एक मस्त लय पकडत चाललेल्या प्रवासात मध्येच दहाबारा गतीरोधकांची पट्टी यावी आणि त्या लयीचा पुरता चक्काचूर झाला तर काय होईल? कथानकाने वेग पकडावा, काहीतरी वेगळं पाहायला मिळावं आणि मध्येच ती लय तुटावी. अंतिमत: सुरुवातीची लय पूर्णत: बिघडून नेमकं काय पाहायचं होतं हेच हरवून जावं असं काहीसं ‘वक्रतुंड महाकाय’ या चित्रपटाबद्दल म्हणता येईल. गणपतीच्या बाहुल्याचा एकाकडून दुसºयाकडे, दुसºयाकडून तिसºयाकडे असा प्रवास, त्यातून समाजातल्या विसंगतीवर, वैगुण्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न, त्याला उपहासाची जोड अशा अंगाने पुढे सरकणारं कथानक निर्णायक टप्प्यांवर मात्र एकदमच वेगळ्या वाटेने भरकटते आणि नेमकं काय मांडायचं हेच त्यात हरवून जातं.
कथानक मराठी चित्रपटासाठी तसं नवीनच म्हणावं लागेल. एक दहशतवादी मंदिरात बॉम्बस्फोट करण्यासाठी गणपतीच्या बाहुल्यामध्ये बॉम्ब ठेवतो आणि तो मंदिरात सोडून देतो. बॉम्बची कळ दाबण्यापूर्वीच एक छोटा मुलगा तो बाहुला उचलून नेतो. हा छोटा मुलगा बेघर आणि काहीबाही कामं करुन जगणारा असतो. त्याला आणि त्याच्या जोडीदाराला पोलीस विनाकारण उचलतात आणि तो बाहुला त्याच्यापासून दुरावतो. आणि मग तोच बाहुला काही ना काही घटनांमुळे एकाकडून दुसºयाकडे, दुसºयाकडून तिसºयाकडे असा फिरत राहतो. तर दुसरीकडे ज्यांनी त्या बाहुल्यात बॉम्ब ठेवलेला असतो ते दहशतवादी तो हस्तगत करण्यासाठी आटापिटा करत असतात. गणपतीच्या बाहुल्याचा हा प्रवास, त्यातून दिसणारं समाजाचं रूप असा हा चित्रपटाचा प्लॉट.
शेवटच्या प्रसंगातील आरती कम गाणं सोडलं तर एकही गाणं नसलेल्या या चित्रपटाचे कथानक सुरुवातीच्या टप्प्यात मस्त वेग पकडते. बाहुल्याबरोबर तुमचादेखील प्रवास सुरू राहतो. दिग्दर्शकाने मांडलेल्या विविध सामाजिक घटनांवर नकळत विचार होतो. वैयक्तिक आयुष्यातील ताणेबाणे, एका गतीमंदाच्या नजरेतून देवाकडे पाहणे, अचानक देवाची प्रतिकृती हातात आल्यामुळे होणारी सामान्यांची प्रतिक्रिया, राजकारण्यांनी केलेला वापर, टिपिकल श्रद्धाळू समाजाचे वाहत जाणे असा हा भाष्यकारक प्रवास दिसतो. पण शेवटच्या टप्प्यावर येताना एका दणक्यात आदळतो. आतापर्यंत सुरु असणारा सारा भाष्यात्मक आणि काहीसा उपहासाकडे झुकणारा प्रयोग एकदम ‘सोकॉल्ड टिपिकिल’ सामाजिक तत्त्वज्ञानाच्या पातळीवर घसरतो. देवाबद्दलच्या समाजातल्या अंध लोकप्रियतेवर भाष्य असं जर दिग्दर्शकाला सुचवायचं असेल तर ते तेवढ्या प्रभावीपणे प्रतित होत नाही.
चित्रपटात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न नक्की झाला आहे. कथानकाला पूरक असे गोळीबंद संवाद अगदी मोजक्या ठिकाणीच येतात. इतरत्र वेळ मारुन नेण्यासारखे झाले आहे. संकलनातील तांत्रिक त्रुटीमुळे विषयाची परिणामकारकता कमी होते. कसलाच आगापिछा नसलेले काही प्रसंग मध्येच येतात. बॉम्ब ठेवणारे नेमके दहशतवादी आहेत, की नक्षलवादी की अन्य कोणी याचा थांग लागत नाही. मुंबईचा वापर करुन सर्वधर्मीय आणि सर्वस्तरीय भाष्य करायचा प्रयत्न झालेला आहे. पण ते मांडणीत परिणामकारकपणे उतरलेलं नाही. धार्मिक आसरा घेऊन कोणतीही गोष्ट आपल्याकडे कशी व्यवस्थितपणे पसरवता येऊ शकते हे मांडण्याचा प्रयत्न जाणवतो जरुर पण तो
भावत नाही.
दिग्दर्शक – पुनर्वसू नाईक
निर्माता –
लेखक – योगेश विनायक जोशी
संगीत – संकेत नाईक, संकर्षण किणी.
ध्वनी – संजय मौर्य, ऑल्विन रेगो, फैसल मजीद
कलाकार – उषा नाडकर्णी, विजय मौर्या, नमन जैन, प्रार्थना बेहेरे, जयंत सावरकर, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे.