तो महत्त्वाकांक्षी, यशासाठी धडपडणारा, तीसुद्धा करिअरिस्ट वुमन’ आणि त्यांचं प्रेम जमतं आणि यथावकाश लग्नही होतं, मग काय काय होतं, दोघंही आपापल्या करिअरमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचं दोघांचं लग्न टिकून राहतं का, की आणि काही वेगळं घडतं.. अशी आजच्या काळाच्या जोडप्याची सरळसाधी थेट गोष्ट दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी आपल्या नव्या चित्रपटातून मांडली आहे. नायकाचे नाव आहे ‘गुरू’ आणि नायिकेचे नाव आहे ‘पौर्णिमा’ असे मिळून चित्रपटाचे शीर्षक ‘गुरू पौर्णिमा’ असे केले, अशी माहिती दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी दिले.
चित्रपट तसे पाहिले तर प्रेमकथापट प्रकारातला आहे. परंतु, गुरू आणि पौर्णिमा यांच्यात साधारण दहा वर्षांचे अंतर आहे हे या प्रेमकथापटातले वैशिष्टय़ म्हणता येईल. सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ सांगताना मोहिते म्हणाले की, उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर अशी जोडी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘जोगवा’नंतर उपेंद्र लिमयेने ‘यलो’ चित्रपटात साकारलेला स्विमिंग प्रशिक्षक गाजला. सई ताम्हणकरने ‘सौ शशी देवधर’ चित्रपटात साकारलेली ‘शशी देवधर’ही लोकांना आवडली होती. आता सई ताम्हणकर-उपेंद्र लिमये ही जोडी प्रथमच ‘गुरू पौर्णिमा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे त्यांची रुपेरी पडद्यावरची ‘केमिस्ट्री’ कशी जुळून आली आहे ते पाहणे प्रेक्षकांसाठी ‘ट्रीट’ ठरू शकते. म्हणूनही या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
खरे सांगायचे तर हा फक्त प्रेमकथापट नाही. तर नात्यांवर आधारित चित्रपट आहे, असे सांगताना गिरीश मोहिते म्हणाले की, नुकतेच लग्न झालेले तरुण जोडपे. आजच्या काळात निदान महानगरांमध्ये तरी नवरा-बायको दोघेही करिअरिस्ट असलेले आपण पाहतो. वैयक्तिक आयुष्य आणि करिअर सांभाळून घरही सांभाळणे, नाती जपणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे अशा खूप बारीकसारीक गोष्टींचा विचार आणि कृती आज सर्वच तरुण जोडप्यांना करावी लागते. गुरू आणि पौर्णिमा या दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांचा आलेख मोठा आहे. त्यांच्यातील वयाचे अंतर हा महत्त्वाचा धागा कथानकात आहे. एवढेच नव्हे तर उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्यासाठीही या व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान मोठे होते. ते त्यांनी कसे पेलले आहे, यशस्वी करून दाखविले आहे ते प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाच समजेल, असेही मोहिते यांनी नमूद केले.
अलीकडे चित्रपटांच्या शीर्षकांबरोबरच ‘टॅगलाइन’ देण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. तशी या चित्रपटाची ‘टॅगलाइन’ आहे ‘एक लव्हेबल गोष्ट’. प्रेमकथापट म्हटले की हमखास गाणी-संगीत हा चित्रपटाचा अविभाज्य भाग बनतो. त्याबद्दल सांगताना दिग्दर्शक म्हणाले की, संगीतकार अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीत दिले असून ‘ऐकावी वाटते’, ‘कल्ला मस्ती ऑन द वे’ यासारखी गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, स्वरूप भालवणकर, संदीप फबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रवींद्र यांसारखे गायक-गायिका आहेत. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पहिला ‘डेली सोप’ म्हणून गाजलेल्या ‘समांतर’ या आपण दिग्दर्शित केलेल्या मालिकेचे पटकथा-संवाद लेखक जितेंद्र देसाई या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत आहेत. त्याचप्रमाणे उपेंद्र लिमयेसोबतही आपण त्या मालिकेनंतर प्रथमच एकत्र काम करीत आहोत.
चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्या दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. म्हणून त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, चार-पाच महिने आधीच आम्ही तारीख निश्चित केली होती. त्यामुळे आता त्यात बदल करता येणार नाही. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य यांनी या चित्रपटात गुरूच्या आईची भूमिका साकारली असून अन्य छोटय़ा छोटय़ा पण महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी आम्ही गोव्यातील नवे कलाकार घेतले आहेत. चित्रीकरण गोव्यात केले असून तेथील ‘एलपीके’ या क्लबमध्ये एक गाणे चित्रित केले आहे. गोवा-मुंबईत इनडोअर चित्रीकरण केले असले तरी राहती घरे आम्ही दाखवली आहेत, त्यामुळे लोकेशन्समधला तोचतोचपणा टाळला आहे. त्यामुळेही चित्रपटाला ‘फ्रेश लुक’ आहे, असेही ते म्हणाले.
संगीतमय ‘गुरू पौर्णिमा’
तो महत्त्वाकांक्षी, यशासाठी धडपडणारा, तीसुद्धा करिअरिस्ट वुमन’ आणि त्यांचं प्रेम जमतं आणि यथावकाश लग्नही होतं, मग काय काय होतं, दोघंही आपापल्या करिअरमध्ये मग्न झाल्यामुळे...
First published on: 25-07-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical guru purnima