पाण्यातलं आमचं प्रतिबिंब आम्ही कितीतरी वेळा पाहिलं. पण विशेष पाहण्यासारखं काही नव्हतं. स्वत:वरच फिदा होणं तर हास्यास्पदच झालं असतं. म्हणूनच ‘अभ्यासिकेत’ नार्सिससबद्दल मला विशेष कुतूहल आणि त्या कोवळय़ा वयात नवलही होतं. ग्रीक दंतकथेतला ‘नार्सि’ स्वत:वर लट्ट झाला. स्वत:च्या रंगरूपावर भाळला. तो असेलही फार देखाणा, पण या अनोख्या वेडामुळे त्याला एकही स्त्री आवडेना.
अशा तऱ्हेचं आत्मप्रेम हा समलैंगिकतेचाच एक प्रकार आहे हे प्रोफेसरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आरशासमोर फार रेंगाळू, मुरडू लागला तरी आपण आपल्या पप्याला ओरडतो. कारण तो बाप्या असतो. पण नार्सिसस ‘स्वत:साठी’ इतका झुरला की, खंगत जाऊन शेवटी त्याचं नार्सिससच्या फुलात रूपांतर झालं. ते कोमल फूल पुन्हा पाण्यातली स्वत:ची नाजूक प्रतिमा बघू लागलं. आजही ते तेच करते. ग्रीक संस्कृतीत ‘शरीरसौष्ठव आणि पर्यायी लैंगिकतेलाही स्थान होतं हे कलेचा इतिहास वाचतानाही सहज कळतं.
आज लखलखत्या बडय़ा शहरात एखादा नार्सिसस ‘उगवला’ तर त्याची किती कोंडी, घुसमट होत असेल? कुणी त्याला स्वत:लाच कुरवाळताना पाहिलं तर तो वाळीत पडेल. नार्सिसस काही वेडाखुळा नव्हता. मॉडेलिंग किंवा अभिनय करणारं एखादं जवान पोरगं स्वत:ची नको तेवढी काळजी घेत, ऐटबाज बढाया मारत स्वत:वर फोकस ठेवतं तेव्हा त्यात नार्सिससचा अंश असतो. पुरुषाला स्त्रीदेहाचा पडणारा मोह प्रजोत्पादन आणि वंशसातत्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे, पण व्यायामशाळेत जाणारा एखादा राजू स्वत:च्या फार प्रेमात असेल, तर त्याचंही समुपदेशन करावं लागेल. त्याला तेच आवडत राहिलं, योग्य वाटलं, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? या नव्या नार्सिससने आत्महत्या करण्याचं, निराशेच्या भोवऱ्यात गडप होण्याचं कारणच नाही. आपलं फुलात (की, ‘फुलराणी’त?) रूपांतर होईल असलं स्वप्नरंजन तर फारच अवास्तव ठरेल. ‘नार्सि’ने ठरवावं की, हे जे वेगळेपण आहे, ते त्याच्यापुरतं, त्याच्यासाठी असेल. समाजात त्याचं काही उपद्रवमूल्य निर्माण होणार नाही. कारण समाजाने नाकारलेल्या माणसाची हुशारी नकारात्मक आणि असामाजिक अंगानेही वाटू शकते. मग ते नार्सिससचं सुमन नसतं. काटेरी निवडुंग बनतो.
आजच्या जिंदगीत लैंगिक असुरक्षितता व लैंगिक आरोग्याला धोके आहेत. अनोळखी पार्टनर गाठण्यापेक्षा हा ‘नार्सिसस’ स्वत:मध्येच मग्न राहिला, तर त्यालाही धोका नाही आणि इतरांनाही नाही. नार्सिसस बदलून ‘स्ट्रेट’ होऊ शकेल का?
response.lokprabha@expressindia.com