मी असं जोशी आडनावाचं जास्त कौतुक करते तेव्हा माझ्या वात्रट मैत्रिणी म्हणतात. जोशी सगळीकडे आहेत. अगदी गुंडसुद्धा बरं का..
आम्ही.. वसुंधरा वसंत जोशी. काय? माझ्या पहिल्याच वाक्याने दचकलात ना? अहो, आम्ही, आम्ही म्हणजे फार बडं प्रस्थ. म्हणजे फार मोठे लोक आहोत. अगदी जमीन-जुमलावाले बरं. बघा प्रत्येक सोसायटीत, चाळीत कुठेही जा. आमचा ‘जोशी’चा एक तरी ब्लॉक असतोच असतो. आठवा बरं तुमच्या सोसायटीत आहे का नाही तो. आमची कुठेही शाखा नाही अशी संकुचित वृत्ती नाही बरं का आमची. आमच्या सर्वत्र शाखा, उपशाखा आहेत. मुंबईत, महाराष्ट्रात, भारतातील प्रत्येक राज्यात, अहो फार काय, परदेशातसुद्धा आमच्या शाखा-उपशाखा आहेत.
तर, असे आम्ही जोशी. अगदी पन्नास-शंभर नावांत आमचे नाव नाही असे होणे नाही. आम्ही जोशी गायक आहोत, वादक आहोत, नाटकात आहोत, सीरियल्समध्ये आहोत, सिनेमात आहोत, पडद्यावर आहोत, पडद्यामागे आहोत, चित्रकार आहोत, राजकारणात आहोत, हिऱ्यासारखे चमचमत आहोत, नाटककार आहोत, लेखक आहोत. तर असं आमचं जोशी खानदान. चमकणाऱ्या जोशीनी ठरवलं तर, अहो आमचं ‘जोशी’ व्हिलेजसुद्धा होऊ शकतं, बरं का.
तर मंडळी माझं नाव ऑफिसमध्ये व्ही. व्ही. जोशी असं झालं. जोशी दोन-तीन असत. त्यामुळे सर्वजण इनिशिअलनं हाक मारत असत. मी त्या ऑफिसला असताना नेमकी एक ज्युनिअर व्ही. व्ही. जोशी आली. तिचं नाव वंदना विनय जोशी. ती अगदी नवी. त्यात लग्न ठरलेली. झालं व्ही. व्ही. चे फोन फार वाढले. फोन आला की ती ५०-१०० स्टाफमध्ये नवीन, त्यामुळे एवढी माहितीही नव्हती. आणि मी तिथे तीन-चार वर्षे होते. त्यामुळे तो नव्या नवलाईचा प्रेमभरा फोन ‘व्ही. व्ही. तुझा फोन’ म्हणून माझ्या हाती येई. तो आवाज अगदी प्रेमभऱ्या अगदी हळू बोलू लागे. ‘ए, आपण आज वरळी सी-फेसला जाऊ या का? तू कितीला येशील?’ मी मात्र अगदी संभ्रमात! आज त्यांना एवढा वेळ कसा मिळाला माझ्याशी बोलायला. बरं आवाजही बऱ्यापैकी त्याच्यासारखा, त्यात फोनची खर्र खर्र होतीच. मी- ‘हॅलो, आपण कोण बोलताय?’ पलीकडचा आवाज, ‘वंदू. माझा आवाज ओळखला नाहीस का?’ एवढं ऐकलं आणि लगेच लक्षात आलं, फोन व्ही. व्ही. जोशी ज्युनियरचा होता.
आमचे प्रत्येक सोसायटीत ब्लॉक आहेत म्हटलं ना! तर चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी बाजारात, बागेत वगैरे जाऊन संध्याकाळची घरी परतले. तर मुलगा-मुलगी म्हणाले, ‘‘आई तू तांदूळ सांगितले होतेस का?’’ – नाही रे. आहेत की तांदूळ घरात. एक ५० किलो बासमतीचं पोतं- विथ पेडच्या रिसिटबरोबर आलेलं. फक्त जोशी आडनावाचा फायदा बरं हा. मुलीने म्हटलं, ‘आई बाबांनी नसेल ना सांगितल?’ ते आल्यावर तेही विचारून झालं. मग त्या सिल्व्हरवाल्याच्या फोनवर फोन करून कळवलं. पाच मिनिटांत तो येऊन सॉरी, सॉरी, थँक्यू थँक्यू म्हणत एक पोतं बासमती घेऊन गेला. बिल्डिंगचं नाव न वाचता, बाजूची ज्ञानदीप समजून आला आम्रपालीत. आता जोशी आम्ही होतोच. प्रामाणिक जोशींनी बासमती परत केला.
एकदा असेच आमच्या पुढच्या बििल्डगमधील जोश्यांचे पत्र आमच्याकडे आले. मजकूर होता, ‘आत्या, तू आता तिथे राहू नकोस. तुझ्या घरातील तुला फारच त्रास देत आहेत. तू सरळ कोकणात ये. काळजी करू नकोस. विन्या. तुझा भाचा.’ या पत्राने मात्र मी घरातल्यांना गमतीने, त्रास दिलात तर कोकणात जाते आता माझ्या विन्याकडे असं म्हणायचे.
तर असे आम्ही सगळीकडे मुरलेले जोशी. मी असं जोशी आडनावाचं जास्त कौतुक करते तेव्हा माझ्या वात्रट मैत्रिणी म्हणतात. जोशी सगळीकडे आहेत. अगदी गुंडसुद्धा बरं का.. चोरी करणाऱ्या बायकांमध्येसुद्धा अगदी गळय़ातलं खेचणाऱ्या डोंबिवलीच्या जोशी आहेत. पण चांगल्या बासमतीमध्ये एक-दोन गारा असणारच ना! त्या जरा बाजूला कराव्या आपण, खरं ना!