तसं पाहिलं तर सर्वांनाच माहीत असणारं असं हे वैश्विक सत्य. पिढीगणिक होणारा बदल (चांगला की वाईट हा वेगळा मुद्दा.) त्या त्या काळानुसार प्रत्येक पिढीत तो होतोच. त्यावर त्या त्या पिढीची छाप असते. कोणी आहे त्यावरच स्वत:चं वर्चस्व निर्माण करतं, कोणी जे आलं ते स्वीकारतं, कोणी त्यातूनच एखादा नवा पर्याय शोधतं, कोणी बंडच करून निघून जातं, कोणी आहे त्यातच स्वतंत्र अस्तित्व दाखवतं तर कोणी स्वत: वेगळी वाट शोधतं. त्यात कधी संघर्ष असतो कधी संमजसपणा तर कधी बेदरकरारपणा. नेमकं हेच सारं कोणताही आक्रस्ताळेपणा, बटबटीतपणा न करता साकारलेलं चित्रपटीय रूपांतर म्हणजे ‘राजवाडे अॅण्ड सन्स.’
कुटुंबव्यवस्था विशविशीत झाली आहे, प्रत्येकजण स्वतंत्र आहे वगैरे गोष्टी आता कैक वेळा कैक प्रकारे सांगून झाल्या आहेत. मात्र त्यापलीकडे जात याची मांडणी करतानाच एक वेगळा दृष्टिकोन यात दिसतो. आज एकत्र कुटुंब (आजी-आजोबा, मुलं-मुली, त्यांची मुलं-मुली) ही संकल्पना तशीही फारशी अस्तित्वात नाही. म्हणूनच की काय एकत्रित कुटुंबाची बदलती कथा दाखविताना दिग्दर्शकाला उच्चभ्रू मराठी व्यापारी कुटुंबाचा आधार घ्यावा लागला असावा.
अर्थातच चित्रपटीय तंत्राचा पुरेपूर वापर करून ते उच्चभ्रूपण फारसं अंगावर येऊ देणं हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. संवाद, संकलन आणि दिग्दर्शन ही बलस्थानं म्हणावी लागतील. सादरीकरणातून सहज भाष्य हे खास नमूद करावं लागेल. नवीन इमारत बांधण्यासाठी म्हणून पाडायला घेतलेला वाडा हा यात मध्यवर्ती आहे. तसा हा वाडा थेट पडद्याावर कमी वेळा दिसतो. पण अनेक प्रसंगांत त्याचं अस्तित्व दडलेलं आहे. वाड्यातल्या प्रसंगांसाठी फ्लॅशबॅकमध्ये जाण्याचा स्मरणरंजनाचा मोह दिग्दर्शकानं टाळला हे उत्तमच आहे. तात्पुरत्या नव्या वास्तूत आल्यानंतर या कुटुंबात दिसणारे अनेक छोटे छोटे बदल (वागण्या-बोलण्यातले) वाड्यातल्या पूर्वाश्रमीच्या आणि भविष्याच्या वातावरणाकडे अंगुली निर्देशन करतात. वाड्याचा अगदी चपखल वापर करून काही प्रसंगांतून भावनांचा गुंता, मनातल्या इच्छा-आकांक्षा यांनादेखील वाट करून दिली आहे. तिसºया पिढीने रिकाम्या वाड्याचा आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी केलेला उपयोग, मधल्या पिढीचं हरवून जाणं आणि कुटुंबप्रमुखाने त्याच वाड्यावर उभ्या राहणाºया इमारतीच्या आरेखनावर एकत्र कुटुंब कसं असेल हे मांडणं, यातून प्रत्येक पिढीची थेट दिशाच दिग्दर्शकाने दाखवली आहे.
कवितेतून पुढं जाणारं एकमेव असं गाणं चित्रपटात आहे. पूरक संगीत आणि कवितेची लड उलगडत कथानकाची व्याप्ती आणि कथानक पुढं नेणं त्यामुळे सहजशक्य झालं आहे (अनेक कलाकार असल्यानंतर होणारा पात्रागणिक गाण्यांचा मोह टाळला हे उत्तम.) चित्रपट हा एका अत्यंत उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित व्यापाºयाच्या कुटुंबाभोवती फिरणारा असल्यामुळे त्याला साजेसा असा सारा तामझाम, बटबटीत न होता कसा सहजपणे दाखविता येऊ शकतो हे या चित्रपटातून प्रकर्षानं जाणवतं.
एखाद्याा गोष्टीचं चित्रपटीय रूपांतर असं याकडे पाहता येणार नाही. किंबहुना कुटुंबाच्या कथानकाचा परीघ तसा मर्यादितच म्हणावा लागेल. जरी एका उच्चभ्रू वर्गातील हा सारा पट असला तरी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून तो अनेक सामाजिक आचरणावर, बदलांवर भाष्य करतो. सोशल माध्यमाबद्दलची आबालवृद्धांची क्रेझ (चांगली की वाईट? यावर भाष्य न करता), तंत्रज्ञान वापराची जाणीव आणि पद्धत, जुन्या पिढीला स्वैराचार वाटू शकेल असा नव्या पिढीचा मोकळेपणा, स्वत:च्या शहराच्या चौकटीतला विचार (पुणेकरांना टोले लगावत), एका टप्प्यानंतर बदलाची कसलीच अपेक्षा नसणारा वर्ग, एकाच व्यक्तीचं दुहेरी जीवन, उगाच उरीपोटी सांभाळलेल्या परंपरांची ओझी आणि या सर्वांसोबत सतत असणारी मनातली आंदोलनं, अशा अनेक सर्वव्यापी मुद्द्यांना चित्रपट स्पर्श करतो.
काही संवाद अगदीच छापील वाक्यांप्रमाणे असणं खटकतं. तर काही ठिकाणी उगाच नाट्यमयता आणणारे प्रसंग आहेत. कथेची गरज म्हणून ठीक असले तरी पोलिसांनी तिसºया पिढीतल्या एका राजवाडेला नेण्याच्या प्रसंगातून जो परिणाम साधायचा आहे त्यापेक्षा उगाचच त्यातलं नाट्यच अधिक अधोरेखित होतं.
एकत्रित कुटुंबाची कहानी म्हटल्यावर कलाकारांची गर्दी ही अपरिहार्यच म्हणावी लागेल. पण या गर्दीत उगा कोणी कोणावर कुरघोडी करत नाही. कमीत कमी पण नेमके संवाद असतानादेखील सतीश आळेकर आणि ज्योती सुभाष यांचा भूमिकेला हवा तो वरिष्ठपणा प्रतित होतो. सॅण्डविच झालेल्या पिढीची अगतिकता मधल्या पिढीने (अतुल कुलकर्णी, मृणाल आणि सचिन खेडेकर) नेमकी व्यक्त केली आहे. तिसºया पिढीतल्या सर्वांनीच वयाला साजेशी धम्माल केली आहे. एक-दोन पात्र थोडीशी खटकतात, पण सारा कोलाज जमून आला आहे.
कुटुंबव्यवस्था पूर्वीसारखी राहिली नाही, बदलत आहे असा एक थेट नकारात्मक सूर लागत असताना एका फ्रेमवर मात्र कुटुंबव्यवस्थेतला प्रेमाचा आपलेपणाचा सूर, प्रत्येकाची स्पेस जपत नव्याने सुदृढ होणारे नात्यांचे बंध एका वेगळ्या कुटुंबाकडे सकारात्मक नोटवर नेतात.
वाड्यातून सुरू झालेलं कथानक, एकमजली वाड्याच्या गवाक्षातून दिसणारं पुणं (म्हणजे त्याचं विश्व), त्याचजागेवरच्या अपूर्ण अशा नव्या इमारतीच्या मोकळ्या जागेतून दिसणारं विस्तीर्ण नव्या पुण्यावर (नव्यानं जाणवलेलं) जेव्हा कथानक संपत तेव्हा पिढींच्या बदलाची एक नेटकी इमारत उभी राहिलेली असते.
कथासूत्र –
राजवाडे हे एक सोन्याच्या दागिन्यांचे प्रतिष्ठित असे उच्चभ्रू पिढीजात व्यापारी. तीन पिढ्यांचं मोठं कुटुंब. कुटुंबप्रमुखाची एकप्रकारची हुकूमशाहीच. व्यापार विस्तारासाठी सोयीस्कर भूमिका घेत केलेले सारे व्यापारी आणि घरगुती व्यवहार. तीन-चार पिढ्यांचा नांदता वाडा पाडणार म्हटल्यावर त्यांचं तात्पुरतं अपार्टमेंटमध्ये स्थलांतर होतं. त्यातून मिळालेलं एकप्रकारचं स्वातंत्र्य (?) आणि तीन पिढ्यांमध्ये असलेली कालानुरूप भिन्नता या पाश्र्वभूमीवर एकेक पात्र उलगड जातात. मधल्या पिढीचं एकप्रकारे सॅण्डविचच झालेलं तर, कुटुंबप्रमुख आपल्याच तोºयात. तर तिसरी तरुणाई पूर्णपणे सुटलेली. प्रत्येकाच्या आशा-अपेक्षांचं जग निराळं. त्यातून नेमकं काय होतं हे मांडण्याचा प्रयत्न.
निर्मिती संस्था – यशवंत देवस्थळी आणि कॅफे कॅमेरा
निर्माते-यशवंत देवस्थळी, अतुल कुलकर्णी, सचिन कुंडलकर.
दिग्दर्शन – सचिन कुंडलकर.
कथा, पटकथा, संवाद-सचिन कुंडलकर.
गीत, कविता – तेजस मोडक.
संगीत – देबार्पितो, एड्रियन डिसुझा, तेजस मोडक.
पाश्र्वसंगीत – देबार्पितो.
गायक/ गायिका – शंकर महादेवन, नयनतारा भटकळ, देबार्पितो.
कॅमेरामन-अर्जुन सोरटे.
संकलन-अभिजीत देशपांडे.
कलाकार-सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी,मृणाल कुलकर्णी, अमित्रीयान पाटील, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे, अलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव, सुहानी धडफळे.