकल्पाला गावकºयांचा विरोध सुरु असतो. त्यातून एक संघर्ष उभा राहतो, गुरुकडे त्याचे नायकत्त्व येते. तो त्यांचा मसिहा बनतो.

निर्माते – इरॉस इंटरनॅशनल, बॅगपाईपर सोडा, ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेवन.
दिग्दर्शक – संजय जाधव
कपडेपट – हर्षदा खानविलकर, अश्विनी कोचरेकर
संगीत – पंकज पडघन, अमितराज
संकलक – अपूर्वा मोतीवाले-सहाय, आशिष म्हात्रे
कलादिग्दर्शक – सतिश चिपकर
पटकथा संवाद – आशिष पाथरे
व्हीज्युयल इफेक्टस – प्रसाद सुतार
अ‍ॅक्शन – बंटी
गीत – गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन
नृत्यदिग्दर्शक – उमेश जाधव
कलाकार – अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, मुरली शर्मा, अविनाश नारकर, स्नेहा रायकर, रविंद्र मंकणी.

मराठीतील सर्व सिने रिव्ह्यू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru marathi movie review