नृत्यात घुंगरूंचं स्थान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. नृत्य करण्याआधी नटराजासोबत घुंगरूंचंही पूजन केलं जातं. छन्छन् असा आवाज करणाऱ्या घुंगरूंमुळे पायांना विशेष शोभा येते.
भारतीय नृत्यात नटराजाला आद्यदेवता मानून नृत्य करण्याआधी त्याची पूजा, आराधना केली जाते; नृत्यात तितकेच महत्त्वाचे स्थान आहे ते – घुंगरूंचे! नृत्य करण्याआधी आणि कोणत्याही कार्यक्रमाआधी, दसरा, गुरुपौर्णिमेसारख्या शुभदिनी नटराजाबरोबरच घुंगरूंनादेखील पुजले जाते. भारतीय शास्त्रीय नृत्यात तर घुंगरू ईश्वरस्थानी मानले गेले आहेत. लहानपणी पायात पैंजण घालून चिमुरडय़ा मुली चालल्या, धावल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नृत्य केल्याचा आनंद दिसतो. कारण गाण्यावर थिरकणाऱ्या पायांची शोभा पैंजणाने द्विगुणित होते. बऱ्याच लहान मुली जेव्हा नृत्याच्या वर्गाला जाऊ लागतात, तेव्हा त्यांच्यासाठी ‘घुंगरू’ हे एक मोठं आकर्षण असतं!! सर्व रसिकप्रेक्षकांना आकर्षित करण्याची जादूई किमया या घुंगरूंमध्ये असते. केवळ भारतीय शास्त्रीय नृत्यातच नाही तर भारतीय लोकनृत्यातसुद्धा घुंगरांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. जर घुंगरू/ चाळ नसतील तर लावणीला बहार कशी येईल? ढोलकीच्या तालावर पकडलेला घुंगरूंचा ठेका लावणीला चार चांद लावतो, तर गोंधळातसुद्धा घुंगरू जोश आणि ऊर्जा आणतात. खरंतर घुंगरू हे वाद्य म्हणूनही अनेक गाण्यांमध्ये साथीला वापरले जाते. इतके छोटे दिसणारे वाद्य पण त्याचा योग्य वापर केला तर गाण्याची मजा वाढते!!
कथ्थक या नृत्यप्रकारासाठी तर घुंगरू अविभाज्य घटक आहे. एका पायात ५०पासून ते १५०-२०० पर्यंत घुंगरू घालून कथ्थक नृत्य केले जाते. कथ्थक नृत्याची विशेषत: म्हणजे चक्कर आणि तत्कार (पदन्यास).. विविध बोल, लयकारी पदन्यासातून दाखवली जातात, घुंगरू ते बोल स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्या बोलांचं सौंदर्य वाढवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढे घुंगरू घालून तत्कार करणं अजिबात सोपं नसतं, त्यासाठी बरीच मेहनत आणि रियाज महत्त्वाचा असतो आणि सर्व ज्येष्ठ कलाकार या घुंगरूंची पूजा करून, त्यांचा चांगला सराव करूनच प्रसिद्ध झालेले बघायला मिळतात. पं. बिरजू महाराज, पं. राजेंद्र गंगानी, पं. चित्रेश दास, पं. दुर्गालाल असे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या उच्च लयीतील तत्कार, घुंगरूंचा उत्तम वापर यामुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवत. शंभर घुंगरूंमधून केवळ एका घुंगरूचा आवाज काढून दाखवण्याच्या हातोटीमुळे या कलाकारांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळत असे, त्यासाठी पायाच्या हालचालींवर कमालीचा ताबा असणं आवश्यक आहे. कथ्थकमध्ये घुंगरूंचं महत्त्व पदन्यासाबरोबरच तबल्याबरोबरच्या जुगलबंदीमध्ये दिसून येतं! विविध बोल तबल्यावर तबलजी वाजवतात व तेच बोल घुंगरूंच्या माध्यमातून नर्तक पायाने वाजवतात आणि मग शेवटी तबला व घुंगरू हातात हात घेऊन जोडीने जावे तसे एकत्र वाजू लागतात, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट नाही केला तरच नवल.. पं. बिरजू महाराजजी तर तबला आणि घुंगरू यांना जवळचे मित्र असे संबोधतात आणि बऱ्याच तिहाई, इतर बोलांमध्ये या दोन मित्रांची कहाणी तबला व घुंगरू यांच्या साहाय्याने रंगवून सांगतात, तेव्हा सर्व रसिकप्रेक्षक असे बोल व सादरीकरण पाहून मंत्रमुग्ध होऊन जातात. कथ्थकमध्ये मुख्यत्वे तीन घराणी आहेत, घुंगरूंच्या आकार, संख्येतदेखील घराण्यांप्रमाणे बदल होत जातात. बनारस घराण्याचे घुंगरू आकाराने मोठे असतात, जयपूर घराण्यात लयीला अधिक महत्त्व असल्याने ते अधिक घुंगरू घालून पदन्यास करतात तर लखनौ घराण्यात मध्यम आकाराचे साधारण एका पायात शंभर घुंगरू घालण्याची पद्धत आहे. घुंगरूंचा आकार, लांबी, बांधण्याची पद्धत, संख्या या सर्वच गोष्टींमुळे त्याच्या आवाज व स्वरामध्ये फरक दिसून येतो. कथ्थकमध्ये दोरीमध्ये/ दोरीच्या वेणीमध्ये हे घुंगरू गुंफले जातात तर भरतनाटय़म, कुचीपुडी, इ. शैलींमध्ये पट्टय़ावर घुंगरू बांधलेले असतात. कधी कधी चामडी पट्टय़ाचा वापर केला जातो. कथ्थकपेक्षा इतर शास्त्रीय शैलींमध्ये कमी घुंगरू वापरले जातात. पण प्रत्येक नृत्यशैलीसाठी घुंगरूंची पूजा करणं मात्र समान प्रथा आहे.
अनेक भारतीय गाण्यांमध्येसुद्धा घुंगरूंचा उल्लेख केला आहे. ‘फाल्गुनी पाठक’चं ‘मै ने पायल है छनकायी’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं तर ‘दे धक्का’मधल्या ‘छम छम पायी वाजे घुंगर, गिरकी घेता फिरते अंबर’वरतीसुद्धा अनेकांनी ताल ठरला.. अभिसारिका नायिकेची व्यथा ‘पायल कि झनकार बैरानिया, झन झन बाजे कैसे बोलू, पिया के मिलन को जाऊँ अब मै’ अशा सार्थ शब्दात मांडतानादेखील लेखकाने घुंगरूंचा आधार आणि संदर्भ वापरला आहे. मानवी दु:ख, यातना दाखवायलादेखील ‘घुंगरू की तरह बजता ही रहा हू मै’ या गाण्यात घुंगरूंचा प्रतीकात्मक वापर केला आहे. ‘पायल की झनकार’ आणि नटराज गोपीकृष्ण असलेल्या ‘झनक झनक पायल बाजे’ या नृत्यावर आधारित चित्रपटांची नावेदेखील घुंगरूंशी संबंधितच आहेत. नृत्य आणि घुंगरू याचं एक अतूट समीकरण आहे! त्यामुळेच प्रत्येक नर्तकीसाठी घुंगरू हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो.
अनेक कलाकार वर्षांनुर्वष एकच घुंगरू वापरतात, आपल्या घुंगरूंच्या बाबतीत ‘पजेसिव्ह’ असलेलेदेखील अनेक नर्तक आहेत. स्वत:चे घुंगरू ते इतर कुणाला वापरायला देत नाहीत, यामध्ये कदाचित त्यांना त्यांच्या घुंगरूंची असलेली अतिकाळजी दिसून येते. गुरुपौर्णिमा, दसरा, अरंगेत्रम अशा शुभदिनी गुरू घुंगरूंची पूजा करून त्यांना मंतरतात असेही मानले जाते. हे घुंगरू घातलेले असताना चप्पल घालून फिरून त्याचा अवमान करू नये, असाही प्रघात बहुतांशी कलाकार पाळताना दिसतात. हे घुंगरू बांधणेदेखील एक कला आणि आणि जिकिरीचे काम आहे. सर्वच कलाकारांना घुंगरू बांधता येत नाहीत. पण स्वत:चे घुंगरू स्वत: बांधता येणंदेखील आवश्यक ठरतं; कारण बाहेरगावी कधी कार्यक्रमानिमित्त गेले असता हे घुंगरू सुटले, तुटले तरी कलाकाराला ते बांधता येत असतील तर आयत्या वेळेला पंचाईत होत नाही. या घुंगरूंची काळजी घेणंही कलाकाराची जबाबदारी असते!
पाण्यात गेले किंवा दमट हवेत ठेवले तर ते काळे पडतात, घुंगरू नेहमी स्वच्छ आणि कोरडय़ा जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच घुंगरू काढल्यानंतर ते नीट गुंडाळून ठेवावे, तसेच घुंगरूंची दोरी सैल झाली असेल तर वेळीच ते परत बांधून घ्यावेत. कारण कार्यक्रमामध्ये घुंगरू सुटले किंवा तुटले तर फारच गोंधळ उडतो. परफॉर्म करताना एखादा घुंगरु पडला तरी तो नमस्कार करुन उचलला जातो. ह्य़ा छोटय़ा गोष्टींमधूनही घुंगरुचं नृत्यातील पावित्र्य दिसून येतं. बरेच जण रियाझाचे आणि कार्यक्रमाचे घुंगरू वेगवेगळे ठेवतात.
थोडक्यात काय तर नर्तकांसाठी घुंगरू ही देवता आहे, एक मौल्यवान आभूषण आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं, योग्य वापर करणं आणि मान राखणं हीदेखील कलाकाराचीच जबाबदारी आहे..
घुंगरूंमधून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरींनेदेखील मन प्रसन्न होते व सकारात्मक ऊर्जा मिळते. नर्तक आणि घुंगरू यांच्यामधील दुवा बळकट होण्यासाठी नर्तकाने घुंगरूंच्या ध्वनीबरोबर एकरूप होऊन साधना केली तर एका अलौकिक आत्मिक आनंदाची अनुभूतीदेखील कलाकाराला घेता येऊ शकते!!
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com